चॅलेंज- प्रतिक पुरी

 चॅलेंज…प्रतिक पुरी,डायमंड पब्लिकेशन्स

गावाबाहेरच्या एका झोपडपट्टीतील काही मुलं. ज्यांचं शिक्षण अनेकानेक कारणांमुळे सुटलं आहे. आता केवळ जगण्यासाठी मिळेल ते काम करून जगण्याची लढाई ते लढत आहेत. अशा मुलांच्या आयुष्यात एका माणसामुळे आशेचा नवा प्रकाश उजळतो. ही किमया घडते फुटबॉलमुळे. फुटबॉल खेळण्याची या मुलांची आवड एका फुटबॉल कोचच्या लक्षात येते. या खेळावर त्याचंही तितकंच प्रेम असतं. आणि या मुलांची परिस्थिती पाहिल्यानंतर त्या मुलांवरही त्याचं प्रेम जडतं. फुटबॉलच्या माध्यमातूनच हा खेळ शिकवताना जगण्याचे धडेही तो या मुलांना देतो.

एका घटनेनं मात्र या खेळाला विलक्षण कलाटणी मिळते. झोपडपट्टीच्या जवळच्या शाळेतील मुलांशी, खेळण्याचं मैदान कोणी वापरायचं यावरून भांडण होतं. आणि या भांडणात झोपडीतल्या मुलांना दिलं जातं एक चॅलेंज. ते चॅलेंज काय असतं, ते स्वीकारलं जातं का आणि त्यात या मुलांना यश मिळतं का याची ही कथा आहे. 

आपल्या सभोवती अशी मुले असतात. अशी शाळा असते. पण मैदान मात्र या मुलांना मिळणे अवघडच. रोजच्या जगण्यात माणुसकी सामावण्याचे प्रयत्न कमी दिसतात. अशा एका प्रयत्नाचा, एका लढ्याचा उत्कंठावर्धक प्रवास  म्हणजे चॅलेंज. 

पत्रकार आणि लेखक म्हणून आपले स्थान पक्के करणा-या प्रतिकची ही दुसरी कादंबरी. भाषेचा वापर वा इतर कादंब-यांशी तुलना न करता आपल्यात खिलाडूवृत्ती वाढावी ही आशा मनात ठेऊन वाचकांनी कादंबरी वाचावी . 

"फुटबॉल आपला दोस्तच होता. जसा रघ्या होता, ममद्या होता. ते आपल्यासाठी जसे कायपण कराले तयार असाचे तसंच हा फुटबॉलबी आपल्यासाठी करतोय..आपल्या चांगल्यासाठी..आपलं भलं व्हावं म्हणून आपल्या लाथा खातोय..आपटतोय..ठेचकाळतोय..पर काही बोलत नाही..त्याले बोलता आलं असतं तर त्यानं ममद्यासारखंच म्हटलं असतं की दोस्त तेरे लिये तो अपनी जान भी हाजीर है...ममद्या हमेशा म्हणाचा असं आपल्याले..तो जसा आपल्यासाठी..सा-या टीमसाठी आपटून घेतोय स्वताले, हाताची ढोपरं आणि पायाचे गुडघे फोडून घेतोय तसंच हा फुटबॉलबी करतोय..लाथाडून घेतोय स्वताले..आमचं चॅलेंज पुरं करता यावं म्हणून..आम्हाले शाळेत जायले मिळावं म्हणून..याचं..ममद्याचं हे लाथाडणं वाया नाही जाऊ द्याचं आपण..याची संगत नाही सोडाची आता आपण..त्याच्या संगतीनंच आपली जिंदगी सुधारणार आहे आता..काही झालं तरी याची संगत नाही सोडाची..आपण आपल्यालेच शब्द दिला..आणि तो पाळण्यासाठी आपण काहीबी कराले तयार होतो.."

...परिस्थितीनं नाडलेल्या पण पोटातली आग न विझलेल्या जिद्दी मुला-मुलींची आणि या अनगढ दगडांमधून सुरेख शिल्पं घडवू पाहणा-या एका ध्येयवेड्या शिक्षकाची विलक्षण कथा...

 

 चॅलेंज…प्रतिक पुरी

डायमंड पब्लिकेशन्स

About the Author

admin's picture
admin