पानसरेंची हत्या आणि असंवेदनशीलतेचा कळस !

  - श्रीरंजन आवटे

   

 

       फुले शाहू आंबेडकरांचा सतत उदघोष करुन पुरोगामी असल्याच्या वल्गना करणा-या महाराष्ट्रात, फुल्यांच्या पुण्यात दाभोलकरांची हत्या होते, शाहूंच्या कोल्हापूरात पानसरेंची हत्या होते..नि ‘राकट देशा कणखर देशा’ अशा शब्दात ज्या राज्याविषयी बोललं जातं त्याबाबत केवळ ‘दगडांच्या देशा’ हा शब्दप्रयोगच योग्य आहे की काय, अशी शंका यावी इतक्या असंवेदनशील प्रतिक्रिया पानसरेंच्या हत्येनंतर उमटतात, याहून शोकात्म काही असू शकत नाही. दाभोलकरांच्या हत्येनंतर सनातन प्रभात सारख्या संस्थांनी जाहीर आनंद व्यक्त केला होता. यु आर अनंतमूर्तींच्या निधनानंतर भाजपच्या आणि हिंदू जागरण वैदिकच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून अनंतमूर्तींच्या मृत्यूचा आनंद व्यक्त केला होता. ( पहाः संदर्भ २३ ऑगस्ट २०१४, हिंदुस्थान टाइम्स) गांधीहत्येला गांधीवध म्हणणा-या स्वयंसेवकांची कमतरता नाही नि नथुरामची जयंती पुण्यतिथी साजरी करण्यापासून ते माथेफिरु नथुरामला शहीद म्हणत त्याच्या नावाने पूल बांधणा-यांची इथे ददात नाही. अशा वेळेस पानसरेंच्या हत्येनंतर ज्या असंवेदनशील प्रतिक्रिया उमटल्या त्या या सा-या घटनामालिकेच्या सूत्राचा पुढील भाग आहेत.  

लोकसत्ताचे अविवेकी असंवेदनशील संपादकीयः-

१६ फेब्रुवारीला शिवाजी विद्यापीठाच्या आवारात सकाळच्या वेळी गोळ्या घालून पानसरेंची हत्या केली गेली. त्यांच्या पत्नीवरही हल्ला केला आणि दुस-या दिवशी लोकसत्ताच्या “खबरदार, विचार कराल तर..” संपादकीयात जे तारे तोडले गेले ते पाहून हा लेख पानसरेंच्या हत्येच्या निषेधार्थ लिहिला आहे की पुरोगाम्यांना झोडपायला लिहिला आहे, असा प्रश्न पडावा इतका भंपक लेख होता. मुक्ता दाभोलकरांनी संपादकीयाला दिलेल्या उत्तरातही असाच प्रश्न विचारला आहे.

“अशा हल्ल्यांमागं आर्थिक हितसंबंध असू शकतात, त्याकडं लक्ष न देता पुरोगामित्व-प्रतिगामित्वाच्या कालबाह्य आणि निष्फळ चर्चात आपण रमतो”  असं लेखात म्हटलं आहे. पुरोगामित्वाची चर्चा कालबाह्य झाली किंवा ती निष्फळ आहे, असं म्हणणं म्हणजे आपल्या अतार्किक असण्याचा स्वतःहून पुरावा देणे होय. हल्यामागे आर्थिक संबंध असोत अथवा काहीही हल्ला ज्यांनी कुणी केला असेल ते प्रतिगामीच. आर्थिक हितसंबंध असल्याने हल्ला करणारे पुरोगामी ठरतात काय ? मुळात दाभोलकर गेल्यानंतर ज्यांनी अर्ध संपादकीय ज्योतिषी साळगावकर यांच्यावर तर अर्ध दाभोलकरांवर लिहिणा-या या संपादकांना पुरोगामित्व आणि प्रतिगामीत्व यांच्या चर्चा निष्फळ वाटणे स्वाभाविक आहे. त्यांचं हे संपादकीय किती पुरोगामी आहे, याची साक्ष सनातन प्रभातने संपादकीयाचं कौतुक करुन दिली आहे. याहून अधिक यावर बोलण्याची आवश्यकता नाही!

(‘एक रेघ’ ब्लॉगने याची दखल घेत यावर मार्मिक भाष्य केले आहे)

 

भाऊ तोरसेकर यांची बौद्धिक दिवाळखोरीः-

“विचारांच्या लढाईचा विवेक सांगायला पुढे सरसावलेले शहाणे एक गोष्ट विसरतात, की कॉम्रेड पानसरे यांना कोण भिन्न विचारसरणीच्या संघटनेनेच मारले असेही मानायची गरज नाही. कम्युनिस्टांमध्ये आपल्याच सहका-यांना ठार मारून काटा काढण्याची कल्पना प्रचलित आहे.”

त्यापेक्षा सरळ कम्युनिष्टांनीच ठार मारलं असं म्हणायचं तोरसेकर.

महिनाभरापूर्वी विद्यापीठातल्या एका कार्यक्रमात सध्या नथुराम गोडसेचं कसं उदात्तीकरण होतं आहे, याविषयी पानसरे बोलले तर अभाविपच्या कार्यकर्त्यांनं भर कार्यक्रमात पानसरेंना धमकावण्याचा प्रयत्न केला होता. जातीअंताच्या चळवळीत, धर्मांध शक्तींच्या विरोधात, टोलविरोधात, भांडवली शक्तींविरोधात पानसरे उभा ठाकलेले असताना त्यांना कम्युनिष्टांनीच मारलं असेल असं सूचित करण्याइतका नतद्र्ष्टपणा नाही.

मुळात कॉन्स्पीरसी थिअरी मांडायची म्हणून काहीही बेछूट विधानं तोरसेकरांनी केली आहेत.

“जगातली कम्युनिस्ट चळवळ आणि भारतातली महाराष्ट्रातली कम्युनिस्ट चळवळ वेगळी नाही.”

“काही पानसरे यांच्यासारखे निव्वळ वैचारिक वाद प्रतिवादात रमणारे असतात, तर काही थेट कृती करणारे हिंसकही असतात.”

पानसरे केवळ वैचारिक प्रतिवाद करत होते, तर त्यांचा खून विचार मारण्यासाठी खून झाला नाही, असं कसं मान्य करायचं ?

बरं पानसरे निव्वळ वैचारिक प्रतिवाद करत होते, तर टोलविरोधी आंदोलनं, रस्त्यावरची अनेक आंदोलनं कोण करत होतं तोरसेकर ? आशयशून्य प्रतिवाद करुन कशीही विस्कळीत विचित्र मांडणी करुन धुरळा उडवून संदिग्धता निर्माण करुन त्यावर पाय रोवणे हा विकृत मार्ग त्यांनी पत्करलेला दिसतो.

लोकसत्ताचे संपादक असोत वा तोरसेकर, दोघंही ‘पुरोगाम्यांनी अमुक केलं तमुक केलं’ या परिभाषेत बोलतात यावरुन ते स्वतः पुरोगामी नसल्याचे मान्य करतात, हे ही नसे थोडके.

सोशल मिडीयावरील अपप्रचारः-     

अमोल पाटील नावाच्या एका माणसाने अतिशय आक्षेपार्ह मजकूर दाभोलकर आणि पानसरेंबद्दल लिहिला होता. पोलिसांनी त्याला अटक केल्याचे आता समजते आहे. पानसरेंची हत्या हा सेक्युलरवाद्यांचा डाव असू शकतो हिंदुत्वाला बदनाम करण्यासाठी, अशा प्रकारचे स्टेटसही पाहण्यात आले. सेक्युलरवाद्यांचा डाव..? सेक्युलर ही काय शिवी आहे काय ? जर आम्ही सेक्युलर तर लिहिणारे कोण आहेत ? संविधानाच्या प्रास्ताविकेत सेक्युलर हा शब्द आहे. सेक्युलॅरिझम हा घटनेचा पाया आहे.

कटकारस्थानांची, अपप्रचाराची ही अतिशय विकृत मांडणी सोशल मिडीयाच्या माध्यमातून होते आहे.  

 

महाराष्ट्र विधानसभेने नाकारला पानसरेंच्या हत्येबाबतचा शोकप्रस्ताव

कॉ.पानसरे यांच्या हत्येबाबत सत्तारुढ सरकार देखील तपासाबाबत कार्यक्षम दिसत नाही. जी बाब दाभोलकर हत्येच्या तपासाबाबत झाली आघाडीच्या काळात तीच गत पानसरेंच्या हत्येच्या तपासाबाबत होताना दिसते आहे. राधाकृष्ण विखे पाटलांनी मांडलेला शोकप्रस्ताव देखील विधानसभेने नाकारला तेही तांत्रिक कारण देऊन. विधानसभेने शोकप्रस्ताव मंजूर करण्यासारखी एका अर्थाने औपचारिक बाबदेखील पूर्ण होत नाही, अशा वेळेस राजकीय नेतृत्वाकडून काही एक अपेक्षा करणेच गैरलागू आहे की काय, असं वाटावं अशी सारी अवस्था आहे. 

सर्वच पातळ्यांवर अशा पध्दतीच्या असमंजस, असंवेदनशील प्रतिक्रिया पाहिल्यानंतर अनिल बर्वेंच्या ‘थॅन्क्यु मिस्टर ग्लाड’ मधला संवाद आठवतो..

“जोजफ,हिटलर माणूस नव्हता; माणसं हिटलर असतात.

गेस्टापू माणसं नव्हती, माणसं गेस्टापू असतात !”

अर्थातच हे सर्वसामान्यीकरण इतर समंजस जनमानसावर अन्याय करणारे ठरेल;पण अल्पसंख्याक असलेले हे समंजस विवेकी जनमानस टिकवणे आणि वाढवणे हेच आव्हान संविधानाची कास धरणा-या प्रत्येकासमोर आहे. पानसरे, दाभोलकरांसारख्या अतिशय कर्तृत्ववान व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्या विचारांविषयी, कर्तृत्वाविषयी चर्चा न करता काहीही अतार्किक बोलणे, लिहिणे ही प्रवृत्ती अतिशय घातक आहे. या असंवेदनशील आणि अविवेकी परिवारापेक्षाही सर्वसामान्य माणूस अधिक सहिष्णू, विवेकी आहे, यावर आजही आमचा विश्वास आहे फक्त दुर्जनांची सक्रियता आणि सज्जनांची निष्क्रियता हे चित्र पालटायला हवे. कॉ.पानसरेंनी, दाभोलकरांनी एक विचार दिला तो विचार वाढवण्यासाठी प्रयत्न करु या. तो विचार वर्धिष्णू होण्यासाठी झटू या. 

 

 

 

About the Author

श्रीरंजन's picture
श्रीरंजन

शैक्षणिक पात्रताः 

फर्ग्युसन महाविद्यालयातून भौतिकशास्त्रात पदवी- 

  स.प महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी- राज्यशास्त्र 

  

परिचयः-

  • संपादक, पाखरांची शाळा ( बालकांसाठी्चे मासिक)
  • सल्लागार संपादक, सुंबरान (मासिक)
  • ‘कवितारती’, ‘अक्षर’, ‘परिवर्तनाचा वाटसरु’, ‘ऐसी अक्षरे’(ऑनलाइन दिवाळी अंक), ‘अनाहत’ ( इ-नियतकालिक) यामध्ये कविता प्रसिध्द
  •  दै.सकाळ,लोकमत,दिव्य मराठी,महाराष्ट्र टाइम्स, कृषीवल साप्ताहिक लोकप्रभा,कलमनामा, परिवर्तनाचा वाटसरु, ऐसी अक्षरे,’कलात्म’ मध्ये सामाजिक,राजकीय, साहित्यिक विषयांवरील लेख प्रसिध्द.
  •  ‘जागतिकीकरणाचे चित्रण करणारी कविता’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्र, मंचर पुणे येथे याच विषयावरील शोधनिबंधाचे वाचन. 
  • अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये यश संपादन