आता उजाडेल !

आता उजाडेल !

विंदा करंदीकरांच्या कवितांमधले समाजभान आणि आशावाद 

'कविता'- सगळ्यांनाच परिचित असलेला विषय. अर्थात, प्रत्येकाचा तो काही जिव्हाळ्याचा विषय नसतो, तरीही कविता प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काही भूमिका निश्चितच बजावते. काहींसाठी ती केवळ पाठ्यपुस्तकापुरती मर्यादित राहते, काहीजण तिला रोजच्या जगण्यात पाहतात. काहींसाठी कविता म्हणजे निव्वळ 'पद्य', काहींसाठी त्या जिवंत जाणीवा. काहींसाठी ते केवळ शब्द, इतर अनेकांसाठी कविता म्हणजे अर्थ… कुठल्याही भाषेत अथवा रूपात, कवितेशी संवाद प्रत्येकाचाच होतो,

कधीना कधी. मराठीपुरतं बोलायचं झालं तर, मर्ढेकरांचा साधारण १९५० च्या सुमारास प्रकाशित झालेला 'काही कविता' हा काव्यसंग्रह नवकवितेची सुरुवात मानली जाते. आता २०१५ साली पुन्हा साठ वर्षे मागे पाहताना ती 'नवकविता' सुद्धा दुर्बोध आणि दुर्लभ वाटू शकते. आपलं सगळंच बदललंय… भोवतालचं जग, जगण्याची परिमाणं, आयुष्य 'घालवायची' पद्धत, सारंच. आपल्या बदलत्या दिनचर्येची आणि परिस्थितीची छाया कवितांमध्ये दिसते. त्यामुळे हल्ली लिहिली जाणारी कविता त्या पूर्वीच्या नवकवितेहून बरीच पुढे आली आहे. तिचं स्वरूप बदललं आहे. त्यामुळे कविता म्हणजे काय याची व्याख्याही बदलली आहे. 
माझ्यापुरती मी केलेली कावितेची व्याख्या म्हणजे मोजक्या शब्दांत गहन विषय आणि अर्थ उलगडून सांगणं. खरंतर एखादा विषय उलगडून सांगायला लांब विश्लेषणं, अनेकविध उदाहरणं गरजेची असतात;परंतु कवितेत तसे पुष्कळदा होत नाही. थोड्या शब्दांत मोठा अर्थ सांगताना कदाचित कविता समजण्यास कठीण, अगम्य होऊ शकते. परंतु त्यातही तिचे स्वतःचे सौंदर्य असते. कवितेचा गाभा (crux) महत्वाचा. मग ती मीटर मध्ये आहे का, यमक जुळतेय का, जड अलंकारिक शब्द वापरतेय का, हे माझ्यासाठी तितकेसे महत्वाचे नाही. तिची लांबीदेखील महत्वाची नाही. ती काय सांगतेय, हे महत्वाचे. जितके जास्तीत जास्त परिणामकारक सांगणे होईल, ती कविता मला भावते. अशी कविता साऱ्याच भाषानियमांच्या पलीकडे जाते. 'शब्दांनो मागुते या' हे या कवितांसाठी समर्पक ठरते. 

असे सांगणे साधलेल्या कवींपैकी एक ठळक नाव म्हणजे विंदा करंदीकर. खरंतर विंदांबददल मी बोलावं-लिहावं असं काही नाहीच. साऱ्या साहित्यविश्वाने त्यांचा गौरव केला आहे. वेगळ्या धाटणीचे, विचारांचे, शब्दांचे हे कवी. त्यांच्या कवितांशी माझी ओळख ' तुकोबा-शेक्सपियर संवादा' तून झाली. मग पुढे कॉलेजमधल्या अनेक कार्यक्रमांतून विंदा वाचले-सादर केले गेले. ( ते कधी काळी रुईयामध्ये इंग्रजी शिकवत हे ऐकून मला अपार आनंद झाला होता) कुठेतरी या कवितांचं जबरदस्त आकर्षण वाटायचं; पण त्या तितक्याच कठीण, दुर्बोधही वाटत असंत. 
विंदांची कविता समजण्यास कठीण, वैचित्र्यपूर्ण आणि क्वचित विविध obscure म्हणाव्यात अशा संदर्भांनी भरलेली आहे. ती फारशी गेय नाही. ( अपवाद सर्वस्व तुजला वाहुनी वगैरे गझलांचा), फारशी गोड नाही. सुलभ नाही, सरळ तर नाहीच नाही. तरीही पुन्हा पुन्हा त्याच कविता वाचाव्याशा का वाटतात याचा शोध घेणे आवश्यक ठरते. याचे माझ्यासाठी महत्वाचे असलेले प्रमुख कारण म्हणजे करंदीकरांच्या कवितेत दिसणाऱ्या टोकदार सामाजिक जाणीवा. त्यांच्या कवितेचा तो USP च म्हणावा लागेल. विंदांच्या बालकविता, प्रेमकवितांमध्येही त्यांचे मूळ सामाजिक भान हरवत नाही. कविता बहरतात, फुलतात, निराश होतात, आशा लावतात ते ह्या भूमीत. या देशाच्या सामाजिक, राजकीय चौकटीत. कितीही नाकारायची झाली तरी ती चौकट आपल्या आयुष्यातून जात नाही. विंदांच्या कवितेतून सुद्धा ती अपरिहार्यपणे येतेच; कवितेचा बाज आणि प्रकार कोणताही असला तरिही. 'पिशी मावशी आणि तिची भुतावळ' हा विंदांचा बालकवितांचा संग्रह. म्हणायला गेलं तर बालकविता, पण मोठ्यांनी जरा सजगपणे पाहिलं तर त्यात दिसते विदारकता, टाकून दिलेल्या स्त्रीची घुसमट. सासरच्या जाचाला कंटाळून शेवटी आत्मशोधापायी अघोरीपणाची वाटचाल केलेली स्त्री. चेटकीण… तरीही स्त्रीच. तिचं चेटकिणीचं आयुष्य सगळ्या कवितांमध्ये मनोरंजनात्मकरित्या रंगवलंय. वाचताना गंमतही वाटते. परंतु संपूर्ण काव्यसंग्रह वाचून झाल्यावर मात्र एक प्रकारची अस्वस्थता मनाला येते. ही अस्वस्थता या कवितांच्या केंद्रस्थानी आहे. ती अशी काही येउन भिडते की कायमची लक्षात राहते. 

जी गोष्ट चेटकीणींची तीच संसारी स्त्रियांची. ' भारतीय स्त्रियांसाठी स्थानगीत' या कवितेत विंदा हेच सांगू पाहतात कदचित. जग कितीही पुढे गेलं तरी ' करा, मरा, तळा, जळा, पोसा-पाजा, धुवा-शिवा, चिरा-झुरा, झिजा- शिजा' ही क्रियापदं पुरुषांना लागू होत नाहीतंच. घरातलं ते ठरलेलं स्थान स्त्रियांना तावडीतून सोडत नाहीच., अजुनही. अगदी थोडक्या शब्दांत हे स्थानगीत आपल्यापर्यंत असं दारुण वास्तव पोहोचवतं. 
मध्यमवर्गी स्त्रियाही यातून सुटलेल्या नाहीत. ' कावेरी डोंगरे' सारख्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या, स्वतःच्या पायांवर उभ्या असणाऱ्या बायकांनाही त्याच जुन्या छळवाटांवरून जावं लागतं. त्यांनाही मंगळ अडतोच, फसवणूक होतेच. त्याच जुन्या परंपरांच्या जाळ्यात बायका पिचत राहतात…काळ बदलला तरीसुद्धा. या अशा चित्रांनी मनाला घेरते केवळ असहनीय विदारकता. करंदीकरांनी ही तळमळ ब-याच कवितांतून शब्दबद्ध केली आहे. 
'ती जनता अमर आहे' या कवितेत विंदा सतत 'नाही रे उजाडत' या वाक्याचा प्रयोग करतात. कितीही पुढारलो तरी '' सोन्याच्या किल्लीनेच उघडतात दरवाजे " हे सत्य नाकारता येत नाही. '' सरस्वतीच्या दरबारात, मुक्यानेच मरतात, मातीतील महाकवी'' हेही काही खोटे नाही. ''विध्वंसक विज्ञानावर पचाककन थुंकून, हसतो महारोग हरएक खेड्यातून, खुपसतो डोळ्यांतून सडलेली बोटे''… हे तर आपण हरसाल अनुभवतो; पण उजाडत नाही,असे म्हणता म्हणता ' कधीतरी उजाडेल' असे म्हणायलाही विंदा विसरत नाहीत. ''तू जगशील, तुम्ही जगाल'' असेही ते आवर्जून म्हणतात. अन्यायाला, शोषणाला वाचा फुटते ती जनतेची एकजूट झाल्यावरच.  करंदीकरांच्या मते ''लाल क्रांती'' अशी  एकजूट आणू शकते. 
'' जनतेच्या नसांमधे, लाल लाल रक्त आहे 
जनतेच्या सत्तेखाली पृथ्वीचे तख्त आहे 
… जिचा आत्मा एक ती जनता अमर आहे! ''
या आणि अशा अनेक ओळींतून विंदांचे साम्यवादी विचार ठळकपणे समोर येतात. 
‘माझ्या मन बन दगड’ या कवितेत ते शेवटी म्हणतात-
'' ऐक टापा, ऐक आवाज , लाल धूळ उडते आज 
यांच्यामागून येईल स्वार, या दगडावर लावील धार 
इतके यश तुला रगड, माझ्या मन बन दगड! ''
परंतु कवितेतला हा विचार इथपर्यंतच मर्यादित राहात नाही. 'लाल क्रांती'ची काळी बाजूही विंदा जाणतात. कुठल्याही बाजूला जा, डाव्या अथवा उजव्या, सुज्ञ माणसाच्या हाती नैराश्याशिवाय फारसे काही लागत नाही. शोषण नको म्हणून उजवीकडून डावीकडे गेल्यास गळ्याला फास लावणारी हुकुमशाही सहन करावी लागते. शेवटी पदरी पडते ती अगतिकताच. ही भावना ठळकपणे 'वाटाड्या' आणि 'दंतकथा' या दोन कवितांमध्ये प्रतित झाली आहे. 

'वाटाड्या' मध्ये विंदा वाट चुकलेल्या पांथस्थाला सांगतात- '' उजव्या बाजूला विटलेल्या रंगाचे आकाश दिसेल, ते दिसल्यावर पुन्हा डावीकडे वळ- डाव्या बाजूला शिटलेल्या  रंगाची जमीन दिसेल. मग आपला नाकासमोर पुढे जा, नाक कापल्यासारखा''… भांडवलशाही असो वा साम्यवाद, तुमच्या- आमच्यांसारख्या आयुष्यात विटलेलं आकाश आणि शिटलेली जमिनच यायची. म्हणूनच नाकासमोर, कोडगं होऊन चालणं कधीही उत्तम.
'दंतकथा' ही कविताही यासंदर्भात वैशिष्ट्यपूर्ण विधानं करते. अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड अशा देशाच्या भांडवलवादी, साम्राज्यवादी धोरणांवर आणि विचारांवर विंदांनी उपरोधाचा/अतिशयोक्तीचा वापर करत कोरडे ओढले आहेत. समविचारी देश कसे एकमेकांच्या हातात हात गुंफून शोषण करण्याची एक एक पायरी चढत जातात, हे इथे खुबीने सांगितले आहे. परंतु अशा शोषणाला विरोध म्हणून लाल क्रांती केलेल्या रशियातही परिस्थिती काही वेगळी नव्हती. अन्याय होतच होता, वेगळ्या रुपात, वेगळ्या तऱ्हेने. तिथे भांडवलशाही… इथे हुकुमशाही. तिथे शोषण, इथे हाल. तिथे रक्ताने माखलेला पैसा, इथे रक्त सांडलेला- गज नसलेला तुरुंग. करंदीकर शेवटी म्हणतात- या दात नसलेल्या दंतकथा आहेत. प्रत्यक्षात विंदांना हे कथित 'दात' विलक्षण बोचत असावेत. 

'नेहरू १९६२' ही चीन आक्रमणानंतर विंदांनी लिहिलेली नेहरूंवरची कविता आहे. जवाहरलाल नेहरू हे एक मध्यममार्ग काढू पाहणारे, डाव्या-उजव्यांच्या शर्यतीपासून स्वतःला वाचवणारे, दूरदृष्टी असणारे नेते होते. शांतता आणि मानवी ऐक्य या मुल्यांचा पुरस्कार करणारे नेहरू विंदांना भावतात. ( साधारण डावीकडे झुकणाऱ्या विचारवंतांना नेहरुंविषयी आत्मीयता वाटतेच.) सारं जग त्यांच्या विरोधात बोलत असताना करंदीकर मात्र त्यांच्या द्रष्टेपणाचा गौरव करतात. त्यांच्या पडत्या काळात आम्ही मात्र, त्यांनीच पारतंत्र्यातून सोडवलेल्या आमच्या हातांनी त्यांच्या हातात कवड्या ठेवल्या, असं करंदीकर या कवितेत म्हणतात. कवड्या म्हणजे य:कश्चित वस्तू, मुल्यशून्य विधाने आणि स्वप्ने. समाजाने जणू अशा कवड्या देऊन नेहरूंनी जे काही देशासाठी केले, त्याची परतफेड केली. विंदांच्या कवितांचा परीघ मोठा आहे. साऱ्या कवितांचा अर्थ लावत बसलो, तर ग्रंथनिर्मितीच होईल. कदाचित हेच या कवितांचे सामर्थ्य आहे. थोडक्यात खूप काही सांगणे, उलगडणे त्यांनी सहजसाध्य केले आहे. शिवाय, या कविता कालातीत आहेत. १९६०-७० चा सुमारास लिहिलेल्या कविता आजही तितक्याच relevant वाटतात. म्हणजे, त्या तेव्हाच काळाच्या बऱ्याच पुढे होत्या आणि समाजमनाची नस त्यांनी अचूक पकडली होती. समाजमन सहसा झपाट्याने बदलत नाही, पालटत नाही. लोकशाहीचा जगन्नाथाचा रथ हळूहळूच पुढे सरकतो. तो जेव्हा धावू लागेल, तेव्हा आत्मभान येईल. क्रांती होईल. समाजाची 'समाज' म्हणून प्रगती होईल. असा आशावाद करंदिकरांसारख्या कवींमुळे, कलाकारांमुळे आणि विचारवंतांमुळे बळावतो व वाढतो. त्यामुळे प्रत्येकाने साहित्याचे हे समाजातील योगदान लक्षात घ्यायलाच हवे. 
नवोदितांना-अजाण जीवांना प्रकाशाची वाट दाखवणे, हे कवितेचे प्रमुख कार्य आहे. करंदीकरांच्या कवितेने ते निश्चितपणे केले आहे आणि म्हणूनच, भारतीय साहित्यविश्वात विंदांच्या कविता 'अमर' आहेत. त्या कवितांच्या रूपातले शुभ्र कबुतर आमच्या मनांच्या बुरुजांवर घुमत राहील… कायमच!

-   गायत्री लेले  

image credits- B.G. Limaye

About the Author

गायत्री लेले's picture
गायत्री लेले