लिफ्ट

लिफ्ट
गाडीने नालासोपारा सोडलं होतं. सगळेजण भराभरा उतरले. विरारच्या आधी गाडी जवळजवळ रिकामी झाली.
भसाभसा खंगाळून (खंगाळून ह्या शब्दाची इटिमॉलॉजि मला समजून घ्यायचीय.. जाणकारांनी कृपया संपर्क साधा!! )पिळलेल्या लेंग्याला पाण्याचा निचरा झाल्यावर जसं हलकं वाटतं तसंच ट्रेनच्या सर्व डब्यांना हलकं वाटलं असेल. 
हलक्या ट्रेनच्या डब्यात मी एक कोपरा पकडतो. उगाच दिवसभराचा थकवा वगैरे असल्याचा आव आपोआप येतो. डोळे मिटणार एवढ्यात वर्तकचा आवाज येतो.
"घरी जायला गाडी आणली आहेस का रे?" वर्तक.
म्हणजे वर्तक प्रश्न विचारणार ह्याची मला खात्री असते, त्याच्याशी संवाद म्हणजे त्याच्या प्रश्नाला उत्तरं देणं हेच असतं हे मला गेल्या अनेक वर्षाच्या अनुभवावरून चांगलंच माहिती आहे. तरीही वर्तक प्रश्न टाकतो आणि मी फ़म्बल होतो. बॉल स्ट्रेट असतो, पण माझाच सराव कमी पडतो.
"नरो वा कुंजरोवा" असं उत्तर माझ्या जिभेवर येतं, पण त्यापुढे वर्तकने मला युद्धपर्व, शांतिपर्व, हरिवंश पुराण ह्या सर्वात नेवून बुडवलं असतं. म्हणून मी ते उत्तर मी टाळतो.
"आहे न! जाऊयात!" ओशाळभूत मी.
किक मारतो. वर्तकला म्हणतो "मला एका ए.टी.एम मध्ये जायचंय. आलोच!"
"ए.टी.एम. ला काही प्रॉब्लेम आहे का?तुला एक मिनिट सत्तावीस सेकंद लागली!" बाहेर पडल्यापडल्या वर्तक विचारतो. 
(वर्तक फ़ॉर्मात येतोय) 
" माझ्या सोन्या.. माझ्या बबड्या!! प्रॉब्लेम ए.टी.एम मध्ये नाही रे! तिथल्या बटणार मी दीदी तेरा देवर दिवाना हे गाणं वाजवत होतो, म्हणून वेळ लागला" मी मनातल्या मनात!
 
वर्तकशी बोलताना माझे प्रगट आणि स्वगत असे दोन्ही संवाद चालू असतात. म्हणजे डोकंही जोरात सुरु असतंच.
वर्तकाच्या तेल लावलेल्या आणि सुरवंट स्टाइल असलेल्या केसांच्या खाली एक तल्लख असा मेंदू आहे आणि तो तर अहोरात्र चालू असतो. सिमेंटच्या मिक्सरसारखा तो घणघण चालतो आणि त्यातून बाहेर पडणारा ज्ञानाचा कडबा तो माझ्यासारख्या तुच्छ प्राण्यासमोर ओततो. त्या कडब्याखाली मी पार भुस्काटुन जातो.
इन केलेला हाफ शर्ट, रेषेत कापलेली मिशी, तेलकट केस आणि खांद्यावर ब्याग ह्याच आवेशात वर्तक मला नेहमी भेटतो. तो इलेक्ट्रिकल इंजिनीअर आहे. त्याच्या ब्यागेत खोडरबर, नेटवर्क केबल, कैलास जीवन, हेक्स नट ह्यापैकी काहीही मिळेल ह्याची मला ग्येरेंटीआहे. कॉलेज पासऔट होवून इतकी वर्ष झाली तरी थेरेजाचं इलेक्ट्रिकल इञ्जिनिअरिङ्गचे पुस्तक त्याच्या ब्यागेत का म्हणून असतं हा  प्रश्न मला पुन्हा पुन्हा पडतो.
"आगाशी- विरार रस्त्यावर किती कुत्रे आहेत माहितीय का रे तुला?  वर्तक गाडीवर मागे बसून प्रश्न टाकतो.
" हो!! मी मागच्या वेळी फ्यामिली प्लानिंगवर कुत्र्यांचे लेक्चर घेतलं होतं तेव्हा १८ होते रे! आता किती आहेत? " माझं स्वगत !
" नाही रे? तू मोजले आहेस? " माझं प्रगट!
" ३७ कुत्रे आहेत" -वर्तक.
"माझं ऐकलं नाही रे, त्याचा परिणाम!" मी खदखदतो!
" बरं मला सांग, आपल्या रस्त्यावर किती स्पीड ब्रेकर्स आहेत?" - वर्तक. 
स्पीड ब्रेकर्स मोजून आपल्या आयुष्यात काय फरक पडणारे हे मला समजत नाही.
"साडे अकरा असतील कदाचित!  वरचा अर्धा आहे ना तो भूगर्भात बदल झाल्यावरचा आहे." मी स्वगत आणि प्रगट दोन्ही! मला आनंद होतो. 
वर्तकने गाडी घेतल्यावर तो गाडीच्या इंजिनचे सी सी मोजायचा प्रयत्न करतो. मी मेक्यानिकलवाला- म्हणून ते कसे मोजायचे हे तो मला विचारतो. मी लिटरचे मोजमाप घेवून त्याच्या घरी जातो..

वर्तक त्याचा बदला घेतो. मला एका कागदावर उगाच स्टार डेल्टा कनेक्शनचं एक कोडं घालतो.
"शरणागत सर्वस्वे भजति तव चरणी!" असं म्हणून मी थेरेजा, कॉलेजचे इलेक्ट्रिकल इंजिनीरिंगचे सर्व मास्तर आणि माझी अल्प स्मृती ह्यांना शरण जातो. अगदी त्या प्रॉब्लेमच्या कागदावर आडवं तिरकं लोळूनही पाहतो. पण मला काही झेपत नाही. आता आनंदानं खदखदायची पाळी वर्तकची असते.   
---
ओपेक, जागतिक अर्थ समस्या, अलो वेरा, टूथ ब्रशचे ब्रीसल्स ह्यावर वर्तक लीलया बोलू शकतो ह्याची मला खात्री आहे. किंबहुना लीलया संचार करणे हा जो शब्द प्रयोग आहे न, ह्याचा वर्तक हा आद्य प्रवर्तक आहे असा माझा मोठा समज आहे. वर्तकसुद्धा त्या समजाला धक्का लागेल असं वर्तन कधीच करत नाही.
येईल त्या विषयांना तो पिळून काढतो. अगदी पार त्या विषयांचं चिप्पाड करून त्याचं रसग्रहण वगैरे सुद्धा करतो.  

भयंकर हुशार माणसं असतात ना, त्यातला वर्तक आहे. साडीच्या निर्या किती असाव्यात ह्याचेहि डीटेल्स त्याला नक्की माहिती असतील. त्यातलं डिझाईन कोणतं पुढे असायला हवं हेही तो खात्रीलायक सांगू शकेल.लुंगी डान्स मध्ये किती एक्स्ट्रा आहेत, त्या गाण्यात यो यो हनी सिंघच्या गळ्यात किती माळा आहेत हेही त्याला नक्की माहिती असेल.
ह्या सर्व माहितीचे तो काय करतो आणि स्वत:चा ब्रेन का बरं ओवरलोड का करतो हे मात्र मला अजून समजायचं आहे.
 
मी कितीही तिरकं बोललो तरी त्याचा तोल जात नाही. एखादी टेक्निकल गोष्ट अडकल्यास त्याच्याकडे नक्की माहिती मिळेल ह्याची मला खात्री आहे. अर्मेचर, वैण्डिङ्ग, केबल्स, एम सी सी ह्याबाबत त्याच्याकडे एक्स्पर्टिज आहे. आणि अनेक गोष्टीत त्याला खूपच गती आहे. 
लहान मुलांचा निरागसपणा आहे त्याच्यात!
 कायम हसरा असतो तो!
म्हणूनच त्याला गाडीवर लिफ्ट पटकन मिळून जाते! 
एरव्ही इतर कुणी देतो, आज माझा नंबर आहे!!
 - सारंग लेले, आगाशी. 

About the Author

सारंग लेले