जीवन रहस्यांचा शोध

       अध्यात्माच्या पातळीवर जीवन रहस्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करणा-या आदि शंकराचार्यांपासून ज्ञानेश्वर, तुकाराम, झेन, Tao आणि ओशो पर्यंतच्या अनेक तत्वज्ञ महाजनांनी मानवी जीवनाचा तळापर्यंत शोध घेतला आणि त्यांनी तो शब्दांत मांडण्याचा मांडण्याचा असफल प्रयत्न केला. कारण त्यांना आलेला अनुभव कोणत्याही स्मृतींच्या कोषांतून आलेला नव्हता. Tao of physics  ह्या सुप्रसिद्ध ग्रंथात F Capra तसेच इतर अनेक वैज्ञानिकांनी Relativity theory आणि Quantum theory  अनुसार पदार्थाचे वस्तुमान काल सापेक्ष आहे, ह्याचे स्पष्टीकरण करण्याचा असफल प्रयत्न केलेला आहे.

                           मुळात असे आहे की निसर्गातील ज्या रचनांचा आणि तत्वांचा वैज्ञानिक अभ्यास करतो, ती संसाधने त्याच्याच मनाच्या, संकल्पनांच्या, विचारांच्या आणि मूल्यांच्या अवकाशातून येत असतात. वैद्यानिक सुद्धा सृष्टी तत्वांचा आणि रचनांचा अविभाज्य असा घटक असल्यामुळे, त्याने लावलेले शोध, केलेले संशोधन, आणि प्राप्त केलेले ज्ञान ही सर्व संसाधने मानवी मनाच्या मूल्यधारणे वरच सिद्ध होत असतात.

            ग्रीक तत्वज्ञानी पाश्चिमात्य संस्कृतीवर आणि आपल्या वैदिक ऋषी-मुनींनी आणि संतांनी भारतीय किंवा पौर्वात्य संस्कृतीवर जे संस्कार केले; त्यांचा तुलनात्मक अभ्यास F Capra ने केलं आहे. ग्रीक तत्वज्ञांनी मनाचे अस्तित्व शरीरापासून भिन्न, वेगेळे मानले आणि मन हे शरीरावर नियंत्रण ठेवणारे एक यंत्र आहे, असे मानले. त्यामुळे मानवी मूलभूत जैविक धारणा, ज्यांना insticts म्हणतात; त्या आणि जागृत चेतन मन ह्या विरोधी भूमिका आहेत, असा निष्कर्ष निर्माण झाला आहे. तथापि आपल्या तत्वज्ञांनी मनाचे स्वतंत्र अस्तित्व अमान्य केले. मन ही जैविक शक्ती (Organic Energy) आहे, असे मानले व तदनुसार जीवांच्या रचनेचे मन हे एक मूलभूत अंग आहे, असे स्वानुभवाच्या साधनेतून, तपातून किंवा समाधी अवस्थेतून सिद्ध केले.

            पौर्वात्यांचा जीव आणि मन हा एकत्रित विचार आता विज्ञानात सिद्ध होऊ लागला आहे. काप्राच्या म्हणण्यांनुसार विज्ञान म्हणजे ज्ञानाची वस्तुनिष्ठ सिध्दता होय. हे ज्ञान मन, पंचेंद्रिये आणि बुद्धी ह्यांच्या प्रक्रियेतून कार्यरत असते. अशा ज्ञानाला काप्राने ‘विश्लेषणात्मक ज्ञान’ (Rational Knowledge) असे म्हणले आहे.

            आधुनिक विज्ञानात संकल्पना आणि त्यांच्या गणिती मांडणीसाठी चिन्हांकित परिभाषा विकसित झाली आहे. ह्या मांडणीच्या साह्याने विचारांची आणि ते प्रकट करण्याची जी प्रणाली प्रस्थापित झाली आहे; ती रेषीय (Linear) आणि क्रमिक (sequential) अशा स्वरुपात आहे.  “Rational knowledge is a system of abstract concepts & symbols, characterized by the linear & sequential structure which is typical of our thinking & speaking”.

                   रेषीय अवकाश ही संकल्पना आणि ह्या संकल्पनेची सिध्दता युक्लेडीयन भूमिती शास्त्रावर आधारित आहे. परंतु जेव्हा सूर्य मालिकेतील प्रचंड ग्रहांचा, ग्रह मालिका आणि ता-यांचा अभ्यास सुरू झाला, तेव्हा असे आढळून आले की युक्लिडची त्रिमितीय गणित सूत्रे लागू पडत नाहीयेय. कारण Newtonian अवकाश रेषीय आहे तर आईनस्टाईनच्या सापेक्षता सिध्दांतानुसार मात्र वक्राकार आहे. ह्याचे कारण गुरुत्वाकर्षण बल. हे बल केंद्रीय असून त्यामुळे इतर सर्व ग्रह तारे सूर्याकडे खेचले जातात. दुसरे असे की सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलाशिवाय इतर ग्रह्मालिकांच्या बलामुळे केंद्रगामी बल (centrifugal forces) प्रसरण पावते व अपकर्षण बल ( centripetal forces) कार्यरत होऊन अवकाश लंबवर्तुळाकार झाले आहे.  अशा प्रकारे वैज्ञानिक दृष्टीकोनातून अवकाश ही संकल्पना स्पष्ट होत आहे.

               तरीही ह्या अवकाशात मानवी जीवाला सुख-दुख: आणि इतर सर्व भावना द्वंद्वात्मक आहेत. त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेक तत्वज्ञ करीत आहेत. ह्यापैकी गौतम बुध्द हा कदाचित पहिला मानव की ज्याने दुख: म्हणजे काय ह्याचा मानवी मनाच्या अगदी तळापर्यंत जाऊन शोध घेतला आणि त्याने स्वानुभवातून असा सिध्दांत मांडला की दुख: ही बाह्य प्रायोजित किंवा स्वयं प्रेरित घटना नाही. तर ती एक आपली प्रतिक्रिया आहे. आपले मन आणि बाह्य जग यांच्या संयोगाचे हे एक फलित आहे. बाह्य जगाला त्याने वस्तू म्हणजे matter म्हणले आहे. पण ही वस्तू शक्ती स्वरुपात असल्यामुळे तिला वस्तूप्रमाणे आकार, रंग, रूप, दृश्यता, घनता, खोली, लांबी-रुंदी इ. कोणतीही परिमाणे नाहीत. मन म्हणजे काय ह्याची मांडणी करताना त्याने आत्मा म्हणजे काय ह्याचा ही शोध घेतला. त्याच्या मते आत्मा म्हणजे शरीराची अस्तित्व रूपाने प्रकट होणारी शक्ती आहे.

             प्राण आणि आत्मा ह्या जीव धारण करण्याच्या मुलभूत अभिशक्ती आहेत. प्राण ही भौतिक शक्ती आहे म्हणून तिला वस्तू म्हणणे संयुक्तिक आहे. कारण तिच्यामुळे शरीर जिवंत असते. ह्यावरून जीवात्मा म्हणजे जीव + आत्मा अशी संकल्पना विकसित झाली आहे. शरीरातून प्राण म्हणजे प्राणशक्ती निघून गेल्यामुळे जीवात्मा मुक्त होतो. पण ह्याचा अर्थ आत्मा शरीरामध्ये बद्ध असतो, असे नाही. तो शरीरांतर्गत आणि शरीरबाह्य असा सर्व जीवसृष्टीला व्यापून, आच्छ्यादून असतो. त्याच्या पासून जीव पृथक झाल्यामुळे आत्मा मुक्त झाला असा वाच्यार्थ झाला आहे. तेव्हा मृत्यू म्हणजे जीवात्मा शरीरातून निघून जाणे होय. अशा प्रकारे मागे राहते ते शरीर वस्तुमात्र असते म्हणून ते पंचमहाभूतांत विलीन होऊन जाते. मुळात शरीर म्हणजे पंचमहाभूतांचे आणि इतर अनेक मुलभूत द्रव्यांचे सजीव रूप आहे. त्यामुळे मृत्यू नंतर हे शरीर पुनश्च पंच महाभूतांत विलीन होऊन जाते.

              उपनिषदकारांनी आत्मा म्हणजे काय; ह्याचे उत्तर “समष्टी स्तरावरील जे ब्रम्ह; तेच व्यष्टी स्तरावरील आत्मा होय” असे दिले आहे. थोडक्यात असे की ब्रम्ह, परब्रम्ह, परमेश्वर, ईश्वर इ. ही सर्व वेगवेगळ्या परिभाषेतील रूपे आहेत. पण मूलभूत तत्व एकच आहे.

 

             उपनिषदकारांनी ईश्वर हे पराकोटीतील अतिसूक्ष्म तत्व आहे, असे म्हणले आहे. उदा. आपले बोलणे म्हणजे ध्वनी निर्मिती. बोलण्याची क्रिया म्हणजे वाणी असे म्हणले आहे. आपण अनुभवतो की आपले बोलणे जेव्हढे हळू-हळू करू, तेव्हढे ते कानाला कमी एकू येऊ लागते. म्हणजेच असे की वाणीचे रूप सूक्ष्म करता येते. म्हणून उपनिषदकारांनी वाणीची रूपे किंवा अवस्था चार आहेत असे म्हणले आहे. १- वैखरी-नेहमी ऐकू येणारा ध्वनी. २- मध्यमा- अगदी हळू आवाजात बोलणे की जे फक्त स्वत:ला ऐकू येते. ३-पश्यंती- हे बोलणे म्हणजे मनातल्या मनात बोलणे. ते स्वत:ला नव्हे तर कोणालाच ऐकू येत नाही, पण आपल्याला ह्या बोलण्याची केवळ जाणीव असते.  ४- परा- परा ही दैवी आणि स्वर्गीय वाणी आहे...परेतून भगवंताशी संवाद साधता येतो ... मनाच्या शून्य अवस्थेतील वाणी असते, ती परा. उदा. आकाशवाणी किंवा दूरदर्शनवर किंवा टेलिफोनवर ऐकू येणारा आवाज. पण मुळात हा आवाज म्हणजे ध्वनी लहरी असतात; ज्या डोळ्यांना दिसत नाहीत; कानांना ऐकू येत नाहीत. त्या ऐकू येतात रेडिओ किंवा टेलिव्हिजन किंवा यंत्राच्या साह्याने. म्हणजे हा आवाज, लहरीमय, अतिसूक्ष्म आहे.

              वैज्ञानिक दृष्टीकोन असा आहे की कोणत्याही निर्मितीच्या किंवा उकलनाच्या  किंवा समजण्याच्या मितीमध्ये एक निमित्तकारण (Efficient Cause) असते आणि दुसरे उपादानकारण (Material Cause) असावेच लागते. पण सृष्टीचे अस्तित्व म्हणजे सत किंवा परब्रम्ह हे एकमेव, अद्वितीय असल्यामुळे सृष्टी निर्मितीचे ते निमित्तकारण आणि उपादानकारण सुद्धा आहे. म्हणूनच आपल्या ऋशी-मुनींनी सर्व शक्तिमान तत्वास ‘सत’ असे अगदी सार्थ नाव दिले आहे. संस्कृत उपपत्तीनुसार सत म्हणजे ‘अस्तित्व’. ह्या तत्वाचे ज्ञान त्यांना ध्यानमग्न, समाधी अवस्थेमध्ये झाले. हे ज्ञान कोणत्याही स्मृतिकोषात नव्हते आणि आजही नाही. म्हणूनच हे ज्ञान ‘गूढ’ आहे. मनाच्या तुर्यावस्थामध्ये आहे. त्याला शब्दरूप देता येत नाही. कारण ते अनिर्वचनीय, निराकार, निरामय आहे. उपनिषदकारांनी ह्यालाच ‘नाद’ किंवा ‘नादब्रम्ह’ असेही म्हणले आहे. पण हा नाद मनुष्य निर्मित आणि सूर, लय, ताल ह्यांच्यासह असेल तर त्याला संगीतमय नाद किंवा आहत-नाद असे म्हणले आहे. ह्याच प्रमाणे जे सृष्टी निर्मित नाद आहेत, त्यांना अनाहत-नाद असे म्हणले आहे. उदा. बांबूच्या वनातून ऐकू येणारा आवाज.  ऋषींना ऐकू आलेले किंवा झालेले ज्ञान असेच अनाहत नादरुपमय आहे. त्यामुळे असे ज्ञान शब्दांत व्यक्त करता येत नाही. म्हणून त्याला अव्यक्त ज्ञान असेही म्हणतात. गुरु-शिष्य एकमेकांच्या सत्संगात जे ज्ञान प्राप्त करतात, ते सुद्धा असेच ज्ञान होय.

             सारांशाने असे म्हणता येते की आपल्या वैदिक तत्वज्ञांनी एकमेवाद्वितीय अशा तत्वाला सृष्टीचा मूलाधार म्हणले आहे. आधुनिक विज्ञानाच्या Quantum Theory नुसार वस्तुमानाचे किंवा पदार्थाचे मुलभूत कण (subatomic particles) आणि सृष्टीतील विविध घटना एकमेकांशी जोडलेल्या, एकमेकांशी संबंधित आणि एकमेकांवर अवलंबून आहेत. म्हणजेच असे की ह्या घटना पृथक नसून त्या सर्व एका पूर्णत्वाच्या अखंडित रूपाचे दृश्य असे विभाग आहेत.( The constituents of matter and the basic phenomena involving them are all interconnected, interrelated and interdependent and they cannot be understood as isolated entities but only as integrated parts of the whole.). ह्यामुळे जगाचे अखंड स्वरूप शब्दांत मांडता येत नाही. विज्ञानाच्या सुद्धा मर्यादा अशाच आहेत. Atomic वस्तुस्थितीत कणाचे (particle) अस्तित्व कधीच आणि केव्हाही निश्चित सांगता येत नाही. कारण ह्या कणांना निश्चित, आखीव गती नाहीयेय; आणि स्थितीही नाहीयेय. ह्याशिवाय, महत्वाची बाब म्हणजे वैज्ञानिक हा वस्तुनिष्ठ साक्षी होऊ शकत नाही, कारण तो स्वत: ह्या प्रयोगाचा म्हणजेच व्यापक अर्थाने जगाचाच अविभक्त भाग असतो. त्यामुळे त्याचा स्वत:चा प्रभाव निरीक्षण केलेल्या वस्तूच्या / वस्तुमानाच्या गुणधर्मावर पडतोच, पडतो. अशा प्रकारे विज्ञानालाही मानवी मर्यादा आहेत.

                     - आनंद गोसावी.

                    ( लेखक सेवानिवृत्त बॅन्क अधिकारी आहेत )

 

                

About the Author

आनंद गोसावी