
“शौक ए दीदार अगर हो तो नजर पैदा कर” ही काव्यात्म ओळ रवीशकुमारांना का आवडते, याचा उलगडा या भेटीत मला झाला.
रवीशकुमारांसोबत झालेल्या भेटीचा वृत्तांत सांगतोय तरुण लेखक,कवी श्रीरंजन आवटे
साधारण वर्षापूर्वीची गोष्ट. स्नेहल बनसोडे या माझ्या मैत्रिणीने फेसबुकवर एका ब्लॉगची लिंक शेअर केली. त्यावेळी यु आर अनंतमूर्ती नावाचे प्रख्यात लेखक म्हणाले होते की, मा.नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर मी देश सोडून जाईन..असे काहीसे. त्यासंदर्भात काही लिहिलेला तो ब्लॉग होता म्हणून मी उत्सुकतेने ब्लॉग वाचायला गेलो. तो ब्लॉग होता कस्बा नावाचा. (naisadak.org) नावाचा. NDTV India चे ऍन्कर, प्रसिध्द पत्रकार रवीशकुमार यांचा तो ब्लॉग होता. यु आर अनंतमूर्ती यांच्या विधानाबाबत आक्षेप नोंदवत त्यांना अतिशय जिव्हाळ्याने लिहिलेले ते पत्र होते. काही वर्षांपूर्वी विजय तेंडुलकरांच्या विधानाने असाच गदारोळ झाला होता. रवीशकुमारांचे ते पत्र वाचले नि मी त्यांचा कस्बा हा ब्लॉग नियमित वाचू लागलो. NDTV,India या न्युज चॅनलवरील त्यांचा प्राइम टाइम हा शो पाहू लागलो. त्यांची लिखाणाची शैली, चर्चा सूत्रसंचालित करण्याची पध्दत यातून रवीशकुमारांचं व्यक्तिमत्वामध्ये असणारी सुसंगतता मला दिसली. हा ऍन्कर, हा लेखक ‘माणूस’ म्हणून कसा आहे, याविषयी माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली.
सामाजिक-राजकीय संबंधांचं विश्लेषण करताना त्यातील मानवी पैलूंकडे बारकाईने पाहण्याची त्यांची नजर मला अचंबित करत गेली. प्राइम टाइमचे सूत्रसंचालन करताना त्यांची मनमोकळी, अनौपचारिक शैली मला भावली. त्याचप्रमाणे त्यांच्या शोचे विशेष म्हणजे चर्चेसाठी आमंत्रित केलेल्या पॅनेलिस्टला देखील बोलण्याची संधी ते देतात. सन्माननीय अपवाद वगळून अनेक ठिकाणी अशा चर्चेत ऍन्कर स्वगतच करत असतो. रवीश यांची ही स्टाइल मला आवडली. या ‘माणूस’ असलेल्या माणसाला भेटायची इच्छा मनात होतीच आणि मीसुध्दा ‘नशीबवान’ असल्याने एक अच्छा दिन आलाच माझ्या आयुष्यात ३१ जानेवारी २०१५ या दिवशी. निमित्त होते ओनामा या NGO आणि सकाळ माध्यम समूह यांनी आयोजित केलेल्या परिसंवादाचे. परिसंवादाचा विषय होता- ‘निर्देशांक राजकीय संस्कृतीचा !’ परिसंवादात सहभागी झाले होते- एस पी कॉलेजच्या प्राध्यापिका संज्योत आपटे, सकाळ माध्यम समूहाचे रोव्हिंग एडिटर संजय आवटे, अर्थतज्ञ खासदार भालचंद्र मुणगेकर आणि रवीशकुमार !
या कार्यक्रमाची उत्सुकतेने मी वाट पहात होतो. ३१जानेवारीला सकाळी ११ वाजताच दिल्लीहून रवीशजी पुण्यात पोहोचले. कार्यक्रम होता ३.३० ला. जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आणि ‘ओनामा’ संस्थेच्या अध्यक्ष रुपाली नारकर यांनी रवीशकुमार यांना हॉटेल प्रेसिडेन्ट येथे पोहोचवले. त्यांना भेटण्यासाठी मी हॉटेलच्या इथे पोहोचलो. इतक्यात युवराज सरांनी मला प्रिंट आउट काढायला सांगितले. प्रिंट आउट काढली,पाहतो तर रवीशकुमार यांचे संपूर्ण भाषणच होते ते. त्यांना प्रिंट आउट देऊन आलो. थोड्याच वेळात रवीशजी ग्राउण्ड फ्लोअरला आले. “ चलो जरा घुमके आते है” असं आम्हाला म्हणाले. सोबत मित्रवर्य कबीर सोनावणे, अनिल पाटील होते. थोड्याच वेळात प्रियदर्शनी हिंगे आल्या. युवराज सरांनी आम्हा सर्वांची ओळख रवीशकुमारांना करुन दिली. त्यावर रवीशकुमार म्हणाले, “ अरे आपका तो बडा खतरनाक ग्रुप है !” आम्हा सर्वांची अत्यंत आस्थेने चौकशी करुन ते पुढं चालू लागले. समोर दिसले प्रभात रोडचे विज्ञान मंदिर.
रवीशकुमारांनी विचारले, “ अरे भाई ये क्या है ?” मीच कसाबसा पत्ता शोधत तिथवर पोहोचलेलो. मला माहीत नाही, असं सांगितल्यावर तर हा मनुष्य थेट आतमध्येच घुसला. कोल्हटकर नावाच्या अनोळखी माणसाशी थेट बोलू लागला. श्री.कोल्हटकर विज्ञान कीर्तनं करतात, हे ऐकल्यावर तर रवीशकुमार मोबाइलवर टाइप करायला लागले. कीर्तनं कसं असतं, पूर्वरंग, उत्तररंग..इ. सारं समजून घेत या माणसाने श्री.कोल्हटकरांना न्युटनवर कीर्तन करायला लावलं. क्षणाक्षणाला रवीशकुमारांमधला अस्सल जातिवंत बावनकशी पत्रकार मला दिसत होता. तिथून फर्ग्युसनच्या IMDRकॅन्टीनला आम्ही गेलो. तिथे रवीशजी दिसताच गर्दी झाली नि अनेकजण ऍटोग्राफ घेऊ लागले. सर्वांची अगदी खूप वर्षांची ओळख असल्यासारखं ते बोलत होते. फर्ग्युसनला रवीशजी रमले, तर कार्यक्रमाला उशीर होण्याची भीती आयोजिका रुपाली नारकर यांच्या चेह-यावर दिसत होती. अखेरीस आम्ही कसेबसे तिथून निघालो नि जेवत असताना पुन्हा गप्पा सुरु झाल्या. महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी त्यांना प्रचंड कुतूहल आहे, हे कळत होतं. सिंहासन सिनेमा आपल्याला प्रचंड आवडला असल्याचं त्यांनी सांगितलं आणि अगदी एयरपोर्ट ते सिम्बॉयसिस या प्रवासातही गाडीत सुरु असलेल्या संगीतापासून ते COEP, जिमखाना ..इ विषयी त्यांची जाणून घ्यायची अनिवार इच्छा एखाद्या लहान मुलासारखी वाटत होती. अरविंद गुप्तांची वैज्ञानिक खेळणी त्यांना पहायची होती;पण गुप्ता सर नेमके पुण्यात नव्हते. प्रा.संज्योत आपटे, संजय आवटे आणि मुणगेकर या सर्वांची सव्वातीनला भेट झाली, तेव्हा संजय आवटे आम्हा सर्व मित्रांकडे हात करत म्हणाले, “ ये सब लोग आपके बडे फॅन है.आप को इन्होने कुछ सवाल पुछे या नही ?”
यावर हसत हसत रवीश म्हणाले, “ हां अब सिर्फ बॅन्क बॅलन्स और पासवर्ड पूछना बाकी है !”
ते असं म्हणालेले असतानाही मी त्यांना प्रश्न विचारला, “ सर दिल्ली में कौन जीतेगा ?”
“ देखो भाई, एक पार्टी जीत रही है, लेकिन दुसरी जीतेगी.”
“ मतलब?”
“ मतलब एक पार्टी के पास जनसमर्थन है और एक के पास पॉवर.”
त्यांच्या उत्तराने कोड्यात पडलेले आमचे चेहरे पाहून ते म्हणाले, “ इतना मत सोचो, लोकतंत्र है, कुछ तो जरुर होगा.”
थोड्या वेळातच आम्ही सिम्बॉयसिसला निघालो. VIP रुममध्ये जाताना त्यांच्या NO VIP या नव्या कार्यक्रमाविषयी चर्चा झाली. ४ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. पडदा सरकला आणि रवीशकुमारांना पाहताच प्रेक्षकांनी जल्लोष सुरु केला. तुळशीच्या रोपाला पाणी घालून उदघाटन करण्याची अभिनव पध्दत आयोजकांनी अवलंबली होती. सत्काराचा औपचारिक भाग झाल्यावर प्रा.उज्व्वला बर्वे मॅडमनी रवीशकुमारांची ओळख करुन द्यायला मला सांगितलं. हिंदीत बोलायचं असल्याने मी रवीशजींची ओळख लिहूनच ठेवली होती. ‘नमस्कार, मै रवीशकुमार ! प्राइम टाइम में आप सबका स्वागत’ हे वाक्य मी उच्चारलं नि प्रेक्षकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बेस्ट न्युज ऍन्कर, शंकर विद्यार्थी अवार्ड, रामनाथ गोएंका …इ अवार्डस मिळाल्याचे सांगून मी म्हणालो, “ रवीशजी को बुलाने का तय हुआ था;लेकिन बात बन नही रही थी आप के व्यस्त दिनक्रम के कारण. तो मैंने सोचा क्युं न हम एक ऑर्डिनन्स निकालकर आपको यहां आने के लिये बाध्य करे लेकिन थॅन्क्स टू इंडियन डेमॉक्रसी, रवीशजी बात मान गये. कुछ बाते आज भी डिस्कशन से हो सकती है.”
परिचयानंतर सकाळ माध्यम समूहाचे रोव्हिंग एडिटर संजय आवटे यांनी त्यांच्या बीजभाषणात आयडिया ऑफ इंडिया समजावून सांगितली. एस पी कॉलेजच्या प्राध्यापिका संज्योत आपटे यांनी राजकीय संस्कृतीची ऍकेडिमिक मांडणी केली. अर्थतज्ञ खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी राजकारण्यांनी राजकीय संस्कृती गलिच्छ करुन टाकली असल्याचं सांगत राजकारण ही अतिशय पवित्र बाब असल्याचं मत व्यक्त केलं. सर्वांनाच ज्या भाषणाची उत्सुकता होती, ते रवीशकुमार यांचं भाषण सुरु झालं नि हशा आणि टाळ्यांचा सिक्वेन्स सुरु झाला. अर्थात अतिशय गंभीर मुद्दे रवीशकुमार सहजपणे पटवून देत होते. आजच्या राजकीय व्यवस्थेने मतदाराला ग्राहक बनवलं आहे आणि पर्यायहीन ग्राहक बनवण्यात आजचं राजकारण यशस्वी झालं आहे.,मतदारांच रुपांतर फॅनमध्ये केलं गेलं आहे, राजकारण बलुतेदार बदलण्यासाठी नसतं तर विचार बदलण्यासाठी असतं, एकूणातच राजकीय संस्कृतीचं अधःपतन कशा पध्दतीने झालं आहे याबाबतचे मुद्दे त्यांनी मांडले.
कार्यक्रमाच्या दुस-या दिवशी त्यांनी फेसबुकवर लिहिलं आहे-
“वोटर को दर्शक बनाकर फ़ैन्स बना दो । मतदाता के लंपटीकरण का इससे अच्छा नमूना कहीं नहीं मिलेगा । सारी बहस इस उस फ़ैन्स के बीच मनोरंजक हो गई है । मुद्दों का कटलेट बन गया है । फ़ैन्स लोकतंत्र के नए लोफ़र हैं । वोटर का निजी और गोपनीय स्पेस को फ़ैन के बहाने एक तबके में ख़त्म कर दिया गया है । पुणे के युवाओं के बीच शनिवार की शाम शानदार गुज़री । लोकतंत्र को लेकर इतनी बड़ी मात्रा में सजग युवा मन पहली बार दिखा । इन्होंने मेरे लिए तालियाँ बजाईं लेकिन मेरा मन इनके लिए तालियाँ बजा रहा था!”
कार्यक्रमानंतर अनेकांनी रवीशजींना प्रश्न विचारले. अगदी दिलखुलास उत्तरं देत होते ते. एका मुलाने प्रश्न विचारला, " तुम्ही एवढे मोठे पत्रकार असून तुमच्यावर दडपण येतं. तुम्ही व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं आवाहन करता,आम्हाला हे कसं शक्य आहे ?
रवीशजी म्हणाले, " सबसे पहले तो अपना अकाउन्ट क्लियर होना चाहिये तभी तो आप सवाल खडा कर सकते हो. अपने अपने डोमेन में सवाल उठाने होंगे. आपको खुले और स्वतंत्र दिमाग से सोचना होगा."
मित्रवर्य अनिल पाटील रवीशकुमार यांच्या व्यक्तिमत्वाने भारावून गेला होता. शंतनू माळशिकरे तर त्यांच्या भाषणातील महत्वाच्या मुद्द्यांविषयी कार्यक्रमानंतरही चर्चा करत होता. रात्री ९ची फ्लाइट असल्यामुळं रवीशजी लगेच विमानतळाकडे रवाना झाले. जाता जाता कौस्तुभ महाडिक या आमच्या मित्राने त्यांच्यासाठी इम्प्लोजन हे जॉन एलियटचं प्रसिध्द पुस्तकं आम्हा सर्वांतर्फे भेट दिलं. आम्हा सर्वांना हसत हसत निरोप देऊन रवीशजी दिल्लीला गेले. मी करुन दिलेला परिचय आवडल्याचं त्यांनी मेसेज करुन सांगितलं तेव्हा मात्र मला प्रचंड आनंद झाला.
रवीशकुमारांना जवळून पाहताना या माणसातलं सच्चेपण आम्हा सर्वांना भावलं. “शौक ए दीदार अगर हो, तो नजर पैदा कर” ही काव्यात्म ओळ त्यांना का आवडते, हे आम्हाला त्यांच्या भेटीतून समजलं हे लाखमोलाचं !