प्रत्येक वेळी सीतेनेच अग्निपरीक्षा द्यायची ?

- अश्विनी सातव

 

 

-----------

नातीनं आजीला सांगितलेली एक अनोखी गोष्ट 

----------

नुकतीच वयात आलेली नात आपल्या आजीला म्हणते, “आजी मी लहान असताना तू रोज रात्री छान गोष्ट सांगायची. खूप आवडायच्या मला त्या गोष्टी . आज मी तुला एक गोष्ट सांगते.”

आजी म्हणते,- “अग हे काय नवीन खूळ ! इतकी का मोठी झालीस तू ? अन माझ वय आहे का गोष्ट ऐकायचं ?”

नात म्हणते, - “असं का ग आजी ! ऐक ना कधीतरी. आणि गोष्ट काही नवीन नाही. जुनीच आहे ती फक्त मी माझ्या पद्धतीने सांगणार आहे . तूच मला सांगितलेली रामायणातली गोष्ट आहे. तर ऐक आता सीतेच्या अग्निप्ररिक्षेची गोष्ट! 

हां; पण एक अट आहे मध्ये अजिबात अडवायचे नाही फक्त ऐकून घ्यायचं! कबूल?”

आजी- “कबुल बाई कबुल तू का ऐकणार आहेस ? कर सुरु तुझे रामायण….”

“बरं डायरेक्ट सुरवात करते, रामायण तर तुला तोंडपाठच आहे . ते सांगण्यात वेळ नाही घालवत .

रामभक्त हनुमान सीतेला लंका नरेश रावणाच्या तावडीतून सोडवून आणतो . त्यानंतर तिच्या पावित्र्याची अग्निप्ररिक्षा घेण्यासाठी एकवचनी, एकपत्नी मर्यादा पुरुषोत्तम अशा रामाचा दरबार भरलेला असतो.

प्रभु श्री रामचंद्र सीतेला म्हणतात - हे सीते, तू गेली अनेक महिने रावणाच्या तावडीत होतीस . तुझ्या परत येण्याने मला खूप आनंद झाला आहे. किंतु राज्यातल्या एका सर्वसामान्य माणसाने तुझ्या चारित्र्याविषयी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे तुझ पावित्र्य सिद्ध करण्यासाठी मला हा दरबार भरवावा लागला आहे . तू अग्निपरीक्षा देऊन प्रजेच्या मनातील शंका दूर करावी , अशी मी तुला आज्ञा देतो .

प्रभू रामचंद्राचे हे बोलणे ऐकून सारा  दरबार अस्वस्थ होतो. सीतेसह लक्ष्मण आणि हनुमान यानाही मोठा धक्का बसतो. हनुमान म्हणतो ,- " हे प्रभू , सीतामाईच्या शीलाबाबत आपल्या मनात किंतू निर्माण व्हावा ! आपण असे कसे बोलू शकता ?"

हनुमानाला मधेच थांबवत लक्ष्मण म्हणतो ,-"प्रभू , आपण मला वडील आहात;पण एका सर्वसामान्य व्यक्तिच्या सांगण्यावरून सीतामाईच्या पावित्र्याविषयी किंतु निर्माण करून तिला 'अग्निपरीक्षा' द्यायला लावावी, हे मला मान्य नाही .

दरबारात हा संवाद सुरु असतानाच रामाच्या बोलण्याने हादरून गेलेली सीता स्वतःला कशीबशी सावरते. लक्ष्मणाला मधेच थांबवते . ती म्हणते , "हे स्वामी, तुमचे बोलणे ऐकून मी खरच अस्वस्थ झाले आहे. हनुमान आणि लक्ष्मण या दोघांचे बोलणे सुरु असताना मी थोडा विचार केला . तेव्हा मला जाणवलं, की तुम्ही वेगळे काहीच केले नाही. सर्वसामान्य पुरुषाला साजेल अशीच कृती तुम्ही केलीत. "

एका सर्वसामान्य पुरुषाला पुढे करून तुम्ही, तुमच्या मनात असलेली माझ्या चारित्र्याविषयीची शंका दूर करू पाहत आहात. स्त्री -पुरुष विषमतेवर आधारलेल्या या समाजात तुमची ही कृती पुरुषप्रधान व्यवस्थेला साजेशी अशीच आहे . यात नवल करण्यासारखे काहीच नाही , हे सुरवातीला माझ्या ध्यानात आले नाही; पण आता मी सावरले.

आपण म्हणालात, माझ्या परतण्याने आपणाला खूप आनंद झाला आहे.असेलही कदाचित; याबाबत मी शंका घेणार नाही कारण मला सोडवण्यासाठी आपण केलेले प्रयत्न मला माहीत आहेत;पण आपल्या मनात माझ्या 'योनिशुचितेविषयी' प्रश्न निर्माण होत असल्याने आपण मी परत येण्याचा आनंद खुलेपणाने साजरा करू शकत नाही . आपल्या या प्रश्नाने माझ्याही मनात काही प्रश्न निर्माण झालेत . आपण आधी माझ्या मला त्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. त्यानंतर मी अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे;पण केवळ माझ्या 'चारित्र्याचं प्रमाणपत्र ' देण्यासाठी मला अशा परीक्षेला सामोरे जाण्याची गरज वाटत नाही . असो ……………….

हे प्रभू , माझा एकच प्रश्न आहे . आपल्याविषयी कसलाही किंतु  नाही . आकस तर मुळीच नाही . आपण, मी आणि लक्ष्मण तिघेही  एकाच वेळी वनवासाला गेलो . नंतर रावणाने कपटाने मला पळवून नेले . त्यानंतर माझ्याप्रमाणे आपणही त्या अर्थी  एकटेच होता ! फरक फक्त इतकाच मी रावणाच्या तावडीत होते. मी सोबत नसताना आपल्या मनातील भावना उत्तेजित  झाल्या नाहीत का? असे म्हणतात की, सर्वच स्त्री -पुरुषांना एकमेकांविषयी शारीरिक आकर्षण असत.मग ते आपणालाही असणारच ना, यात शंका नसावी . निसर्गाने स्त्रीला गर्भधारणेसाठी अनुकूल बनवले आहे , म्हणून प्रत्येक वेळी चारित्र्याचा पावित्र्याची परीक्षा तिनेच द्यायची का?

 

सीतेच्या या बोलण्यानंतर सारा  दरबार हादरून गेला आजी ! अगदी तू हादरलीस ना तसाच बघ ………। हो हो, जरा  थांब पुढे ऐक तर जरा… सा-या  दरबारात एकच गोंधळ उडतो. त्याच वेळी लक्ष्मण सर्वाना शांत करतो  आणि स्वतः बोलायला सुरवात करतो, “सीतामाई चे हे प्रश्न सर्वांनाच विशेषतः पुरुषी अहंकाराला , सत्तेला हादरवणारे आहेत; पण असे असले तरी मला हे बोलणे पटते आहे. प्रभू, आपण दोघे जसे एकमेकांपासून लांब होता तसाच मीही उर्मिलापासून लांब होतो. आपल्या हाती सत्ता आहे, आपण पुरुष आहात, म्हणून स्त्रीच्या चारित्र्याविषयी शंका घ्यायची, का तर आपल्याला कोणी विचारणार नाही म्हणून ? का लिंगावर आधरित समाजरचनेत आपल्याला पुरुष म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे म्हणून ? आपल्यासारख्या पुरुषोत्तमाकडून ही अपेक्षा नव्हती; पण आपण याच व्यवस्थेचा भाग …। यात आपला दोष काय ?”

सीता आणि लक्ष्मणाचे हे बोलणे ऐकून प्रभू रामचंद्र खूप अस्वस्थ झाले . सारा दरबार या दोघांकडे रागाने पाहू लागला .सा-यांच्या मनात दोघांविषयी प्रचंड राग निर्माण झाला . तेव्हा रामाने सर्वाना शांत करत आपले बोलणे सुरु केले . " हे सीते ,- तुझ्या या प्रश्नाने माझ्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे . मला माझी चूक कळली . मी तुझी क्षमा मागतो . लक्ष्मणा तू माझ्यापेक्षा धाकटा ;पण तू तुझ्या सदसदविवेकाचे पालन केलेस आणि मी केवळ लोक काय म्हणतील, या विचाराने सीतेच्या चारित्र्याविषयी शंका घेतली.खूप मोठी चूक करायला निघालो होतो मी;पण तुम्ही दोघांनी माझ्यातील विवेक जागृत केलात . मी लिंग, वर्ग , जात ,वर्ण यावर आधरित समाजातून सत्तेच्या सिंहासनावर बसून हे बोललो . मला क्षमा करा .

आता आपण तिघे मिळून एक असे राज्य निर्माण करू कि त्यात जात, धर्म, लिंग, वर्ग ,वर्ण यावर आधारित कोणत्याही प्रकारची विषमता नसेल . कसलेच भेद नसतील. असतील ती सारीच माणसे ………. कोणी स्त्री -पुरुष नसेल. या दरबारात मी असे भेदभाव विरहित राज्य स्थापन करण्याचे जाहीर करतो.”

दरबारात रामाचं बोलणं सर्वांना पटतं. सगळे विषमतेवर आधारित राज्य नष्ट करण्याची शपथ घेतात आणि दरबार संपतो .

काय आजी कशी वाटली माझी गोष्ट ? आवडली का ग ? बोल आता काय बोलायचे ते ?”

आजी विचारात पडली आणि मग म्हणाली,“आवडली ग बाई , त्या रामाप्रमाणं तूही माझे डोळे उघडलेस की . प्रत्येक वेळी सीतेनीच का 'अग्निपरीक्षा' द्यायची? पटतंय ग तुझं…”

-

अश्विनी सातव
 

About the Author

अश्विनी सातव-डोके's picture
अश्विनी सातव-डोके