तिचे पत्र

‘प्रेम म्हणजे काही भातुकलीचा खेळ नव्हे’, कितीतरी वेळा ऐकलेलं आणि तुझ्यासोबत अनुभवलंही! किती गुंतागुंतीचं प्रकरण ! एकमेकांना उलगडत जाताना आपली किती ओढाताण झाली. कधी नाजूक, कधी हिंसक झालो. कितीदा घाबरूनही गेलो. एरवी आपण नकळत दुसऱ्यांशी  खोटं बोलतो कधीतरी . त्याने काही फार फरक नाही पडत. पण सत्याची खरी परिक्षा या नात्यात होते. तावून सुलाखून निघालेलेलं एक एक सत्य आपण एकमेकांना सांगू शकलो. जितका अधिक तुझा सहवास मिळत गेला तितकच अधिक, मी जे काही तुझ्यात पाहत होते ते सगळच आवडत गेलं.

 

एका वयात आल्यावर आपल्या डोक्यात एक कल्पना असते, “someone, somewhere is made for you”  सारखी. तो someone म्हणजेच आपला राजकुमार! आदर्श जोडीदार! माझी पण अशी कल्पना होती. पण नंतर कळलं, ‘आदर्श’ जोडीदार मुळात नसतोच. कुणीही १००% परफेक्ट कधीच नसतं. पण या कल्पनेची एक गम्मत असते, ती म्हणजे हि जरी कल्पना असली तरी तुम्ही स्वतः स्वतःला ती सांगू शकता! मी पण तेच केलं. हि कल्पना हे त्या वयाचं सौंदर्यच!

---
आपली पहिली भेट आठवते? किती अवघडलो होतो. किती औपचरिक होतो. एकमेकांसमोर किती खुबीने वागलो. तू मला जिंकण्याच्या प्रयत्नात आणि मी तुला. जसे जास्तीत जास्त भेटत गेलो तशा सवयी कळू लागल्या. तू जेऊन तृप्त झाल्यावर मोकळेपणाने ढेकर द्यायचास, मला इतका राग यायचा तुझा. इतके दिवस जो मुखवटा  घालून माझ्यासमोर यायचास त्यामगचा खरा तू मला दिसू लागलास. आणि माझी खात्री आहे माझ्या बाबतीत तुझही काहीसं असाच झालं असेल. मुखवटे! जे आपण धारण केलेले, एकमेकांसाठी!

पण खरं सांगू आपल्या नात्याचं सौंदर्य या मुखवट्यान्मध्येच होतं. या मुखवट्यामधूनच आपलं नातं आकार घेत गेलं. प्रत्येक वेळी मी हेच दर्शवत गेले कि तू तसाच आहेस जसा मला पहिल्या भेटीत जाणवलेलास . तुझा मुखवटा मी खरा मानला. मला माहित होतं कि तू तितका परफेक्ट नाहीस तरीही. आणि माझ्या बाबतीत तुही तेच केलंस. माझ्या खऱ्या मी पेक्षा तो मुखवटा तू खरा मानलास. जेंव्हा तुलाही माहित होतं कि मी ‘ती’ आदर्श व्यक्ती नव्हे जी तुला पहिल्या भेटीत भेटलेली. आपण या खोट्याच्या आधारावर एकमेकांसोबत स्वेच्छेने राहू लागलो.  तेंव्हा नकळतच आपल्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा वाढल्या आणि म्हणूनच  आपण खरच ‘ती’ आदर्श व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करू लगलो. या नात्याने या मुखवट्याना जिवंत करायला भाग पाडले.  हे मुखवटे आपण एकमेकांकडे  मागितले आणि एकमेकांना दिलेही आणि म्हणूनच आपण एकमेकांसाठी ‘तो आदर्श’ जोडीदार बनलो. आदर्श बनलो कारण तू मला आदर्श मानयची तयारी दाखवली आणि मी तुला.

तू तसाच बनलास मिस्टर परफेक्ट ज्याची मी कायम प्रतीक्षा केली.

---

आपण आदर्श कसे बनलो? १००% परफेक्ट मुळीच नव्हतो. तुही नाही आणि मीही. कोणीच नसतं . कुठलीही दोन माणसं  एकमेकांसाठी परफेक्ट match  कधीच नसतात. अगदी कधीच नाही! कुठल्याही  दोन व्यक्ती एकमेकांसाठी शारिरीक दृष्ट्या १००% compatible कधीच नसतात. कुठल्याही दोन व्यक्ती एकमेकांसाठी भावनिक  दृष्ट्या १००% compatible  कधीच नसतात. कुठल्याही दोन व्यक्तींच्या  इच्छा- आकांक्षा  नेमक्या कायमच एकसारख्या कधीच नसतात. आणि जर हे आपल्याला तेंव्हा कळलं नसतं तर आपलं  नातं  कदाचित २ महिनेही टिकलं  नसतं .

एकेमेकांची ओळख झाली. म्हणजे शरिराची नव्हे तर शरिराच्या माध्यमातून झाली . त्या  एका क्षणाला चेहऱ्यावरचे सगळे मुखवटे गळून पडले  आणि त्या जहाल क्षणात स्वतःबद्दलच ज्ञान आलं, खरा तू दिसलास आणि खरी मी!

त्यानंतर शब्दांची गरजच उरली नाही. ते मुके झाले. आणि हे मौन अतिशय बोलके होते. या मौनाचे क्षण हे काही आयुष्यातल्या उरल्या सुरल्या ओळी नव्हेत, तर तेच पुढे  आयुष्य बनले. समृध्द, सूक्ष्म, अनिवार्य, जर शांतपणे अनुभवले तर जिवंत! सळसळता उत्साह, रुसवे फुगवे, वेदना, राग, आनंद सगळाच आपण एकमेकांसोबत जगलो. हे सगळं  करताना आपण एकमेकांसाठी स्वतःला अगदी झोकून दिले. इतके एकमेकांचे झालो कि कोण  मी आणि तू  ? आणि माझे - तुझे असा काय उरले? आनंद, दुख , समर्पण, इच्छा, उत्कटता , उल्हास सगळं  तुझ्या क्षितीजामध्ये मला भरभरून मिळालं . तू वादळासारखा आलास पण हे वादळ मिटावं असं कधीच नाही वाटलं.  स्थिर झाल्याशिवाय स्थैर्य कसं मिळणार? तुझ्यामधले दोष मी दुर्लक्षित कसे करणार? किती संताप होत असे माझा. पण एकदा तुला तुझ्या गुणदोषांसकट स्वीकारले आणि तोही प्रश्न मिटला. तुझे दोष मी स्वीकारले आणि नंतर त्यांचाकडे दुर्लक्ष करणं सोपं  झालं.

तुझ्यासोबत घालवलेल्या क्षणांमधून जगणे उमजले. समुद्रकिनाऱ्यावर वाळूत आपली  बोटं एकमेकांशी खेळताना एक सुखद संवेदना शरीरभर पसरे. मला एरवी जितकं वाटे त्याहूनही कैक  पटीने हलकं  त्या क्षणांमध्ये वाटे. अगदी  पिसासारखं  हलकं ! आयुष्य किती अनमोल आहे हे तेंव्हा कळलं . तुझ्या आधी  त्याची किंमत एवढ्या प्रकर्षाने कधीच जाणवली नव्हती. आपण कोणाला तरी खूप आवडतो हि जाणीव किती सुखावणारी आहे. आपसूकच आयुष्याला एक अर्थ आला. आपण एकाच  प्रवासाला निघालो,एकमेकांचे सोबती म्हणून….!

---
नातेसंबंध म्हणजे सगळ्या अनुभवांचा गुरूच! प्रेम म्हणजे काय हे सर्वप्रथम उमजणे  आणि त्यानंतर ते निभावणे हे सगळ्यात कठीण काम! कोवळ्या वयाला हे कसे कळणार? कुसुमाग्रज म्हणतात तसं प्रेम हे बेधडक, आर्त, निस्वार्थी असायला हवं.

प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं

प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं

मागे कधीतरी तू रील्काचा एक उतारा वाचून दाखवलेलास, तो  अजूनही स्मरणात आहे.  “सगळ्याच क्षेत्रात नवख्या असणाऱ्या त्याला/ तिला  प्रेम तरी कसे समजणार? त्यांना ते शिकावे लागते . त्यांच्या आत्म्यासह. त्यांच्या सर्व ताकादीसह. त्यांच्या एकाकी, भेदरलेल्या आणि धडधडत्या हृदयासह! त्यांना शिकावेच लागते. पण  हे ज्ञान काही एकाच रात्रीत येणारे  नव्हे. काहीही शिकायला वेळ हा लागतोच. प्रेमालाही! बऱ्याच  काळासाठी अतिशय गर्द असा एकाकीपणा सोबतीला असतो . प्रेम म्हणजे काही फक्त एकत्र असणे नव्हे, फक्त सतत देणे नव्हे कि सोबत जाणं नव्हे. यासाठी त्याला स्वतःला काहीतरी असावे लगते. बनावे लगते. स्वतःला एक  जग बनावे लागते. स्वतःला समोरच्यासाठी एक जग बनवावे  लागते.” आपलंही जग बनलं. फक्त तुझं आणि माझं! कसं?

प्रेम करणं  इतकं  सहज सोपं  नसतंच . क्षुल्लक कारणांनी सुरु झालेले वाद टोकाला जायचे.  त्यातून मनाची होणारी दोलायमान अवस्था. त्यांतून उभा  राहणारा  वैचारिक, भावनिक कल्लोळ .  कधीतरी वाटायचं  माझा निर्णय चुकला तर नाही? चिडचिड,संताप, नैराश्य सगळच  घेरून टाकायचं. पण हळूहळू समजत गेले, जर स्वतःच्या प्रेमावरच  विश्वास नाही ठेवता आला तर बाकीच्या सगळ्याच भावना, नाती अगदी कशावरही विश्वास नाही ठेवू शकत नाही. प्रेमाहून क्षुल्लक गोष्टी तर नाहीच पण जर प्रेमाहून श्रेष्ठ काही नसेल तर आजपर्यंत  जगत आलेल्या प्रत्येक गोष्टीवर अविश्वास दाखवू  आपण. सरसकट सगळ्याच गोष्टींवर अविश्वास! आपल्या जगण्यावरच अविश्वास!

या वादातून, मनस्तापातून एक गोष्ट मात्र शिकले, आपण ज्या माणसावर प्रेम करतोय त्याच्याबद्दल अथः पासून इतिपर्यंत आपल्याला कधीच नाही कळणार.  हे नातं, त्याच्यावर आपले १००% वर्चस्व कधीच नसेल. पण हि सुखद गोष्ट! कारण आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला, नात्याला संपूर्णपणे काबूत ठेवायचा प्रयत्न केला  तर त्या नात्यामधून आपण काय मिळवणार? कदाचित आपल्या हाती काहीच नाही येणार. यापेक्षा निव्वळ, निस्सीम प्रेम केलेलं काय वाईट? मी कदाचित तेच केलं. तुझ्यासोबत जगताना फ्रिडाच्या ओळी कायमच  डोळ्यासमोर होत्या,

the silent life giver of worlds,

what is most important is the nonillusion. morning breaks, the friendly reds, the big blues, hands full of leaves, noisy birds, fingers in the hair, pigeons’ nests a rare understanding of human struggle simplicity of the senseless song the folly of the wind in my heart = don’t let them rhyme girl = sweet xocolatl [chocolate] of ancient Mexico, storm in the blood that comes in through the mouth — convulsion, omen, laughter and sheer teeth needles of pearl, for some gift on a seventh of July, I ask for it, I get it, I sing, sang, I’ll sing from now on our magic — love.

- Frida Koelho.

-दिप्ती साळवी

 

About the Author

Dipti Salvi's picture
Dipti Salvi