एक अविस्मरणीय अनुभव

“London bridge is falling down

Falling down, Falling Down

My fair lady !”

हे मी ऐकलं होतंच;पण ते मला आठवत होतं लंडन ब्रिजवर मी स्वतः असताना. लंडन शहराची वेगळी ओळख सांगायची आवश्यकता नाही. भारत आणि इंग्लंडचे संबंध किती जुने आहेत, याचा पुनरुच्चार करण्याची गरज नाही. अशा या शहरात जाण्याची संधी मला sustainable leadership programme अंतर्गत २१ दिवसीय प्रशिक्षणाच्या निमित्ताने मिळाली.

लीला पुनावाला फाउन्डेशनकडून(LPF) मला ही सुवर्णसंधी मिळाली. हे फाउन्डेशन मुलींना शिष्यवृत्ती देऊन त्यांच्यात संवाद कौशल्याचा विकास व्हावा, व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी प्रयत्न करते. लीला पुनावाला फाउन्डेशन शिष्यवृत्ती प्राप्त मुलगी एक स्वावलंबी, बुध्दिमान आणि सजग नागरिक म्हणून घडली पाहिजे, असा प्रयत्न फाउन्डेशन करत असतं. शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर प्रत्येक मुलगी फाउन्डेशनची सभासद असते आणि फाउन्डेशनमार्फत घेण्यात येणा-या ऍक्टीविटीज उदा.  कम्युनिकेशन प्रोग्राम, लीडरशीप प्रोग्राम, कल्चरल इवेन्ट्स या सा-यात ती सहभागी होऊ शकते.

मला पदव्युत्तर शिक्षणासाठी २००९ मध्ये रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते ही शिष्यवृत्ती मिळाली होती. हे फाउन्डेशन तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या कार्यशाळा, प्रशिक्षण शिबीरं आयोजित करत असतं. जगाच्या पाठीवर मुलींच्या प्रगतीचा ठसा उमटावा म्हणून LPFने युकेमधील Gloucestershire येथे आशा सेन्टर उभे केले आहे. येथे लीडरशीप प्रोग्रामसाठी १४ विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती दिली जाते. प्रशिक्षणानंतर अशा मुलींना Peace ambassadors   म्हणून ओळखले जाते.

“ Congratulations you have selected for Peace ambassador Sustainable Leadership Programme-2012”  असा मेल मला फाउन्डेशनकडून आला. माझा आनंद गगनात मावेना. कधी फारशी महाराष्ट्राबाहेरही न फिरलेली मी एकदम देशाबाहेर जाणार, या कल्पनेनेच मला छान वाटलं. नुकतेच एका कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून मी रुजू झाले होते नि  तेवढ्यात ही संधी मिळाली.

पराकोटीचा आनंद, भीती, हूरहूर, ..असं सगळंच होतं. मुख्य म्हणजे तयारी काहीच नव्हती. अगदी रजा मिळण्यापासून ते पासपोर्ट काढण्यापर्यंत सा-या गोष्टी करायच्या होती. अनेक छोट्यामोठ्या अडचणींना दूर करत अखेरीस सा-या गोष्टी पार पडल्या आणि अखेरीस तो दिवस उजाडला.

आम्ही १४ मुली निघालो मुंबईला. सेक्युरीटी चेकिंगलाच जवळपास २ तास लागले. माझ्या इच्छेप्रमाणे विन्डो सीट मला मिळाली आणि घरच्यांनी सांगितलेला विनोदी सल्ला आठवला-

“ विमानातून हात बाहेर काढू नकोस.”

खरी गम्मत तर पुढेच घडली.

माझी विन्डो होती विमानाच्या पातीजवळची. विमान बाहेरुन न पाहताच आम्ही डायरेक्ट चेकींग झाल्यानंतर विमानात बसलो. विमान सुरु झालं तसं माझ्या विन्डोशेजारची पातीही वेगाने फिरु लागली. मला वाटलं, आमच्या विमानाबरोबर आणखी एक विमान अगदी आमच्याच समान गतीनं सुरु झालं आहे. मी जेव्हा माझी शंका मैत्रिणींजवळ बोलून दाखवली तेव्हा एकच हशा पिकला मी माझ्याच विमानाच्या पातीने कन्फ्युज झाले होते.

लंडनमध्ये उतरल्यानंतर Crompton guest house वर आम्ही थांबून पहिले ३ दिवस थांबून लंडनचा काही भाग पाहणार नि मग १५ दिवस आशा सेन्टर आणि पुन्हा शेवटचे तीन दिवस लंडन !

असा आमचा प्लान होता.

पुण्यातून बाहेर पडल्यापासून मी ठरवलं होतं की माझ्या कोषातून बाहेर पडायचं. कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन काही एक शिकण्याचा प्रयत्न करायचा.

लंडनची लोकसंख्या तशी कमी;पण लोक अतिशय शिस्तप्रिय. वेळेचा सदुपयोग करणारे. कोणी वाचताना दिसायचं तर कोणी टॅब उघडून काम करताना. जमीनीखालून जाणा-या रेल्वेंना तिथे ट्युबस म्हणतात. यातून जातानाही आमचा १४ मुलींचा ग्रुप अगदी बिनधास्त गप्पा गाणी करत असायचा. ते पाहून लोक आम्हाला विचारायचे “ Are you from India ?”

आशा सेन्टरमध्ये वेगवेगळ्या देशातील तरुणी विविध विषयातील प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. Ms Zerbano Gifford या आशा सेन्टरच्या संस्थापिका आहेत.

तापमान १५-१६ डिग्री.

थंड वारा. गोंगाट नाही. शांतता पसरलेली.

नेहमीपेक्षा खूपच वेगळ्या वातावरणात आम्ही रमलेलो. आशा सेन्टरमधल्या स्वयंसेविकांना आमची ओळख करुन देत होतो. त्या आम्हाला सेन्टरविषयी माहिती सांगत होत्या.

प्रशिक्षणाची सुरुवात wheel of life यापासून झाली. या प्रशिक्षणासाठी मला का यावेसे वाटले, काय अपेक्षा घेऊन मी इथे आले आणि भारतात परतल्यावर शिकलेल्या गोष्टी आचरणात कशा आणायच्या, यासंदर्भाने चर्चासत्र झाले.

चित्रकलेतून मनातील भाषा शिकता येते, हे ऐकून होते, आशा सेन्टरमध्ये मी ते प्रत्यक्ष अनुभवले.

दररोजचा दिवस प्रार्थनेने सुरु होई. हिरवळीवर बसून प्रार्थना म्हणताना मी इतकी तल्लीन होत असे की ‘ मी मज हरपून बसले ग..सखी मी मज..’ या ओळीच म्हणणे बाकी.

आशा सेन्टरमध्ये शेतीदेखील केली जाते. वेगवेगळी पीकं घेतली जातात. तिथंच भाज्या पिकवायच्या आणि त्याच जेवणासाठी वापरायच्या असा तिथला शिरस्ता. सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे वक्तशीरपणा. आम्ही तिथे गेल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासून वेळ पाळायला शिकलो होतो. विचार सूसूत्रतेचे देखील प्रकार असतात, हे आम्हाला YING Yang model च्या माध्यमातून दाखवले.

सकारात्मक विचारांची ताकद मोठी असते हे Mr. Samson यांनी I love and respect myself या त्यांच्या मांडणीतून सांगितलं. खरं म्हणजे माहीत असलेल्याच गोष्टी मला नव्याने कळत असाव्यात अशा पध्दतीने ते मी ऐकत राहिले नि भारावून गेले. सत्व रज आणि तम या गुणांचा लीडरशीपमध्ये कसा उपयोग होतो, हे सांगून चार टेम्परामेंट इलिमेन्टचा वापर करुन व्यक्तिमत्व कसे विकसित करता येईल, हे त्यांनी पटवून दिले.

प्रशिक्षण संपल्यानंतर आमची परीक्षा घेतली गेली. सेशनमध्ये दिलेल्या हव्या त्या विषयावर आम्ही १०-१० मिनिटं बोललो. शेवटच्या तीन दिवसात पुन्हा लंडनवारी. ब्रिटीश पार्लामेंट, लंडन आय, शॉपींग स्ट्रीटस, सायन्स पार्क, ऑक्सफर्ड युनिवर्सीटी,शेक्सपीयरचे जन्मस्थान,रोमन बाथ, …अशी बरीच ठिकाणं पाहिली.

कुटुंब, काळजी, तणाव,नोकरी…या सा-या सा-यापासून दूर गेल्यामुळं मला माझ्यातल्या ‘मी’ मध्ये डोकावायला वेळ मिळाला. मला मीच नव्याने कळले. नेमकं काय घडलं, कसं घडलं माझं मलाही कळलं नाही;पण माझ्यातल्या सुप्त स्नेहलची नि माझी भेट घडली त्यादरम्यान.

भारतात परतल्यावर आम्ही १४ मुलींनी Parent’s day ला आमच्या प्रशिक्षणाचा आढावाही सादर केला. पालकांनाही प्रशिक्षणापूर्वीचे आम्ही आणि त्यानंतरचे आम्ही यात फरक जाणवला.

लीडरशीप ट्रेनिंगनंतर आम्ही सामाजिक कार्यात हातभार लावण्याचा प्रयत्न केला. कॅन्सर पेशंटसाठी, आर्मीतील जवानांसाठी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. गरीबांना कपडे वाटप केले आणि फाउण्डेशनने आखून दिलेल्या अनेक कार्यक्रमात स्वयंसेविका म्हणून सहभाग घेतला.

माझी लंडनवारी खरंतर दोन वर्षांपूर्वीची;पण अगदी काल-परवाच जाऊन आले असावे इतकं सारं हे डोळ्यासमोर ताजं ताजं आहे. माझ्या आयुष्यातला हा एक अविस्मरणीय अनुभव माझी माझ्याशीच भेट घालून देणारा !

 

-स्नेहल पाटील

( स्नेहल पाटील या कमिन्स इंजिनीयरींग कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.)

 

 

About the Author

स्नेहल पाटील's picture
स्नेहल पाटील