प्रिय योगेंद्र...,

.............

योगेंद्र यादवांना लिहिलेलं एक काव्यमय पत्र 

..........

 

 

प्रिय योगेंद्र,

वेड्या माणसा,

शहाणपणाला काही एक मर्यादा असते. समंजसपणाचीही एक सीमा असते.
तुला नाही आकळत खुर्चीच्या पायांच्या लाकडाचा पोत.
तुला नाही समजत कॅमे-याचा छायांकित झोत.
तेव्हा अशा वेळेस वेड्या माणसा,
शांत रहाणंच तुझ्या हाती.
पक्ष्यांच्या कोलाहलात गोंगाटात एखादा सत्यपक्षी नेहमीच असतो शांत तडफडत. गोष्ट तुला माहिती असेलच.

सत्यपक्ष्याने विहरु नये आकाशात. सांगू नयेत तत्वाच्या गोष्टी.

तुला ठाऊक नाही का,

वनवासात सोबत असते सीता;पण ‘रामराज्या’त तिला नसते स्थान

तिला जावंच लागतं अग्निदिव्यातून..!
काळजाच्या पायथ्याशी गावं वसवू पाहणा-यांना
आम्ही केलं आहे स्थानबध्द,
खबर तुझ्या कानावर आली नाही अजून ?
‘स्वप्नाळू’, ‘आदर्श’ अशा कोंदणात तुझी रवानगी करुन साजरा करु देत ना आम्हाला हा विजय.

आम्ही जिंकलो आहोत आणि विजयाला विवेकाच्या गोष्टी सांगणा-यांनी थांबू नये आमच्यासोबत. त्यांना मूक करण्याची व्यवस्था केली आहे आम्ही; तर आमचा हा थवा निघाला आहे उड्डाणाला. परंपरागत जमीनीची नाडी ओळखून बाह्या सरसावून निघाला आहे काफिला, तेव्हा तू पुन्हा पुन्हा कपाळावरच्या आठ्यांनी नको सांगूस पारदर्शकतेचे मानदंड.

तू तर गद्दार, तूच द्रोही आणि तू शिकवू पाहतोस आम्हाला इमान !
तडजोडींचे गणित तुला कळत कसे नाही ?

तुझ्या वेडेपणाची साक्ष द्यायला सज्ज आहोत आम्ही केव्हाचे.
कधीचे प्रतीक्षारत आहोत नि तू अजुनही तापानं फणफणलेल्या माणसानं बरळावं तसं बरळत राहतोस, सांगतोस बंधुतेच्या गोष्टी.
सांगत राहतोस गोष्ट त्या गरीब पोरीच्या ४९०० रुपयांच्या गुल्लकची.

तुझ्या १५ रुपयाच्या आठवणीची घालतोस शपथ तिच्या गुल्लकसह .

किती क्रूर आहेस तू ! 

तुझ्या भंगलेल्या स्वप्नांचं सामूहिकीकरण करु पाहतोस तू.

तुला पसंत नाहीत इथले वाडे, इमले, गड हे ठाऊक आहे;पण ज्या घराच्या वाटेने तू नेऊ पाहतोस आम्हाला, त्याचे बांधकाम अजून किती कच्चे आहे माझ्या मित्रा,
तुझ्या भरवशावर कुठवर येऊ वेड्या ?
अल्पसंख्य वेड्यांनी स्वीकारावे शहाण्यांचे बहुमत.

मान्य करावे त्यांचे अस्तित्व.

शरण जावं त्यांना. यातच आपले हित सामावले आहे मित्रा.

ग्लुकोजची मात्रा जास्त झालेली असताना कडवट बोलू नये रे. जयजयकार करणा-यांच्या गर्दीत सामील व्हावं स्वखुशीनं. राजाचे नागवेपण सांगण्याचे दुस्साहस करु नये बंद खोलीतही. राजाच्या अंगावर नेहमीच असतात कपडे. नेहमीच असतो तो खानदानी पेहरावात. सिंहासनासोबत  फ्री असतात कपडे. तुला या सेलची कल्पना नसावी कदाचित.

मला ठाऊक आहे, तू पाहतो आहेस खूप दूरवर जिथवर नजर नाही जात आमची.
इतक्या दूरचे पाहताना डोळ्यांवर ताण येतो रे.
चष्म्यांना कुठून मिळेल एवढी रिझॉल्विंग पॉवर ?

कशी वाढेल त्यांची फोकल लेन्थ?
पुन्हा तुझ्या दीक्षा देण्याने आम्ही विसरुन जाऊ आमचे चष्मे
तेव्हा मित्रा,

शांत हो
चेह-यावर पाणी टाक.

आजूबाजूला पहा तरी, वेढा घातलाय सा-यांनी.
वाट पाहतायत तुझ्या निर्गमनाची नि तू अजून खंबीर आहेस तुझ्या वास्तव्याबाबत.

यजमानालाही काढता पाय घ्यायला लागतो वेड्या माणसा जेव्हा तो असतो तुझ्यासारखा...

मित्रा, फार वेळ न घेता सांगतो तुला. 
तू चुकला आहेस पत्ता.
You are on wrong planet, my friend.
एलियन असलेल्या वेड्या माणसा,
माणूस असलेल्या माणसाला कोणताच नसतो विमा इथे 

तुला कळतंय ना ?
तुझ्या नादानं शहाणपण हरवत असलेला

तुझा छोटा मित्र,

श्रीरंजन

 

 

About the Author

श्रीरंजन's picture
श्रीरंजन

शैक्षणिक पात्रताः 

फर्ग्युसन महाविद्यालयातून भौतिकशास्त्रात पदवी- 

  स.प महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी- राज्यशास्त्र 

  

परिचयः-

  • संपादक, पाखरांची शाळा ( बालकांसाठी्चे मासिक)
  • सल्लागार संपादक, सुंबरान (मासिक)
  • ‘कवितारती’, ‘अक्षर’, ‘परिवर्तनाचा वाटसरु’, ‘ऐसी अक्षरे’(ऑनलाइन दिवाळी अंक), ‘अनाहत’ ( इ-नियतकालिक) यामध्ये कविता प्रसिध्द
  •  दै.सकाळ,लोकमत,दिव्य मराठी,महाराष्ट्र टाइम्स, कृषीवल साप्ताहिक लोकप्रभा,कलमनामा, परिवर्तनाचा वाटसरु, ऐसी अक्षरे,’कलात्म’ मध्ये सामाजिक,राजकीय, साहित्यिक विषयांवरील लेख प्रसिध्द.
  •  ‘जागतिकीकरणाचे चित्रण करणारी कविता’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्र, मंचर पुणे येथे याच विषयावरील शोधनिबंधाचे वाचन. 
  • अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये यश संपादन