एका व्यंगचित्रकाराशी संवाद

एका व्यंगचित्रकाराशी संवाद

          तो एकाग्र होऊन रेखाटत होता. जाता येतांना माणसे थबकत होती. हसत होती. 
"तू चिडवतो आहेस मला. हे बरे नाही." मी हातात कागद धरत त्याला म्हणाले.
माझ्या व्यंगचित्राकडे बघून अनेकांची करमणूक होत होती. त्याने काढलेले चित्र पाहून माझी मुलगी तर जाम खूश होती. कारणही तसेच होते.  ख्रिसने व्यंगचित्रात रागवणा-या आईची म्हणजे माझी चक्क एक दात विचकावणारी चेटकीण केली होती! 
हात दाखवून अवलक्षण की काय म्हणतात ते हेच असावे.
मासिके, वर्तमानपत्रे यामध्ये व्यंगचित्रे असतात हे आपल्याला महिती आहे. त्याशिवाय इथे अनेक पार्ट्य़ा, कंपनीची पिकनिक्स आणि थिमपार्क यामध्ये व्यंगचित्रकाराची उपस्थिती असते. लोक त्यांच्यापुढे रांगा लावून  आपले व्यंगचित्र काढून घेतात. आमच्याकडे सर्वांचे असे एक चित्र आहे. आपल्या दिसण्याचे ,वागण्याचे विडंबन बघवणार नाही म्हणून मी मात्र आजवर व्यंगचित्र काढून घेतले नव्हते. पण या थिमपार्कात  व्यंगचित्र काढणारा ख्रिस आणि त्याची चित्रे  मी येता जाता बघत होते. त्याच्या भोवती चित्राकरता जमलेली गर्दी, थबकणारे लोक, त्याच्याचकडून चित्र काढायचा हट्ट हे सर्व मी बघत होते. आया मुली अशा सर्वांना तो क्यूट वगैरे वाटेल असा होता यात शंकाच नाही! 
एका कृष्णवर्णीय जोडप्याचे चित्र तो रेखाटत होता. जोडप्याचे चित्र झाले होते. आता तो ते रंगवत होता.
त्याच्या शर्टावर नेम टॅग होता. त्यामुळे त्याचे नाव ख्रिस आहे हे मला कळले.
-------
"ख्रिस, किती वर्षापासून व्यंगचित्रे काढतो आहेस?" मी त्याला विचारले. 
५ वर्षे झाली" तो म्हणाला.
तेवढ्यात त्या जोडप्याचा मुलगा तिथे आला. आपल्या आईवडिलांच्या चित्राकडे त्याने पाहिले. त्याच्या ओठावर हसू होते. 
वडिलांच्या चेह-याकडे बघत तो म्हणाला," आई जास्त तरूण दिसते तुमच्यापेक्षा, मी म्हणत होतो ना तुम्हाला.."
मग वडिलांना ख्रिसला चित्रात थोडे बदल सुचवले. त्याचे क्लिनली शेव्हन डोके त्याला पसंत होते. पण त्याला फ्रेंच बिअर्ड हवी होती. तो माणूस नेव्हीत होता. त्यावेळी त्याने चित्रकलेचा अभ्यास केला होता. 
"तू व्यंगचित्र काढायचे असे ठरवले होते का? इतर चित्रे पण काढतोस?"
"मला चित्रे आवडतात.  मी चित्रकला शिकायचा निर्णयच एका व्यंगचित्रामुळे घेतला. मी ५-६वीत होतो तेव्हाची गोष्ट असावी. एकदा माझे वडील रागवले मला. मी चिडलो होतो, दुखावलो होतो. चित्र काढता काढता त्यांचे व्यंगचित्र काढले. ते सर्वांना आवडले होते. लॉस अ‍ॅन्जेलिसला एका प्रायव्हेट स्कूलमध्ये मी चित्रकला शिकू लागलो. फी खूप होती. म्हणून मग नोकरी शोधत होतो. तेव्हा ही ऑफर मिळाली. शिक्षण मागे पडले. योगायोगाने मी व्यंगचित्र काढू लागलो. "
तो एकीकडे चित्र रंगवत होता. आमच्या गप्पाही सुरु होत्या.
काही कंपन्या जगभराच्या थीमपार्कात व्यंगचित्रकारांना काम देतात. अशाच एका कंपनीतर्फे ख्रिसने इथे काम सुरु केले होते.
"मी दीड वर्ष कोरियात सेऊलला(seol ,korea) होतो. " तो म्हणाला.
"तिथे आणि अमेरिकेत खूप फरक आहे ,असे वाटले असेल ना तुला?
"नाही. तसे नाही वाटले कारण थीम पार्क साधारण असेच आहेत. शिवाय तिथे येणा-या  व इथे माझ्याभोवती उभे असतात त्या लोकांच्या वागण्यात खूप साम्य आहे असा माझा अनुभव आहे."
"तुझ्या लक्षात राहिला आहे असा एखादा किस्सा सांग. एवढी चित्रे काढली आहेस तू-" तसा तो हसून म्हणाला "हे चित्र पूर्ण करतो. मग बोलू. अशा प्रश्नांची सवय नाही! एकाग्र होणे आवश्यक असते, मी शक्यतो दुसरीकडे कुठे लक्ष देत नाही." 
त्या जोडप्याचे चित्र त्याने रंगवून पूर्ण केले. त्या दिवशी त्यांच्या लग्नाचा २० वा वाढदिवस होता! हे अर्थात ख्रिसने त्या चित्रावर लिहिले म्हणून मला समजले होते. 

----
माझे चित्र काढता काढता गप्पा सुरु ठेवायच्या असे ठरवले. 
माझ्या आईवडिलांनी पाठिंबा दिला म्हणून मी थोडे शिक्षण घेऊ शकलो.नोकरी मिळवणे आवश्यक होते. आधी एन्टरटेन्मेंट आर्ट मध्ये जायची इच्छा होती. त्या शिक्षणाचा खर्च खूप आहे.  मध्ये बराच काळ गेला पण आता पुन्हा इथल्या युनिवर्सिटीमध्ये शिकेन असे विचार करतो आहे. पण आता फाईन आर्टस मध्ये मेजर करेन. 
गेली पाच वर्षे ख्रिस या थिमपार्कात रोज ८ तास काम करतो. दिवसभर व्यंगचित्रे काढायची. त्याच्याबरोबर आणखीही चित्रकार येथे असतात. सर्वांनी केलेल्या एकूण विक्रीचा काही हिस्सा, पगार आणि 
गि-हाईकांनी दिलेली बक्षिसी ही त्याची मिळकत. 
"तुला आपण दुसरे काही शिकून नोकरी करावी असे कधी वाटले का? इथे लोक येतात,एवढा पैसा खर्च करतात. ते पाहून तुला काय वाटत?"
"चित्रकलेशी संबंधित शिकायचे हे मी ठरवले आहे." त्याने उत्तर दिले.
"आणि पैसा?"
"माझ्या एकट्यापुरता मिळवतो मी."तो एकाग्रतेने चित्र काढत होता.
"काय साम्य दिसले तुला  लोकांच्या वागण्यात इथे आणि कोरियात होतास तेव्हा?
ख्रिस हसला. सुरु केलेला चित्राचा भाग त्याने पूर्ण केला. 
----
मला म्हणाला पहा- लोक इथे आले आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, मित्रमैत्रिणी आहेत बरोबर. पण अधूनमधून प्रत्येकाचे लक्ष आहे फोनकडे. ते फोनवर बोलतात, एस. एम. एस करतात. सोशल नेटवर्कवर पोस्ट करतात. कित्येकजण नोकरी किंवा व्यवसाय असतो त्याचे काम करतात! त्यापासूनही ते दूर राहू शकत नाहीत. इथे बसून नवरा-बायको भांडतात. थोडा निवांत वेळ मिळाला की. पण तेव्हाही फोनवर काही तरी सुरु असते. स्वत:साठी वेळ नाही, एकमेकांसाठी वेळ नाही. ही धावपळ, हीच वॄत्ती मला दिसली कोरियातल्या थिमपार्कातही. 
"तू आहेस फेसबुकावर?" मी प्रश्न केला.
"मी आहे. पण फेसबुक फक्त जवळच्या माणसांकरता आहे. मी ब्लॉग पण लिहायचो आधी आता बंद केला. इथे जी चित्रे काढली त्या विषयी लिहायचो."
 
माझ्या बाजूला अगदी हाताच्या अंतरावर उभे राहून एक मुलगा आणि मुलगी एकमेकांपासून दूर राहू शकत नाही असे दिसत होते. डोळ्याच्या कोप-यातून दिसणा-या चुंबनाकडे मी लक्ष द्यायचे नाही असे ठरवले. पण प्रश्न सुटलाच," ख्रिस,तुला गर्लफ्रेंड आहे? उत्तर दिले नाही तरी चालेल." हा प्रश्न विचारायला नको होता असे मनात येऊन मी त्याला म्हणाले.
तो थोड्या वेळाने म्हणाला,"सध्या फक्त चित्रे काढतो आहे. कॉलेजात शिकेन मग पाहू. मला शांत असे आयुष्य आवडते. फार अपेक्षा नाहीत माझ्या. तुम्ही असे आनंदी राहू शकता ते शोधायचे. त्याचे उत्तर सापडले तर सोपे होते जगणे. माझी बहीण इंजिनियर आहे. ती खूप बिझी असते. तिच्या जगण्यात सतत तणाव असतो. मी स्पर्धा करत नाही. त्याचे फायदे आहेत पण काही तोटेही."
---
 नुसते हसू येते हा एक गमतीचा भाग. पण मुद्दाम आपला चेहरा असा वेडावाकडा करून घ्यायला का आवडते माणसाला? दोष तर कुणालाच आवडत नाहीत दाखवलेले. "माणसे व्यंगचित्र का काढून घेतात  असे तुला वाटते?"
"लोकांना हसायला आवडतं. इथे थिम पार्कात दोन रोलरकोस्टर राईडच्या मध्ये वेळ असतो म्हणून,कधी गंमत म्ह्णून लोक व्यंगचित्र काढून घेत असावेत. कधी फोटोसारखी आठवण जपावी म्हणूनही. काही जण त्यांच्या घरात मोठ्या फ्रेममध्ये लावतात ही चित्रे." ख्रिस म्ह्णाला. 
"किमान तेवढा वेळ लोक किमान एका जागेवर बसलेले असतात! कधी आपल्या जोडीदाराकरता म्हणून काढून घेतात चित्रे."त्याने पुस्ती जोडली.

 चित्रकलेतली गती काय आहे ते त्याला मी सांगितले होते.  त्याशिवाय मनात येतील ते प्रश्न विचारेन हे सुद्धा सांगितले होते. म्हणून आम्ही मोकळेपणे बोलू शकलो.

"तू चित्र सुरु करतांना मनात काही ठरवत असशील.. तसे चित्र झाले नाही तर/ इथे इरेझर नाही. खोडून दुरुस्त करायचे नसते का चित्र? आता नाही पण सुरुवातीला करायचास का? "
"नाही. आम्ही कुणीच इरेझर ठेवत नाही. रेषा पक्क्याच येत जातात सवयीने."
"काही चुका झाल्या तर?"
"गि-हाईकाला चित्र पटलेच नाही तर मी पुन्हा काढतो. अन्यथा चूक झाली तरी मी उरलेले चित्र पूर्ण करतो. "
 "आपलं काम परफेक्ट व्हाव असं वाटत नाही का?"
"सुरुवातीला किंवा अजूनही मी झालेल्या चुकांचा आढावा घेतो, त्या होणार नाहीत अशी काळजी सुद्धा. पण एखादी रेष मनासारखी आली नाही म्हणून मी त्याचा इफेक्ट इतर चित्रावर होऊ देत नाही. हे शिकावेच लागते आणि जमतेही. माझ्या चेह-यावर यातले काही दिसणार नाही हे सुद्धा पथ्य पाळतो मी." 
त्याच्या समोर रांग वाढत होती. माझे चित्र पूर्ण झाले होते. बिलावर मी सही केली.
---
त्याला शुभेच्छा देऊन मी निघाले. दोन चार डिग्र्या, मोठाल्या कंपनीतली नोकरी, यशस्वी मुले, साजेसा जोडीदार अशा माणसाच्या सुखाच्या, यशस्वी असण्याच्या व्याख्येतले खरे व्यंग त्याला कळले नसते तरच नवल! 

-सोनाली जोशी

 

 

 

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह