कुर्म्याच्या बंधनात अडकलेली स्त्री

कुर्म्याच्या निमित्तानं तिला मिळतो चार दिवस आराम;पण हा आराम खरोखर आरामदायक   असतो का ? काय आहे कुर्म्याची प्रथा ?

अभिषेक भोसले या तरुण पत्रकाराच्या क्षेत्र-भेटीतून आकाराला आलेला हा लेख

.................

कोणताही समाज, धर्म हा स्त्रीच्या शोषणावरच व शरीरशास्त्राच्या विरोधी गुणांवरच उभा असतो. मग त्यात प्रगत – अप्रगत, विकसित – अविकसित,  शहरी- ग्रामीण समाज असा काहीच भेद उरत नाही.  स्त्रीच्या शोषणाला ना धर्माच्या सीमा असतात ना जातीच्या. स्त्रीच्या शरीराकडं पाहण्याचा दृष्टीकोन हा आशास्त्रीयतेला चिकटलेला आणि तुच्छतेचाच किंवा भोगविलासा पलीकडे जाणारा नसतो. तर दुसऱ्य़ा बाजूला आदिवासी समाजात जिथं स्त्रीला समान वागणूक मिळते असं सगळीकडं सांगितलं जातं. ते बरोबरच आहे. विवाहसंस्था असो वा अधिकार, वारसा या बाबतीत आदिवासींमध्ये पुरूषांपेक्षा स्त्रीयांचेच पारडेच जड दिसते;पण स्त्रीच्या शरीरशास्त्राचा जेव्हा संबंध येतो तेव्हा मात्र समानतेच्या या सर्व गोष्टी गळून पडतात.

मासिक पाळी ही अशी गोष्ट आहे, जी स्त्रीला मानसिक शारीरीक व सामाजिक पातळीवर स्त्री म्हणून जगवते. मासिक पाळीच्या काळामध्ये स्त्री अधिक अशक्त बनण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात तिला आराम मिळणे गरजेचे असते. ही गरज ओळखून आदिवासी समाजामध्ये मासिक पाळीच्या काळात स्त्रीला पूर्ण आराम मिळण्याची व्यवस्था केलेली आहे. आदिवासी समाजामध्ये वा गावामध्ये घराचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यात लोन, खेतुली, गोटूल, चावाड आणि कुर्मा इ. यातील कुर्मा म्हणजे आदिवासी स्त्रीने मासिक पाळी आली की या घरात रहायचे. गावातल्या 5 -6 घरांचा मिळून एक कुर्मा असतो. या चार दिवसाच्या काळात स्त्रीने फक्त आराम करायचा. घरातली सगळी कामं पुरूष मंडळींनी करायची. या कुर्म्यामध्येच तिच्या राहण्याची खाण्याची पिण्याची  व्यवस्था करण्यात येते. कुर्म्यात वापरायची कापडं अंथरूनं पांघरून सगळीच वेगळी.

गडचिरोलीच्या आदिवासी भागातले पण सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले लेखक एम.डी. रामटेके आपल्या ‘आम्ही माडिया’ पुस्तकात लिहितात, “आमच्याकडे स्त्री – पुरूष बरोबरीने काम करतात. अगदी नांगरण्यापासून ते झाडं तोडण्यापर्यंतची सगळी काम स्त्रियाही करतात. स्त्री इतर दिवस पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून कामं करत असली तरी  मासिक पाळीच्या काळात ही कामं करताना ती कमी पडते आणि तिला विश्रांतीची गरज असते. हे आमच्या पूर्वजांनी हेरलं होतं;पण नुसतं घरी बसून राहणं आणि स्वयंपाक रांधणं म्हणजे विश्रांती नव्हे. बाई खरी असली की आल्या गेल्याचं करणं, घरातली लहान- सहान काम करणं हे ओघाने येतंच. या सर्व गोष्टीतून तिची सुटका केल्याशिवाय खरी विश्रांती मिळणार नाही. हे ओळखून कुर्म्याची कल्पना निघाली असावी”.

नक्कीच वैज्ञानिकदृष्ट्या देखील मासिक पाळीच्या काळात स्त्रीला आरामाची नितांत गरज असते. या दृष्टिकोनातून कुर्म्याची संकल्पना अस्तित्वात आली असावी. एक मात्र खरं आहे आपल्या शहरी भागत मासिक पाळीच्या काळात शिवायचं नाही वगैरे प्रकार असतो. कदाचित त्यामागही आराम मिळावा हाच उद्देश असावा; पण त्यापेक्षा यात अधिक आराम मिळण्याची शक्यता असेत. शहरी व ग्रामीण भागात शिवायचं नसलं तरी छोटी मोठी कामं करता येतात, म्हणजे पूर्ण आराम ही संकल्पना त्यात नाहीये. त्यामुळे अदिवासींच्या या कुर्मा संस्कृतीला महत्त्व आहे. त्यात संपूर्ण आराम करण्याची मुभा आहे; पण त्यातून निर्माण होणाऱ्या गैरसोयीचं काय?

एकीकडं शरीरशास्त्र, विज्ञान प्रगत होत आहे, त्याचप्रमाणे अदिवासीही प्रगत होऊ लागला आहे. जागृत होऊ लागला आहे. आपल्या हक्कांसाठी आवाज उठवू लागला आहे. आरोग्याच्या सोयी या अदिवासी भागांमध्ये चांगल्या प्रमाणात पोहोचत आहेत. आरोग्यासंदर्भात अधिकाधिक जागृती करण्याचे प्रयत्न प्रशासनातर्फे तसेच दुर्गम भागात काम करणाऱ्या एनजीओकडून करण्यात येऊ लागले आहेत. नुकत्याच गडचिरोलीच्या अदिवासी गावांमध्ये फिरताना कुर्मा संस्कृतीची दुसरी बाजू जी स्त्रीच्या आरोग्यासाठी भयानक विदारक आणि हानीकारक आहे, ती पाहता आली. स्त्रियांशी संवाद साधता आला. मुळात कुर्मा ही गोष्ट जरी स्त्रीच्या शरीराला केंद्रस्थानी ठेवून निर्माण झाली असली तर आज आरोग्याची चर्चा करताना स्त्रीला आणि तिच्या शरीराला या कुर्मा संस्कृतीचा होणारा तोटा देखील समोर येणं गरजेचं आहे. मी पाहिलेल्या कुर्म्यांमध्ये ना लाईटची व्यवस्था आहे ना पाण्याची, ना झोपायला खाट आहे ना आंघोळीसाठीची योग्य सोय. मासिक पाळी ही गोष्ट 12 महिने चालू असणारी प्रक्रिया आहे. तिला ना उन्हाळ्याचे बंधन आहे ना पावसाळा हिवाळ्याचे. पावसाळ्याच्या काळात कुर्म्यांमध्ये राहणाऱ्या स्त्रियांना साप चावल्याच्या अनेक घटना आपल्याला या भागात ऐकायला मिळतात. 5 – 6 घरांमध्ये कुर्मा असल्याने एका वेळी  2 3 स्त्रिया या कुर्म्यात असतात. कुर्म्याची जी जागा असते ती आकाराने खूपच लहान असते. त्यात खाट घालणं शक्य होत नाही. मग रात्री जमीनवरच झोपणं आलं. मग थंडीचा काळ असो वा पावसाळा झोपणं तर जमीनीवरच. मग साप चावण्याच्या घटना हमखास घडतातच. पावसाळ्यात तर झोपायला देखील जागा मिळत नाही. वरून पाणी गळत असतं. त्यात कपडे वाळायची अडचण. मग त्यातूनच संसर्ग होण्याची शक्यता  बळावते.

 आता या आदिवासी भागात काही संस्था आरोग्याच्या प्रश्नासाठी काम करत आहेत. गडचिरोलीच्या ‘सर्च’ मध्ये काम करणारे महादेव सातपुते जे सर्च साठी गावागावतील आरोग्य सांभाळण्याचे काम करतात ते कुर्म्याबद्दल सांगतात, “आम्ही आमच्या कुवतीनुसार मासिक पाळीमध्ये आवश्यक काय काळजी घ्यायला हवी या बद्दल स्त्रियांना सांगत असतो. गावातल्या लोकांनाही कुर्म्याबद्दल घ्यावयाची काळजी आणि कुर्म्याच्या आत अपेक्षित सोयींची माहिती सांगत असतो. त्यात कुर्म्याचा आकार वाढविणे, खाटेची व्यवस्था करणे, भरपूर पाणी उपलब्ध करून देणे व महत्त्वाचे म्हणजे लाईटची व्यवस्था असणे या बद्दल सातत्याने सांगत असतो. आता मोठ्या प्रमाणाच कुर्म्याच्या रचनेत बदल होत आहेत. मोठ्या आकाराचे कुर्मे बांधले जाऊ लागले आहेत. शेवटी हा त्यांच्या परंपरेचा प्रश्न असल्यामुळे बाहेरच्या लोकांनी त्यात जास्त ढवळाढवळ करणं हे काही आदिवासी स्वीकारू शकणार नाहीत. त्यामुळे या प्रश्नावर आम्हीदेखील अदिवासी समाजाशी थेट बोलू शकत नाहीत;पण बदल घडत आहेत”

30 टक्के महिला आरक्षणामुळे गावच्या पंचायतीत महिलांना स्थान जरी मिळाले असले तरी, त्या चार दिवसांमध्ये कुर्म्यामध्ये येणाऱ्या अडचणीवर बोलायला या महिला धजावतात. म्हणजे या गोष्टीवर या समस्यांवर बोलण्यासाठी हा समाज अजून तरी तयार नाहीये.  कुर्मा ही गोष्ट वर्षांनुवर्षं चालत आलेली आहे. त्यामुळे त्याविरूद्ध बोलणं म्हणजे परंपरेच्या विरूद्ध बोलण्यासारखंच असल्याचे या अदिवासी स्त्रिया सांगतात. कोणी बोलायचा प्रयत्न केला तर मग काय गावची पंचायत व त्यांच्या समाजातील लोक त्यांच्यावर पैशाच्या स्वरूपात दंड बसवितात, त्यामुळे कितीही त्रास होत असला तरी सहन करण्याशिवाय पर्याय उरत नाही.

बदलत्या जीवनशैलीमध्ये कपड्याचे बदललेले प्रकारही या स्त्रियांच्या अडचणीत भरच टाकतात. आज कॉटनचे कपडे वा साड्या बाजारातून मिळणं अवघडच झालं आहे. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात लागणारे कॉटनचे कपडे वापरणं आता अवघड झालंय. बाजारात मिळणारे पँड विकत घेणं काही अर्थिकदृष्ट्या या स्त्रियांना परवडत नाही. त्यामुळे कॉटनपेक्षा वेगळे कपडे वापरण्यापासून ते कपडे वाळविण्यापर्यंतच्या समस्यांना व नवीन कॉटनचे कपडे मिळविण्याच्या समस्यांना या स्त्रियांना सामोरे जावे लागत आहे.

या चार दिवसाच्या काळात या स्त्रियांसाठी कुर्मा म्हणजे गप्पाचे एक मस्त ठिकाणच ठरते. त्याच बरोबर मनोरंजन म्हणून काही जणी फळभाज्या लावणे, त्यांची देखभाल करणे. रामटेके यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे काही स्त्रिया या संधीचा उपयोग शिकारीसाठीही करतात.

एकंदरीत ही कुर्मा संकल्पना आदिवासी स्त्रियांना आराम मिळावा म्हणून जरी सुरूवात करण्यात आली असली तरी त्यात असणाऱ्या सोयीसुविधा या त्या स्त्र साठी नक्कीच आरामदायक नाहीत. त्यामुळे कुर्मा पद्धत चालू असावी की बंद करावी हे अदिवासीच काळानुरूप ठरवतील पण तोपर्यंत कुर्म्यामध्ये आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्या तरच खऱ्या प्रकारे त्या स्त्रिया आराम करू शकतील. नाहीतर गैरसोयींचाच त्रास जास्त होईल. ‘सर्च’सारख्या काम करणाऱ्या संस्था या प्रश्नावर जागृती करण्याचे काम करतच आहेत, पण त्याला आणखी काही कालावधी लागेल. आज प्रगत होत असलेल्या आणि स्त्री पुरूष समानता मानणाऱ्या अदिवासींमध्ये कुर्मा सारखी मासिक पाळी संदर्भातील समस्या आजही स्त्रिया गावतल्या पुरूषांसमोर मांडू शकत नाहीत. कदाचित भविष्यामध्ये त्या मांडण्याचे धाडस करतीलही. पण आज अजून ती वेळ आली नाहीये.

अभिषेक भोसले

 

About the Author

अभिषेक भोसले's picture
अभिषेक भोसले