तुम्हाला आहे मैत्रीण?

तुम्हाला आहे  मैत्रीण?
 महिला दिन झाला म्हणजे आता महिला आणि त्यांचे समाजातले स्थान याचा विचार करायचा नाही, असं मुळीच नाही. उलट दिवस झाल्यावरही आयुष्यात आलेली, पाहिलेली एखादी स्त्री आवर्जून आठवत राहते.
ती स्त्री आपल्या जवळ नसतानाही. असं जेव्हा होतं तेव्हा त्या स्त्रीचं आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान आहे, असं नक्की समजा. तिच्यावर आपलं प्रेम आहे, हे सुद्धा मान्य करा. हे प्रेम शारीरिक आकर्षण असावं, असं मुळीच नाही.
आज मी एक छोटी गोष्ट सांगणार आहे. माझ्या एका मैत्रिणीची. ती आदर्श स्त्री, अतिशय प्रतिष्ठित आहे असं काही आहे म्हणून तिच्याविषयी सांगते आहे, असं नाही. ती फार सोशिक आहे असंही नाही. ती त्याग वगरेसुद्धा करते असंही नाही. तिच्याकडे एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे ती दुस-याला थोडा वेळ देते. समोरच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेते.
तुम्ही म्हणाल की, काय आहे त्यात विशेष? घराघरात प्रत्येक स्त्रीला असं वागावं लागतं. ऐकण्याची सवय झाली की बायका निमूटपणे बाहेरही इतर व्यक्तीचं म्हणणं मान्य करतात, असं सर्वसाधारणपणे दिसतं.
उलट चित्र असतं, अशा केसेस खूप कमी. पण या मैत्रिणीचं तिचं हे ऐकणं, नुसत्या ‘हो ला हो’ करण्याच्या ऐकण्यापैकी नाही. एखाद्या जीवाभावाच्या सखीनं म्हणणं ऐकून घ्यावं, तसं आहे ते.
दिवस सुरू झाल्यापासून दूधवाला, पेपरवाला, टॅक्सीवाल्यापासून तर ऑफिसातली रिसेप्शनिस्ट, तिच्या बरोबर काम करणारे अनेक जण तिच्याशी बोलतात. त्यांची गा-हाणी, सुख-दु:खं सांगतात. ती समुपदेशक नाही. तरी तिच्या कानावर कुणाकुणाच्या गोष्टी-व्यथा येतात. कधी लोक तिच्याशी उगाच वाद घालतात.
समोरच्या व्यक्तीच्या हिला न पटणा-या अनेक गोष्टी अनेक वष्रे कशी समजुतीने स्वत:ला पटवून देते ही? आणि अशी काय वागते, जणू काही घडलंच नाही. तिला बघितलं की अनेकदा मनात विचार येतो, कसं काय जमतं तिला हे किती जणांना जमतं हे असं वागणं? साधारणपणे मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय स्त्री जर पाहिली तर अनेकींच्या नाकाच्या शेंडय़ावर राग असतो.
जन्मजात गुणांचा- दिसणं, आíथक स्थैर्य, जात अशा कोणत्याही गोष्टीमुळे थोडा माजच असतो असं म्हणू. तरुण असताना काय आणि पार चाळिशी पार झाली तरी अनेकींचा स्वभाव बदलत नाही. आधी असलेला गर्व आणि प्रखर असा अहंकार तसूभरही कमी होत नाही.
पण हिचं सगळं काही औरच आहे. हिला राग येत नाही वा हिच्या काही अटी नाहीत, असं नाही. तिनं कसं वागायचं याच्या अटी आणि सीमा आधीच आखून घेतल्या आहेत, असं एक मैत्रीण नेहमी म्हणायची. ते आता पटतंय. त्या सीमेत जे काही सामावतं तिथवर हिचं वागणं एक असतं. ती सीमा पार झाली की मग वेगळं. पण म्हणून त्या वेगळ्या वागण्याचे फटके बसलेले मी पाहिले नाहीत.
एकाही माणसाबद्दल काही वावगं बोलत नाही ती. प्रत्येकामधलं जे काही चांगलं आणि अनुकरण करण्यासारखं असतं तेवढं शोधते. समोरच्याने दहा गा-हाणी ऐकवली तरी शांत राहते, जमेल तशी मदत करते.
माझ्याच नाही तर आमच्या ज्या कुणी कॉमन फ्रेण्ड्स आहेत, त्यांच्या मनात हिच्याविषयी अनेक प्रश्न आणि उत्सुकता आहे. तिला विचारलं तर ती नुसतं हसते वा अगं मी अशीच आहे, असं सांगते.
आम्हाला मात्र प्रश्न असतात की, कसे बहर आणि शिशिरसारख्याच आपुलकीनं हिने आपल्यात सामावून घेतले आहेत? पाखरांना निवारा देणाऱ्या फुललेल्या झाडाप्रमाणे, बागेप्रमाणे आहे तिचं हसणं, वागणं हे जमणं किती अवघड आहे! माणसं वाहवत जातात, गुंततात; पण ही कशी निर्वकिारपणे वागते? त्या निर्वकिारपणाचा एखाद्याला राग आला तर ती माणसं दुखावतात- हिलाही आणि स्वत:लाही त्रास करून घेतात. अशांचा सामना करताना थोडीशी अस्वस्थ होते ही! पण पुन्हा शांत होते.
हिचंही थोडं उजवं-डावं होत असेलच. पण तरीही ती एकंदर निर्वकिारपणे जगाकडे बघते. साधारण एखादा वाईट अनुभव आला की, लोक त्याची तशीच परतफेड करतात. मग ही न टाळता येणारी वाईट वागणुकीची मालिका सुरू होते असं आपण बघतो.
अशावेळी हिच्या वाटेला नकार कधी आलेच नसतील का? तिलाही त्रास होत असेल ना कशाचा? पण तिला मिळालेले नकार, अपमान, खेद न खंत बाळगता ती कशी पेलते? त्याच्या बदल्यात तिलाही आपण तसंच वागावं असं वाटत नसेल का? नसेल वाटत तर काय रहस्य आहे याचं, असा प्रश्न आम्हाला छळत असतो.
ऋतूमागून ऋतू सरकतात, ऊन-पावसाचा खेळ चालतो, रंगीबेरंगी इंद्रधनुष्याची कमान घेऊन ऊनही होतं रंगीबेरंगी! खडा टाकल्यावर पाण्यात वर्तुळे दिसतात, लहरी उठतात. तसं कुणाच्या खडय़ाचा हिलाही त्रास होत असेल. पण फार नाही असं म्हणत ती मागमूसही लागू देत नाही.
आज तिला भेटल्यावर पुन्हा वाटत आहे की, खरं शोधायला हवं कुठं जातात ते हसण्याआधी ओठावर आलेले समजूतदार उसासे.. तुम्हालाही आहे असा कुणी मित्र? कुणी मैत्रीण? जपा त्यांना. काही टक्केतसे आपणही वागलो तर प्रेम काही वेगळं नाही असं लक्षात येईल.

About the Author

admin's picture
admin