'नाद' करायचा हाय !

'नाद' या आपल्या पदार्पणातील शॉर्टफिल्मने चित्रपट क्षेत्रात दमदार पाऊल टाकणा-या वैभव दाभाडे याची साहित्य संस्कृतीसाठी एक्सक्लुझिव मुलाखत  
 
 १. ' नाद' या तुझ्या शॉर्टफिल्मची सध्या विशिष्ट वर्तुळात चर्चा आहे. पदार्पणातच अशी शॉर्टफिल्म तुला करावीशी वाटणं, ही अतिशय आश्वासक बाब आहे. शॉर्ट्फिल्मकडे येण्यापूर्वी मला तुला हे विचारायचंय, की तुला हातात कॅमेरा घ्यावा, असं का वाटलं?
याचं नेमकं उत्तर सांगणं माझ्यासाठी तरी कठीण आहे... कारण, मला असं वाटतं की, एखादी गोष्ट आवडण्याचं कारण त्याच्या गूढपणात आहे. म्हणजे एखादी गोष्ट का आवडते याचं कारण माहिती झालं तर त्यातला रस निघून जातो. मला चित्रपट कला का आवडते याचं कारणते करताना, त्याबद्दल बोलताना माझ्या पोटात गोळा येतो, उत्साह येतो. आणि जेव्हा माझं सांगून संपतं, तेव्हा तो उत्साह आणि चमक मी जेव्हा समोरच्या माणसाच्या डोळ्यांत बघतो, तेव्हा मला खूप समाधान वाटतं... बस्.. हेच कारण असावं...
 
२.  तू फिल्मच्या संदर्भाने काही तांत्रिक शिक्षण घेतलं आहेस का ?
नाही... म्हणजे, एखाद्या institute मधल्या शिक्षणाबद्ल बोलत असशील, तर सुदैवाने नाही घेतलं... सुदैवाने यासाठी की, मला वाटतं बऱ्याचशा institute मध्ये एक ठरावीक प्रकारचे चित्रपट म्हणजे ग्रेट आणि ठरावीक चित्रपट वाईट, असे समीकरण तयार करून दिले जाते.. आणि मला वाटतं की, कलेला अशा समीकरणात नाही बांधता येत... त्यामुळं माझं जे शिक्षण झालं, ते कामातूनच झालं... जे काम करत गेलो, त्यातून शिकत गेलो इतकंच!
३. मी मघाशी म्हणालो त्याप्रमाणे,नाद’सारखी शॉर्टफिल्म तुला का करावीशी वाटली ? ‘नाद’सारखी असं म्हणताना मला असं म्हणायचं आहे की अगदी ऑफबीट अशी ही थीम आहे आणि तू ती अतिशय शांत, संयत पध्दतीने मांडली आहेस. 
या लघुपटाचा उगम कसा झाला ?
कुठल्याही कथेचा उगम माझ्या डोक्यात होताना ती पूर्ण कथा किंवा अगदी संकल्पनाही येते असं नाही.. मला फक्त एक दृश्य दिसतं...'नाद' च्या बाबतीतही हेच झालं... मला फक्त नजरेसमोर आवाजाच्या मागे जाणारा एक वेडा दिसत होता... 
त्या पुढचं काही ठरवलं नाही... मी त्यावेड्याला माझ्या नजरेसमोर मोकळा सोडला आणि त्या पुढची कथा तो वेडा घडवत गेला...
 
४. या लघुपटासाठी जे तू कलाकार निवडलेस, ते निवडण्यामागे त्यामागे तुझी नेमकी भूमिका काय होती? आशीष खाचने सारखा नवखा;पण अतिशय ताकदीनं रोल करणारा ऍक्टर तू कसा निवडलास ? म्हणजे अगदी राष्ट्रपती पुरस्कार विजेता 
बालकलाकार सूरज पवारनंही यात काम केलं आहे नि अगदी गेस्ट ऍपीयरन्स करणारा एक ऍक्टर हा देखील राष्ट्रपती पुरस्कार विजेता सुप्रसिध्द दिग्दर्शक आहे, या सा-यांना तू कसं निवडलंस ? 
 
आशीषच्या बाबतीत बोलायचं तर, तो आधीपासून कथेच्या एकूण बांधणीपासून तो यात सामावलेला होता... मी कथा सांगताना तो अगदी मन लावून ते ऐकत असे.. आशीषला घेण्यासाठी बऱ्याच जणांचा विरोध होता. तो त्यासाठी संपूर्णपणे शोभून दिसणार नाही, असंही बरेच लोक म्हणाले..पण मला असे वाटत होते की, एखादं पात्र कसं दिसतं, शोभतं की नाही, हे सुरुवातीचे १० सेकंद लक्षात राहतं.. नंतर पूर्ण चित्रपट ते पात्र स्वतःच्या खांद्यावर पेलतं... म्हणजे दिसणं महत्त्वाचं नाही असं नाही... पण आशीषला घेताना मी त्याचा विचार, त्याचं वागणं, त्याचंमनापासून ऐकणं हे विचारात घेतले... सूरजच्या बाबतीत बोलायचे तर, illusion ethereal मध्ये Fandry चे post production चे काम सुरू असताना आमचे तिथे कायम येणेजाणे असे... तिथे मी सूरजला कायम पाहत होतो.. 
सूरजच्या चेहऱ्यावर जो नैसर्गिक निष्पापपणा होता, तोमला भावला होता.. सूरजला घ्यायचे ठरले, तेव्हा नागराजकडून परवानगी घेतली होती... जेव्हा तो सीन घ्यायला आम्ही निघालो, तेव्हा नागराजला सहज विचारले की, तू ती भूमिका करशील का? नागराजने पटकन होकार दिला... नागराजबद्दल आणखी एक विशेष गोष्ट सांगायचीतर, त्याला सांगताच तो तयार झाला, शिवाय कुठेही न अडवता त्याने एक दिग्दर्शक म्हणून मला पूर्ण मोकळीक दिली व पूर्ण सहकार्य केलं.
 
५.  ‘नाद’ या लघुपटाचा सध्या वेगवेगळा अन्वयार्थ लावला जात आहे;पण डायरेक्टर म्हणून तुझं स्टेटमेंट काय आहे ?
याचं उत्तर खूपच सोपं आहे... दोन पात्रांच्या प्रवासाची ही सोपी गोष्ट आहे... आणि त्या पात्रांची व कथेची सोपी रचना मला प्रेक्षकांसमोर मांडायची होती..... बाकी जे काही लघुपटात आहे ते पात्रांनी दिले..
 
६.  नव्यानं फिल्म करु पाहणा-या विद्यार्थ्याला चिंंता असते पैशाची. तुझ्या या लघुपटासाठीचं आर्थिक नियोजन तू कसं केलंस?
निर्मितीचा जो खर्च झाला त्यामध्ये पात्रांच्या वेशभूषेचे पैसे आणि आशीषने खाल्लेले वडापाव हे सर्व मिळून नाद ही फक्त ५०० रुपयांत बनली आहे... हे सगळे फक्त आणि फक्त आमच्या टीममुळे शक्य झाले...
 
७.  शॉर्टफिल्म करताना तुला कोणाकोणाची मदत झाली ?
चांगलं काम करताना खूप लोकांच्या मदतीचीही गरज असते... या मदतीमुळेच 'नाद' होणे शक्य झाले. सगळ्यात पहिल्यांदा तर माझे वडील मिलिंद दाभाडे, त्यांच्यामुळेच हे शक्य झालं...
.. पंकज सोनावणे, विवेक जांभळे, भूषण हुंबे ..llusion Ethereal ची पूर्ण टीम, नागराज मंजुळेआणि फँड्रीची पूर्ण टीम या सर्वांनी खूप मदत केली, पाठिंबा दिला.. माझे मामा विजय सावंत आणि ज्यांच्याशिवाय 'नाद' होणे शक्य नव्हते, ते माझे सहकारी म्हणजेच अमर मेलगिरी, हर्षद गायकवाड, ललित खाचने व इतर टीम यांचे खूप सहकार्य झाले..
 
८.   लघुपटांसाठी मराठीतच नव्हे तर देश पातळीवर सशक्त व्यासपीठ नाही, अशी दिग्दर्शकांची तक्रार असते. या तक्रारीत तथ्य आहे का ? असल्यास काय करायला हवं ?
हो हे खरं आहे पण सध्या फिल्म सोसायटीची आणि फिल्म फेस्टीवलची चळवळ देशात जोर धरते आहे.
 त्यामुळे लघुपट या माध्यमाला महत्त्व मिळत आहे... शिवाय अनेक वाहिन्यांवरही लघुपट दाखवले जात आहेत... अर्थात कुठलाही बदल एका दिवसात घडणार नाही... त्यासाठी वेळहा जावाच लागेल...
 
९. तुझे आवडते दिग्दर्शक किंवा फिल्म्स ?
खासकरून वातावरण निर्मितीसाठी स्टीवन स्पीलबर्गचा Schindler's list हा चित्रपट मला खूप आवडतो.. कल्पकतेसाठी ख्रिस्तोफर नोलानचे चित्रपट मला अगाध वाटतात, शिवाय शेखर कपूर-बॅन्डिट क्वीन,गुरुदत्त-प्यासा, राकेश ओमप्रकाश मेहरा-रंग दे बसंती.. याशिवाय खूपदिग्दर्शक आणि त्यांच्या कलाकृती प्रेरणादायक आहेत..
 
१०. तुझा नवीन प्रोजेक्ट ?
'वो अभी गुलदस्ते में है!'

About the Author

साहित्यसंस्कृती