नेमाडेंना ज्ञानपीठ ! तरुणाईचा जल्लोष !!!

 मराठी साहित्याला पेंगताना नेमाडेंनी अचूक पकडलं, अशा शब्दात पु ल देशपांडेंनी कोसलाबाबत लिहिलं होतं. साठोत्तरी साहित्याला वेगळं वळण देणारी त्यांची ‘कोसला’ ही कादंबरी अनवट होती ती आशय, अभिव्यक्ती नि शैली या सा-याच पातळ्यांवर. मर्ढेकरी परात्मतेला एक संमोहक वळण देत डौलदार पदन्यास करणारी कोसला ही मैलाचा दगड ठरली ती याचमुळे. झूल, बिढार, जरीलाने पुढचं पाऊल टाकलं दरम्यान त्यांची ‘देखणी’ कविता मराठी साहित्य पटलावर अवतरली. कशा रांगोळ्या काढता तुम्ही घरंदाज व्यथांनो, असा सवाल करीत विशिष्टतेपासून विश्वात्मक होणारी त्यांची कविताही मराठी रसिकांनी आपलीशी केली. तब्बल साडेतीन दशकांच्या प्रतीक्षेतनंतर हिंदूः जगण्याची समृध्द अडगळ ही महाकादंबरी जन्माला आली नि पुन्हा एकदा ही कलाकृती साहित्यविश्वाला कलाटणी देणारी ठरली. एकीकडे नेमाडेंचे साहित्यविषयक कर्तृत्वाची वाहवा होत असताना, स्वतः नेमाडे यांचाच लेखकाचा लेखकराव झाला, अशा प्रकारची टीकाही होत असते. नेमाडेंचा देशीवाद बलुतेदारीचं/ जातिव्यवस्थेचं समर्थन करतो की काय, अशी शंकाही अनेकदा व्यक्त होत असते. जागतिकीकरणाच्या आजच्या सा-या धबडग्यात देशीवाद खरोखरच गरजेचा आहे काय ? त्याचे साधार समर्थन होऊ शकते काय ? ‘हिंदूः जगण्याची समृध्द अडगळ’ असे म्हणत असताना परंपरांचे अनाठायी उदात्तीकरण होते काय ; या सा-या परंपरांचा धांडोळा घेणे आपली सेंद्रियतेची नाळ टिकवण्यासाठी आवश्यक नाही काय, असे कैक प्रश्न नेमाडेंच्या साहित्यामुळे निर्माण झालेले आहेत.

नेमाडे चूक की बरोबर, देशीवाद योग्य की अयोग्य या चर्चेपेक्षाही नेमाडेंच्या साहित्यामुळे साहित्यसंस्कृतीला वेगळे वळण मिळाले काय, असल्यास ते कितपत विधायक आहे, अथवा विघातक आहे, याचा वेध घेणे महत्वाचे.

 

नेमाडेंना ज्ञानपीठ मिळाल्यानंतर तरुणाईने व्यक्त केला जल्लोष. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रियाः-

मराठी साहित्य- सृष्टीला पालवी फुटण्याची चिन्हे

गेली पन्नास वर्षे आणि त्याहुन अधिक काळ मराठी साहित्य सृष्टीवर गारुड केलेल्या लेखकाला हा पुरस्कार दिला जातो आहे, त्याबद्दल आनंद व्यक्त करावा हे ओघाने आलेच. अनियतकालिकांची चळवळ नेमाडे यांच्या सारख्या अनेक तरुण लेखकांना लिहिते करून गेली, तिचेही आभार. कोसला असो की हिंदू, या कादंब-यांचा पैस आणि प्रभाव मोठा आहे. बदलत्या सांस्कृतिक- राजकीय परिप्रेक्ष्यात अभिव्यक्तीचे आव्हान नव्या पिढीतील लेखक कसे पेलतात, हा खरा प्रश्न आहे. नेमाडे यांच्या साहित्यिक योगदानाने अनेक पिढ्या मोहित झाल्या आहेत. कोसलाचा प्रभाव अगदी अलीकडे लिहू लागलेल्या लेखकांवरही दिसून येतो. मधल्या काळात साहित्यात नवे काही आले नाही, असेच वाटावे अशी ही परिस्थिती आहे. पहिल्यांदाच शिकलेली, लिहू पाहणारी मंडळी जागतिकीकरणाच्या विशीत मोकळा श्वास घेवू पाहणारी मंडळी अभिव्यक्त झाली, तर मराठी साहित्य सृष्टीला नवी पालवी फुटण्याची चिन्हे आहेत,

अन्यथा कोसलाचा बोव्हाडा अजुन पन्नास वर्षे मराठी साहित्य सृष्टी नाचवेल, असे खेदाने म्हणावेसे वाटते. 

हर्षल लोहकरे,पुणे
मुक्त पत्रकार  

 

नेमाडे,ढसाळांना मिळायला हवा नोबेल

मराठी तसेच भारतीय साहित्यातील आज मैलाचा दगड ठरणा-या साहित्यिकांत नाव घेणा-यांत माझ्या डोळ्यांपुढे ज्यांचा साहित्यव्यवहार अगदी विद्यार्थी दशेपासून उभा राहिला त्यांत दोन मुख्य नावे म्हणजे भालचंद्र नेमाडे आणि नामदेव ढसाळ. कुठलेही वाचन कधीही पूर्वग्रहदूषिततेची झापडं लावून आजपर्यंत करताच आलं नाही. त्याला कारण म्हणजे नेमाड्यांचे टीकास्वयंवर, सोळा भाषणे,निवडक मुलाखती,साहित्याची भाषा आणि तुकाराम. या समग्र आणि अतिशय सखोल चिंतनातून आलेली टीकात्मक लेखनसंपदा वाचनात आली नसती तर कुठेही उभे राहताच आले नसते. बहुजन न्यूनगंड मारून टाकण्याचे काम आणि माझ्यासारख्या असंख्य मुलांना, गावाकडून शहरी व्यवस्थेत प्रवेश केलेल्या व्यक्तींना एका अर्थाने लिहायला प्रवृत्त करण्याचे काम नेमाडेंच्या साहित्यामुळे शक्य झाले अथवा त्याला नैतिक अर्थाचे बळ मिळाले. अन्यथा हा पायपोस निव्वळ ययाती, स्वामी, पानिपत अशा ब्राम्हणी थाटाचा आशय विषय प्रस्तुत करण्यापुरत्या साहित्याशी मर्यादित राहिला असता. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना "कोसला" हातात पडणं आणि पदव्युत्तर वर्षाला "गोलपिठा". कादंबरी अशी नाही तर अशीच असते आणि कवितादेखील हीच असते. हे झपाटलेपण जाणवणं ही आयुष्यात प्रगल्भता वाढीस लागण्याची आपली सुरूवात. म्हणून या दोन वर्षांची नोंद कोरली गेली. मग अख्खा नेमाडे वाचणं क्रमप्राप्त ठरलं. कोसलाची पारायणे झाली. त्यांच्या टीकालेखनाने समीक्षात्मक लेखनही सोप्या परिभाषेत समजून घेता आले. त्यांच्यावर असलेला तुकाराम,चक्रधर,गालिब आणि महात्मा ज्योतिबा फुले आदींचा प्रभाव, त्यातून त्यांची पुढे येणारी देशीवादी भूमिका अधिक परिणामकारकपणे मनावर बिंबत गेली. समग्र गांधी आणि समग्र फुले वाचल्यानंतर तर त्यांच्या ब-याच गोष्टी उदाहरणार्थ भूमिका स्पष्ट झाल्या. त्यांचं इंग्रजी भाषेचं प्राध्यापक असणं केवळ त्या भाषेपुरतंच उरलं. त्यांचं जगणं मातृभाषेतलं अस्सल देशी तळठाव घेणारं राहिलं. मध्यंतरी परिवर्तनाचा वाटसरूच्या दिवाळी अंकात सुधाकर यादव यांनी घेतलेली मुलाखत वाचली.पुन्हा पुन्हा वाचली. माणूस त्याच्या साहित्याशी आणि जीवनाशी असलेल्या बांधिलकीशी किती प्रामाणिकपणाची कठोरता आचरणात आणतो, याचा वस्तुपाठ म्हणजे ही मुलाखत होय. "हिंदू-जगण्याची समृध्द अडगळ" वाचल्यानंतर आपलं परत पुन्हा समग्र महात्मा ज्योतिबा फुले वाचण्यास प्रवृत्त होणं. यावरून फुलेकेंद्रित दृष्टिकोणाची किती मोठी गरज आहे, हे पुन्हा पुन्हा जाणवू लागले. या जागतिकीकरणात बोकाळलेल्या अनेक प्रवाहांना आवर घालण्यासाठी या दृष्टिकोणाचीच आता गरज आहे. याच अनुषंगाने हिंदू कादंबरीबद्दल कोम्रेड व प्राच्यविद्यापंडित शरद पाटील हे "अब्राम्हणी साहित्याचे महाकथन" असे म्हणतात. हे अधिक महत्त्वाचे वाटते. भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ जाहीर होणं ही एक औपचारिकता होती. नव्हे तो आम्ही मनोमन जाहीरही केलाच होता. माझ्या सामान्य दृष्टी असलेल्या व्यक्तीची तर रास्त इच्छा ही आहे की, एक महाकादंबरीकार नेमाडे आणि एक महाकवी ढसाळ अशा दोघांनाही नोबेल पुरस्कार मिळावा. किंबहुना तो मिळेलच. असो बाकी काय तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे,

"कोणी कापो माझी मान|सुखे पीडोत दुर्जन||"

किंवा नेमाडे म्हणतात त्याप्रमाणे,
"दु:खाचा अंकुश असो सदा मनावर
पचविल्याबद्दल माथ्यावर चंद्र असो
माणसं मोजण्यासाठी हाताला हजार बोटं असोत
राहत नाहीत बिचारी"

श्रीकांत सावळेराम ढेरंगे,आंबी दुमाला,संगमनेर.
तरुण लेखक

 

मराठीचं प्रतिनिधीत्व करणारा भाषाप्रभू

 

भाषा आणि संस्कृती संवर्धनाकरता ज्यांनी मोजकीच परंतु परिणामकारक अभिव्यक्ती केली, त्या नेमाडे सरांना साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मिळतो आहे, याचा आनंदच आहे.
पंचविसाव्या वर्षी ‘कोसला’सारखी कादंबरी लिहून आशय आणि अभिव्यक्ती पातळीवर नावीन्य आणणारे शब्दमार्तंड नेमाडे यांनी आपल्या ‘देखण्या’ लेखणीतून साहित्यशिल्पं उभारली.अवघ्या मराठी भाषेचं प्रतिनीधीत्व करणा-या या भाषाप्रभूला ज्ञानपीठ मिळाल्याने अतिशय आनंद झालाय.

अक्षय इंडीकर
तरुण दिग्दर्शक, पुणे

 

नेमाडे कवी म्हणून अधिक भावतात

कवी म्हणून मला खूप भावतात, भिडतात. याचे कारण त्या कवितेच्या मुळाशी मानवी जगण्याविषयी, त्याच्या सामान्य तरीही उदात्त, क्षणिक तरीही शाश्वत अस्तित्वाविषयी आदर व करुणा आहे. त्यातही या कवितेतिला स्त्री जाणिवा कमालीच्या आतून आलेल्या, नितळ वाटतात. एखाद्या स्त्रीनेच आपल्या ऐतिहासिक, सामाजिक प्रवासाचे आत्मगत सहज सांगत जावे इतकी ही कविता प्रवाही आणि खरीखुरी आहे. असा इतका नेमका परकायाप्रवेश खूप कमी प्रतिभावंतांना साधतो. येत्या काळात मी पुन्हा कविता लिहिण्याकडे वळणार हे त्यांचे विधान खरेच खूप सुखावणारे आहे!

शर्मिष्ठा भोसले, औरंगाबाद
कवयित्री, पत्रकार

About the Author

साहित्यसंस्कृती