ख्वाडा

ख्वाडा चित्रपटाचे दिग्दर्शक-निर्माता भाऊराव कऱ्हाडे यांची मुलाखत

भाऊराव कऱ्हाडे नावाचा माणूस अहमदनगर जिल्ह्यातल्या छोट्या शेतकरी कुटुंबात जन्मलेला. चित्रपट निर्मितीचा त्याने अखंड ध्यास घेतला. अनंत अडचणींचा सामना करून त्याने त्याचं स्वप्न सत्यात आणलं. घरची शेतजमीन विकून ‘ख्वाडा’ अखेर तयार झाला. आणि त्यावर थेट राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर उमटली! 
ख्वाडा या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटाचे दिग्दर्शक-निर्माता भाऊराव कऱ्हाडे यांची घेतलेली मुलाखत.. 

--

अहमदनगर जिल्ह्यातील छोटा शेतकरी ते मास कम्युनिकेशनचा विद्यार्थी ते राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक.. हा प्रवास दिसताना खूप रोमांटिक दिसत असला तरी तो तितकाच खडतर असतो याची अनेकांना कल्पना नसते. त्यामुळे ‘ख्वाडा’ची मूळ कल्पनाच डोक्यात यायच्या आधीचं भाऊराव कऱ्हाडेचं आयुष्य, त्याची पार्श्वभूमी जाणून घ्यायला आवडेल.. 
पार्श्वभूमी म्हणजे काय नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातल्या छोट्याशा गावात जन्म झाला आणि प्राथमिक शिक्षणही तिथलंच. आणि ६-७ वर्षाचा असल्यापासूनच सिनेमे पहायची आवड लागली होती. गावात दूरदर्शनवर लागणारे सगळे सिनेमे बघायचे. त्या वेळेस मी आयुष्यातला पाहिलेला पहिला चित्रपट म्हणजे ‘मैने प्यार किया’! त्या वयात त्यातलं काहीच समजलं नाही. पण ‘कबुतर जा’ हे गाणं ऐकून ‘ती मुलगी कबुतराला कुठेतरी जायला सांगत्ये’ एवढंच लक्षात राहिलं! मग माध्यमिक शिक्षणासाठी जवळच्या शिरूर गावात आलो. तिथे मिनी थिएटरमध्ये दोन-तीन रुपयात सिनेमे पाहू लागलो. गावात पाव विकायचा धंदाही केला. (हा आयुष्यातला पहिला व्यवसाय!) दहावीपर्यंत चिक्कार सिनेमे पाहिले, वाचन केलं आणि अकरावीत आलो. सिनेमात जे ‘हिरो’ असतात तेच सर्व काही असतात, बाकी दिग्दर्शक, कॅमेरामन वगैरे काही भानगड असते हे माहीतच नव्हतं! हे सगळं मग त्या वेळेस एका वृत्तपत्राच्या पुरवणीत आलेल्या लेखामुळे समजलं. पुण्यातली एफटीआयआय संस्था माहित झाली. तेव्हा वाटू लागलं की दिग्दर्शक व्हावं.. पुढे बारावीही झाली. 

मग पुढे काय केलंत? 
घरचे म्हणत होते मिलीटरीत जावं आणि माझी तशी अजिबात इच्छा नव्हती! त्यात मी शिक्षणातही हुशार वगैरे नव्हतो. पन्नास-बावन टक्के मिळायचे (म्हणजे तसं नापासच!) पण डोळ्यासमोर ध्येय एफटीआयआय आणि दिग्दर्शनाचंच होतं. शिक्षण थांबवलं, गावाकडे शेती आणि इतर कामं लाकडाच्या वखारीत, वाळू उद्योगात कामगार म्हणून कामंही केली. एकदा कांदा विकायला पुण्यात गुलटेकडीला आलो होतो. तिथूनच चालत चालत एफटीआयआय गाठलं. चौकशीनंतर लक्षात आलं तिथे जाण्यासाठी पदवी हवी. मग पुन्हा गावाकडे जाताना ठरवलं पदवीचं शिक्षण घ्यायचं. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात पहिलं वर्ष आणि मग नियमित कॉलेजमध्ये बाकीची वर्षं. पण एफटीआयआयसाठी इंग्रजी मात्र सुधारलं नव्हतं. मग त्यासाठी नगरमध्ये law करायचा निर्णय घेतला. परंतु तेव्हाच नगरच्या न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये मास कम्युनिकेशनचा कोर्स सुरु झालाय, त्यात कॅमेरा, दिग्दर्शनही शिकवतात असं समजलं. तिथे प्रवेश घेतला, समर नखाते सरांच्या संपर्कात आलो आणि खरा प्रवास सुरु झाला. 

‘टीन एज’ मध्ये तुम्ही प्रचंड सिनेमे पाहिलेत. तसे सिनेमाचे वेड असणारे त्याकाळात असंख्य होते. पण ‘सलमानसारखी बॉडी करणं’ किंवा ‘शाहरुखसारखं प्रेयसीला प्रपोज करणं’ इतपतच त्यांची ध्येयं असायची. ‘आपणही सिनेमा बनवायचा’ हे स्वप्न पाहणारा भाऊराव कऱ्हाडे मात्र त्यांच्यात एखादाच. शिवाय गावात एखादा प्रयोगशील किंवा कलात्मक चित्रपट येणं अशक्यच. 
मग अशा कोणत्या कलाकाराचा/ दिग्दर्शकाचा एवढा प्रभाव तुमच्यावर पडला? नेमका काय विचार त्यावेळेस केलात? 

मुळात आधी त्या वयात आपण चित्रपट काढायचा एवढंच माहित होतं. त्या त्या काळातल्या चित्रपटांचा काळानुसार त्यावेळेस प्रभाव हा असतोच. भले ते चित्रपट आता तितके आवडणार नाहीत. खासकरून ‘शोले’चा प्रचंड प्रभाव होता. सिनेमातला ‘हिरो’ हा काहीतरी सर्वशक्तिमान, सर्व काही जाणणारा वगैरे असतो असं एकेकाळी मलाही वाटायचंच. मग पुढे समर नखाते सरांच्या संपर्कात आल्यानंतर एक वेगळा दृष्टीकोन मिळाला. जगभरचे वेगवेगळे सिनेमे पाहायला मिळाले. सत्यजित रे यांच्यासारख्या दिग्दर्शकांचा प्रभाव पडू लागला. मग आपणही वास्तववादी चित्रपट करायचा असं मनाशी नक्की केलं आणि कामाला लागलो..
मास कम्युनिकेशन पूर्ण झाल्यावर स्ट्रगल सुरु झालं. आपला स्वतःचा सिनेमा बनवायचा हे नक्की होतं. आधी एक कथा लिहून त्यावर काम सुरूही झालं आणि अचानक थांबलंसुद्धा. एक वर्ष तणावाखाली गेलं. मग दुसरी कथा लिहिली. ती ‘ख्वाडा’ची होती.
एक चांगलं स्क्रिप्ट तयार झालंय असा विश्वास त्या वेळी जाणवला. 

ख्वाडा हे नेमकं काय आहे? या संकल्पनेबद्दल आणि चित्रपटाबद्दल सांगा.. 
ख्वाडा या शब्दाचे खरंतर अनेक अर्थ आहेत जे चित्रपटात वेगवेगळ्या प्रसंगातून जाणवत राहतात. पण ख्वाडाचा बेसिक अर्थ अडचण असा आहे. ग्रामीण भागातील भटके किंवा स्थलांतरित याचं आयुष्य प्रातिनिधिक स्वरुपात या कथानकातून दाखवायचा प्रयत्न आम्ही केलाय. स्थलांतर हे एकतर लादलेलं असतं किंवा नैसर्गिक- पोटापाण्यासाठी असतं. ते स्थलांतरिताचं आयुष्य, त्याचे अनुभव, व्यथा वास्तवदर्शी रुपात मांडायचा प्रयत्न केलाय. 

असं समजलं की ‘ख्वाडा’ च्या निर्मितीसाठी तुम्ही तुमची शेतजमीन विकली. कथानक लिहून पूर्ण झाल्यावर निर्माता मिळाला नाही. मग स्वतःच निर्मिती करावी म्हणून चक्क शेत विकून टाकलंत! एवढं ख्वाडा मध्ये शक्तिशाली, पुन्हा पुन्हा खेचून आणणारं रसायन नेमकं काय होतं? 
सर्वात पहिलं म्हणजे आपण चित्रपट काढायचाच असं एक ‘खूळ’ डोक्यात होतंच. ती जिद्द मला तिथवर घेऊन गेली. आणि त्यातही ख्वाडाच का, तर स्क्रिप्ट लिहून झाल्यावर मलाच ती प्रचंड अफलातून वाटली. आणि सर्व मित्राचं, कलाकारांचं म्हणणं पडलं की कथानक ऐकताना एकेक चित्र डोळ्यासमोर उभी राहतायत! इतकी ही स्क्रिप्ट प्रभावी आहे. यातली पात्र जिवंत उभी राहत होती.   त्यामुळे हि कथा पुढे येण्यासाठी चित्रपट व्हायलाच हवा असंही वाटू लागलं. मला या सिनेमात कलात्मक बाजूही दिसते आणि ‘कमर्शियल पोटेन्शीअल’ सुद्धा.   

असं ताकदीचं स्क्रिप्ट तुमचं स्वतःचंच. दिग्दर्शक म्हणून सर्वोत्तम बनवण्याचा ध्यास. आणि निर्माता म्हणून आर्थिक संकटं, पैशाच्या नियोजनाचा सततचा विचार. हे दिग्दर्शक आणि निर्माता या दोन्ही भूमिकांचा समतोल ठेवायला कसं काय जमलं? 
ते तसं अवघडच गेलं सुरुवातीला. पण दिग्दर्शक म्हणून मला काय करायचंय हे माझ्या मनात नक्की होतं आणि निर्माता म्हणून माझ्यावर कुणाचंही बंधन असणार नव्हतं ही माझी जमेची बाजू होती. मनासारखं काम करायची संधी मिळाली. पुरेसा वेळ घेण्याची मोकळीक मिळाली. पण हो, निर्माता म्हणून आर्थिक अडचणी सतत उभ्या राहत होत्या परंतु म्हणून माझ्यातला दिग्दर्शक कुठेही कमी पडू दिला नाही. चित्रीकरणाच्या वेळेस फक्त ‘फ्रेम्स’च डोळ्यासमोर उभ्या असायच्या आणि काम आटोपून घरी गेलो की मग आर्थिक गोष्टींचा विचार करायचो. कधीकधी दुसऱ्या दिवशीच्या शूटिंगसाठी पैसेच नसायचे! मग दोन दोन दिवस काम थांबून जायचं. त्यामुळे निर्माता ही जबाबदारी किती जोखमीची, अवघड असते याची जाणीव झाली. आणि माझी टीम.. त्यांच्यामुळे बऱ्याच वेळा निर्मितीतल्या अडचणी माझ्यापर्यंत आल्याच नाहीत. त्या त्यांनी सांभाळून घेतल्या आणि मला माझं काम करायला मिळालं. त्यामुळे हा एक छान अनुभव ठरला. 
सिनेमाला मिळालेली अशी एखादी दाद जी कायम आठवणीत राहील..
पुण्यातले एक वयोवृद्ध गृहस्थ ‘पुणे इंटरनशनल फिल्म फेस्टिवल’मध्ये ख्वाडा पाहून माझ्यापाशी आले. त्यांनी खिशातून शंभराची नोट काढून माझ्या हातात ठेवली. मी म्हणालो की धन्यवाद पण तुमचं कौतुक हीच माझी पावती आहे. ते म्हणाले की हे शंभर रुपये तुला खर्चाला देत नाही.. तर तुझ्या पुढच्या निर्मितीत हे पैसे माझ्या नावाने वापरावेस अशी माझी इच्छा आहे! मला कित्येक वर्षात असा वास्तववादी चित्रपट पाहायला मिळाला नव्हता. ‘प्रभात’च्या काळातल्या चित्रपटांची आठवण मला तुझा सिनेमा पाहताना होत होती. ही दाद माझ्यासाठी खूपच मोठी होती.. 

एकीकडे सिंहासन, सामना ते श्वास ते फेन्ड्री, कोर्ट दुसरीकडे धुमधडाका, धांगडधिंगा, हवालदार भिकू भाजीवाली सखू.. प्रायोगिक/कलात्मक/समांतर आणि व्यावसायिक/मसालेदार वगैरे लेबल्स. त्यावरून चर्चा, वादविवाद. यात ख्वाडाचं लोकेशन तुम्ही कुठे पाहता? 
सिनेमा करायचं ठरवलं तेव्हा एक वास्तववादी सिनेमा करायचा हे नक्की होतंच. आणि निर्माता म्हणून खर्च केलेले पैसे पुन्हा मिळावेत अशीदेखील अर्थातच इच्छा आहे. चांगला सिनेमा करायचा तर चांगले पैसेही मिळवायचे असं माझं मत आहे. चित्रपट ही अनेक कलांची मिळून बनलेली एक कलाकृती असते आणि ते दिग्दर्शकाला त्याच्या मनातलं सांगायचं माध्यम असते. त्यामुळे ख्वाडा बनवताना असा काहीच विचार नव्हता की तो प्रायोगिक, कलात्मक किंवा व्यावसायिक अशा कुठल्याही लेबलचा असेल. हा सिनेमा समीक्षकांनाही आवडेल आणि सर्वसामान्य प्रेक्षकानाही आवडेल अशीच माझी आधीपासून भूमिका आहे..

तुम्ही म्हणताय की तुम्ही समतोल साधायचा प्रयत्न केलाय. पण आज दिसून मात्र असं येतं की मसाला किंवा उथळ वगैरे चित्रपट ग्रामीण भागात लोकप्रिय होतात. आणि ग्रामीण भागाच्या व्यथा अतिशय तळमळीने मांडणारे चित्रपट शहरी भागातच फिरत राहतात. हा विरोधाभास कसा बदलायचा? 
ते तसं होणं स्वाभाविक आहे. कारण शहरी लोकांनी ग्रामीण जीवन पाहिलेलंच नसतं आणि ग्रामीण भागात ते रोजचंच जगणं असतं. त्यातून काही क्षण त्या मसालापटांच्याद्वारे सुटकेचा मार्ग शोधला जातो. 
पण कदाचित आधीचे ग्रामीण चित्रपट तितक्या ताकदीचे नव्हते. त्यातल्या संवेदना लोकांना खोट्या वाटल्या असाव्यात. आता निश्चित परिस्थिती बदलत्ये, ताकदीचे चित्रपट येताहेत आणि ग्रामीण प्रेक्षक चोखंदळ होतोय. पूर्वीही प्रभातचे सिनेमे ग्रामीण शहरी दोन्ही प्रेक्षकांना आवडायचे.. 

हे झालं प्रेक्षकांचं. पण इंडस्ट्रीत काय दिसतंय तर ख्वाडाला निर्माता मिळत नाही आणि दुसरीकडे मसाला गल्लाभरू चित्रपट डझनावर निघत आहेत.. 
हे चित्र निश्चितपणे बदलतंय. प्रेक्षक सुज्ञ झालाय. त्याला ‘रिअलीस्टिक’ सिनेमा हवाय. इंटरनेटमुळे जगभरातलं दर्जेदार त्यांच्यापर्यंत पोहोचतंय. त्यांना आता खोटारडेपणा आवडेनासा झालाय. कदाचित मला माझी स्क्रिप्ट तितक्या ताकदीनं निर्मात्यांपर्यंत पोहोचवता आली नसावी. कारण मला चटपटीत बोलता येत नव्हतं.. 

ख्वाडा राष्ट्रीय पुरस्कार, ‘पिफ’च्या माध्यमातून एका वर्गापर्यंत पोहोचलाय. दुसरा मोठा वर्ग ज्याच्यापर्यंत तो प्रदर्शनानंतरच पोहोचणारे.. तिथे पोहोचण्यासाठी काय योजना आहेत? 
मार्केटिंगचे वेगवेगळे प्रयोग चालू आहेत. शेवटच्या टप्प्यापर्यंत चित्रपट पोहोचवण्यासाठी काय करता येईल याचा विचार चालू आहेच. विशेषतः ग्रामीण भागात अद्यापही टिकून असलेल्या ‘मिनी थिएतर्स’पर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असणारे. 

आता शेवटचा प्रश्न. तुम्ही चित्रपट दिग्दर्शक झालात. त्यातही प्रयोगशील किंवा संवेदनशील दिग्दर्शक म्हणून लोक तुम्हाला ओळखू लागले. आपल्याकडे दिग्दर्शक जितका ‘संवेदनशील’ तितका त्याला फोनवर गाठणं, भेटीसाठी वेळ घेणं आणि भेटणं अवघड! भाऊराव कऱ्हाडे माझा पहिलाच कॉल उचलतो, भेटीसाठी तत्काळ वेळ ठरवतो आणि मनमोकळेपणाने गप्पा मारतो. ह्याची मुळ कुठे आहेत? गावाकडच्या मातीतल्या संस्कारात आहेत? की ख्वाडाच्या दरम्यान आलेली संकटं, अनुभव यामध्ये आहेत.. 
भारतातल्या शेतकऱ्याइतकं संवेदनशील आणि अन्याय सहन करणारं जगात कोणीच नाही असं मला वाटतं. त्यामुळे ही जाणीव तिथूनच आलेली आहे बहुतेक. त्यामुळे अजूनही पाय जमिनीवर राहू शकलेत. डोक्यात हवा गेलेली नाही. आणि मला सतत ही बुद्धी मिळत राहो की मी कुणाचे फोन कॉल्स टाळणार नाही!    
धन्यवाद भाऊराव. ख्वाडासाठी आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..

निमेश वहाळकर 

nsv.cpn@gmail.com  
  

About the Author

निमेश वहाळकर's picture
निमेश वहाळकर