मॅगी का प्यार

पियाला आवडतो म्हणून गाजर का हलवा करणारी नायिका तुम्हा-आम्हाला नवीन नाही. अनेक खाद्यपदार्थाची नावं या प्रेमाची जोडलेली असतात. कॉलेजच्या दिवसात मित्र-मैत्रिणी जमतात तेव्हा आम्ही काय खायचो असा विचार डोक्यात आला आणि मॅगीचे नाव टाळता आले नाही! रस्त्यावरच्या चायनीज फूडची तेव्हा जबरदस्त क्रेझ होती. त्याची तहान भागवण्याचा मॅगी हा एक पर्याय होता.
maggiदिवसभर वेगवेगळ्या प्रकारचे मॅगी नूडल्स खाणारे कुणी तुम्हाला माहिती आहे का? आयटी कंपन्या, कॉलेजेसमध्ये अनेक तरुण-तरुणी या मॅगीवर जगतात, हे वास्तव आहे. अनेक रेस्टॉरंट्स, रस्त्यावरचे पोहे-उपमावाले, गल्लीच्या टोकावरचा उडप्या असे अनेक पर्याय उपलब्ध असताना मॅगी एकदातरी हवी असं म्हणणारे मला माहिती आहेत.
कॉलेजच्या दिवसात माझ्या एका बंगाली मैत्रिणीकडे गेलो असताना मॅगी हा आमचा झटपट खाणं उरकण्याचा पर्याय होता! फोडणीची पोळी वा भातापेक्षा या मॅगीला टीव्हीवरच्या, पेपरातल्या वगरे जाहिरातीचे ग्लॅमर होते! सुरुवातीला एकदम आवडली नाही तर सोपी म्हणून, सोय म्हणून मॅगी पटली होती. पेप्सीकोला वा केक पेस्टरीपेक्षा जास्त परवडणारा आणि सोईचा वाटेल असा पदार्थ होता मॅगी.
तुम्ही मित्र-मैत्रिणींकडे जाता-येता, तेव्हा कुणाकडे काय खायला असतं याची एक कल्पना वा अंदाज असतो. एकमेकांना काय हवंय तशी वाटणीही मित्र-मैत्रिणी करून घेतात. तसं या एका मैत्रिणीकडे मॅगी खायची असं ठरलेलं असे. मॅगीच खायची तर तिच्याकडे कशाला जायचं वा तिच्याकडे जाऊन फक्त मॅगी खायची? असं माझा भाऊ मला चिडवायचा. ते आजही आठवतं. असं झटपट होतं ते काही खरं नसतं असं आई माझ्या तब्येतीच्या काळजीपोटी सांगायची.
मार्कस्, मॅगी, रिंगटोन याचा प्रेमाशी काय संबंध? काहींना प्रेम म्हटल्यावर फक्त जे काही मनात येतं ते काय आहे हे मला माहिती आहे. पण प्रेम ही भावना फक्त सेक्स, शरीर, तारुण्य वा लैला-मजनू याच्याशी संबंधित आहे असं मी मानत नाही. प्रेम ही अनेक पदरी, विविध कंगोरे, वेगवेगळ्या नात्यांना जोडणारी भावना आहे. पुस्तकांपासून इंटरनेटवर शरीर प्रेमाविषयी जे हवं ते पाहता, वाचता येतं. ते शरीर प्रेम हा या सदराचा उद्देश नाही. प्रेम वेगवेगळ्या वाटांवरून जातं तेव्हा त्या मार्गात अनेक अडथळे, अनेक टप्पे येतात. परीक्षा असतात, मार्कस् असतात. हॉटेल, भटकंती असते. वाट बघणं असतं. मेसेज आला का म्हणून फोन बघणंही असतं. नातं जपणं हा प्रेमाचा मूळ उद्देश असतो. प्रेमाचाच एक रस्ता खाद्यपदार्थाच्या वाटेवरून जातो. त्या वाटेवर आईच्या हातची पुरणपोळी असते. आजीच्या हातचे बेसनाचे लाडू, मावशीने केलेल्या चकल्या असतात. लाडक्या बायकोनं नवीन लग्न झाल्यावर केलेले स्वयंपाकघरातले प्रयोग असतात. जोश्यांचा वडापावसुद्धा प्रेमात महत्त्वाचा असू शकतो. एखादं प्रेम बेकरीतल्या ब्लॅक फॉरेस्ट केकची आठवणही असू शकतं. रूममेट्स, मित्र-मैत्रिणी भेटतात तेव्हा चटकन तयार होणारी मॅगी आठवते का? आई-वडिलापांसून दूर राहणारे वा एकमेकांपासून दूर एकटे राहणारे प्रेमी युगुल २ मिनिट मॅगीच्या आठवणीसुद्धा सांगेल तर मला नवल वाटणार नाही.
कॉलेज संपले, नोकरी सुरू झाली. मित्र-मैत्रिणी देशविदेशात गेले. संवाद होता. संपर्क होता.कालांतराने लग्ने झालीत. लग्नानंतरही भेटीगाठी भटकंती सुरू होती. कधी बोलणं झालं, वा फोटो पाहिले की कॉलेजचे दिवस आणि सबमिशन आठवत असे. मैत्रिणीच्या घरची मॅगीची आठवण नक्की ठरलेली. पुढे काही मित्र-मैत्रिणींशी संपर्क एकदम बंद झाला. काहींशी हळूहळू संबंध दुरावत गेले. काही गरसमज वाढले. मॅगीवाल्या मैत्रिणीचे आणि माझे संबंध नावापुरते राहिले होते. त्या बोलण्यात, ईमेल्समध्ये परकेपणाची चाहूल लागत होती. आयुष्यात स्थिरस्थावर झालो असताना अशी एखादी जवळची वाटणारी व्यक्ती दुरावते! त्याचा खेद असतो. अशावेळी या नात्यात ज्याची भावनिक गुंतवणूक जास्त त्या व्यक्तीला जास्तच. तसे माझे झाले होते. त्या घटेनेलाही आता एक तप उलटले आहे. माझ्या मुलांना मॅगी आवडते; पण जसं माझी आई मॅगीच्या शॉर्टकटला विरोध करायची तसाच माझाही विरोध असतो. कधीतरी एखादं मॅगीचं पाकीट घरी आणते! त्यावेळी त्या मैत्रिणीचा विचार येतो. मुलांना ही गोष्ट माहिती आहे. ते हसतात. दोस्त दोस्त ना रहा, दोस्ती सुद्धा इंन्स्ट्ंट तुटली असले जोक्स करतात.. मीही हसते. पण मनात काहीतरी बोचत असतं..
गेले काही दिवस भारतातल्या विविध राज्यांत मॅगीच्या पाकिटात एमएसजी हा घटक जास्त प्रमाणात सापडला अशा बातम्या आपण वाचत आहोत. अनेक ठिकाणी दुकानदारांनी मॅगीची पाकिटे दुकानातून हलवण्यास सुरुवात केली आहे. कोर्ट-कचेरी, बंदी आणि दंड इत्यादीला नेस्ले या कंपनीला आता सामोरे जावे लागेल, याबाबत अंदाज व्यक्त केले जात आहेत. मॅगीत सापडलेला हा घटक भारत आणि चीनमधल्या अनेक पदार्थात असतो हे आपल्याला माहिती आहे. त्याचे प्रमाण किती असावे या अटीचे उल्लंघन मॅगीत झाले आहे. मॅगीसारखे इन्स्टंट वा दोन मिनिटात तयार होणारे जे काही पदार्थ आजच्या घडीला बाजारपेठेत आहेत त्यामध्ये अनेकांत हा घटक असेल. त्याचे प्रमाणही चिंताजनक असेल.. पण सध्या मॅगीचे वाईट दिवस आहेत.. कुठलाही शॉर्टकट बरा नाही हे आईनं वा एखाद्या शिक्षकांनी सांगितलेलं अशावेळी आवर्जून आठवतं. मॅगीचा प्रेमाशी संबंध नाही असं म्हणता?

-सोनाली 

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह