हुकू- भाग १

...1...
अंधार पडू लागला. फत्याकडं जमलेली मंडळी आपापल्या घराकडे निघाली. घराघरांत चिमण्या पेटू लागल्या. त्यांचा मिणमिणता उजेड तट्ट्याच्या भोकांतून बाहेर पसरू लागला. कुडकुडायला लावणाऱ्या थंडीत उब घ्यायला शेकोटी पेटवली गेली. रातकिड्यांची कीरकीर सुरू झाली. गावाभोवतालच्या डोंगरात वारं घुमू लागलं. लांब अंतरावरून दऱ्याखोऱ्यातून जंगली श्वापदांचा आवाजही घुमू लागला. गावातील प्रत्येक घरात दबक्या आवाजात कुजबूज सुरू होती.
फत्याच्या घरी घडलेल्या घटनेनं गावाला जणू वेढून टाकलं होतं. शेकोटी लगतच्या मोडक्या खाटेवर पडून फत्या सुस्कारे सोडत होता, मधूनच डोळयाला लागलेली धार पुसुन घेत होता. शेकोटीभोवती परशा, सोना आणि ठोग्या या तिन्ही भावंडाच्याही डोळयाला धार लागली होती. खाटेजवळच बसलेली फत्याची बायको करमीचा आक्रोश ती भयाण रात्र चिरून टाकत होता. आजवर पोटच्या नऊ अपत्यांचा मृत्यू सोसणाऱ्या करमीची एकुलती एक मुलगी देवाघरी गेली होती. संध्याकाळीच तिला माती दिली गेली होती. त्या दुःखाचा करमीचा आक्रोश थांबण्याची चिन्हं नव्हती. तिच्या आक्रोशामुळं पोरंही आणखी दुःखात जात होती. फत्याला ते सारं घेरून घेत होतं. शेवटी तो म्हणाला, 
“पुरे आता, आवरून घे. पोरांनो तुम्ही पण झोपा आता.”
अचानक पलीकडल्या ओढयाकडून वाघाची डरकाळी आली. करमीनं फोडलेला हंबरडा तसाच गिळून घेतला. वाघाचं परिसरातलं अस्तित्त्व पुरेसं होतं. 
“पुऱ्या, आगठ ऊलाडू!” फत्यानं शेकोटी विझवायला पोरांना सांगितलं. 
लगबगीनं परशानं शेकोटीत पाणी ओतून शेकोटी विझवली. सोनानं झटकन चिमणी विझवली. लगोलग गावातील मिणमिणत्या चिमण्या आणि शेकोटयाही विझल्या. गाव अंधारात बुडाला. 
वाघ तसाच डरकाळी फोडीत शिवारापलीकडे निघून गेला, अन् गाव निजलं.
वाघाच्या एका डरकाळीनं काही काळासाठी गावाला दुःख विसरणं भाग पाडलं.
---
कोंबडा आरवला. चिमण्या अन् शेकोटया पेटल्या. काही घरातून जात्याची घरघर लागली. जाग आली आणि काही काळासाठी पोटात जाऊन बसलेल्या दुःखानं करमीला घेरलं. 
हुका, टिल्या आणि डोक्या हे तिघे त्याआधीच दातण फिरवत तिथे पोचले होते. ते फत्याच्या कुटुंबाचं सांत्वन करू लागले. “पोर गेली. आपल्या हाती काही नव्हतं. आता ते दुःख मागे टाकून उभं राहिलं पाहिजे,” एवढंच ते सांगू शकत होते.
काही वेळातच गाव जमलं. बहुतेकांनी शेकोटीजवळ बसून बिडी पेटविली. तिथं एकही माणूस असा नव्हता की ज्याला फत्याचं दुःख माहिती नव्हतं. लहान वयातच फत्या पोरका झाला होता. शेतजमीन थोरल्या भावानं हिसकावून घेतली होती. नमतं घेत पोटापुरता एक पट्टा त्यानं मिळवला होता. लग्न झालं. तेरा मुलं झाली, त्यातली तीनच वाचली. बाकी आल्या रस्त्यानंच परत गेली होती. फत्याचं हे सगळं दुःख उसळी घेऊन बाहेर येत होतं. 
रडून रडून थकलेली करमी अखेर ओरडली. बऱ्याच काळापासून डोक्यात घर करून बसलेली शंका अखेर तिच्या तोंडून बाहेर आली. तिचा थोरला दीर सत्या. त्याची थोरली सून या सगळ्याच्या मागं आहे असा तिचा समज. ती करणी करत असल्यामुळंच आपला संसार उध्वस्त होतोय हा त्याचा अर्थ. 
“जगू देणार नाही ही...” करमी ओरडली.
तिच्या सुरात सूर मिळवित तिची सून, परशाची बायको, म्हणाली, “गावो माँ नी जीवाये, नाठणू ओयहें एंवीं.” गाव सोडून जाण्याचा इरादा व्यक्त करणारा तो पहिला उद्गार, त्या दिवशी असा झाला.
क्षणातच फत्याचाही हुंकार आला. जगण्यासारखं गावात काय राहिलं आता, असं म्हणत त्यानं करमीच्या सुरात सूर मिळवला.
भाऊबंदकीत अन् नात्यातच कुणाला डाकीण ठरवून प्रश्न सुटणार नाही हे समजूतदारांना कळत होतं. टिल्यादादानं ते समजावण्याचा प्रयतही केला. ‘गाव सोडून काय होणार आहे? चांगले दिवस येतील, शांत हो’ असं गावातील मंडळी समजावत होती. फत्याचं कुटुंब मात्र ते समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतं. 
“कसं जगायचं, तुम्हीच सांगा? हा सत्या, शेतीचं तुकडं द्यायला तयार नाही. अन् इकडं दरवर्षी एकेका मुलाचा अंत्यविधी करायचा. त्यावर तुमच्याकडं इलाज आहे का?” फत्यानं विचारलं, आणि गाव निरुत्तर झाला. 
“मी जातो लटकुव्याला ओमऱ्यादादाकडं. सत्याला पण बघून घेईन आणि त्या डाकीणीचाही समाचार घेईन.”
फत्या तावातावात बैठकीतून उठला आणि लटकुव्याच्या दिशेने निघून गेला. तोवर सूर्य बराच वर येवून कोवळं ऊन पडलं. गावातील गुर-ढोरं चरायला सोडली गेली. फत्याकडं शेकोटीला जमलेली सर्व मंडळी उठून आपआपल्या घराकडं निघून गेली अन् पुन्हा करमीनं हंबरडा फोडला.
---
पूर्वेला गावाचा लटकुवा पाडा. या पाडयावर ओमऱ्यादादाचं एकटं घर. गावात त्याचा दरारा. गावातल्या प्रत्येक लाडीनं, म्हणजेच विवाहितेनं, डोक्यावर पदर घेतला पाहिजे, जेष्ठांचा मान राखला पाहिजे, याबाबतीत आग्रही असणारा आणि प्रसंगी त्यापोटी सजा देणारा ओमऱ्यादादा गावात कुठं दिवसा पीठ दळण्याचा आवाज आला तरी सरळ त्या घरापुढं जाऊन अंगणातून कोंबडा आरवावा तसा आवाज काढायचा आणि विचारायचा, “तुझ्याकडं आता पहाट झाली का? म्हणून आता पीठ दळतेय?”
कोणा पुरुषाच्या कडेवर तान्हुलं पोर दिसलं तर हा ओरडायचा, “कारं, याची आई मेली का?”
पाडयावर एकाकी घर, डोक्यापाशी डेंगारा घेऊन उघडयावर झोपणारा, बासरीच्या तालसुरावर नाचून दादागिरी करणारा, उंचापुरा, धडधाकट, काहीसा रागीट, भांडणाचा वचपा काढल्याशिवाय शांत न होणारा, स्वतःच्या हिंमतीवर विश्वास ठेवणारा ओमऱ्यादादा. तो आपल्याला आधार देईल, या आशेवर फत्या तिथं येऊन पोचला होता. महूची फुलं गळण्याचा हंगाम सुरू होणार होता. फुलं गोळा करण्यासाठी बांबूची टोपली विणण्यात ओमऱ्यादादा गर्क होता. फत्याला येताना पाहून ओमऱ्यादादानं त्याचं स्वागत केलं. 
“आव फत्या.”
फत्या खालमानेनं बसला. अन् त्यानं सांगायला सुरूवात केली.
“दादा मला गावात फार काळ दिवस काढता येतील असं वाटत नाही, कोण्या मावलीची नजर लागली कोणास ठाव? एका मागून एक करीत घर संपवायला आली. ज्यांहरीं-ज्यांहरीं जांणू च्यांहरीं-च्यांहरीं गोडहान वेह दोरीन बोठ्ठैतलीं...” त्यानं आपल्याच चुलत सुनेविषयीच्या ती चेटूक करत असल्याचा संशय ओमऱ्यापुढं मांडला. “केव्हा घात करील काहीच सांगता येत नाही. कधीपर्यंत जीव वाचवण्याचा प्रयत करू? कणगीतलं दाणं संपत आलं. उद्याला पोरांना काय घालावं? प्रश्न आहे, आता तुम्हीच बघा ना, कालच या बयेनं पोरीचा घात केला. ती तरी वाचेल असं वाटलं होतं, एकुलती एक होती ती. गावाला विचारावं तर गाव गुमान आहे. सत्याकडं शेत मागावं तं सत्या शेती देत नाही. मरावं का जगावं काहीच कळत नाही.” फत्याच्या डोळयाला धार लागली. 
फत्याला पाण्याचं भांडं देत ओमऱ्याची बायको म्हणाली, “आरं दादा असा रडू नको, नियतीचा हात आहे तो. तू तरी काय करशील, घे हे पाणी.”
थरथरत्या हातानं पाणी घेत फत्या ते घटाघटा प्याला. इकडं ओमऱ्याची बायको ओमऱ्याला म्हणाली, “कधीपर्यंत यातना भोगेल दादा, त्याला पाडयावर बोलवून घ्या आपल्याबरोबर, तिकडली झाडं तोडून करिल पोटापुरतं, नाहीतरी आपलं घरही एकटंच आहे पाडयावर, तेवढीच सोबत होईल.”
“तसं कर रं फत्या, गावात जमत नसेल तर ये बिऱ्हाड घेऊन इथं, त्या रांधून घ्यायच्या घरात बिऱ्हाड टाक, आता तू गावात रहायचं नाहीच म्हणतोय तर ये घेऊन बिऱ्हाड. काय ते बघू.” ओमऱ्यादादा फत्याला म्हणाला, “ठीक आहे दादा, येतो उद्याला बिऱ्हाड घेवून, पोरांच्या मदतीनं झाडं तोडून करीन पोटापुरती शेती थोडीफार.”
फत्या माघारी फिरणार तोच ओमऱ्या फत्याला म्हणाला, “बघ फत्या, गावात जावून कोणाशी वाद घालू नको, मी आहे इथं, काय ते बऱ्या-वाईटाचं बघून घेईल. बिऱ्हाड तेवढं घेवून ये.” “हो दादा तुझ्या शब्दापुढं मी नाही जाणार, येतो उद्याला पोरा-सोरासह,” म्हणत फत्या गावाकडं मार्गस्थ झाला. “देव बी किती भोगायला लावणार या दादाला.” म्हणत ओमऱ्याची बायको घरात रांधायला निघून गेली. ओमऱ्या पुन्हा खाली मान घालून टोपली विणून घेण्याच्या कामात गर्क झाला. फत्या गावात पोहोचला. गटागटा पाणी पित पोरांना म्हणाला, “पोरांनो उद्याला लटकुव्याला जायचं आहे, दादानं बोलावलंय, काय सामान-सुमान ते बांधाय लागा.”
“बाबा तेथं घर नाही ना काही नाही कुठं रहायचं?” परशा म्हणाला.
“देव माणूस आहे तो दादा, रांधून घ्यायचं घर देतो म्हणून सांगितलयं त्यानं,” फत्या परशाला म्हणाला.
“असं कसं जाणार? तयारी नाही ना काही नाही.” परशाची बायको भणभणली.
“एवढं घडलं, पुरं झालं नाही का अजून? नाही तरी घरात काय आहे, एकटयानं डोक्यावर धरायचं म्हटलं तरी अपुरं पडेल. घ्यावं प्रत्येकानं डोक्यावर,” फत्यानं सुनेला दटावलं.
करमी सुनेला म्हणाली, “जेंहे बगवान करावे तेंहे लाडी जातीज रयहूँ हें” (जसं देव करेल तसं जाऊ.”) एक एक करून सामान-सुमान बांधायला सुरुवात झाली. दिवसभरात आवरायचं ते आवरून झालं.
अंधार पडला, मिणमिणत्या चिमण्या आणि शेकोटया गावात चमकू लागल्या. तीच रातकिडयाची किरकिर, तोच जंगली श्वापदांचा आवाज, तीच गावातील कुणकुण. त्यात भर होती, फत्या उद्याला गाव सोडून लटकुव्याला जाणार म्हणून, हळूहळू गाव निजले.
कोंबडा आवरतीपासून गावानं आपआपल्या कामाला सुरुवात केली. फत्याचं कुटुंब गाव सोडण्यासाठी सूर्य उगवण्याची वाट पाहात होतं. सूर्य उगवला. फत्यानं त्याच्याकडच्या एकमेव बैलाला दोरी बांधली. फत्याच्या पोरांनी डोक्यावर बिऱ्हाड घेतलं, करमी अन् तिच्या सुनेनं डोक्यावर एकेक गाठोडं धरलं, गावातल्या दोघा-तिघांनी फत्याला मदतीचा हात देत त्याच्याही डोक्यावर एक बोचकं चढवलं... टोपलीतल्या कोंबडया कुचकुचल्या. फत्याचं कुटुंब गाव सोडून लटकुव्याच्या दिशेनं चालतं झालं. गाव अवाक होऊन बघत होतं, हळहळत होतं, म्हणत होतं. “नाही ऐकलं फत्यानं, शेवटी निघालाच तो लटकुव्याला.” गावातील पोरं फत्याच्या कुटुंबाकडे बघत होती. काही अंतरापर्यंत गावातील ती त्यांच्या सोबतीला होती. गाव बराच वेळ बघ्याच्या भूमिकेत होतं. फत्याचं बिऱ्हाड दूर जात होतं. करमीचा हंबरडा हळूहळू मालवल्यागत क्षीण होत गेला. 
---
पाडयावर पोहोचल्यावर फत्यानं ओमऱ्यादादाच्या रांधून घ्यायच्या घरात बिऱ्हाड टाकलं. गावापासून मैलभरावरचा डोंगर कुशीतील हा लटकुवापाडा म्हणजे घनदाट जंगल. या पाडयावर आता ओमऱ्याच्या जोडीला फत्याचं कुटुंब आलं. लगतच्या झाडाझुडुपात पोरांच्या मदतीनं फत्याची कुऱ्हाड चालू लागली. पाहता पाहता दीड-दोन एकर शेतजमीन तयार झाली. फत्यानं ती करायला सुरुवात केली. जोडधंदा म्हणून तो बकऱ्या बाळगू लागला. एक-दोन वर्षाच्या कष्टातून फत्यानं स्वतंत्र घर बांधलं. दुष्काळावर मात केली. काही काळानं ओमऱ्या फत्याची अन् पाडयाची साथ सोडून निघून गेला. त्यानंतर ओमऱ्याची पोरं वेस्ता, फेरांग्या, पिदा आणि काल्ला यांच्या सोबत फत्याची वाटचाल सुरू झाली. या सर्वांच्या घरानं पाडयावर आकार धरला. बहुतेकांच्या पोरांची वयात आल्यावर लग्नं होत गेली. संसार उभे राहू लागले.
सोनाला मिसरूड फुटली आणि फत्याला सोनाचं लग्न करून घ्यावं, असं वाटू लागलं. रिवाजानुसार नातेवाईकांना, भाऊबंदकीला, लगतच्या गावांना बोलावून सोनाचं लग्न पार पाडायचं म्हणजे खर्च बराच येणार होता. फत्याची ती आर्थिक कुवत नव्हती. घर बसल्या सोनाला पोरगी मिळाली तर लग्न खर्च वाचेल अन् आपल्याला आयती सून मिळेल, हा विचार फत्याच्या डोक्यात होत. एके दिवशी त्यानं तसं थोरल्या सुनेला बोलून दाखविलं. फत्याची सून म्हणजेच परशाची बायको मेहली, ती कामाला लागली. सोनासाठी एक-दोन स्थळं पाहिली गेली.
बुगवाडे येथील ओखाडया हा साधा सरळ माणूस, कोणाच्या अध्यात ना मध्यात, आपण दहा बोलावं, तर हा एक बोलणार; त्याची मुलगी मोचडी, रंगा-रूपानं, चार-चौघांसारखी, तिच्याशी सोनाचं जुळतं का ते पहावं म्हणून फत्याच्या सुनेनं ओखाडयाकडं दोन दिवस फेऱ्या घातल्या. मोचडीला ‘घर बसल्या पाठवून द्यायला’ ओखाड्या तयार झाला. त्याचा अर्थ होता मोचडी फत्याकडे जाईल. आणि तिचं ते जाणं म्हणजेच मोचडी आणि सोनाचं लग्न झालं असं मानलं जाईल. तिसऱ्या दिवशी फत्याची सून मेहली ओखाडयाकडं गेली. ती मोचडीला घेऊनच परतली. फत्यानं घरातल्या बकऱ्या विकल्या, दहेज रकमेची जमवा-जमव केली. आठवड्यानंतर ओखाडया स्वतः फत्याकडं दहेजची रक्कम घेवून गेला. ‘ना रिती ना रिवाज,' असं सोनाचं लग्न झालं.
फत्याचा थोरला पोरगा परशा एकत्र कुटूंबातून पुढं विभक्त झाला. त्यानं पाडयावर स्वतंत्र घर उभारलं. परिस्थितीवर मात करीत काबाडकष्ट करत फत्याचं कुटूंब पाडयावर उभारी धरू लागलं. सुख-दुःखाचा, काबाड-कष्टाचा, रूढी-परंपरेचा, रिती-रिवाजाचा सर्व व्यवहार एकमेकांच्या मदतीनं होऊ लागला. पोटाला पुरेसं पिकत नसलं तरी महूची फुलं अन् जंगलातील कंद-मुळाच्या आधारानं दिवस जाऊ लागले.
---
ज्येष्ठ अमावस्या होती. आभाळ भरून गेलं होतं. वीजा चमकत होत्या. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळू लागला. शेतीचं नवं वर्ष लागलं. रात्र झाली. पाडयावर मिणमिणत्या चिमण्या पेटल्या, चुली पेटल्या. रात्रीचं जेवण झालं. एक-एक करत पेटलेल्या चुली अन चिमण्या विझल्या. अन नवं वर्ष आधार देईल की नाही हा प्रश्न उदरात घेऊन पाडा निजला.
पहाटे कोंबडा आरवला, पक्ष्यांची किलबिलाट झाली. एक-एक करत घरं जागी झाली. सूर्य वर आला. शेतीला नवीन वर्ष, पेरणी अन नांगरणी करायला बी-बियाण्यांची अन शेती अवजाराची जमवा-जमव करण्याची तयारी सुरू झाली. अन् त्याचवेळी पाड्यावरच्या फेरांग्याची मुलगी आन्या तापानं फणफणली. पेरणी अन नांगरणी करण्याचं काम बाजूला पडलं. आन्याला बुडव्याकडं दाखवण्यातच दोन-तीन दिवस गेले. ताप कमी होत नव्हता.
चौथ्या दिवशी आन्याला दवाखान्यात हलवण्याचा निर्णय झाला. झोळीत टाकून तिला भाऊबंदकीनं धडगावला नेलं. धडगावहून शहाद्याला जाण्यासाठी जीप केली गेली. धडगाव-शहादा पंचेचाळीस मैलाचं अंतर, डोंगर-दऱ्याखोऱ्यातील कच्चा रस्ता, शहाद्याला पोहोचायला किमान चार तास लागणार होते. धडगावहून जीप निघाली. नियतीच्या पोटात मात्र वेगळंच दडलं होतं. मैल-दीड मैल जीप जाईपर्यंतच आन्यानं जीव सोडला. जीप माघारी फिरली. पाडा दु:खात बुडाला.
फेरांग्याची लाडकी पोर ती. तीच राहिली नाही. तापट फेरांग्या या घटनेनं भडकला. त्याचा थोरला भाऊ पिदा. पिदाच्या बायकोनं करणी केली अन आपली आन्या गेली, या संशयानं फेरांग्याच्या डोक्यात घर केलं. आणि त्या दोघांमध्ये खटके उडू लागले.
आन्याच्या मृत्यूमागं आपल्या बायकोचा हात नाही, असं पिदा वारंवार फेरांग्याला समजावून सांगण्याचा प्रयत करायचा. पण फेरांग्या ते समजून घ्यायचा नाही. आन्याच्या मृत्यूनंतर पंधरवडा उलटला असावा. फेरांग्यानं सकाळीच बाटली हाणली. अन आरोळी ठोकली. तापट फेरांग्याची ही आरोळी पिदाला हादरवून सोडण्यास पुरेशी होती. उभ्या पाडयाच्याच पोटात धस्स झालं. डेंगारा घेवून फेरांग्या पिदाच्या घरावर धावला. एका-एकी घरावर चालून आलेला हा फेरांग्या, पिदाची बायको जिंगली हात जोडून आडवी झाली. बाईच्या पाठीत फेराग्यानं डेंगारा घातला. पोरांना कुशीत घेऊन जिंगली पाडयावरनं बोंबलत सुटली. साधा सरळ, भांडणापासून दोन हात लांब राहाणाऱ्या पिदानं फेरांग्याला हात जोडले. पण तो काही ऐकण्याच्या मनःस्थितीतच नव्हता. फेरांग्यानं पुन्हा आरोळी ठोकली, अन पिदाच्या पाठीत डेंगारा घातला. जिवाच्या भीतीनं पिदानं घरातून पळ काढला. अन उगवतीला, नाल्याच्या दिशेनं बोंबलत धावला. पिदा धावत नाल्यापर्यंत पोहोचेपर्यंत मागावर असणाऱ्या फेरांग्यानं त्याला गाठलंच. गयावया करीत पिदा फेरांग्याकडे जीवाची भीक मागू लागला. पिदाचा आकांत फेरांग्यावर परिणाम करू शकला नाही. आरोळी ठोकीत, शिव्या घालत कपडे धोपटावेत तसा फेरांग्याने पिदावर हल्ला चढवला. फेरांग्याला टरकून असणारा पाडा, भांडण सोडवायला धावला नाही. अपवाद फक्त फत्याची बायको करमी हिचा. ती भांडण सोडवायला धावली. पण ती पोहोचेपर्यंत डेंगाऱ्याचा मार लागून जखमी झालेला पिदा रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
“आता बस झालं रं दादा, बस झालं, आणखीन मारू नको, त्याची लहान पोरं उघडी पडतील,” म्हणत अन फेरांग्याला हात जोडीत करमी रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या पिदावर आडवी झाली. फेरांग्यानं करमीकडं पहात डोळे वटारले. झटापट झाली. त्यात करमीला मार लागला. हतबल करमीनं शेवटी प्रयत सोडून दिला. आणि मग पिदा गतप्राण होईपर्यंत फेरांग्या डेंगारा हाणीत राहिला. पिदा निपचीत झाल्याची खात्री पटल्यावरच त्याचा हात थांबला, आणि पुन्हा एकदा आरोळी ठोकत फेरांग्या माघारी फिरला.
पाडा अवाक् झाला. भाऊबंदकीनं नाल्यावरून पिदाला झोळीत टाकून घरात आणलं. पिदाची पोरं असहाय झाली. जिंगलीचा आक्रोश सुरू झाला. दोन-अडीच मैलावर धडगाव. पिदाला तिथं झोळीत टाकून नेलं गेलं. दिवस या घटनेत गेला. रात्र झाली. धडगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असताना पिदानं जीव सोडला.
धडगावच्या पोलिस स्टेशनला रिपोर्ट झाला. फेरांग्याविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला. धडगावपासून पंचवीस मैल अंतरावर तळोदा, तिथं चिरफाड (पोस्टमॉर्टेम) करण्याची व्यवस्था. डोंगर-दऱ्याखोऱ्यातली पायवाट, वरून पावसानं लावलेली रिपरिप. काकावाडीतील मजुरांच्या मदतीनं विल्ला, हुण्या, आरशा या भाऊबंदकीनं पिदाचं प्रेत झोळीत टाकून तळोद्याला नेलं. त्यात दोन दिवस गेले.
फेरांग्या फरार झाला. दऱ्याखोऱ्यातून तो पोलिसांना हुलकावणी देत होता, पण दोन दिवसांतच तो सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. दोन दिवसांनी पिदाचं पोस्ट मॉर्टेम करून ही मंडळी गावाकडं परतत होती. त्याचवेळी गावाकडून फेरांग्याला हातात बेडया टाकून पोलिस तळोद्याला नेत होते. चांदसैली घाटात त्यांची भेट झाली.
फेरांग्या त्यांना म्हणाला, “आरं दादा, चूक झाली, शेवटलं एकदा पाहून घ्यावं म्हणतो दादाला, तेव्हा झोळी खाली ठेवा.”
झोळी खाली ठेवता-ठेवता डोळयात पाणी घेवून विल्ला भणभणला, “तेव्हा कसा रं तुला तुझा दादा दिसला नाही? सर्व आवरून झाल्यावर कसा रं तुला तुझा दादा दिसतो? झालं आता तुझ्या मनासारखं?”
फेरांग्यानं मान खाली घातली. खाली मान घालूनच त्यानं पिदाच्या तोंडावरून शेवटचा हात फिरवला. फेरांग्याच्या डोळयात पाणी तरळलं. फेरांग्या पोलिसांसह तळोद्याला पोहचला. पाडयावर पिदाची चिता पेटली.
पाड्याचं जगणं सुरू होतं...
---
सूर्य अस्ताला जात होता. पाडयावर गुरं-ढोरं घरात बांधून घ्यायची लगबग सुरू होती. सोना पांगलेल्या बकऱ्या घराकडे हाकीत होता. रात्रीला काय रांधावं म्हणून सोनाची आई विचारमग्न स्थितीत तट्टयाला टेकून बसली होती. अंधार पडायच्या अगोदर पाणी भरून घ्यावं म्हणून दोन्ही सुना मडके घेवून कुव्यावर गेल्या होत्या. परशाच्या पोरांचा बकऱ्या बांधता बांधता कलकलाट सुरू होता. सूर्य मावळला. दोरखंड बनवून घ्यायचं आवरतं घेत फत्या घरालगतच्या आंब्याच्या झाडाखालनं “अंधार पडेल लवकर आवरा” अशा सूचना पोरांना देत होता.
सोना, हुवऱ्या अन् दोहाण्याच्या मनात दिवसभर चिचवली या गावी लग्नाला जाण्याच्या विचारानं घर केलं होतं. आई-वडिलांना चाहूल लागू न देता त्यांना जायचं होतं. आई-वडिल ओरडतील ही भीती होती. लग्नाला केव्हा व कसं निघावं, हे ठरवण्यासाठी सोनाचे जोडीदार हुवऱ्या अन् दोहाण्या सोनाकडे पोहोचले. त्यांनी घाबरतच सोनाच्या वडिलांना प्रश्न केला.
“बाबा सोना कुठाय?”
“तो काय बकऱ्या घराकडं हाकतोय,” असं ते सांगत होते तोवर सोनाही बकऱ्या हाकीत घराकडं पोहचला. तो म्हणाला, “बोला, केव्हा निघायचं लग्नाला?”
“आरं आई ऐकील, ये... ये ईकडं,” म्हणत दोहाण्या अन् हुवऱ्यानं सोनाला घराच्या बाजूला घेतलं अन् कानात कुजबुजले. सोनानं होकाराची मान डोलवली आणि त्यांचे चिचवली या गावी लग्नाच्या कार्यक्रमाला हजेरी लावायचे निश्चित झाले. अंधार पडला... इकडं सोनाच्या आईला या तिघांची चाहूल लागली. नेहमीचा अनुभव असणारी सोनाची आई बडबडली. “आरं या अंधाऱ्या रात्री कुठं लग्नाला गेला बिलात तर बघा! परत घरी कसे येता ते बघतेच मी. तुमचं हे नेहमीचं झालंय, अंधाऱ्या रात्री या गावावरनं त्या गावी लग्नाला जाणं. कामाचं काय ते सुधरत नाही तुम्हाला आणि सोना तुला पण सांगून ठेवते. गेलास तर बघ.” 
“अगं आई मी कुठं जातोय त्यांच्या बरोबर उगाच भणभण लावतेय,” सोना म्हणाला. 
“हां, आणखीन काही बोलू नको, सर्व माहितीय मला,” असं म्हणत सोनाची आई पुढल्या कामाला घरात निघून गेली. सोना हळूच आईची अन् बाबाची नजर चुकवून घरातून बाहेर पडला.
तिघांनी चिचवलीच्या लग्नाला मध्यरात्रीपर्यंत ढोल ताशांच्या गजरात आनंद लुटला. रात्र चढत गेली. थकून तिघं परतीच्या प्रवासाला लागले. बरेच अंतर चालून झाले. अन् अचानक “आऽऽऽऽयीय बाबा” असा किंचाळत सोना झटकन खाली बसून रडू लागला. लगोलग “काय कोऱ्य रा? काय कोऱ्य रा?” (काय झालं रं? काय झालं रं?) अशी चौकशी करीत हुवऱ्या अन् दोहाण्या सोनानं जो पाय हातात धरला होता तो अंधारात निरखून पाहिला. पायात ज्वारीचे धस खोलवर रूतले होते. सोनाचा पाय न्याहाळता-न्याहाळता हुवऱ्या उद्गारला... “आयीय बाबा! पाय सरळ कर, पाय सरळ कर.” हुवऱ्यानं सोनाच्या उजव्या पायात ज्वारीच्या रोपटयाचं रुतलेल धस खचकन बाहेर काढले. तोच सोना पुन्हा “आऽऽऽऽ यीय बाबा” असा किंकाळला. सोनाच्या पायातून भळाभळा रक्त वाहू लागलं. लगोलग दोहाण्यानं स्वतःच्या रुमालानं सोनाच्या जखमेवर पाटा बांधला अन् सोना उभा राहून लंगडत चालू लागला. चालता चालता म्हणाला, 
“आई आता जीवच घेईल की, नाही म्हणत होती ती, लग्नाला जावू नको म्हणून. पण मी ऐकलं नाही.”
हुवऱ्या म्हणाला, “आरं आज रात्री घरी जावूच नको तू; माझ्याकडंच झोप.”
आई-वडिलांची समजूत कशी घालावी? त्यांचे बोलणे कसे झेलावे? काय सांगावं? या सर्व प्रश्नांवर काही शक्कल लढवत हे तिघे पाडयावर पोहोचले अन् हुवऱ्याकडच निजले.
सकाळी झाला प्रकार सर्वांना लक्षात आला. गोधडीत स्वतःला लपेटून सोना वेदनेनं विव्हळत होता.
सोनाच्या आई-बाबांसह सर्व मंडळी हुवऱ्याकडे जमली. सोनाच्या पायाला मोठी जखम झाली होती. सोनाची आई बडबडली. “ऐकतील तेव्हा ना! चांगलच सांगत होती मी, सर्व दिवस सारखे नसतात. केव्हा काय घडेल सांगता येत नाही.... पण हा ऐकेल तेव्हा ना! गेला मराया तिकडं. अन् आता पाय धरुन बसलाय!” सोनाचा बाबाही ओरडू लागला. पाडयावरली मंडळी, “कसं काय एवढी जखम झालीय, अन् कशाला तडफडले एवढया अंधाऱ्या रात्री मराया तिकडं,” म्हणत हुवऱ्या अन् दोहाण्या या सोनाच्या जोडीदारांना झाडत होते. 
वेस्तानं परशाकडून बागड खोडच्या फांद्या मागवल्या. ते हातावर रगडून सोनाच्या जखमेवर वेस्तानं रस सोडला. अन् त्याचा लगदा तयार करून जखमेवर बांधला.
तसेच दिवस जात होते, पण सोनाच्या पायाला झालेली जखम बरी होत नव्हती. जखम जास्त पिचत जावून आतापर्यंत पायी चालू शकत असलेल्या सोनाने खाट धरली. अन् फत्याबाबाचं कुटुंब वेगळयाच चिंतेत बुडून गेलं. खाट धरून पडलेला सोना रात्रंदिवस वेदनेने कण्हत असायचा. सोनाला पाहण्यासाठी नातेवाईकांची रीघ लागू लागली. दोन-अडीच महिन्यांनी सोना अन्न, पाणी घेईनासा झाला. जखमेतून दुर्गंधी सुटली. पूर्ण पाडाच चिंतेत पडला. त्याची बायको मोचडी गर्भवती होती. पोटच्या पोराला कुशीत घेऊन ती अवघडलेली सोनाच्या खाटेजवळ तासन् तास बसून रहायची. कशातच तिचं लक्ष नव्हतं. फत्याच्या घरात हळूहळू चुल पेटणं बंद होत गेलं. सोना तर निर्वाणीचंच बोलू लागला. 
फत्याच्या घरावर पुन्हा संकट चालून येत असल्याची चाहूल लागली. 
शेवटचा उपाय म्हणून धडगांवहून डॉक्टरांना आणलं गेलं. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. तळोद्याहून औषध आणायला सांगितलं आणि तो निघून गेला. पोस्टमन तळोदा ते धडगांव ये-जा करतो म्हणून औषध आणायचं काम पोस्टमनकडं सोपविलं गेलं. त्यात दोन चार दिवस गेले.
घराला हातभार लावणारा सोना अंतिम घटका मोजू लागला. सरते शेवटी असह्य होऊन सोनाच्या थोरल्या भावानं पाड्यावरल्या सर्व बायांना आपल्या घरी बोलावून घेतले. सर्व बाया सोनाच्या घरात जमल्या. सोनाच्या खाटेभोवती सर्व बाया काहीशा गांगरलेल्या अवस्थेत डोक्याला हात धरून बसून होत्या. सोनाची स्थिती अशी होण्यामागे कुणी तरी आहे, त्या माणसानं वाईट केलं आहे, असं मानून परशा हाती डेंगारा घेऊन दार अडवून बसला. त्यानं बसल्या जागी बाटलीभर दारू ढोसली. 
तळोद्याहून पोस्टमननं आणलेलं औषध सोनानं तोंडात घेतलं. आपल्या पडक्या घराकडे अन् स्वतःच्या पोराला डोळे भरून पाहिलं. पोरांचा सांभाळ कर, असं त्यानं मोचडीला सांगितलं अन् जगाचा निरोप घेतला; आणि पुन्हा फत्याच्या घरात आक्रोश सुरू झाला. फत्याच्या घरातील हा अकरावा मृत्यू.
---
सोनाच्या दु:खातच हिवाळा गेला. अन् उन्हाळा लागला. फत्याचा शेवटचा मुलगा ठोग्या, तो लग्नाचा होत आला. उन्हाळा आहे तोपर्यंत ठोग्याचं लग्न एकदाच आवरून घ्यावं, पावसाळा सुरू झाला की जमणार नाही, असा विचार फत्याच्या डोक्यात येवू लागला. आपल्यासारखा साधा सरळ व्याही मिळाला तर बरं म्हणून फत्यानं ठोग्यासाठी स्थळं पहायला सुरुवात केली. एक-दोन ठिकाणी फत्यानं स्थळं पाहिली; पण ती त्याला पसंत पडली नाहीत.
उमराणीचा पाडवी अगदी साधा सरळ माणूस, कधी कोणाशी भांडण नाही, कोणाशी वाद नाही, रस्त्यानं जाताना पायसुध्दा वाट पाहूनच टाकणारा, उगाच कोणाशी वैर नको, या विचाराचा. त्याची मुलगी पेरवी, रंग-रूपानं चार-चौघांसारखी, ठोग्यासाठी विचारून बघावं म्हणून फत्या पाडवीकडं गेला आणि स्थळ पक्कं करून आला. रिवाजाचा भाग म्हणून ठोग्या पेरवीला पहायला जावून आला. त्याला पेरवी पसंत पडली.
सोनाचं नुकतच झालेलं निधन, त्या दु:खातून फत्याचं कुटूंब पूर्णपणे बाहेर पडलं नव्हतं. दुखवट्यात असल्यानं ठोग्याचं लग्न साध्या पध्दतीनं करायचं ठरलं. लग्न साध्या पध्दतीनं ठरलं म्हणजे काय तर उमराणीच्या मंडळींनी ठरलेल्या दिवशी पेरवीला फत्याकडं पोहचवून देणं एवढंच. ठरल्या दिवशी उमराणीची मंडळी पेरवीला फत्याकडं पोहोचवून गेली. वाजंत्री नाही, बैठक नाही, गाणी नाही. साध्या रिवाजानं ठोग्याचं असं लग्न झालं. जेवणात ज्वारीच्या डुंडण्या आणि उडदाची डाळ दिली गेली. दहेज रक्कम सातशे रुपये. त्यासाठी फत्यानं घरातल्या सात-आठ बकऱ्या विकल्या, उधार-उसन्याचा आधार घेतला. त्यातून पाचशे रुपये जमले. तेवढीच दहेज रक्कम फत्यानं पाडवीला दिली. दोनशे रुपये राहिलेली दहेज रक्कम मात्र कायमची राहिली.
---
सोनाच्या निधनानंतर अबोल झालेल्या मोचडीचं कशातच लक्ष लागेना. काय वाढून ठेवलंय देवानं आपल्या वाटयाला याचाच ती विचार करत होती. सोनाच्या आईचं काळीज दगड झालं होतं. चूल पेटवून रांधावं तरी कोणाच्या घशात उतरत नव्हतं. कधी कधी फत्या ओरडायचा, “तुम्ही सर्व त्याच्याबरोबर मरणार की काय? एखादं तुकडं तोंडात धरा की, तुम्हाला कोण देव आहे तो समजावील... पोरं आहेत, घरदार आहे, ते तर सांभाळावं लागेल की, रोजचं डोक्याला हात धरला तर कसं होईल?” पण ओरडताना त्याच्याही डोळयाला धार लागायची. घराला आधार देणाऱ्या कर्त्या पोराच्या अंत्यविधीनंतर उरावर दगड ठेवून फत्याच्या कुटुंबानं वाटचाल सुरु ठेवली.
सोना गेल्यानंतर अडीच-तीन महिन्यांनी मोचडीने एका मुलीला जन्म दिला. पहिला मुलगा आणि आताची ही मुलगी यांच्यात रमून भूतकाळ विसरण्याचा प्रयत फत्याचं कुटुंब करत होतं. सोनाची बायको मात्र द्विधा मन:स्थितीत होती. तिची दोन्ही पोरं हळूहळू मोठी होत होती. पोटच्या पोरांना पुढयात घेवून किती दिवस धन्याविना काढायचे? लोक काय म्हणतील? आणि, दुसरं घर करावं तर या पोटच्या पोरांचं कसं होईल? या विचारानं बाईच्या डोक्यात घर केलं होतं. डूमटी गावच्या बिखारीचं आधीच लग्न झालं होतं, तरीही तो हिला नांदवायला तयार होता. तशी खबर करमीची थोरल्या सुनेला म्हणजेच मोचडीच्या जावेला मिळाली; म्हणून एके दिवशी मोचडीला ती म्हणाली,
“नाहवा लाडी तूबी एखलीज कदराक दिह काडणी, डूमटी बिखरीपाह हाजलज सेतहं, पुऱ्या ते मोटा अयजहत निया.” (“अगं, सुनबाई तू पण किती दिवस एकटी धन्याविना काढशील, डूमटीच्या बिखारीकडं बरं आहे, तिथं जा निघून, पोरांचं काय, होतील मोठे.”) तिचा हा सल्ला मान्य करून एके दिवशी आपल्या उरावर दगड ठेवून मोचडी डूमटीला बिखारीकडं निघून गेली. इकडं फत्या, करमी, ठोग्या अन् ठोग्याची बायको यांच्या आधारानं सोनाची दोन्ही मुलं लहानाची मोठी होऊ लागली.
---
ठोग्याच्या बायकोला पहिल्या मुलाची चाहूल लागली. या बाईनं उन्हाळयातील काळया रात्री मिणमिणत्या चिमणीच्या उजेडात एका अशक्त पोराला जन्म दिला. जन्मतःच अशक्त असणाऱ्या या तान्हुल्याची भुकेपोटी सतत किरकिर सुरू असायची. दारिद्र्यामुळं अर्धपोटी असलेल्या आईच्या अंगावर दूध नव्हतं. आपल्या पोटच्या पोरांच्या अंत्यविधीची एक मालिकाच अनुभवणाऱ्या करमीला हे पोर वाचेल याची फारशी खात्री नव्हती. या पोराकडं आईचं अन् करमीचं कायम लक्ष लागून असायचं. बकरी अन् गाईचं दूध पाजून या पोराचं संगोपन सुरू होतं. सटवाई झाल्यागत (अशक्त पोराचं पोट फुगलेलं असतं) किरकिर करणारं हे पोरगं दिवसामागून दिवस करत मोठं होत होतं. पोराला सटवाई झाली म्हणून पारसी नावाच्या बुडव्याकडून मंत्रतंत्राने उपचार केले गेले. बुडव्यानं पोरगं बरं व्हावं, सुदृढ व्हावं म्हणून पोरांच्या अंगावरनं सटवाई उतरविली. उतारा केला, पोराच्या कंबरेला पांढरा दोरा मंतरून बांधला. जगेल अन् तगेल असं कोणालाही वाटत नव्हतं; पण हे पोरगं लहानाचं मोठं होतं गेलं. त्याचं नाव मोहन्या. तो मी. लेखक!

 

About the Author

मोहन पावरा