SP च्या स्टुडंट कौन्सिलनं आणले विद्यार्थ्यांसाठी 'अच्छे दिन' !

नव्या सरकारला जनतेसाठी 'अच्छे दिन' आणता येतील की नाही, ठाऊक नाही मात्र SP च्या स्टुडंट कौन्सिलनं विद्यार्थ्यांसाठी अच्छे दिन आणले आहेत.

इच्छाशक्ती असेल तर कॉलेजचं स्टुडंट कौन्सिलदेखील किती प्रयोगशील उपक्रम राबवू शकते, याचा वस्तुपाठच SPच्या स्टुडंट कौन्सिलने दिला आहे. या स्टुडंट कौन्सिलच्या कार्याचा आढावा घेते आहे राज्यशास्त्राची अभ्यासक मुग्धा महाबळ

……………

पूर्वी राजकारण, निवडणुका, सरकार हा फक्त वरच्या वर्गाची मक्तेदारी असलेला विषय होता. पण सध्या अशी काही परिस्थिती उरलीच नाही. आज हे सगळ्यांच्या जिव्हाळ्याचे विषय बनले आहेत. तरुण पिढी तर ह्या सगळ्यात अजिबातच मागे नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदार संघात १८ ते २१ वयोगटातील ९०,००० मतदार मतदान करु शकले. ही संख्या आश्चर्यकारकच आहे. आज पर्यंत जगात ज्या कुठल्या महत्वाच्या चळवळी सुरु झाल्या त्या ह्याच गटातील मुलांमुळे मग ती इजिप्तमधील तरुणांची चळवळ असो किंवा आसाममधील विद्यार्थी चळवळ. लोकशाही विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा रुजतेय ह्याचं हे खूप मोठ लक्षण आहे. लोकशाही विद्यार्थांमध्ये चांगल्या पद्धतीने रुजावी यासाठी काही वर्षांपूर्वी महाविद्यालयीन स्तरावर निवडणुका सुरु करण्यात आलेल्या. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न महाविद्यालयापर्यंत स्टुडेंटस्स् कौन्सिलच्या माध्यमातून पोहोचतील;परंतु नंतरच्या काळात राजकीय पक्षांचा हस्तक्षेप वाढल्यामुळे त्या निवडणुकांचे स्वरूप बदलले गेले. आणि त्या नंतर मात्र स्टुडेंटस् कौन्सिल फक्त कागदोपत्री अस्तित्व असलेली संस्था ठरली.

मात्र या सुप्तावस्थेच्या कालावधीतील विचारांना छेद देणारी स्टुडेंटस् कौन्सिल सध्या स. प. महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे. २०१४-२०१५ या शैक्षणिक वर्षासाठी जिंजुमोन प्रसन्नन हा विद्यार्थी स्टुडेंटस् कौन्सिलतर्फे विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवडून आला. या स्टुडंटस् कौन्सिलने वर्षभरात खूप वेगवेगळी आणि अर्थातच विद्यार्थ्यांचं हित जपणारी कामं केली. या स्टुडंटस् कौन्सिलनी सर्वप्रथम काम केलं ते कॉलेजमधील अंध विद्यार्थ्यांसाठी. सध्या सर्वच कॉलेजांमध्ये लेखनिक उपलब्ध नसणं हि खूपच मोठी समस्या आहे; पण स. प. महाविद्यालयातील स्टुडंटस् कौन्सिलने सगळ्या समस्यांवर मात करत एक वेगळी वाट शोधायचं ठरवलं. आणि त्यामुळेच त्यांना मार्ग सापडले सुध्दा. आज स. प. महाविद्यालयातील सर्वच अंध विद्यार्थ्यांना लेखनिक तर मिळालेच पण त्या शिवाय त्यांना अभ्यासात मदत करणारे मित्र देखील लाभले.या सगळ्यांना एकत्र आणून अंध विद्यार्थ्यांसाठी मदतीचा स्त्रोत म्हणून कौन्सिलने काम केलं. ही सर्व मदत अभ्यासापुरती मर्यादित न ठेवता कौन्सिलने अंध विद्यार्थांसाठी परिसंवादाचे आयोजन केले. ज्यामुळे त्यांना सरकारच्या विविध तरतुदी आणि योजनांबद्दल माहिती मिळाली तसेच त्यांच्यातील सुप्त गुणांना वावदेखील मिळाला. देवेंद्र चव्हाण याने कौन्सिल समन्वयक म्हणून या परिसंवादाचे काम पहिले.

स्टुडंटस् कौन्सिलने मुलींसाठीसुध्दा अनेक उपक्रम आयोजित केले. संवादिनी विद्यार्थिनी मंचच्या संयुक्त विद्यमाने स्त्रीत्वाचा उत्सव चित्रपट महोत्सवाद्वारे साजरा करण्याचे योजिले. कौन्सिल समन्वयक म्हणून मृणाल जोशी हिने स्त्रियांच्या समस्यांवरील लघुपटांचे आयोजन केले. तसेच मुलींसाठी क्रीडा दिवसाचे आयोजन कौन्सिल समन्वयक अनिरुद्ध डाळवाले याने केले.यामध्ये व्हॉलीबॉल आणि लगोरी ह्या खेळांचा समावेश केला होता. राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्टुडेंटस् कौन्सिलने “Pray The Devil Back To Hell”  हा लायबेरियातील महिला चळवळीवर आधारित चित्रपट दाखवला. चित्रपटानंतर डॉ. प्रदीप आवटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि १९९० च्या दशकातील चळवळीचा व आजच्या समाजाचा उत्कृष्ट समन्वय साधत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

स्टुडेंटस् कौन्सिलच्या ह्या सगळ्या उपक्रमांना विद्यार्थ्यांकडून खूपच छान प्रतिसाद मिळाला. जवळजवळ ८० हून अधिक मुलांनी स्वयंसेवक म्हणून नावनोंदणी केली. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत कौन्सिलने स्वतःचा ई-मेल आयडी आणि फेसबुकवर नवीन पेज तयार केलं जेणेकरून विद्यार्थी या कुठल्याही मार्गाचा अवलंब करून स्टुडेंटस् कौन्सिलपर्यंत त्यांचं म्हणणं पोहोचवू शकतील. इतक्या वेगवेगळ्या मार्गांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू पाहणारी ही माझ्या माहितीतील एकमेव स्टुडेंटस् कौन्सिल आहे.

       स्टुडंटस् कौन्सिलने वर्षभरात अनेक परिसंवाद आयोजित केले. आंबेडकर अध्यासनाच्या सहकार्याने कौन्सिलने "आंबेडकरांचे विचार : प्रेरणा आणि परिणाम" ह्या विषयावर चर्चा आयोजित केलेली. सायली कुळकर्णी, योगेश खंडागळे आणि श्रीरंजन आवटे या स. प. महाविद्यालयातीलच आजी आणि माजी विद्यार्थ्यांनी आंबेडकरांचे विचार मांडले. इतर सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग सुद्धा लक्षणीय होता. प्रश्नोत्तराच्या सत्राने तर चर्चेची रंगत व्दिगुणीत केली. याशिवाय वाणिज्य असोसिएशनसोबत व्यक्तिमत्व विकासावर परिसंवादाचे कौन्सिलने आयोजन केले. याप्रसंगी शबनम पठाण यांना वक्ता म्हणून बोलावण्यात आले होते तर कौन्सिल समन्वयक म्हणून ऋतुजा जोशी हिने काम पहिले. जिमखान्याच्या सहकार्याने स्टुडेंटस् कौन्सिलने मुलांसाठी इन्ट्रा-कॉलेजीएट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये “परशुरामियन्स” हा संघ विजेता ठरला  तसेच स. प. महाविद्यालयामध्य "Understanding ICT in Education through the Finnish Model ” हा आंतरराष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये स्टुडेंटस् कौन्सिल मधील विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले. हा परिसंवाद प्राध्यापकांसाठी आयोजिलेला होता. परिसंवादाची स्वयंसेवक- समन्वयक म्हणून शिवानी भरुचा हिने जबाबदारी पेलली.

स. प. महाविद्यालयाच्या या स्टुडेंटस् कौन्सिलचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आणि स्पर्धांचं आयोजन करून ते थांबले नाहीत तर त्यांनी विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडवले. FYBsc च्या १७ मुलांची पात्रता क्रमांकाची समस्या कौन्सिलने नेटाने सोडवली. शिवाय कॉलेजच्या "उर्मी" या वार्षिक महोत्सवला पूर्ण पाठिंबा दिला. कौन्सिलने कॉलेजच्या आवारात स्वच्छतेबाबत जागरुकता वाढावी यासाठी पथनाट्य सुध्दा सादर केले. अक्षय कोथिंबिरे याने विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवत उत्कृष्टरित्या विद्यार्थ्यांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहोचवला. कौन्सिलच्या अनेक सक्रिय सदस्यांपैकी प्रियांका डागे हिने प्राथमिक उपचारांबाबत जागरुकता वाढीस लागावी याकरिता कार्यशाळा आयोजित केलेली. या कार्यशाळेकरिता अनिश मेनन हे वक्ते म्हणून लाभले.

या सगळ्या उपक्रमांशिवाय स्टुडेंटस् कौन्सिलने कॉलेजसमोर "कॉलेज कट्टा" नामक एक अभिनव संकल्पना मांडलेली. "कॉलेज कट्टा" ही संस्था ४ विभागात विभागली गेली होती.

संवेदना : या व्यासपीठाद्वारे सामाजिक आणि संवेदनशील मुद्द्यांवर चित्रपट, नाटक आणि पथनाट्य यांच्या मार्फत भाष्य करता येणार होते.

आशा : या विभागाद्वारे अंध तसेच वेगळ्या अर्थाने सक्षम मुलांसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार होते.

शिखर : हा विभाग स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या मुलांच्या मदतीसाठी तयार करण्यात आला होता.

कॉलेज मित्र : हा विभाग म्हणजे स्वयंसेवकांचा गट. हा गट एकूणच प्रशासकीय कामकाजात मदत म्हणून कार्यरत राहणारा असा असणार होता जेणेकरून कॉलेजमध्ये विद्यार्थी आणि प्रशासकीय विभाग यांच्यातील समन्वय वाढीस लागेल.

याशिवाय पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागात मुलींना स्व-संरक्षणासाठी उपयुक्त ठरेल असा अभ्यासक्रम सुरु करावा यासाठी "सबला" नावाचा एक महिन्याचा उपक्रम मांडला होता.

स. प. महाविद्यालयाच्या स्टुडेंटस् कौन्सिलने सर्वांसाठी आदर्श समोर ठेवला आहे. वाटेत येण्याऱ्या सर्व अडचणींवर मात करत त्यांनी त्यांची वेगळी वाट निवडली आहे आणि आज त्या वाटेवर ते सक्षमपणे चालत आहेत. फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी हे सर्व करून दाखवलं आहे. इतर महाविद्यालयांच्या स्टुडेंटस् कौन्सिल्सना सुध्दा त्यांची वाट सापडो हीच सदिच्छा…! नव्या सरकारला जनतेसाठी अच्छे दिन आणता येतील की नाही, ठाऊक नाही;पण SP च्या स्टुडंट कौन्सिलने मात्र विद्यार्थ्यांसाठी अच्छे दिन आणले आहेत.

 

  • मुग्धा महाबळ

About the Author

मुग्धा महाबळ's picture
मुग्धा महाबळ