जो बुंद से गयी....

 इंचाइंचावर स्वतःचे नाव विणलेला सूट वापरणे, हेच मुळात हीन अभिरूचीचे लक्षण आहे. औचित्यभंग आहे. संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन आहे. तसे तर अंगावर किलोकिलाचे दागिने घालून मिरवणारे गुंठापती तर आपल्या आजूबाजूस शेकड्यांनी आहेत; पण देशातील साऱ्या जनतेचे प्रथम क्रमांकाने प्रतिनिधित्व करणाऱ्या पंतप्रधानांकडून अधिक समंजस वर्तनाची आणि परिपक्वतेची अपेक्षा आहे. मते मागताना ‘मी सामान्य चहावाला आहे’ असे म्हणून मते मागायची आणि निवडून आल्यावर कुबेराला लाजवेल असे रंगढंग करायचे, ही शुद्ध लबाडी आहे.

 महागड्या सूटने ‘गाढवही गेले नि ब्रम्हचर्यही’ अशी अवस्था झालेल्या मोदींच्या दांभिक वर्तनाचा ज्येष्ठ लेखक रवींद्र देसाई यांनी घेतलेला समाचार

………….

 

पायदानावर पाय टाकून आरामात पसरलेल्या अकबर बादशहाच्या अंगावर एक हुजऱ्या अत्तरदाणीतून अत्तर शिंपडत असताना, अत्तराचा एक थेंब पायदानावर पडला. एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे, अकबराने नकळत तो थेंब आपल्या बोटाने टिपला आणि आपल्या अंगरख्याला पुसला. किती किरकोळ बाब! अगदी मोदींच्या दहा लाखांच्या सूटासारखीच!

सुदैवाने, दरबारात सदैव मान झुकवूनच उभे राहायची सवय असल्यामुळे एकाही दरबाऱ्याने बादशहाची ही ‘मख्खीचूस’ हरकत पाहिली नव्हती. ‘मख्खीचूस’ म्हणजे तुपात माशी पडली तर ते तूप फेकून देण्याची बात तर सोडाच; उलट माशीच्या पंखाना लागलेले तूपही वाया जाऊ नये म्हणून तुपात पडलेली माशीही चोखणारा कंजूष! असो. एकट्या बिरबलाने मात्र ते पाहिले होते आणि बिरबलाने ते पाहिले आहे; हे बादशहाच्याही लक्षात आले होते. पण घटना तर घडून गेली होती. भले, कालचक्र उलटे फिरवून चुका दुरुस्त करता येत नसल्या तरी, स्वतःच्या सोईनुसार इतिहासाचेही पुनर्लेखन करता येते, हे मात्र बादशहाला कोणी तरी पक्के पढवलेले असावे. त्यामुळे त्यानेही, ‘प्रतिमा सुधारण्यासाठी सूटाचा लिलाव करून ते पैसे गंगापर्ण करणाऱ्या मोदींच्या पीआरओसारखीच ‘डॅमेज कंट्रोल’ची एक क्लृप्ती’ वापरायची ठरवले.

‘आपल्याला पैशांची काडीचीही फिकिर नाही‘, ‘आपण बिल्कूल कंजूष नाही’, हे बिरबलाच्या मनावर ठसवण्यासाठी त्याने दुसरे दिवशी बागेतल्या भल्या मोठ्या हौदामध्ये पाण्याऐवजी काठोकाठ चक्क अत्तरच भरले आणि दवंडी पिटवली, ‘ज्याला कोणाला जेवढे हवे असेल तेवढे अत्तर खुशाल फुकट घेऊन जावे.’ बादशहा आणि बिरबल बाजूस उभे राहून प्रजाजनांची झुंबड पाहात होते. बादशहाने मोठ्या रुबाबात बिरबलाकडे कटाक्ष टाकला. बिरबल फक्त एवढेच म्हणाला, ‘‘जो बुंद से गयी, वो हौदसे नही आती’’.

थेंबभर अत्तर वाचवण्यासाठी केलेल्या आटापिट्याने ‘मख्खीचूस’ म्हणून झालेली बेअब्रू, नंतर हौदभर अत्तर फुकट वाटूनही पुसता येत नाही. पाठीराख्यांच्या अतिउत्साहातून किंवा ‘माझे कोण काय वाकडे करणार’ या गुर्मीतून वा स्वप्रतिमेच्या प्रेमातून 10 लाखांचा सूट अंगावर चढवणाऱ्या मोदींची अवस्था, दिल्लीच्या निवडणूकीत भाजपचा पुरता सफाया झाल्यानंतर तो सूटही विकल्यामुळे आता ‘गाढवही गेले आणि ब्रम्हचर्यही गेले’ अशीच काहीशी विचित्र झाली आहे. ‘काहीही गोलमाल सांगून आपण जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकू शकू, या पक्षप्रवक्त्यांचा औधत्यपूर्ण गैरसमजुतीतून सादर केलेल्या मखलशींमुळे तर प्रकरण आणखीनच चिघळले आहे.

खरे तर, कोणी काय कपडे घालावेत हे इतर कोणीही ठरवू नये. तो ज्याच्या त्याच्या (किंवा जिच्या तिच्या) आवडीचा, अभिरूचीचा आणि ऐपतीचा प्रश्न आहे, अशी निदान माझी तरी निःसंदिग्ध भूमिका आहे कारण, कोणी काय कपडे घालावेत हे ठरवायला मी काही ‘स्वतःची स्वतःच नेमणूक केलेला बिनपगारी, निरूद्योगी आणि दुसऱ्यांच्या आनंदात बिब्बा घालणारा तथाकथित संस्कृतीरक्षक’ नाही. हां, पण जसे कोणालाही काहीही कपडे परिधान करायचे स्वातंत्र्य आहे; तसेच इतरांनाही कायदा हातात न घेता, त्याच्यावर सनदशीर मार्गाने मतप्रदर्शन करण्याचेही स्वातंत्र्य आहे, असेही मी मानतो, म्हणूनच मोदींच्या या सूटाबाबत मला काही मुद्दे उठवावेसे वाटतात.

 

पहिली बाब, अभिरूचीबाबत बोलायचे तर इंचाइंचावर स्वतःचे नाव विणलेला सूट वापरणे, हेच मुळात हीन अभिरूचीचे लक्षण आहे. औचित्यभंग आहे. संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन आहे. तसे तर अंगावर किलोकिलाचे दागिने घालून मिरवणारे गुंठापती तर आपल्या आजूबाजूस शेकड्यांनी आहेत; पण देशातील साऱ्या जनतेचे प्रथम क्रमांकाने प्रतिनिधित्व करणाऱ्या पंतप्रधानांकडून अधिक समंजस वर्तनाची आणि परिपक्वतेची अपेक्षा आहे. मते मागताना ‘मी सामान्य चहावाला आहे’ असे म्हणून मते मागायची आणि निवडून आल्यावर कुबेराला लाजवेल असे रंगढंग करायचे, ही शुद्ध लबाडी आहे. मोदी समर्थक अगदी मानभावीपणे म्हणतात की तो सूट मोदींनी स्वतः शिवला नव्हता. त्यांना तो ‘भेट’ म्हणून मिळाला होता. तसे असेल (आहेच) तर, जिची परतफेड सहजासहजी करता येणार नाही अशी डोईजड भेट कोणाकडूनही स्वीकारणे हेच मुळात अधिकच गैर आहे. एक तर अशा भेटीची परतफेड करताना नाकी नऊ येतात किंवा परतफेड करेपर्यंत मिंघेपणाची भावना मनात बाळगावी लागते. सारी चाणक्यनीती कोळून प्यायलाचा आव आणणाऱ्या मोदींना  ‘There is no free meal’, हे शेंबड्या पोरांनाही कळणारे व्यावहारिक सत्य काय ठाऊक नाही की उठता बसता भारतीय संस्कृतीचा घोष करणाऱ्या मोदींना भीष्म पितामहांनी अगतिकपणे व्यक्त केलेली ‘अर्थस्य पुरूषो दासः’ ही उक्ती ठाऊक नाही? म्हणजे मग एक तर ती भेट देणाऱ्याला मोदी याची सव्याज परतफेड करतीलच अशी खात्री होती किंवा आपण या भेटीची परतफेड (पंतप्रधानांच्या तौलनिक माफक पगारातून?) करू शकू याची भेट स्वीकारताना मोदींनाही खात्री होती, असेच म्हणावे लागेल.

भेटीची परतफेड करण्यासाठी रिटर्न गिफ्ट द्यायचा सभ्य समाजात सर्वमान्य रिवाज असतो. सत्ताधारी - मग तो अधिकारी असो वा पदाधिकारी - अशी परतफेड स्वतःच्या खिशातून करण्यापेक्षा, गीफ्ट देणाऱ्यावर वेगळ्या प्रकारे मेहेरबानी करून परतफेड करेल अशी केवळ शक्यताच नव्हे, तर सर्वत्र चांगली रुळलेली ती पद्धतच आहे. लाच आणि गिफ्ट यामधली सीमारेषा नेहमीच फारच धूसर असते. शासकीय कर्मचाऱ्यांना कोणाकडूनही ‘गिफ्ट’ स्वीकारायला बंदी असण्यामागे हेच कारण असते. असे असताना मोदींनी ही नियमबाह्य गिफ्ट मुळात स्वीकारलीच का?

पत्रकारांनी खोदून खोदून विचारल्यावरही हा सूट कोणी भेट दिला हे लपवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आला. लाखो रुपयांच्या सूटाची किंमत फारतर पाच-सात हजार आहे असे सांगण्यापर्यंतही पक्षप्रवक्त्यांची मजल गेली. आता निदान सूट भेट देणारा तरी पुढे आला आहे; पण इथेही पुन्हा लपाछपीचा खेळ चालूच आहे. सूटाची किंमत म्हणे खुद्द त्यालाच माहित नाही. आता बोला!

लिलावातून येणारे पैसे ‘गंगा सफाई’सारख्या कामात खर्च होणार आहेत, असे सांगून मूळ चुकीवर पांघरूण घालण्याचा पक्षप्रवक्त्यांचा युक्तीवाद अगदीच बालिश आहे. उद्या एखाद्या चोराने चोरीची सारी रक्कम मी दानधर्म करण्यात वा मंदिर बांधण्यासाठी वापरणार आहे असे अॅफेडेव्हिट लिहून दिले, तर काय कोर्टाने त्याला दोषमुक्त करायचे का?

आक्रमण हा संरक्षणाचा अधिक चांगला उपाय असतो, हे बाळकडूच प्यालेल्या पक्षप्रवक्त्यांनी मोदींवरचे लक्ष उडवण्यासाठी या प्रकरणाची तुलना नेहरूंचे कपडे पॅरिसमधून धूवून येत असे सांगून तिकडे लक्ष वेधवण्याचा अधिकच नुकसानदायक मार्ग अनुसरला आहे. नेहरूंचे कपडे कदाचित पॅरिसमधून धूवून येतही असतील कारण ते मुळातच गर्भश्रीमंत घरात जन्मले होते. अर्थात तरी देखील पैशांचा असा अपव्यय क्षम्य नाहीच. जर ती गोष्ट खरी असेल तर नेहरूंचे ते वर्तनही तितकेच निंदनीय आहे;पण नेहरूंनी एखादी निंदनीय गोष्ट केली असेल तर तीच गोष्ट मोदींनी केल्यावर वंदनीय कशी ठरते, हे एक कोडेच आहे. शिवाय या दोन्ही उदाहरणांमध्ये एक फार मोठा विरोधाभासही आहे. नेहरूंनी ते वैभव सोडून देशासाठी तुरुंगवासही पत्करला. इथे हा उलटाच प्रकार चालाला आहे, आपल्या व आपल्यासारख्यांच्या गरीबीचे स्मरण ठेऊन साधेपणाने राहाण्याऐवजी, आमचे माननीय पंतप्रधान एखाद्या असंस्कृत व्यक्तीप्रमाणे आपल्या (स्वकष्टार्जितही नसलेल्या) वैभवाचे किळसवाणे प्रदर्शन करण्यात धन्यता मानत आहेत.

 

लिलावामध्ये सुटाची किंमत जास्तीत जास्त वाढवून मोदी अजूनही किती लोकप्रिय आहेत हे दाखवण्याचाही केविलवाणा प्रयत्न चालू आहे;पण किंमत जशी जशी वाढेल तशी तशी ही सारीच घटना सर्व अप्रिय तपशीलांसह लोकांच्या मनात अधिक काळपर्यंत लक्षात राहिल, हा धोका या ‘डॅमेज कंट्रोलरांनी’ लक्षात घेतलेला नसावा.

असो. पण ही सारी घटना विसरून, हे सारे कशामुळे घडते या अधिक महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळल्यावर लक्षात येते, की माणसांना अपयश पचवता येते, पण यश मात्र नम्रपणे पचवता येत नाही. उन्मत्त यशामध्येच पुढच्या अपयशाची मुळे रोवलेली असतात. यशस्वी माणसाच्या भोवती नेहमीच स्वार्थी लोकांचा, तोंडपुजकांचा आणि खूषमस्कऱ्यांचाच तांडा जमतो. सदैवच उगवत्या सुर्याला नमस्कार करणाऱ्या या भाटांना दूर ठेऊन, बिरबलासारखा एखादा विवेकी व निर्भिड टिकाकार ‘कॉन्शन्स कीपर’ म्हणून सोबत ठेवणे, हे चिरकालीन फायद्याचे असते; पण कोणत्याच राज्यकर्त्याला हा मार्ग रुचत नाही. मानवी जीवनाची हीच खरी शोकांतिका आहे

 

रवीन्द्र देसाई

( मराठीतील ज्येष्ठ लेखक. अठराहून अधिक अभ्यासपूर्ण पुस्तके रवींद्र देसाई यांच्या नावावर आहेत.)

desaisays@gmail.com

 

About the Author

रवींद्र देसाई's picture
रवींद्र देसाई