GM हटाओ, देश बचाओ !

 

जेनेटिकल मॉडिफाइड पिकांचा मानवी आरोग्यावर आणि परिसंस्थेवर होणारा दुष्परिणाम अभ्यासपूर्ण रीतीने मांडणारा राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका तेजश्री प्रताप प्रतिभा कांबळे यांचा हा लेख

---------------

सध्या महाराष्ट्रात, राहुरी कृषी विद्यापीठात आणि परभणीच्या कृषी विद्यापीठात जी.एम (Genetically modified organisms ) गहू, तांदूळ, मका, कापूस, वांगी या पिकांच्या  – जनुकीय परिवर्तीत बियाण्यांवर चाचण्या सुरु आहेत . त्याचवेळी कानाकोपऱ्यातून ह्या तंत्रज्ञानाला विरोध करणारे  सूर ऐकू येत आहेत  व या बाबत एकूणच बरेच वाद-विवाद आहेत. २००९ मध्ये  कोल्हापुर कृषी विद्यापीठात ह्या चाचण्या होणार होत्या, त्या रोखण्यात आल्या होत्या. युपीए सरकार ने जाता जाता आचारसंहिता लागू होण्याच्या दोन-चार दिवस आधी जी.एम्. पिकांच्या  चाचण्यांना परवानगी दिली.  जी.एम्. पिकांची आपल्याला गरजच नाही अशी एक बाजू तर  दूसरी बाजू म्हणजे गरीबी, कुपोषण, अन्न सुरक्षा, वाढत्या लोकसंख्येचा भस्मासुर, पर्यावरण बदल या सगळ्याच प्रश्नांवर आता फ़क्त जनुकीय परिवर्तीत बियाणेच उपाय आहेत. तर जी. एम् ला नेमका विरोध का, हे आपण शास्त्रशुध्द पध्दतीने समजुन घेऊ.

 

 मुळात आपला समाज हा कोणताही प्रश्न समजून घ्यायला तितकासा उत्सुक नसतो, परंतु परिस्थितीची खूप गुंतागुंत झाल्यानंतर मात्र प्रश्न समजून घेण्याखेरीज पर्याय नसतो, जेव्हा तलवार त्याच्या गळ्याशी आलेली असते.. कोणत्याही तंत्रज्ञानाला विरोध म्हणजे विज्ञानाला विरोध, हा तंत्रज्ञानावर अंधश्रध्दा ठेवणा-यांचा रोख असतो. विज्ञान आणि त्यासंबंधाने होणा-या प्रगतीतील घडामोडी ही झापडं लावुन मान्य करून घेणे कुठला विवेकवाद किंवा वैज्ञानिक दृष्टिकोण;पण तंत्रज्ञानाला प्रश्नच विचारायचे नाही, कारण चर्चा मग वीज, फोन, रेल्वे, इंटरनेट त्यांच्या फायद्यात जाऊन अडकतात.  ही विषयांतर करण्याची जुनी पद्धत आता मोडून काढली पाहिजे. मुद्द्याचं बोला आणि मुद्द्याचं ऐका.

 लोकशाहीची जी काही तत्वे आहेत, ती विज्ञानाची प्रगती कितीही वेगवान झाली तरी स्वीकारावीच लागणार. विज्ञान म्हणजे हुकुमशाही नाही. विज्ञानाचा आणि विकासाचा नक्कीच संबंध आहे;पण आपण आता विकासाची व्याख्या तपासून बघण्याची गरज आहे, विकास नक्की होतोय कोणाचा..? कारण आम्ही सांगू तोच  विकास याने अनेक सामाजिक आणि पर्यावरणीय प्रश्न निर्माण झालेत, जे ब-यापैकी दुर्लक्षित आहेत.

वैज्ञानिक शास्त्रज्ञ एकमेकांना चुकीचं सिध्द करून किंवा झालेल्या शोधाला पुराव्यांची जोड देऊन विज्ञानाची जगाला ओळख करून देत असतात. यालाच आपण विज्ञानाची प्रगती समजत आलो आहोत; पण विज्ञानाच्या काही सामाजिक भूमिकासुध्दा आहेत. विज्ञान हा काय धर्म आहे का, की आपण त्याला प्रश्न नाही विचारू शकत. मग प्रश्न विचारणारे सामाजिक कंटक  कसे बनतात? असं मत व्यक्त करण्यामागचं कारण म्हणजे जून मध्ये आलेल्या आय.बी च्या रिपोर्ट मध्ये जी. एम. ला विरोध करणारे म्हणजे विकास-बाधक, असं घोषित करून प्रश्न विचारणारे हे देशद्रोही ठरवले गेले.. त्यामुळे मी जे काही मांडत आहे ती कल्पना नाही, तर सिद्ध झालेले जी. एम संबंधातील संशोधनातील त्रुटी व त्याचे दुष्परिणाम, तसेच काही महत्वाचे प्रश्न आहेत. जसे की, जी.एम पिकांमुळे ट्युमर्स,मूत्रपिंडदोष आणि स्कीन एलर्जी(त्वचा रोग) असे आरोग्यावरील दुष्परिणाम आढळून आले. देशी वाण संपुष्टात येत आहे. जैव-विविधता नष्ट होताना दिसतीये., काही ठिकाणी जनावरे मरण पावल्याचे, तसेच गर्भधारण क्षमतेवर परिणाम झाल्याचे आढळून आले. रासायनिक खतांचा वापर वाढलेला आहे. जमिनीचा आणि पर्यावरणाचा -हास  होताना दिसतोय. तसेच येत्या काळामध्ये मधुमेह आणि कुपोषणाचे प्रमाण वाढू शकते.

ब-याच देशांमध्ये जी.एम अन्नावर बंदी आहे. काही देशांमध्ये जी.एम. पिकांवर लेबलिंग बंधनकारक आहे. जी.एम पिकांना जगभरात विरोध होत असतांना मग आपली जी. एम. पिके स्वीकारण्यासाठी इतकी घाई कशासाठी? जी.एम तंत्रज्ञान हे अपरिवर्तनीय आहे, हे सिद्ध झाले आहे.

 विज्ञानावर फक्त वैज्ञानिकांचा पगडा आणि काही हितसंबंध असणाऱ्यांचे वर्चस्व आणि मक्तेदारी दिसून येते. जी. एम.चा  प्रश्न समजून घ्यायला आपण शास्त्रज्ञ, किंवा शेतीतज्ञ, किंवा बायो-टेक्नोलोजीतज्ञ, किंवा पर्यावरण शास्त्रज्ञ,  किंवा कोणत्याही विषयाचा तज्ञ असण्याची गरज  नाही. साधी विवेकपूर्ण बुध्दी हवी, सजग विचार आणि मुळात कॉमनसेन्स असावा लागतो. जवळ जवळ सगळ्याच गोष्टींना दोन बाजू असतात. म्हणून किमान खुली चर्चा व्हावी, जी.एम. च्या दोन्ही  बाजू लोकांच्या समोर याव्यात व त्यातून त्यांनी ठरवावं की आपण काय खायचं आणि काय उगवायचं, हे माझे साधे प्रश्न आहेत .

जेनेटिक इंजिनीयरिंग (Genetic engineering) म्हणजे एखाद्या वनस्पती किंवा प्राण्याचे गुणधर्म बदलण्यासाठी जनुकीय पातळीवर त्याच्या संरचनेत बदल करणे. GMO वेगळे काही नसून ते याच “जेनेटिक इंजिनीयरिंग” च्या तंत्रज्ञानाने तयार केलेले जीव आहेत. जी. एम बियाणे तयार करताना, एकाच वनस्पतीच्या प्रजातीतून नव्हे, तर वनस्पती, प्राणी, पक्षी, किंवा सूक्ष्म जीवाणू यापैकी कोणत्याही प्रजाती मधील जनुकांची अदला-बदल करून नवीन बियाण्यांची जात निर्माण केली जाते. बियाणे-बाजारात हा एक ब्रम्हराक्षस आलेला आहे. GMO बियाणे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रयोगशाळेत, कृत्रिम पध्दतीने, तयार केले जाते. उदाहरणार्थ, tomato चे जी.एम. बियाणे तयार करताना समजा – tomato चा ‘क्ष’ वाण उत्पादन भरपूर देतो पण त्यामध्ये खालील तीन त्रुटी आहेत.

१.      त्याची साल पातळ असल्यामुळे वाहतुकीत खराब होतो.

२.      तो  आकाराने लहान आहे.

३.      तो ‘य’ रोगास बळी पडतो.

tomato च्या ‘क्ष’ जातीमध्ये असलेल्या या तीन त्रुटींवर मात करण्यासाठी हे तीन गुणधर्म ज्या प्राणी, पक्षी व वनस्पतीमध्ये आढळतील ते जनुक शोधून tomato च्या ‘क्ष’ वाणामध्ये घालून त्या वाणाची रचना बदलण्यात येते.

 उदा.

अ.    साल जाड होण्यासाठी डुकराच्या कातडीचा जनुक ब. आकार मोठा व्हावा म्हणून दुसऱ्याच वनस्पतीचा जनुक क.‘य’ रोगास बळी पडू नये म्हणून उंदराचा जनुक असे अनैसर्गिक एकत्रीकरण  होते.

जनुकीय परिवर्तीत बियाणे हे हायब्रीड नव्हे, तांदळातून तांदळाचे वाण, गव्हातून गव्हाचे वाण इ. असे एका जातीच्या पिकातून त्याच जातीचे वाण तयार करणे म्हणजे हायब्रीड. पण जी. एम. बियाणे म्हणजे दोन वेगळ्या पिकांमधून जनुक घेऊन ते तंत्रज्ञानाच्या सह्याने नवीन बियाणे तयार करणे. जसे की, टोमॅटोची बाह्य आवरण हे पातळ असते त्यामुळे वाहतुकीच्या किंवा साठवणीच्या कामात टोमॅटो फुटतात. इकडे तंत्रज्ञानाचा उपयोग म्हणजे, टोमॅटोची त्वचा जाड करण्यासाठी त्यामध्ये डुकराच्या चामड्याचा जनुक टाकला जातो आणि मग तो टोमॅटो टणक असू शकतो.

 

जी.एम. पिकांचे आरोग्यावरील दुष्परिणामः- 

जनुकीय तंत्रावर आधारित पिकांची लागवड सुरु झाल्यानंतर उत्तर अमेरिकेतील शेतकऱ्यांना असे जाणवले की, अशा पिकांचा चारा खाऊन वाढणाऱ्या जनावरांमध्ये अनैसर्गिक  गर्भपाताचे प्रमाण वाढले आहे. भारतामध्ये कापसाचे बी.टी. पिक सुरु झाल्यापासुनही हरियाना, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशमधील शेतकऱ्यांनी असेच अनुभव नोंदवले. याबाबतीत असा आक्षेप घेतला जातो की, अशा घटनांच्या आधारावर एखाद्या तंत्रज्ञानाच्या चांगले-वाईटपणा विषयी दावे करता येत नाहीत. अर्थात हा आक्षेप निश्चितच बरोबर आहे. कारण बऱ्याच वेळा अशा घटना योगायोगाने घडलेल्या, इतर कारणांनी घडलेल्या, किंवा अशा घटनांमध्ये हितसंबंध गुंतलेल्या व्यक्ती किंवा समूहाने हेतुपुरस्पर पसरविलेल्या असू शकतात. अर्थात त्यामुळेच जी. एम. तंत्रज्ञानाच्या धोक्यांविषयी जाणीव झालेल्या अभ्यासकांनी केवळ अशा सांगीव घटनांच्या आधारावर न थांबता त्याच्या परिणामांविषयी काळजीपूर्वक अभ्यासाला सुरुवात केलेली आहे.

उदाहरणार्थ, फ्रांस मधील जीलेस एररक सेरेवलनी आणि इतर शास्त्रज्ञांच्या गटाने २०१२ साली केलेल्या आंतरपिढीय अभ्यासात हे स्पष्टपणे दिसून आले की, जनुकीय तंत्राने बनववलेला मका खाल्ल्यामुळे उंदरांमधील अकाली मृत्यू व कॅन्सरचे प्रमाण वाढते.अशाच प्रकारचे निष्कर्ष वेलीमिरोव आणि सहकाऱ्यांनी केलेल्या अभ्यासातून पुढे आले. अशा प्रकारे काळजीपूर्वक पणे केलेल्या शास्त्रीय चाचण्यांमधून आलेल्या निष्कर्षांची पुष्टी मिळत असतानाही जर जगभरातून नोंदविल्या जाणाऱ्या घटनांना केवळ अफवा समजून दुर्लक्ष करणे मात्र नक्कीच शहाणपणाचे आणि विज्ञानवादी नाही.

 

 भारतातील जनुकीय तंत्राधारित पिकांच्या चाचण्यांचे वास्तवः-

दुसरा आपल्या समोरील महत्वाचा प्रश्न म्हणजे जर एखाद्या तंत्राच्या साह्याने पिकांची उत्पादकता वाढण्याची शक्यता असेल तर अशा प्रयोगांना आपला विरोध का असावा? अशा विरोधाला एक महत्वाचे कारण म्हणजे त्यातून पुरेशा काळजी अभावी घातक, दुर्दैवी दुष्परिणाम घडून येवू नयेत ही अपेक्षा. जेव्हा संभावित धोक्यांचा संबंध थेट आपल्या आरोग्याशी, जीवन-मरणाशी असेल तेव्हा ही अपेक्षा चुकीची आहे का? मात्र, या प्रयोगांना समर्थकांच्या मते अशा परिणामांबाबत अनाठायी भीती पसरविली जात आहे. प्रत्यक्षात असे परिणाम घडून येऊ नयेत, यासाठी पुरेशी काळजी घेतली गेली आहे.

 

नेमकी काय काळजी घेतली आहे?

अशा चाचण्यांमध्ये असलेल्या संभावित धोक्यांची जाणीव झाल्यानंतर या चाचण्यांना पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी देण्यास नकार देणाऱ्या जयंती नटराजन यांची आठ दिवसात मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली.

संबंधित विषयातील तज्ञांच्या सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने अशा चाचण्या करण्यासाठी पुरेशी यंत्रणा आपल्याकडे नाही असे ठामपणे सांगितले असताना, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट न पाहता अशा चाचण्यांना परवानगी दिली जात आहे.

या चाचण्या आणि त्यातून तयार झालेल्या पिकांचे घातक दुष्परिणाम झाल्यास त्याविषयी संबंधित कंपन्यांवर काय जबाबदारी असावी याबाबत कुठलेही नियमन केलेले नाही.

अशा तंत्रज्ञानाच्या गरजेचा अभ्यास झालेला नाही.

अशा प्रकारे होत असलेल्या प्रयोगांविषयीची भीती तुम्हाला अनाठायी वाटते का?

जी.एम. पिकांचे पर्यावरणावरील दुष्परिणाम

जनुकसंस्कारित पिकांचे इतर जीवसृष्टीवर, म्हणजेच ‘जैव विविधतेवर’, होणारे परिणाम जास्त धोकादायक आहेत कारण ते अपरिवर्तनीय आहेत. अशा पिकांवर जगणारे ‘लेडीबग’सारखे पिकांना हानी पोचविणाऱ्या उपद्रवी किडींना खाणारे मित्रकीटक, मधमाशासारखे उपयुक्त कीटक आणि इतर निरुपद्रवी कीटक यांनाही अशा पिकातील विषामुळे हानी पोचून त्यांचे जीवन धोक्यात येऊ शकते. एवढेच नव्हे तर अशा किटकांवर जगणाऱ्या पक्ष्यांसारख्या  निसर्गाच्या  ‘अन्नसाखळीतील’ इतर जीवांना देखील हानी पोचू शकते. ‘समांतर जनुक स्थानांतरण’ (horizontal gene transfer) या प्रक्रियेद्वारे या पिकांमधील विष निर्माण करणारी धोकादायक जनुके परिसरातील त्याच प्रजातीच्या इतर वाणांमध्ये अथवा त्याच वनस्पती कुटुंबाच्या (plant family) इतर प्रजातींमध्ये शिरून नवा उत्पात घडवू शकतात अशी शक्यता परिस्थितीकी शास्त्रज्ञ (ecologists) व्यक्त करतात. याच संदर्भात ज्यावर कुठल्याही कीटकनाशकाचा परिणाम होणार नाही अशी अनियंत्रित ‘राक्षसी कीड’(super bugs) तसेच अनियंत्रित ‘राक्षसी तणे’ (super weeds) निर्माण होण्याचा धोकाही व्यक्त केला जातो. त्याचप्रमाणे त्यांच्या सेवनाने मानवी आरोग्यावरही दुष्परिणाम संभवतात. म्हणूनच बीटी वांगी व यासारख्याच मानवी खाद्य म्हणून उपयोगात येणाऱ्या इतर पिकांच्या जनुकीय संसाक्रीत वाणांच्या निर्मिती व व्यापारीकरणाकडे सावधपणे पाहण्याची गरज आहे. कारण या संदर्भात निसर्गातील जीव, तसेच मानवी आरोग्य यावर होणारे परिणाम तपासणारे शास्त्रीय अभ्यास तुलनेने कमी आहेत व जे आहेत ते कमी काळाचे आहेत.

जी.एम. पिकांचे शेतीवरील- सेंद्रिय शेती, देशी बियाणे दुष्परिणाम 

 

विदर्भातील  सेंद्रीय शेती करणारे वसंत फुटाणे, माझ्याशी बोलताना म्हणाले, "माझ्या शेजा-याने जी.एम. बियाणे वापरल्यास तिकडचे परागकण माझ्या शेतात येवून माझे पीक नासू शकते आणि मी जपलेल्या पारंपारिक बियाण्याची कायमची वाट लागू शकते." पुढे त्यांनी सांगितले की  ज्वारी, मका, दुधी भोपळा, कोहळा, काकडी, कारली, पपई, आंबा, इ. परपरागसिंचितसारख्या (cross-pollinated) पिकांच्या बाबतीत हा धोका फार अधिक आहे. मेक्सिको देशाचे मुख्य पीक मका आहे. तेथे जी.एम. मक्यामुळे मक्याच्या पारंपारिक जाती कायमच्या दूषित झाल्या आहेत.

 स्टीव्ह मार्श हा ऑस्ट्रेलियातील गहू पिकविणारा सेंद्रिय शेतकरी आहे. त्याच्या शेजा-याने जी.एम. कॅनोला (एक मोहरीवर्गीय तेलबियाणं) पेरले म्हणून ताचे सेंद्रिय शेतीचे प्रमाणपत्र रद्द झाले. त्याने पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च न्यायालयात नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला;परंतु न्यायालयाने त्याची मागणी फेटाळली. (Ecowatch, 30 May 2014).

 जी.एम. पिकांचे अर्थकारण कोणाच्या हिताचे...?

 जगभरात फक्त 29 राष्ट्रांमध्ये GM पिकांचे उत्पादन होते. एकूण GM उत्पादनच्या 95% उत्पादन त्यातल्या 6 देशांमध्ये – अमेरिका, ब्राझिल, अर्जेंटिना, भारत, कॅनडा आणि चीन – होते. आता मात्र चीन अधिक काळजीपूर्वक पावले उचलत आहे आणि चीनचे GM क्षेत्र भारतापेक्षा कमी आहे. अनेक देशांनी GM पिकांवर पूर्ण बंदी घातली आहे तर इतरांनी दंड आणि लेबलींगचे कायदे करत त्यावर चांगले नियमन आणले आहे. आपल्या शेतीविषयक आस्थापनेला  कॉर्पोरेट जगाकडून मिळत असलेली; कॉर्पोरेट प्रायोजित ‘शैक्षणिक भेटी’, संशोधनासाठीचा निधी आणि इतर प्रलोभने यांना बळी पडत UPA सरकारने GM कडे आगेकूच आरंभली होती. आपल्या शेतीविषयक संसदीय स्थायी समितीचे खरोखरच अभिनंदन करायला हवे कारण त्यांनी UPA सरकारच्या GM पूरक धोरणांना योग्य वेळी आळा घालणारी पावले उचलली. जर GM हे एवढे यशस्वी आणि शेतकरी – मित्र तंत्रज्ञान असेल तर अमेरिकेतील कापूस शेतकर्‍यांना  460 कोटी $ एवढी वार्षिक सबसिडी का द्यावी लागते हा प्रश्न कळीचा आहे. आणि विदर्भात Bt कापसाचा प्रवेश झाल्यापासून करदात्यांचे पैसे वारंवार शेतकर्‍यांची कर्जे माफ करण्यासाठी का वापरले जात आहेत?

आपली अन्नाची गरज भागवण्यासाठी महागडी, पेटंट केलेली, परत न वापरता येणारी GM बियाणी आवश्यक आहेत का? आपल्या शेतक-यांनी हे दाखवून दिले आहे की, आपल्या वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतके अन्न उत्पादन करण्याची त्यांची क्षमता आहे.  गहू आणि भाताची दुथडी भरून वाहणारी गोदामे – जी ना ही संकरित आहेत, ना GM – हेच दाखवून देतात की शेतक-यांना सिंचन आणि पिकाची किंमत यांचे पाठबळ दिले की काय होते! 1 जून, 2012 ला आपल्याकडे 800 लक्ष टन जास्तीचे अन्नधान्य होते. उत्पादन हा आपला प्रश्नच नाहीए. आपले प्रश्न आहेत, गोदामात साठवलेल्या धान्याचे उंदीर – घुशींपासून, पाण्यापासून, नफ्यासाठी हपापलेल्या श्रीमंत चोरांपासून संरक्षण! एकीकडे हे धान्य सडते तर दुसरीकडे गरीब जनता भुकेली झोपते.

उत्पादन वाढवण्याच्या बढाया मारणा-या तंत्रज्ञानाकडे वळण्याऐवजी, अन्न वाटप सुविधा चांगली करण्यासाठी आणि अन्नाची नासाडी, वाहतूकीतले नुकसान आणि केंद्रीय गोदामातील चोरी कमी करण्यासाठी  योग्य साठवण आणि गाव पातळीवर छोटे अन्नप्रक्रिया उद्योग निर्माण करण्याकडे आपला कल हवा. शेतक-याला मालाची योग्य किंमत मिळणे, हे महत्वाचे आहे. मध्यस्थ व्यापार्‍याला किंवा विदेशी किरकोळ विक्रेत्यांना नव्हे जे शेतक-याला गिळंकृत करायला बसलेले आहेत.

जी. एम बियाणे दरवर्षी बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून अवाजवी दरात विकत घावे लागते. त्याचा पुनर्वापर होऊ नये, म्हणून ते टर्मिनेट केलेले असते. म्हणजे बियाण्यांच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न निर्माण होऊन. मोंसॅंटो, कारगिल, सिंजेंटा, डाओ आणि यांचे भारतीय परवानाधारक यांच्या मनात भारतीय शेतक-यांविषयी काही आस्था आहे, असे एका क्षणासाठीही आपण मनात आणायला नको. जेव्हा त्यांची बियाणी फसतात तेव्हा या कंपन्या शेतक-यांना नुकसान भरपार्ई देतात की बियाण्याच्या पाक़िटावर बारीक अक्षरात लिहिलेले सिंचन, कीड यांविषयक अटी आणि नियम दाखवतात. छोट्या कोरडवाहू शेतकर्‍याला हे सर्व सांभाळणे कसे शक्य होईल? 

म्हणूनच 'जी. एम हटाओ,  देश बचाओ' हे प्रचारकी विधान नाही तर अभ्यासांती केलेली घोषणा आहे.

-    तेजश्री प्रताप प्रतिभा कांबळे

(tejashri2211@gmail.com)

( राज्यशास्त्राची लेक्चरर असणारी तेजश्री शेतीप्रश्नाची अभ्यासक आहे )

 

 

About the Author

तेजश्री प्रताप प्रतिभा कांबळे's picture
तेजश्री प्रताप ...