सचिन, ..खरंच ??

-निमेश वहाळकर

-----------

“खेळ म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे सचिन एवढंच आम्हाला माहीत. खरंतर या क्रिकेट आणि सचिन यांच्यामध्ये टीमइंडिया सुद्धा होतीच. पण एवढे आम्ही प्रखर राष्ट्रवादी वगैरे असूनही (साहेबांची नव्हे!) आम्हाला कधी मोंगिया, शिवसुंदर दास, वेणुगोपाल राव, बांगर इत्यादींना खेळताना बघावसं वाटलंच नाही त्याला आम्ही तरी काय करणार. ते म्हणतात ना, जगाच्या इतिहासात आपलं आयुष्य म्हणजे एक ठिपका असतं. हे मोंगिया वगैरे सचिनच्या कारकीर्दीसमोर ठिपकाच ठरले, त्यात आमची काय चूक?  त्यामुळे टीमइंडियाच्या मॅचमध्ये आम्ही पाहिलं फक्त सचिनलाच.”

सचिन रमेश तेंडुलकरचा चाहता निमेश वहाळकरचा हा भावव्याकुळ लेख .

 --------------

 

 

 

दि. १६ नोव्हेंबर, २०१३.

ठिकाण- वानखेडे क्रिकेट स्टेडियम, मुंबई.

सचिन रिटायर्ड झाला.

सचिन रमेश तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

भारताचा, अगदी जगातला वगैरे महान फलंदाज, मास्टर ब्लास्टर, विक्रमादित्य… इत्यादी सचिन तेंडुलकरने निवृत्ती आणि तीही क्रिकेटमधून..अखेर घेतलीच.

 

आमचा तेव्हाही यावर विश्वास बसला नव्हता, आणि आजही, तो निवृत्त होऊन नंतरचं आख्खं एक वर्ष उलटल्यावरही बसत नाहीये की तो सचिन निवृत्त झाला आणि त्याहीपेक्षा विश्वास यावर बसत नाहीये की क्रिकेटमध्ये आता त्याच्या नसण्याची सवय होत नाही..

सचिन निवृत्त झाला. त्यानंतर तो भारतरत्नही झाला. कधी राज्यसभेत दिसला, कधी कुठे टेनिस बघायला गेला. नंतर त्याने तो फुटबॉलचा संघ विकत घेतला. कधी तो कुटुंबासोबत सहलींमध्ये दिसला. नुकतंच त्याचं आत्मचरित्र वगैरे प्रकाशित झालं. काही महिन्यांपूर्वी तो निवृत्तांच्या एका सामन्यात खेळला होता. लॉर्डस्‌वर. (त्यात तो हल्लीच्या फिल्मफेअर वगैरेमध्ये अमिताभ, ऋषी कपूर, धर्मेंद्र हे लोक आल्यावर कसे वाटतात, तसा काहीसा वाटला होता..) एकूण काय तर तो क्रिकेटमधून खरोखरच पूर्णपणे निवृत्त झाला. एवढं होऊनही आम्ही या गोष्टीवर विश्वास का ठेऊ शकत नाही, की सचिन खरोखरच निवृत्त झालाय?

 

हे काय करून ठेवलंय सचिननं आमचं?  क्रिकेट हा शब्द उच्चारता यायला लागल्यापासून आम्ही पाहिला फक्त सचिन. एवढासा तो सचिन. पॅव्हिलियमधून उड्या मारत यायचा. वॉर्म-अप घेत. आकाशाकडे पाहात. त्याचं ते क्रीझवरचं बॅट आपटणं, इकडे तिकडे बघणं, नॉन स्ट्रायकर एन्डला बॅट टेकवून निवांत उभं राहणं आणि या सगळ्याला त्याची अशी एक लय. मग त्याचे ते ड्राइव्हज्, विशेषतः तो स्ट्रेट ड्राइव्ह..(२०११ विश्वचषकातला आठवतोय? फायनलमधला?) असंख्य कव्हर ड्राइव्हज्, अचानक त्सुनामी यावी तसे मिड ऑन-मिड ऑफला भिरकावून दिलेले षटकार..अझरूददीनसोबत खेळत असल्यापासून ते अगदी काल परवाच्या कोहली-रैनासोबत त्यांनाही लाजवेल अशा चपळाईने काढलेल्या त्या एकेरी-दुहेरी धावा, मग धावफलकावरचे ते पंचवीस, मग पन्नास, मग नव्वद (मग आमचा रक्तदाब वाढणार..) मग शंभर, सव्वाशे..हे सारं सवयीचं. अगदी रोजचं. अगदी काही काम, गडबड असतानादेखील केवळ सचिनची बॅटींग म्हणून मिळेल तिथे टीव्हीसमोर उभं राहणं, शाळा-कॉलेजात तास बुडवून मॅच बघणं (कारण सचिन फॉर्मात असताना कोणालाच त्या तासात रस नसे. अगदी मास्तरांसकट) सारं नित्याचं..

हेच पाहात, अनुभवत बालवाडीतले आम्ही विशीत आलो. आमची क्रिकेट समीक्षकाची कारकीर्द (जन्मसिद्ध) ही सचिनबरोबरच सुरू झाली आणि सचिनसोबतच संपली.. कारण खेळ म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे सचिन एवढंच आम्हाला माहीत. खरंतर या क्रिकेट आणि सचिन यांच्यामध्ये टीमइंडिया सुद्धा होतीच. पण एवढे आम्ही प्रखर राष्ट्रवादी वगैरे असूनही (साहेबांची नव्हे!) आम्हाला कधी मोंगिया, शिवसुंदर दास, वेणुगोपाल राव, बांगर इत्यादींना खेळताना बघावसं वाटलंच नाही त्याला आम्ही तरी काय करणार. ते म्हणतात ना, जगाच्या इतिहासात आपलं आयुष्य म्हणजे एक ठिपका असतं. हे मोंगिया वगैरे सचिनच्या कारकीर्दीसमोर ठिपकाच ठरले, त्यात आमची काय चूक?  त्यामुळे टीमइंडियाच्या मॅचमध्ये आम्ही पाहिलं फक्त सचिनलाच. अर्थात, द्रविड, गांगुली, लक्ष्मण आणि कुंबळेचे आम्ही चाहते होतोच. पण सचिन तो सचिनच ना. त्यामुळे तो गेला. या चौघांच्याही नंतर..शेवटच्या रोमनसारखा. आणि आमचा क्रिकेटमधील रसच गेला..

मध्यंतरी एवढं वाईट मारलं त्या श्रीलंकेला, नाही उत्सुकता वाटली जाणून घ्यायची. सध्याच्या ऑस्ट्रेलिया मालिकेबद्दल तर न बोललेलंच बरं. त्या टी-२० आणि आयपीएलसोबत देखील जमलं नाही आमचं कधीच. अर्थात आम्ही काही पन्नाशीला आलेली माणसं नव्हेत. पण आताच्या कोहली-धवन-पुजाराला खेळताना पाहिलं की राहून राहून सचिन आठवतोच आणि मग उगाचच डोक्यावरचे केस पिकल्यासारखं वाटायला लागतं.

थोडंफार कळायला जेव्हापासून लागलं तेव्हापासून मनाशी तीन इच्छा मनाशी बाळगल्या होत्या.

भीमसेन जोशींचं गाणं,

अटलजींचं भाषण,

आणि सचिनची फलंदाजी..प्रत्यक्ष अनुभवणं. गाण्याचा कान तयार होईपर्यंत भीमसेनजी गेले. राजकारण कळू लागलं तेव्हा अटलजींनी राजकीय कारकीर्दीचा शेवट केला. आणि दीड-दोन हजारांचं तिकीट काढून क्रिकेट मॅचला जायची मानसिकता तयार झाली तेव्हा सचिननं एक्झिट घेतली. आणि या इच्छा तशाच, एखाद्या शल्यासारख्या सोबत घेऊन फिरायची वेळ आली. आता काहीजण येऊन म्हणतील, काय लावलंय सारखं सचिन सचिन. बास करा, म्हातारा झाला आता तो. खरंय ना. अगदी मान्य. पण आता तुम्ही-आम्हीतरी काय करणार त्याला की जर आजही क्रिकेट पाहताना असं वाटत असेल की जर आजही क्रिकेट पाहताना असं वाटत असेल की आता सचिन येईल, आणि आल्या आल्या त्याचा तो स्ट्रेट ड्राइव्ह दाखवेल. मग पुन्हा ते सचिन विरूद्ध अख्तर-अक्रम-वकार, सचिन विरूद्ध मॅगक्‌ग्राथ-वॉर्न.. आणि टीव्हीसमोर बसून नुसता धुमाकूळ..(यासाठी अर्थातच २००३ विश्वचषक..प्रतिवाद करताच येणार नाही.)

पण आता सचिन तसा दिसणार नाहीये. हे कळतंय.. पण वळत नाहीये. २०१४ देखील संपलं. खरंच..हे काय करून ठेवलंय सचिननं आमचं...!

निमेश वहाळकर,

ई-मेल nsv.cpn@gmail.com

 

About the Author

निमेश वहाळकर's picture
निमेश वहाळकर