आम्ही पण शेतकरी आहोत ना ?

   शेती-प्रश्नात हरवलेल्या महिला 

   तेजश्री प्रताप प्रतिभा कांबळे 

 “बाई ती सती प्रथाच बरी होती बघ, एकदाचं जळून जायचं आपल्या माणसाबरोबर, हे रोजचं जळणं नाही जमत, मी एकटी जर कर्ज खंडू शकले माझा मालक गेल्यानंतर, तर दोघांना जमलच असतं ना बाई.? पण व्यवहार कधी सांगायचच नाही बाईला, अन माणूस गेल्यावर मग सगळंच बघायचं- घर-बार, शेत-काम, हिशोब -कितोब, अमुक-तमुक? ...”, वैशाली वाघमारे(वय ३४, वयाच्या २२ वर्षी विधवा).

“आत्महत्या केलेल्या मुलाची शपथ घेतली आणि ठरवलं, की काही झालं तरी आत्महत्या नाही करायची, पण आपल्या जमीनीसाठी लढायचं....” सुमनबाई(वय ६२).

 मी माझ्या एम.फील च्या संशोधांनाचा विषय म्हणून वर्धा जिल्ह्याचा अभ्यास दौ-याला होते. महिला शेतकरी आणि जमीन हक्क या विषयाचा जरा प्रत्यक्ष स्थितीत अभ्यास व्हावा म्हणून. बऱ्याच महिलांच्या मुलाखती घेतल्या. सुमनबाई नानाजी ठाकरे, वर्धापूर, वर्धा. त्यांनी आयुष्याला दिलेला लढा पाहून महिला शेतकरीकडून एक प्रचंड स्फूर्ती मिळाली, माझ्यासाठी या कहाण्या  आयुष्यातल्या कुठल्याही घसरत्या टप्प्यावर एक ऊर्जा देणा-या असणार आहेत.

इंटरव्युची प्रश्नावली घेऊन आपण बोलत असू, तर त्या मोजकं आणि तुटक बोलत; पण त्यांना त्यांच काम करू देता-देता आपण बोलत राहिलो, की चर्चा खोलात जाऊ लागायच्या. इतकंच नव्हे, तर त्यांच्या सोबत कापुस वेचता-वेचता त्या बऱ्याच निरीक्षण केलेल्या गोष्टी सहज सांगायच्या. मुलाखतीचं स्वरूप बाजूला राहून त्यांच्या व्यक्तिगत लढाया समजून घेणं, मला महत्त्वाचं वाटू लागलं. सुमनबाईंनी आपली जमीन कशी मिळवली, हे ऐकतांना मला समजलं,की जमिनीवर ज्यांची उपजीविका आहे, त्यांना जमीन सोडून-विकून आयुष्य जगणं कठीण होऊन बसतं. “कर्ज फेडल्या खेरीज मरणार नाही”, कर्ज फेडण्याची ताकद आपल्या क्षमतेला आखलेली. मी सुमनबाईंच्या आत्मविश्वासाला सलाम ठोकला. एकीकडे, लोक आपण कर्जबारी आहोत, नापीक जमीनीमुळे, घरगुती कारणामुळे आत्महत्या करीत असल्याचे आढळले. आणि इकडे, या सुमनबाईंना कुठून या जगण्याच्या लढ्याला ताकद मिळत होती ? मी विचारातच होते, दीर्घ श्वास घेण्यापलिकडे पर्याय नव्हता माझ्याकडे, आणि त्या भरभरून बोलत होत्या, “ कसं आहे ना बाईने हात टेकून नाही चालत, लहानपणापासून एकटी, मग लगीन झाल्यावर दहा –बारा वर्षात नवरा जातो, असच एकटं जगणं बाईला लई शिकूवून जातं. सुनेशीच असं लढून आपलीच जमीन परत आपल्याच ताब्यात मिळवायची, पण कशासाठी ?. ही जमीनच आहे माझी, माझं पोट या जमिनीवरच. जगण्याचा आधार आहे ही जमीन माझी. पैसा आज आहे उद्या नाही. ही जमीन माझं रोज पोट भरू शकते आणि यंदाच्या मोसंबी बगातून एक लाख मिळाले, जावईबापुचे कर्ज फेडायला सुरुवात केली. लई बरं वाटतंय , आपण कोणाच्या डोक्यावर आपलं जगण्याचा वझं नाही टाकून चाललो”. कसं जमलं हे सगळं त्यांना , कशाने घडलं-जडलं आहे त्यांचं मन, मला काहीच उमजेना. बस्स आपल्या डायरीत आणि मनात नोंद करून ठेवली त्यांची.

विविध प्रश्नांची तुलना होऊ शकते का, असा प्रश्न पडू लागला. महिलांचे प्रश्न शहरात आणि ग्रामीण भागात बरेच वेगळे असतात, हे मान्य;पण मला ग्रामीण भागातल्या स्त्रियांसाठी, विशेष आदर आणि चिंता दोन्ही वाटू लागली. त्यांचं जगणं हे खूपच चॅलेंजिंग आहे. अशा स्त्रिया ज्यांना स्वतःच्या कष्टावर विश्वास आहे, रोजचं त्यांना बऱ्याच प्रश्नांना सामोरं जावं लागतं. महिला शेतकरी आता सक्षमतेकडे वळू लागली आहे. स्वतःच्या गुणांची पारख तिला फार स्पष्ट पद्धतीने जमते. ती कणखर आहेच, ती स्वावलंबी होतीये , तिच्यात जगण्याची जिद्द प्रचंड आहे. कोणी तिला साथ नाही दिली, तरी ती स्वतः सोबत नेहमी असते;पण खंत फक्त हीच वाटत आहे शेती प्रश्न समजून घेताना महिला शेतकऱ्यांचे प्रश्न कुठे जातात ..?

आपल्या समाजात शेती प्रश्नांची ओळख म्हणजे शेत मालाला भाव मिळालाच पाहिजे; शेतीतलं तंत्रज्ञान सुधारावं; शेतीतील पायाभूत सुविधा- पाणी, वीज, कर्ज, वाहतूक, शेत मालासाठी गोदाम पाहिजे; शेत मालाला आंतरराष्ट्रीय व्यापारात व बाजारात सरकारकडून अनुदान मिळालाच पाहिजे; आणि शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचणे वगैरे वगैरे...इथे महिला शेतकऱ्यांचे प्रश्न हे शेती प्रश्न असू शकतात याचा विचार करणे म्हणजे शेती प्रश्नात स्त्रीवाद घुसवणे असं समजलं जातं.  शेती-प्रश्न आणि महिला शेतकऱ्यांचे प्रश्न हे वेगळे कसे असू शकतात...? प्रश्न नीट समजला की, प्रश्न सुटण्यास त्याची मदत होते, नाही तर प्रश्नांची गुंतागुंत वाढत जाते.

शेतीतली आकडेवारी स्पष्ट सांगते एकूण workforce मध्ये महिलांचा किती सहभाग पुरूषांपेक्षा जास्त आहे  आणि एकूण शेतकामात महिलांचा पुरुषांच्या तुलनेत सुद्धा सहभाग जास्त आहे. भूमिहीन शेतमजूर महिलांचा कुटुंबव्यवस्था टिकवून ठेवण्यातला सहभाग, कुटुंबाच्या गरजांना सांभाळण्यात तिची काय भूमिका आहे ? आपण या सगळ्या गोष्टी बायपास करून शेती प्रश्न समजून घेण्याची चूक करत आहोत, शेती प्रश्न समजून घेण्यासाठी मुळात शेतात काम करणाऱ्या महिलांचे प्रश्न वगळून आपण फक्त वर्तुळाच्या बाह्य प्रश्न समजून घेतोय, असंच मला वाटत राहिलं.

अभ्यासाचा विषय “महिला शेतकरी त्यांचा शेतीतील राजकीय-आर्थिक स्थान/ दर्जा” असा  निवडतांना ‘शेतकरी' या व्याख्येत आणि कल्पनेत पुरूष सर्रास गृहीत धरलेला दिसला, समाजानेच नव्हे तर राजकीय आणि शासकीय व्याखेतसुद्धा;पण शेतकरी असणारी ती महिला शेतकरी आहे हे समजून घेण्यासाठी ‘महिला शेतकरी’ असा उल्लेख करावा लागतो. एक अभ्यासक म्हणून आपण या प्रश्नाकडे कसं पाहावं ? भाषेतील दोष आणि त्यातील गृहीतके आपण सहज मान्य करीत  असतो आणि यानेच समाजातील संरचनात्मक (structured)  विषमतेला मान्यता देत असतो. काही विषमता या  नैसर्गिक असतात आणि काही समाजाने निर्माण केलेल्या असतात; पण शेतीतल्या कामाची विभागणी करून पाहता असं लक्षात आलं, की महिला शेतकरी हि तुलनेनं बरीच जास्त कामं करतात, याच्यात कदाचित कुणाचं दुमत नसणार, याची मला खात्री आहे. हे वास्तव असं असतांनाही आपल्या महिला शेतकऱ्यांची अशी अवस्था आणि याच्यावर चर्चा, अभ्यास याचा अभाव मला दिसला. शेती-प्रश्न समजून घेण्याच्या बाबत आपण महिला शेतकऱ्यांना वगळून किती मोठी चूक करत आहोत, हे माझ्या लक्षात आले.

शेती व्यवसाय याच्यातच मुळात एकसंधपणा नाही, तर त्याचे उपाय कसे एकसंध असू शकतात? विदर्भातील शेती प्रश्न हा शेतीतला बिकट प्रश्न दिसला. आत्महत्येचा प्रमाण हे विदर्भार्तूनच असल्याचे दिसले;पण पुरुष शेतकरीच आत्महत्या का करतात.?अभ्यास करतांना आधी महिला शेतकरी या विषयावर झालेलं काम पहिलं, तेव्हा लक्षात आलं जमीन-हक़्क (land rights) या प्रश्नावर बरंच काम झालेलं दिसलं;पण फक्त जमीन हक्क देऊन प्रश्न सुटेल का ? प्रत्यक्ष महिला शेतकऱ्यांशी बोलतांना बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या, की शेती प्रश्नावरचे उपाय हे बऱ्याचदा महिला शेतकरीला गृहीत न धरता आखलेल्या दिसल्या. उपायांमध्ये पितृसत्ताकवादी दृष्टिकोन स्पष्ट दिसून येतो.

शेतीमध्ये  महिला शेतकऱ्यांचं योगदान- सहभाग : शेतकामात महिलांचा सहभाग ७०-८०% आहे तर जमिनी १३% त्यांच्या नावावर आहे. आत्ता जमिनीवर नाव चढवले जात आहेत तर सरकारी योजनाचा फायदा करून घ्यायला, असंही दिसलं; पण कामाच्या वर्गवारीनुसार ताकदीची, तांत्रिक आणि महत्वाचे निर्णय घेण्याची कामे पुरुषांची- कोणतं पिक घ्यायचं, नांगरणी, ट्रक्टर, फवारणी, बैल- जोडी, शेत माल विकणे, पाणी वळवणे, व्यवहार. महिलांची कामे म्हणजे- निंदन, वेचणी, काडी-कचरा, बी-लावणे, सोंगणी, चारा-पाणी, आणि घरातली कामं तर त्याच करतात;पण मुळात पुरुषांची कामे हे काही दिवसांसाठी असल्याचे दिसले, पण महिला शेतकरी ह्या वर्षभर काहीना काही करतच असतात. थंडी, उन, पाऊस, वारा असलं तरी त्यांची कामं सुरूच. महत्वाचं म्हणजे वेळ आल्यास पडेल ते काम महिला शेतकरी करतांना दिसली, पण तेच पुरुष  हात आखडून काम करताना  दिसले.

महिला शेतकऱ्यांचे वास्तव जीवन प्रश्न: गुणात्मक-शिक्षण, आरोग्यच्या सोयी-सुविधा आणि पुरुष शेतकऱ्यांच्या तुलनेत योग्य मजुरी, कोणतं पीक लावावं, यावर तिचं मत असणं, कर्ज व कर्जाची परतफेड, सरकारी योजना शेती व्यवसायला व महिलांच्या प्रश्नाला पूरक असाव्यात. गावातलं घर आणि शेती याचं अंतर रोज पायी गाठावं लागतं. पिण्याचं पाणी नळ नसल्यास काही किलोमीटर अंतरावरून आणणे, हे अजून चालूच आहे. मुळात त्यांचे प्रश्न त्यांनी जगण्याचा भाग म्हणून स्वीकारले आहेत.

शासन: तसं पाहता महिलांवर शासन सगळ्यांचेच. शासनाला महिला सशक्तीकरण या विषयात फार रस आहे;पण शासकीय योजनांवरून महिला शेतकरीला शासनाची ओळख आहे. शासनाबद्दलचं तिचं आकलन फारच स्पष्ट होतं, जसे की आत्महत्याग्रस्त परिवाराला विहिरीची स्कीम आहे;पण त्यांना आधी ३०-४०००० खर्चाची विहीर खंदल्यानंतर त्या स्कीमचे पैसे मिळतात.

तर वैशाली वाघमारे म्हणतात, “ हे बघा ताई, सरकार हे बी असं घरातला माणूस कर्जापायी गेल्यावर, घरात पैसे कुठून असणार ?. साधा हिशोब जमत नाही सरकारला म्हणून स्कीमच्या कागदावर नाव येऊन पण फायदा करून घेता येत नाही,”

उज्ज्वला पेटकर म्हणाल्या, “काही साहेब म्याडम खरंच खूप चांगल्या होत्या, त्यांच्यामुळंच लाख रुपये  मिळाले, नाही तर सासरकड्च्यांनी मिळू दिलं नसतं;पण खरं तर शासन म्हणजे दाखल्यांसाठी चकरा मारत बसने, मजुरी मोडून नाही परवडत स्किमा आम्हाला.”

आर्थिक बाब : महिला शेतक-यांचे कर्जाविषयीचे आकलन फारच विवेकपूर्ण आहे. कर्ज आपण फेडूच शकतो, याचं भान तिला तिच्या मर्यादांना समोर ठेऊन असतं. बचत गट या संकल्पननेमुळे ती आज व्यक्त होऊ लागली आहे. आर्थिक नियोजनाबाबत ती खूपच विवेकी आहे.

महिला शेतकरी आणि शाश्वत शेती:

आज शेतीतलं संकट हे शेतात काम करणारी बाई समजू शकते, आणि तिच्या आवड व कौशल्यनुसार तिला शेतकाम हे फार उत्तम जमते. त्यामुळे शाश्वत शेतीकडे नेणारी महिला शेतकरी ही एक महत्वाची कडी आहे. पुरुषांचा कल आर्थिक फायद्यांपुरता मर्यादित असतो;पण महिला शेतकरी बियाण्यांचं महत्व, जैविक- सेंद्रिय शेतीकडे वळतांना  दिसते. तिला शेतात रसायने कमी वापरावीत, हे फार व्यवस्थित समजतं, पण निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत तिला घेतलं जात नाही. याचा अर्थ असा नाही, की पुरुष शेतकरी हे शेतीचा ऱ्हास करू लागलेत, पण पुरुष शेतकरी बाजारु- आर्थिक गोष्टींना बळी पडले आहेत.

मी या सगळ्याच महिला शेतकऱ्यांची ऋणी आहे, त्यांच्या प्रेमाची, त्यांनी दिलेल्या वेळेची, विलक्षण आहेत या.

कसली भक्कम ताकद आहे त्यांची जगण्याची.

कुठून मिळते त्यांना हि उर्जा?

समाजाच्या आणि राज्याच्या कोंडीत सापडलेल्या, पण आपल्या जमिनीवर निर्भर असलेल्या, स्वतःवर आणि पावसावर विश्वास ठेवणाऱ्या, जमेल तसं पोट भरणाऱ्या, काही झालं तरी आपल्या मुलांना वाढवणाऱ्या, शेती प्रश्नात हरवलेल्या.  त्यांच्या विषयी अभ्यास करता-करता त्यांनीच मला माझ्या आयुष्यात मला शेती प्रश्नावर काम करण्याची दिशा दिली. या दिशेने काम करत असतांना शेती प्रश्न सुटेल असं नाही;पण शेती प्रश्न किमान समजला असेल.

  • तेजश्री प्रताप प्रतिभा कांबळे 

About the Author

तेजश्री प्रताप प्रतिभा कांबळे's picture
तेजश्री प्रताप ...