नवी सुरुवात कशी कराल?

नवी सुरुवात कशी कराल?
कोणत्याही नव्या उपक्रमाची, गोष्टीची वा प्रोजेक्टची सुरुवात करतो आहोत असं बोलणं सोपं असतं पण ती सुरूवात अनेकदा सोपी नसते. अगदी उदाहरण म्हणजे नवीन वर्ष सुरु झाले की आपण जे काही उपक्रम करणार आहोत ते पहिल्याच दिवशी सुरू करणे अवघड असते. सुरूवात करायला आपण वेळ घेतो वा करत नाही यामागे काही कारणं असतात- मुख्यत:
१. अपयशाची भीती
२. नेमकी माहिती नसणं
३. टाळाटाळ करायची वृत्ती
 ४.वेळ काढता न येणं

या गोष्टी काय आहेत? त्या कशा बदलता येतील हे पाहू या.

१. अपयशाची भीती
अनेकदा सुरुवात न करणं या मागे आपण अयपशी ठरू ही अनाठायी भीती मुख्य कारणं असते. जी गोष्ट केलीच नाही, ज्याचे प्रयत्न केले नाहीत, ते करण्याआधीच मन अपयशाची विचार करते. त्या अपयशाने घाबरते. एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल तर नकार येईल म्हणून त्या प्रेमाचा उच्चार न करते, संपादन नकार देईल या विचाराने लेखन न पाठवणे, जॉब इंटरव्हू असेल तर आपल्याला नाकारतील या भीतीने कित्येकजण नोकरीचा अर्ज करत नाहीत .. अशा प्रकारे अपयशाची भीती आपल्याला नवीन काही करण्यापासून दूर ठेवते.
मनातली भीती दूर करण्याचा प्रयत्न करा. वाईटात वाईट काय होईल त्याचा विचार करा, ते मान्य करा आणि न घाबरता सकारात्मक करा. नोकरीचा अर्ज भरणे, नवीन प्रोजेक्ट सुरू करणे याकरता किमान नियोजन करा, मार्गदर्शन घ्या व प्रत्यक्ष कृती करा. 
२.  नेमकी माहिती नसणं
आपल्याला नोकरी हवी आहे, पण कंपनीच्या अपेक्षा माहिती नसतात. त्या अपेक्षा आणि आपले शिक्षण व अनुभव नेमका कसा एकमेकांना पूरक आहे त्याची खात्री नसते. नविन काही शिकावे लागेल का याची कल्पना नसते. आपल्याला काय हवं आहे ते माहिती असणं हा प्रत्येक गोष्टीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. थोडा वेळ काढून आपल्या अपेक्षा, आवडनिवड याची यादी  करा. त्यानंतर जे नको त्यामागे वेळ घालवू नका. 
३. टाळाटाळ करायची वृत्ती
अनिश्चितता आणि पहिली दोन कारणे अनेकदा आपल्या मनात असतात. त्यामुळे एखादी गोष्ट लांबणीवर टाकली जाते.काही जणांचा टाळाटाळ करणे हा सवयीचा व स्वभावाचा भाग बनतो इतके ते मनात रूजलेले असते. जे काही टाळावेसे वाटते ते प्रथम करेन असा निश्चय करा. प्रत्यक्ष कृती करा.
४. वेळ काढता न येणं
काही व्यक्तींना प्रत्येक गोष्ट करायची असते. प्रत्येक उपक्रम स्वीकारायचा असतो. अशा व्यक्तींना हाती असलेला वेळ आणि कामे याची सांगड घालता येत नाही. त्यामुळे अनेक उपक्रम जे करण्यासाठी होकार दिला असतो त्याची सुरुवात होऊ शकत नाही. याकरता कोणत्याही नव्या उपक्रमाला होकार देण्याआधी आपल्या हाती असलेली कामे, त्याचा प्राधान्यक्रम समजून घ्या. त्यानुसार होकार द्या. योग्य वेळ ठरवा, शक्य असेल तर तशी अट घाला व ती वेळेची अट पाळा. असे केले तर सर्व कामांना वेळ नीट देता येईल. वेळ काढता आला नाही असं कारण द्यावं लागणार नाही.

स्वत:वर विश्वास ठेवा, नीट माहिती घ्या, वेळेचं नियोजन करा आणि नव्या उपक्रमाची सुरुवात करा. कृती न करणं म्हणजे अपयशाला निमंत्रण देणंच आहे. ते टाळा.

About the Author

admin's picture
admin