महाराष्ट्राचे भूषण!

 महाराष्ट्राचे भूषण! 

……………….
मला बाबासाहेब कधी इतिहास संशोधक वगैरे वाटलेच नाहीत. बाबासाहेब पुरंदरे हा तर इतिहासाच्या साधनेत ब्रम्हानंदी टाळी लागलेला, इतिहास जगणारा वेडा मुसाफिरच.
महाराष्ट्र-भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंविषयी सांगतोय निमेश शशिकांत वहाळकर
………………..

तेव्हा मी साधारण इयत्ता सहावी-सातवीत होतो. गोष्टीबिष्टींची मासिकं वाचायचं तुफान वेड. इतिहासही आवडायचा बऱ्यापैकी. पण तो अमक्याने तमक्याला कसं मारलं, कशी फजिती उडवली, फुंकर मारून कसं शंभर राक्षसांना उडवलं इतपतच मर्यादित होता. सनावळ्या, वंशावळी काही म्हणजे काही झेपायच्या नाहीत. सगळं डोक्याच्या वरून. बाकी घरात नुसतं चंपक, ठकठक, किशोर नि छात्र प्रबोधन. आले कि हावरटासारखे वाचायचे. एखाद्या महिन्यात आले नाहीत की गोंधळच गोंधळ. तर.. अशी आमची वाचनसंस्कृती तशी सरासरीच होती. आणि अशाच एका साधारण वगैरे दिवशी बाबांनी एक जाडजूड पुस्तक समोर आणून ठेवलं. उचलायला गेलो तर भलतंच जड. नाव वाचलं.. राजा शिवछत्रपती. लेखक ब. मो. पुरंदरे. तोपर्यंत शिवाजी महाराज हे क्रमशः आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींमधून, चौथीतल्या इतिहासाच्या पुस्तकातून, आणि शाखेतल्या जय भवानी जय शिवाजी इ. घोषणा आणि 'शिवाजी म्हणतो..' सारख्या खेळांमधून माहिती होते. एवढं जाडजूड पुस्तक वाचायचं म्हणजे जरा अवघडच काम होतं. 
बाबा म्हणाले, “वाच. सोपं आहे. आवडेल तुला.” 
कसाबसा ते वजनदार पुस्तक घेऊन बाहेर अंगणात आलो आणि पायरीवर बसून सुरुवात केली. 
सुरुवातीला ते यादवकालीन महाराष्ट्राचं वर्णन, मग खिलजीचं आक्रमण, सुलतानशाही, मग शिवाजीचा जन्म, मग ते बाल शिवबाचे खेळ, त्याचे सवंगडी वगैरे.. मग सुरु झालेली अफझल-शास्तादी खानावळ.. मग पुरंदरचा तह, मग आग्रा प्रकरण, राज्याभिषेक, मधेच येणाऱ्या समर्थांच्या ओळी, मग दक्षिण दिग्विजय, आणि अखेरचं ते 'काय लिहू? शब्दच संपले!!' पाचव्या दिवशी पूर्ण.   टाइम मशीनने इतिहासातली चारशे वर्ष चार दिवसात फिरून आलो आणि चांगलंच गरगरलं. पुन्हा पहिल्या पानापासून वाचायला घेतलं. पुन्हा गरगरलो. मग पुढे बाबा एकेक पुस्तकं देत राहिले, मी वाचत राहिलो, वय वाढत गेलं तसे विषय वाढत गेले (पुस्तकांचे!).. पण सुरुवात तिथून झाली..  राजा शिवछत्रपती. लेखक ब. मो. पुरंदरे! 
काल बातमी आली की महाराष्ट्र शासनाने बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर केला. शिवशाहीर बळवंत मोरेश्वर पुरंदरे. वयाची नव्वदी पार केलेले ज्येष्ठ मराठी साहित्यिक, नाटककार आणि इतिहास लेखक. नव्वद आणि वीस यांतला फरकच कळेनासा व्हावा असा उत्साह, चैतन्य आणि प्रसन्नता सोबत घेऊन फिरणारा हा अवलिया. आपल्याकडे एक पद्धत आहे. आपल्याला इतिहास संशोधक, इतिहास लेखक वगैरे नेहमी कुठलंतरी लेबल लावलेला लागतो. ब्राम्हण इतिहासकार, मराठा इतिहासकार, दलित इतिहासकार वगैरे वगैरे. त्याशिवाय चालत नाही आपल्याला. बाबासाहेबांवर तर केवढे आरोप झाले! इतिहासाचं काय तर ब्राम्हणीकरण केलं नी काय काय. खरं सांगायचं तर मला बाबासाहेब कधी इतिहास संशोधक वगैरे वाटलेच नाहीत. बाबासाहेब पुरंदरे हा तर इतिहासाच्या साधनेत ब्रम्हानंदी टाळी लागलेला, इतिहास जगणारा वेडा मुसाफिरच. या जातीपातींच्या लेबलांची झेप जिथे संपते तिथून प्रवास सुरु करणारा मुसाफिर. मराठा सरदार आदिल-निजामाच्या जहागिरी मिळवण्यात कसे स्वार्थी झाले होते हे सांगताना त्यांनी ब्राम्हण दशग्रंथी नी सहस्रग्रंथी गोदावरीच्या तीरावर बसून वेदांच्या साक्षीने या पातशाहास कसे 'दुवा' देण्यात गुंग होते हेही सांगितले. 
राजा शिवछत्रपतीमध्ये बाल शिवबाच्या सवंगड्यासोबतचे ते खेळ वाचताना, समर्थांच्या सह्याद्रीच्या कडेकपारीत घुमणाऱ्या 'आनंद वनभुवनी'सारख्या रचना वाचताना, बाजीप्रभू पडल्यानंतर त्या पावनखिंडीने स्वातंत्र्यसूर्याकडे केलेला आक्रोश वाचताना, बेभान होऊन दिलेरखानावर तुटून पडणारा मुरारबाजी वाचताना, पुरंदरच्या तहानंतर शिवरायांचं विषण्ण झालेलं मन वाचताना माझ्यासारख्या सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनाला हे ब्राम्हणीकरण वगैरे शिवूच शकत नाही. माझ्यासारखा वाचक तेव्हा जगात असतो तो फक्त इतिहास. शिवाजी या तीन अक्षरांचा इतिहास. आणि हे समग्र इतिहास दर्शन घडवतात ते म्हणजे बाबासाहेब पुरंदरे. 
इतिहास वाचन किंवा मुळातच कोणत्याच वाचनाची आवड नसलेले माझे अनेक मित्र, त्यांना शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल खडानखडा माहिती असते. कारण त्यांनी त्यांच्या 'टीन एज' मध्ये 'राजा शिवछत्रपती' वाचलेलं असतं. ही अशी आणि अशा महाराष्ट्रातल्या कित्येक पिढ्या घडवल्या बाबासाहेबांनी. घराघरांत इतिहास पोहोचवला बाबासाहेबांनी.  या अशा या अशा ॠषीतुल्य व्यक्तिमत्वाला महाराष्ट्रभूषण पुरस्कार घोषित करणा-या सांस्कृतिक कामकाज मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीचे मन:पूर्वक अभिनंदन. कारण बाबासाहेबांच्या रूपाने त्यांनी महाराष्ट्रभूषण या पुरस्काराचाच सन्मान केला आहे व त्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. आणि बाबासाहेब.. तुमच्याबद्दल मी याऊपर काय बोलू? हे तो श्रींची इच्छा!! 
 -निमेश शशिकांत वहाळकर 

About the Author

निमेश वहाळकर's picture
निमेश वहाळकर