पाऊलवाट

पाऊलवाट

 

आज जगात तत्त्वनिष्ठ माणसे आहेत का? असा प्रश्न जर तुमच्या मनात येत असेल तर पाऊलवाट हा चित्रपट तुमच्याकरता आहे! स्मरणात राहील असा अभिनय,कथानकाला आवश्यक तेवढीच पात्रे आणि त्यांच्या क्षमतेचा उत्तम उपयोग पाऊलवाट मधे केला आहे. सकस कथानक आणि प्रभावी मांडणी यामुळे नक्की बघावा असा हा चित्रपट आहे. अनंत देव या गायकाची ही कथा आहे - सांगलीहून मुंबईला पार्श्वगायक बनायला येतो आणि मित्र बाब्या धडफळे याच्या मदतीने गोदू आक्कांकडे रहायला लागतो. गोदू आक्का एकटया! ना नवरा... ना मुलबाळ! त्यामुळेच की काय पण रोख-ठोक आणि व्यवहारी. अनंता आक्कांकडे रहायला लागतो आणि त्याचा 'स्ट्रगल' सुरु होतो. कलाकार म्हटले की स्ट्रगल आलाच मग चित्रपटात वेगळे काय असे मनात येणे साहजिक आहे. त्या स्ट्रगल मधे नात्यांची, जगण्याची आणि प्रवासात लागलेल्या पाऊलवाटांची जी कथा आहे त्यात या चित्रपटाचे वेगळेपण आहे. चित्रपटाचा शेवट काय आहे याचा अंदाज सुरुवातीलाच आला तरी उत्तम अभिनय, चित्रपटाचे कथानक पुढे नेणारी अर्थपूर्ण गीते यामुळे चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. अभिराम भडकमकर यांची कथा, आदित्य इंगळे यांचे दिग्दर्शन याचा सुरेख मिलाफ या चित्रपटात आहे. वैभव जोशी यांनी लिहिलेल्या गाण्यातून चित्रपटाची कथा पुढे सरकते हे हे आणखी एक वैशिष्टय. नरेंद्र भिडे यांनी दिलेल्या संगीतामुळे यामुळे ती गाणी अधिक उठावदार वाटतात. आल्लामंतर कोल्हामंतर चल मारू प्रेमाने फुंकर ओठांवर आले हासू दु:खे झाली उडन छू ... उडन छू... उडन छू... उडन छू. आशा भोसले यांच्या आवाजातले एक अनोळखी फूल झुले माझ्या वेलीवर ही दोन गाणी मुद्दाम उल्लेख करावा अशी आहेत. आजची पिढी नात्यांकडे कशा दृष्टीने बघते, या पिढीच्या मनात नात्यांचे स्थान काय आहे, अपेक्षा कोणत्या आहेत, त्या पूर्ण करायचे कोणते मार्ग आहेत याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न एका कलाकाराचे स्वप्न आणि त्याचा प्रवास दाखवतांना ्केला आहे. समाजव्यवस्था, व्यावसायिकतेची गणिते, मूल्ये या सर्वांचा संघर्ष म्हणजे हा चित्रपट. अनंत देव आणि एक व्यक्ती म्हणून आपण एकाच समाजव्यवस्थेचे घटक आहोत. त्याचे आणि आपले प्रश्न वेगळे नाहीत. तथाकथित यशस्वी पण निर्ढावलेली अनेक मने जे प्रश्न टाळून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात ते प्रश्न आपल्या समोर पाऊलवाटच्या माध्यमातून पुन्हा उभे राहतात. सकारात्मक दृष्टी ठेऊन पाऊलवाटेवर चालत राहणा-या अनंत देवचा झगडा आपल्याही मनात सुरु असतो. हा चित्रपट मी अमेरिकेत, वर्जिनिया या राज्यात थिएटर मधे पाहिला. हिंदी चित्रपटाबरोबर मराठी चित्रपटाचे निर्माते आपल्या चित्रपटाचे शो इथे आयोजित करत आहेत हे महत्त्वाचे. सुबोध भावे, आनंद इंगळे, ज्योति चांदेकर यांच्या चाह्त्यांनी तर 'पाऊलवाट' मुळीच चुकवू नये.

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह