
शहाण्यानं चढावी थिएटरची पायरी- ‘कोर्ट’ साठी !
सिनेमा म्हणजे काय? सिनेमा म्हणजे हलत्या चित्ररुपात दिसणारी कथा. ढोबळमानाने बघितलं तर व्यावसायिक सिनेमा म्हणजे काय? व्यावसायिक सिनेमा म्हणजे ज्यात एक हिरो प्रकारातला व्यक्तिविशेष आहे आणि या हिरोला केंद्रस्थानी मानून कथा किंवा आख्खा सिनेमाच त्याच्याभोवती विणलेला आहे. मग कधी कधी ही हिरोची व्याख्या पातळ होते आणि प्रोटॅगनिस्ट समोर येतो; पण हिरो किंवा प्रोटॅगनिस्टशिवायही कथा असू शकते; आणि सिनेमासुद्धा. 'कोर्ट' हा असाच वेगळ्या पद्धतीने सांगितल्या गेलेल्या वेगळ्या कथेचा सिनेमा आहे. 'कोर्ट' च्या कथेला हिरो किंवा प्रोटॅगनिस्ट नाही. मग 'कोर्ट' मधे घडतं काय? आपल्या रोजच्या जीवनात घडत असतं तेच. मग त्याचा सिनेमा कशाला करायचा? हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. उत्तर जुनंच आहे. सिनेमे का करावेत? सिनेमा नामक माध्यमातून लेखक/दिग्दर्शकाला काहीतरी सांगायचं असतं म्हणून ते सिनेमे करतात. आणि म्हणूनच 'कोर्ट'.
'कोर्ट'मधे काय आहे ह्यापेक्षा 'कोर्ट'मधे काय नाही याची यादी आकाराने मोठी आहे.आणि 'कोर्ट'मधे काय नाही, यापेक्षा 'कोर्ट'मधे काय आहे याची यादी जास्त महत्वाची आहे. तेव्हा 'कोर्ट' हा सिनेमा निव्वळ धमाल मनोरंजनासाठी थेटरात जाणा-यांसाठी नाही. अर्थात बघण्यावर आणि बघून आवडला नाही तर शिव्या घालण्यावरही बंदी कुणालाच नाही; पण समकालीन किंवा आजवरच्या चित्रपटांशी साधर्म्य सांगणारी कुठलीच बाब यात नाही. कुठलाही शेंडा बुडखा, सरळ एक कथा, हिरो-हिरॉईन, व्हिलन, चटकदार वेगवान एडिटींग, चमकदार लाईट्स, घासूनपुसून लख्ख सौंदर्य अधोरेखणा-या फ्रेम्स असं काहीही नसलेला सिनेमा म्हणजे 'कोर्ट'. 'कोर्ट'ला एक वेगळीच गोष्ट सांगायची आहे. आपल्याचबद्दलचं एक वेगळं निरीक्षण मांडायचं आहे. सिनेमातील पात्रांचं सिनेमाबाह्य आयुष्य शून्य असतं, हे आपण मानूनच बसलो आहोत. म्हणजे हिरोने हिरॉईन बघितली आणि पुढच्या सीनमधे तिच्यासोबत झाडांमधे पळत गाणं गात नाचला यात आपल्याला काहीच चूक वाटत नाही. सिनेमात कधी कोणी पेट्रोल भरायला थांबत नाही. संवाद चालू असताना मधेच शिंकत नाही. हिरोला वाट्टेल तितकी मारामारी करून थकायलाही होत नाही आणि "छ्या फारच स्ट्रॉन्ग झालेत हे आजकालचे गुंड!" असं म्हणत हिरॉईनसोबत नाचण्याच्या आधी तो एखादी तंदूरी मुर्गी चावत नाही. हे सगळं बिनबोभाट चालून जातं. मग ही सिनेमॅटिक लिबर्टी तोडून एखादा सिनेमा रोजच्या आयुष्याच्या खरेपणाच्या जास्त जवळ जाणारं काहीतरी दाखवू इच्छित असेल तर त्यातही काही चूक नाही. अशा प्रकारे त्यातील पात्रांच्या रोजच्या जगण्यातून त्या पात्रांच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेणं आणि मग त्याचा मूळ कथेवर होणारा प्रभाव तपासणं असा प्रयोग करणारा सिनेमा म्हणजे कोर्ट !
पोस्टर्समुळे चित्रपटाची ओळख बनलेल्या पात्राचं, "नारायण कांबळेंचं काय होतंय?" हा सवाल उभा करणं ही 'कोर्ट'ची मुख्य कथा. चित्रपटाचा गाभा यापेक्षा फार मोठा आणि वेगळा आहे. लोकशाहीर नारायण कांबळेंची कथा म्हणजे त्यांनी कोर्ट/सरकारविरोधी दिलेला एकहाती लढा अशीच असायला हवी का? चित्रपटांनी स्वतःवरच घालून घेतलेल्या नारायण कांबळेंना सक्तीने हिरो करायच्या बेड्या कोर्ट तोडतो. नारायण कांबळे विरुद्ध सरकार या खटल्यात त्यांचे वकील, पोलीस, साक्षीदार, जज या सगळ्यांचीही कथा आहेच. तर नारायण कांबळेंच्या कथेवर या लोकांच्या कथांचा का/कसा/कधी प्रभाव पडतो ह्या शक्यता 'कोर्ट' तपासून पहातो. मग हळूहळू सिनेमाच्या कथेचाच अंडरकरंट होतो आणि आज आपण जगतो त्या समाजाचा, सरकारी व्यवस्थांचा, गरीबांच्या, मध्यमवर्गीयांच्या, उच्चभ्रूंच्या रोजच्या जगण्याचा आडवा छेद समोर येतो. या सगळ्या मोकाट धाग्यांना बांधून ठेवतो नारायण कांबळे आणि त्याची कथा. नारायण कांबळेंना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक व सुटका होते. न्यायालयाच्या पद्धतीनुसार खटला पुढे सरकत असताना शहरी वर्गभेद आपल्यासमोर येतो. वेगवेगळ्या वर्गाची नमुनेदार उदाहरणं असणा-या या पात्रांच्या संयोगातून नारायण कांबळेंचं भवितव्य ठरत असतं. आणि एका प्रकारे नारायण कांबळेंमुळे सरकार, चित्रपटात कधीही समोर न येणारा व्हिलन/ऍन्टागॉनिस्ट ह्यांचंही भवितव्य ठरेल. मुळात सिनेमा नारायण कांबळेंना हिरो करत नसल्याने कुणालातरी व्हिलन म्हणून उभी करायची गरज मला तरी जाणवली नाही. कोर्टाला उन्हाळ्याची सुट्टी लागते तिथे रूढार्थाने सिनेमा संपतो. त्यानंतर जे काही होतं तो फक्त एपिलॉग; सिनेमा संपला तरी नारायण कांबळे आणि कोर्टाची कथा चालूच रहाणार असल्याची जाणीव करून देणारा.
कोर्टची दृष्यभाषासुद्धा अतिशय वेगळी आहे. 'कोर्ट'च्या प्रकृतीशी साधर्म्य सांगणारी आहे. सिनेमा ओव्हर द शोल्डरच्या किंवा क्लोजपच्या क्लोजनेसला फार कमी जातो. एका बाजूने या सिंगल स्टॅटिक फ्रेम्स प्रेक्षकांना कंटाळा आणतात तर दुसरीकडे घटनेतली उत्स्फुर्तता/खरेपणा जपतात. अशा वेळेस धावून येतात ते संवाद. सोसायटीतील प्री-एस्टाब्लिश्ड आयडेन्टिटीज आणि त्यांच्या जगत रहाण्यातली टिपीकॅलिटी मेलोड्रामाटिक न होता योग्य संशोधन आणि चोख संवादांद्वारे चित्रपटातून व्यक्त होत रहाते.
शेवटी नारायण कांबळेंचं जे काय होतंय ते चालूच राहील. एक गेले की चळवळ थांबणार नाही. दुसरे कुणी त्यांची जागा घेतील. आणि आपण आपल्या जगण्यातल्या समस्त टिपीकॅलिटीज् एंजॉय करत जगत राहू किंवा मरत राहू.