प्रेमः कालचे, आजचे आणि उद्याचे

                   

प्रेम व्यक्त करण्याच्या पध्दतीही बदलतात काळानुसार. हे प्राणसखे, प्राणप्रिये..किंवा ये प्रियकरा..पासून ते हे बेब, हे ड्युड.. असा केवळ भाषिकच नव्हे तर प्रेमाची परिभाषा, मोडस ऑपरेन्डीच बदलते.व्हॅलेन्टाइन डे च्या निमित्तानं या बदलांचा आढावा घेतोय ऋषीकेश निकम

----------------------

 

‘प्रेम’ हा तसा खूप पूर्वीच्या काळापासून लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या विषयावर याआधी इतके लेखन झाले आहे की, आता ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या निमित्ताने नेमकं काय वेगळं लिहायचं असा प्रश्न पडतो आहे( अशी सुरुवातीलाच कबुली दिली की मग पुढचा लेख वाचून ‘त्यानं काय नवीन लिहिलं?’ असा प्रश्न सहसा कुणाला पडत नाही आणि पडला तरी तो विचारण्यात कुणाला फारसा रस उरत नाही. असो). खरे प्रेम म्हणजे नक्की काय? खरे प्रेम खरेच अस्तित्त्वात असते का? असे घासून गुळ्गुळीत झालेले प्रश्न आता कुणाला पडत नसल्यामुळे तो विषय इथे काढून वेळ घालवण्यात काही अर्थ नाही, त्यामुळे पुढे जाऊ.

अगदी राधा-कृष्णाच्या काळापासून लोक प्रेमाचा महिमा गात आहेत (तसे कृष्णाने सोळा सहस्त्र बायकांवर अगदी मनापासून प्रेम केले, पण तितका उदारमतवादी समाज आता राहिला नसल्यामुळे एकीवरच खरे प्रेम करणे उत्तम. अर्थात त्याबद्दल तक्रार नाही, पण उदाहरणाच्या ओघाने तुलना झाली). त्यानंतरही बरीच उदाहरणे अजरामर झाली. जोधा-अकबर, सलीम-अनारकली, सोह्नी-महिवाल, हीर-रांझा अशा जोड्यांची उदाहरणे म्हणजे प्रियकर प्रेयसींची स्तोत्रे झाली. पण फक्त प्रेमावर लिहायचं तरी त्याचा बहुआयामी विचार करणे महत्त्वाचे ठरते. कारण प्रेमाची व्याख्या स्थळ-काळ-व्यक्तिपरत्त्वे बदलत असते. त्याचा विचार करून प्रेमाच्या मागील, चालू व आगामी पिढीतील परिस्थितीबद्दल बोलू.

काही वर्षांपूर्वी म्हणजे, साधारण एका पिढीपूर्वी असे म्हणू; प्रेम करणे (आणि अर्थात त्याबाबत पुढच्या काही हालचाली करणे) हा काही सामान्यांच्या तोंडचा घास नव्हता. त्यासाठी खूप हिंमत आणि निश्चयाची गरज असे. प्रेम करणे, ते निभावणे आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्याशी प्रामाणिक राहणे या गोष्टी यशस्वीपणे करणा-याला त्याकाळी प्रेमवीरांच्या जगात शौर्य पदकाने गौरवले जात असावे (अर्थात मनातल्या मनात किंवा फार फार तर गप्पांच्या कट्ट्यावर). त्याकाळी प्रेमाच्या भवितव्याबाबत विचार करताना ‘लिव्ह इन..’, ‘कॅज्युअल’ असे पर्याय नसल्यामुळे प्रेमाचे भवितव्य लग्न होणे किंवा न होणे हेच असे. शिवाय तंत्रज्ञान इतके प्रगत नसल्यामुळे प्रेम मिळवण्याची व व्यक्त करण्याची पद्धतही खूप किचकट असे. म्हणजे, फक्त बघणे, मित्राची, मैत्रिणीची मदत घेऊन बोलणे किंवा थेट जाऊन विचारण्याऐवजी पुस्तकात, दप्तरात, बाकाखाली पत्र ठेवणे इत्यादी गोष्टी त्याकाळचे प्रेमवीर करीत. ‘या भानगडी न करता प्रेम व्यक्त करण्याच्या पर्यायांचा शोध का लागत नाही?’ असा विचार त्या काळचे प्रेमवीर करीत होते की नाही, हे माहिती नाही. पण आम्हाला बुवा ते किस्से ऐकून जाम मजा येते आणि क्वचित प्रसंगी ते सारं थ्रिलिंग वगैरे पण वाटतं! आपल्या घरातल्या वडीलधा-या माणसांनी त्या थ्रिलचा अनुभव कधी घेतला असेल का हो? Ahm, Ahm! असो. हा प्रश्न न विचारलेला बरा!

पण अगदी अलीकडे ९०च्या दशकात ज्यांचे तारुण्य गेले, त्यांनाही प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठीही काही भक्कम व्यासपीठ उपलब्ध होते असे नाही. त्यांनाही सामान्यपणे बघणे, मित्रमैत्रिणींची मदत घेणे, बाकाखाली किंवा पुस्तकांत पत्र ठेवणे या मार्गांचा आधार घ्यावा लागे; पण एकंदरीतच या प्रकारच्या प्रेमप्रकरणांची मजा शब्दातीत असावी! एकमेकांना पत्र देऊन पुढचे पत्र येईपर्यंत वाट पाहणे, तोपर्यंत पत्राचा मायना काय असेल याचा अंदाज लावणे या गोष्टी किती मजेशीर असतील! ती सांभाळून ठेवलेली पत्रे आणि एखाद-दुसरा फोटो पाच-सहा किंवा कधी कधी दहा वर्षांनंतर उघडून पाहताना त्यांना काय कमाल आनंद होत असेल! त्यांच्या मुरलेल्या प्रेमाचा दाखला देणारी ती जीर्ण झालेली पत्रे, त्यांच्या प्रेमाइतकीच अस्सल वाटत असतील नाही! याशिवाय प्रेम-पत्रव्यवहाराच्या काळात पत्रातील भाषा ही औपचारिक किंवा काव्यमयच असावी असा अलिखित नियम असल्यामुळे प्रत्येक प्रेमवीरातील उत्स्फूर्त कवी आणि लेखक तेव्हा अंग झटकून कामाला लागत असेल! माझ्या लहानपणी एका ओळखीच्या दादाने त्याच्या प्रेयसीचे एक पत्र मला दाखवले होते. तो तिला सारखेच पत्र देऊन उत्तर विचारत असल्यामुळे तिने ते खरमरीत, पण प्रेमळ पत्र त्याला लिहिले होते. पत्राचा मायना असा-

     “मी तूला किती वेळेला सांगितले नालायक. मोहिनीसमोर पत्र देत जाऊ नकोस. ती दाद्यासमोर जाऊन सगळ सांगते. मी तोंडाने बोलत नसले तरी मणात तूच आहेस हे तुला कळत नाही का? सारखा पत्र देत जाऊ नकोस, नाहीतर भेटल्यावर एक काणाखाली मारनार. कधी आनि कुठ भेटायच ते उद्या सांगते पत्र देऊन.

                                  तुझी,

                                  प्रभा”

 

व्याकरण, छंद इत्यादींचे नियम झुगारून लावणारी या प्रेमवीरांची काव्य आणि लेखनप्रतिभा ‘बंडखोर साहित्य’ या प्रकारात मोडायला हरकत नाही! पण विनोदाचा भाग सोडला, तर या प्रेमवीरांच्या भावनेतील अस्सलपणा आणि भाबडेपणा भावल्याशिवाय राहत नाही. या सगळ्यामध्ये समाजही इतका पुढारलेला नसल्यामुळे सगळ्यांचीच प्रेमप्रकरणे शेवटपर्यंत तग धरायची, असे नाही;पण काहीजण ‘जमाने से बगावत’ वगैरे करूनही लग्न करायचे. तर काहींचे प्रेम त्या पत्रांमध्येच राहून जायचे. 

आजकाल जग बदलल्यामुळे प्रेम मिळवण्यासाठी पत्र वगैरे देण्याची प्रथा आता कालबाह्य झाली आहे. मुलीचे किंवा मुलाचे फक्त नाव माहिती झाले, तरी लगेच फेसबुकावर सर्च करून रेक्वेस्ट पाठवायची की, झाले काम! मग पुढे चॅटिंग, फोन नंबर देणे-घेणे इत्यादी होते. त्यापुढची जबाबदारी व्हॉट्सऍप सांभाळतो. सगळ्या गोष्टी तशा सोप्या झाल्यामुळे त्यात थ्रिल असे काही उरले नाही म्हणा. व्हॉट्सॅप आणि फेसबूकवर प्रोफाईल फोटो बघायला मिळत असल्यामुळे आपल्या प्रियकर-प्रेयसीचे फोटो मिळवून जपून ठेवण्यात तितकीशी मजा उरली नाही (ही टीका थोडीशी पारंपारिक अंगाने जात असली, तरीही यात तथ्य आहेच की!).

भविष्यातील प्रेमप्रकरणांबाबत तर आपण अंदाज लावू शकत नाही इतक्या विचित्र गोष्टी घडू शकतात. म्हणजे, मुलाला असे रिक्वेस्ट वगैरे पाठवण्याचे उद्योग न करावे लागता थेट मुलीच्या मनातील गोष्टी वाचता येतील. म्हणजे संगणकीय तंत्रात हुशार असलेला एखादा माणूस थेट आपल्या आवडत्या व्यक्तीच्या मनाचा पासवर्ड वगैरे हॅक करून आत चाललेल्या गोष्टी जाणून घेऊ शकेल. ‘टेलिपॅथी’ का काय म्हणतात ते तंत्रज्ञान प्रगत झाले, तर मोबाईलशिवायही बोलता येईल. म्हणजे आत्ता मोबाईल कानाशी लावून स्वतःलाही ऐकू येणार नाही इतक्या हळू आवाजात बडबडणारे प्रेमवीर, भविष्यात कदाचित एकटेच कुठेतरी शून्यात नजर लावून नुसतेच बडबडताना दिसतील.

प्रेम हा अतिशय हळवा आणि जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे, प्रेम होणे म्हणजे मेंदूतील frontal cortex चा दरवाजा बंद होऊन मेंदूतील dopamineचे प्रमाण वाढणे अशा साधारण रुक्ष व्याख्येपुरते ते मर्यादित असू शकत नाही. कवींना विचारायचे तरीही प्रेमात पडणे म्हणजे अमुक अमुक एक गोष्ट होणे अशी निश्चित व्याख्या सगळ्या कवींनी मिळून केलेली नाही. पाडगावकरांपासून ते रुमीपर्यंत प्रत्येकाने त्याची अनुभूती वेगवेगळी सांगितली आहे. ती एक वैयक्तिक भावना असल्यामुळे ती प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. काही साधारण बदल म्हणावेत तर भूक न लागणे, झोप न येणे वगैरे आहेत असे म्हणतात;पण प्रेमात पडल्यावरही भरभक्कम आहार आणि पुरेशी निद्रा घेणारे अनेक प्रेमवीरही आपल्या आसपास आहेत. त्यामुळे या व्याख्या वगैरेंच्या फंदांत न पडता प्रेम करत राहावे हे उत्तम! काळ कोणताही असला, तरीही प्रेमाची अनुभूती आणि त्यानुसार बदलत जाणारे व्यक्तिगत आयुष्य यांची वर्णने मात्र तीच राहतील असे वाटते. शिवाय प्रेम ही भावनाच सर्वकाळ ताजी राहणारी असल्यामुळे प्रेमावर आधारीत कथा, कविता आणि इतर साहित्यही नेहमी तितकेच ताजे राहील. सर्व नव्या, जुन्या आणि मार्गस्थ प्रेमवीरांना ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा! 

-ऋषीकेश निकम
(ऋषीकेश हा तरुण लेखक, अभिनेता असून पुरुषोत्तम करंडक नाट्यस्पर्धेत अनेक बक्षिसे त्याला प्राप्त झाली आहेत.)

 

           

 

 

About the Author

Rushikesh's picture
Rushikesh