कहाणी एका आरोग्यदूताची !

अदिवासींच्या आरोग्यासाठी झटणा-या महादेव सातपुते या मलेरिया फायटरची गोष्ट सांगतोय तरुण अभ्यासू पत्रकार अभिषेक भोसले

 

 आम्ही आज पुण्या– मुंबईमध्ये राहून विकास, शेती, दुष्काळ, आरोग्य इत्यादी विषयावर मस्त वातानूकुत खोली मध्ये बसून चर्चा करत असतो. त्या चर्चा करण्यात तसं काहीच गैर नाही, कारण कमीत कमी आम्ही या विषयांवर चर्चा करतो हेच महत्त्त्वाचं आहे. मग त्या उथळ चर्चातूनच आम्ही विशिष्ट समूह, भूभाग यांची सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी माहीत नसताना त्या संबंधित समूह, भूभाग यांची धोरणं ठरवत असतो. समाजाचं समाजिक, राजकिय, अर्थिक व शारिरिक स्वास्थ्य सांभाळायचा प्रयत्न करत असतो. मग त्यासाठी अनेक विविधांगी योजना राबविण्यात येतात. लाखो रूपये त्या योजनांच्या अंमलबजावणी साठी राखून ठेवण्यात येतात. मग त्या योजना काही दिवसांनी सत्ताधारी आणि माध्यमांसाठी चार दिवसाच्या चर्चा करून टाकून दिलेला चोथा बनतात.

देशाच्या आणि राज्याच्या विविध भागामध्ये सरकारी योजनांची आस न धरता आपापल्या परीनं काम करणाऱ्या अनेक संस्था, व्यक्ती आहेत, कदाचित त्यांच्यामुळंच समाजाचं खरं समाजिक, राजकिय, अर्थिक व शारीरिक  स्वास्थ व आरोग्य राखलं जात असावं. कल्याणकारी राज्याची संकल्पना आपण  1950 मध्येच स्वीकारली. आता तर कुठं कल्याणकारी राज्याची पुण्या-मुंबईपुरती कैद झालेली संकल्पना विकसित शहरांकडून झिरपत झिरपत मराठवाडा विदर्भ यांसारख्या मागास ‘बनविलेल्या’ भागात पोहचत आहे. त्यात आरोग्य या गोष्टीशी तर आपल्याला काही देणं घेणं आहे याचं चित्रच समोर दिसत नाही. शहरी व ग्रामीण भागात आरोग्याबद्दल सरकार किती जागरूक आहे,  याच्या कोणाच्या तरी मृत्युनी बरबटलेल्या कथा आपण दररोजच माध्यमात पहात वाचत असतो. त्यातच मग ‘गडचिरोली सारख्या भागामध्ये तर काय दशा असेल याची कल्पनाच न केलेली बरी ! ‘गडचिरोली’, महाराष्ट्राचा सर्वांत पूर्वेकडील खनिज संपत्तीनं भरपूर, जंगलाने व्यापलेला, माडिया - गोंड आदिवासींचे वास्तव असलेला दंडकारण्याचा भाग आणि नक्षलग्रस्त जिल्हा अशी आपल्या सर्वांना ओळख असलेले हे नाव. राज्याच्या इतर भागाप्रमाणे  आरोग्याच्या छोट्या छोट्या समस्यांमुळे जीव गमवावा लागलेल्यांची संख्या इथही काही कमी नव्हती. डॉ. अभय व राणी बंग, डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे यांच्यासारखी ध्येयवेडी माणसं इथं येऊन राहिली. आणि सरकारही कधी साकारू शकलं नसतं अशी आरोग्य चळवळ या जिल्ह्यामध्ये पेरली गेली. या माणसांबद्दल सातत्यानं आपल्याला वाचायला मिळत असतं. त्यांना आपण माध्यमांमधून, विविध कार्यक्रमांमधून ऐकत असतो.  ही माणसं बाहेरून आलेली पण इथल्या स्थानिक लोकांमधूनही कामाचं महत्त्व लक्षात घेता अनेक कार्यकर्ते तयार झाले. साथ देणारे हजारो हात, पोलीस आणि नक्षलवाद या दोन्हीच्या संघर्षात प्रत्यक्ष फिल्ड वर काम करणारी माणसं आणि त्यांच्या जीवनकथा मात्र जगासमोर आल्या नाहीत. त्यांचं जगणं आणि काम  एक संघर्षयात्राच बनलेलं अहे. अशा अनेकांमधलं एक नाव म्हणजे ‘महादेव सातपुते’ गडचिरोलीच्या 48 अदिवासी गावं पाड्यासांठी ते 24 तास ऑन ड्युटी असतात. शिक्षण तसं जेमतेम 12 वी पास, जन्म गडचिरोलीच्याच चार्मोशी तालुक्यातील तडोधी गावचा. मागील 13 वर्षापासून ‘सर्च’च्या माध्यमातून ते या भागात ‘मलेरिया फायटर’ च्या रूपात अविरतपणे काम करत आहेत. आपल्या कल्पनेपलिकडं असणाऱ्या समस्यांचा सामना करत आदिवासींचं आरोग्य सुधारण्यासाठी त्यांनी  स्वताला झोकून दिलं आहे. समाज आणि त्यापरी आपलं कर्तव्य यासाठी झटणाऱ्या माणसांसाठी महादेव सातपुते यांचं काम व जीवन एक चालता फिरता प्रेरणास्त्रोत आहे. मर्यादित भूक्षेत्रावरील पण पूर्णपणे केंद्रीत काम किती मोठा बदल घडवून आणू शकतं याचं महादेव सातपुते आणि त्यांचं काम एक जिवंत उदाहरणच आहे.

आज अनेक आजारावरच्या लसी विज्ञानामुळे विकसित झाल्या आहेत. सर्वसामान्यांसाठी त्या उपलब्धही आहेत. तरीदेखील मलेरिया सारख्या आजारानं गडचिरोलीमध्ये मरणाऱ्यांची संख्या काही कमी नव्हती. माडिया – गोंडाना भेडसाविणाऱ्या व मरणाच्या दारात पोहचविणाऱ्या अनेक आजारांपैकी एक म्हणजे मलेरिया.  2000 सालापर्यंत मोठ्या प्रमाणात व आजही काही प्रमाणात माडिया गोंड अदिवासी मलेरियाचा बळी ठरतोय. आपल्याकडच्या आणि जंगलातील त्यांच्या मलेरियामधील फरक एवढाच की वेळेत उपचार नाही मिळाला तर जीव जाण्याची 100 टक्के लिखित खात्री. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये होणाऱ्या मलेरियामुळं मृत्यु ओढावण्याची संधी खूपच कमी असते. पण या दंडकारण्याच्या जंगली भागामध्ये आढळणाऱ्या सेलिब्ररल मलेरियामुळं 48 तासाच्या आत उपचार नाही मिळाला तर रूग्ण हमखास दगावणारच. पावसाळा सुरू झाला की प्रत्येक गावात मलेरियानं कमीत कमी 2 3 जण तर दगावत असत. पावसाळ्याव्यतिरिक्तही मृत्यु व्हायचेच. लहान मुलं, गरोदर स्त्रिया तर या मलेरियाचे आवडते यजमानच, त्यांना आजही मोठ्या प्रमाणात  मलेरियाची लागण होत असते. मग उपचार मिळाला किंवा क्लोरोक्वीन एखादी गोळी मिळाली तर जगण्याची थोडीफार शक्यता, नाही तर मरण उंबरठ्यावर उभं असायचंच.

महादेव भाऊंनी 1993 पासून सर्चच्या माध्यमातून मलेरियाविरूद्धच्या व आरोग्य स्वराज्यच्या मोहिमेत सहभागी झाले. गडचिरोलीपासून 10 किलोमीटर अंतरावर आदिवासींच्या आरोग्यासंबंधी काम करणारी व सार्वजनिक आरोग्यावर संशोधन करणारी ‘सर्च’ ही संस्था, डॉ. राणी व अभय बंग या जोडीनं शोधग्राम च्या माध्यमातून या अदिवासी भागात आरोग्याच्या कामास सुरूवात केली आणि आज भारतातील सार्वजनिक आरोग्यावर काम व संशोधन करणारी ही एक महत्त्वाची विश्वासनीय संस्था बनली आहे. औषधपाणी, मच्छरदाणी  व श्रमदान या त्रिसूत्रीच्या आधारे मलेरियानं पिढ्यानपिढ्या घातलेल्या मृत्यूच्या  तांडवाविरूद्ध  लढा सुरू झाला. सुरूवात झाली ती आदिवासींचा विश्वास संपादन करण्यापासून. अदिवासी पाड्यांवर व गावात त्यांचा डॉक्टर म्हणजे पुजारी. मलेरिया काय? कोणताही आजार झाला की रूग्णाला पहिलं दर्शन व्हायचं ते या पुजाऱ्याचं (यालाच महाराष्ट्राच्या इतर अदिवासी भागात भगत असेही म्हणतात). मग या पुजाऱ्यांना विश्वासात घेणं गरजेचं होतं. कारण या पुजाऱ्यांची उपजीविकाच या आदिवासींच्या आजारपणावर असायची.  त्यासाठी सर्चच्या कार्यक्षेत्रातील सर्व पुजाऱ्यांना जमा करून मलेरियाचा जंतू कसा दिसतो, हे मायक्रोस्कोप मध्ये या पुजाऱ्यांना दाखविला. कदाचित या पुजाऱ्यांनाही हा आजार किती जीवघेणा आहे याची जाणीव नसावी. ती जाणीव त्यांना करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रयत्नांतूनच पुजाऱ्यांना मलेरियाच्या जीवघेणेपणाची जाणीव झाली असावी. ही बाहेरून आलेली माणसं आपल्यासाठी आदिवांसीसाठी काही तरी काम करत आहेत, त्यांची तळमळ पाहून मलेरियासद्दश आजाराचं लक्षण असलेला रूग्ण या पुजाऱ्याकडं गेला की, पुजारी त्याला सांगितल्यानुसार क्लोरोक्वीनची गोळी देऊ लागला. तब्येत आधिकच खराब आहे असं जाणवल्यास त्याला सर्च मध्ये पाठविलं जाऊ लागलं. पुजाऱ्यांचा, गावकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात यश तर आलं होतं. मलेरिया झाला आहे की नाही समजण्यासाठी रक्ताची तपासणी करणं आवश्यक असायचं. रक्त आणि अंधश्रद्धा यांचा आपल्या सुशिक्षितामध्ये जसा पगडा आहे तसाच हा अदिवासी समाजही त्याला अपवाद नाही. आपल्या रक्ताचा उपयोग करून आपल्यामागं भूत वगैरे लावलं जाईल अशा गैरसमजुतीं इथही होत्या. अशा अनेक गैरसमजुतींमधून मार्ग काढायाचा होता. 1993 पासून सर्चमध्ये काम करत असल्यामुळं महादेव सातपुतेंना अशा परिस्थितीला भविष्यात कधी ना कधी सामोरं जावंच लागणार होतं, याची जाणीव होतीच. त्यामुळं अशा समस्यांवर कशाप्रकारे मात करावी हे ठरविण्यास वेळ लागला नाही.  अशा समस्यांवर जास्त वेळ खर्च करायचा नसेल तर आदिवासींचं ‘आरोग्य शिक्षण’ करणं गरजचं होतं.  मग वेगवेगळ्या पातळ्यांवर आदिवासींचं मलेरियासोबतच इतर आजार आणि शरीरसंबंधी असणाऱ्या गैरसमजुतींबद्दल आरोग्याप्रबोधन करायला सुरूवात झाली. स्लाईड शो, आदिवासींच्या भाषेतूनच लिहिलेली गाणी याच्या माध्यमातून आदिवासींचं आरोग्य शिक्षण सुरू झालं. गावागावतल्या कार्यक्रमात आरोग्याशिक्षणासंबंधीची गाणी गायली जाऊ लागली. आता  मलेरियाविरूद्धचा लढा वेग धरत होता. तरीपण मृत्यू थांबविता येत नव्हता. डोळ्यांसमोर मलेरियानं मेलेला रूग्ण पाहण्याची वेळ अनेकदा आल्याचं सातपुते सांगतात. सातगावपासून 40 किलोमीटर अंतरावरील  टवेटो गावात डोळ्यासमोर मलेरियानं मेलेल्या मुलीची घटना आजही महादेव भाऊंच्या बोलण्यात येते.

आरोग्य शिक्षणामध्ये अदिवासींना पांघरून घेऊन झोपायला, मच्छरदाणीचा वापर करायला सांगण्यात येऊ लागले. मच्छरदाणी कशी लावायची, इथपासून प्रशिक्षण देण्यात येऊ लागलं. 25 गावामध्ये मच्छरदाण्याचं अल्पदरात वाटप करण्यात आलं. हे सर्व चालू असतानाच सातपुतें यांना औरंगाबाद, नाशिक येथे आरोग्याचं वेगळं ट्रेनिंग मिळालं, त्याचबरोबर पपेट बनविण्याचं ट्रेनिंग देखील त्यांनी घेतलं. या प्रशिक्षणाचा फायदा त्यांना मलेरियासंबंधीच्या कामात झाल्याचं सातपुते सांगतात. हळहळू लोकांमध्ये मलेरिया बद्दल जागृती वाढू लागली होती.  

गावात कोणी आजारी पडलं की ही आरोग्यासंबंधी काम करणारी मंडळी बाहेरून  गावात येणार. त्यात वेळ जाणार त्यातच संपर्काच्या अडचणी.  गावात ना फोनची व्यवस्था ना मोबाईलची. आजसुद्धा अदिवासी वस्तीवर जरी मोबाईल आला असला तरी जवळपास उंच अशी एखादीच जागा असते जिथं रेंज येते, मग गावातली सगळी माणसं फोनवर बोलण्यासाठी त्याठिकाणी जातात. गावातलं कोणी अचानक आजारी पडलं आणि संपर्क झाला तर ठीक नाही तर आजार जीवावर बेताण्याची शक्यता अधिक. हे सगळं लक्षात घेऊन प्रत्येक गावात ‘आरोग्य सेवक’ नेमण्याचं ठरलं (यालाच अदिवासी समाज दंतेश्वरी सेवक म्हणूनही ओळखतो.  दंतेश्वरी माता ही त्या भागातील आदिवासींची देवी म्हणून याला ‘दंतेश्वरी सेवक’ असेही म्हणतात).

आरोग्य सेवक म्हणजे अदिवासींमधला थोडा फार शिकलेला एक तरूण आणि तरूणी सर्वमतानं निवडून सर्च कडं पाठवायचा. मग वेगवेगळ्या गावातून आलेल्या या तरूण – तरूणी व लोकांनां तिथं आरोग्य प्रशिक्षण दिलं जातं. विशेषत मलेरिया संदर्भात प्रशिक्षण दिलं जातं. या आरोग्य सेवकांचं मुख्य काम म्हणजे मलेरियासदृश्श लक्षण असणारा पेशंट आढळला की, त्याला प्राथमिक उपचार म्हणून हे आरोग्य सेवक क्लोरोक्वीनची गोळी देणार, त्याच बरोबर गावात कोणाची तब्येत अचानक खराब झाली तर गावातल्या रेंज भेटणाऱ्या उंच टेकडी वर जाऊन लवकरात लवकर सर्चमध्ये फोन करून रूग्णवाहिका बोलवायचं काम या आरोग्य सेवकाकडं असतं. त्याच बरोबर मलेरियाच्या तात्काळ RDK (Rapid Diagnosis Kit) किट  विकसित करण्यात आली आहे. RDK किट चा वापर कसा करायचा हे देखील आरोग्य सेवकांना शिकविण्यात आलं आहे, असं सातपुते सांगतात. या किटमध्ये रूग्णाचं रक्त तपासून किती बँड येतात याच्या माध्यमातून त्या रूग्णाला मलेरिया झालंय का? झाला असेल तर साधा मलेरिया झालाय की सेलिब्रलर मलेरिया झालाय हे आरोग्यसेवकाला कळतं. मग त्यानुसार प्राथमिक उपचार सुरू होतात. साधा असेल तर लगेच तिथं क्लोरोक्वीनच्या गोळीनं उपचार सुरू होतात. मलेरियासोबतच इतर वेगवेगळ्या 14 गोळ्या या आरोग्यसेवकांकडं असतात. या गोळ्या संपल्या की त्या उपलब्ध करून द्यायचं काम महादेव सातपुतेंकडं असतं.  मग रूग्णाला समोर बसवून आवश्यक ती गोळी ते समोर उभारून खायला देतात. हे काम जरी आरोग्यसेवक स्वच्छेनं करत असला तरी आरोग्यसेवकांना 150 रूपये मानधन देण्यात येतं. या आरोग्य सेवकांचं मार्गदर्शन करण्याची आणि समन्वय साधण्याची जबाबदारी महादेवभाऊ समर्थपणे पार पाडत आहेत.

महादेव सातपुते यांच्यासोबत त्यांच्या कार्यक्षेत्रात फिरताना माहवाडा गावातील आरोग्य सेवकास भेटता आलं. उंचीनं बुटका, चेहऱ्यावर उत्साह, अंगावर डॉक्टर लोकं घालतात तसला कोट आणि बोलायला सुरूवात केल्यावर गोळ्यांची नावं न चुकता सागंणारा ‘विनायक दुगा’, 13 ते 14 वर्षापासून तो आरोग्य सेवक म्हणून काम करतोय. आज गावातील लोकं याला डॉक्टर म्हणूनच ओळखतात. शिक्षण 10 वी, सगळ्यांपेक्षा काही तरी वेगळं करायचंय या गोष्टीनं झपाटलेला हा माणूस आजही वेगवेगळे प्रयोग करत असतो. बोलता बोलता गंमत म्हणून तो सांगत होता, “ गावात सगळ्यांनाच मलेरिया व्हायचा पण मला काही मलेरिया व्हायचा नाही, आरोग्य शिक्षणातून कळालेल्या सगळ्या गोष्टींचे मी पालन करत असायचो, मग एकदा मच्छरदाणी न लावताच झोपायंच ठरवलं आणि  मग काय मलाही मलेरिया झाला. मग मी आज गावकऱ्यांना सांगत असतो बघा मच्छरदाणी नाही लावली तर मलेरिया नक्कीच होणार आणि आपल्याच डॉक्टरला असा अनुभव आल्यामुळं अदिवासी आता न चुकता मच्छरदाणीचा वापर करतात.” असा हा विनायक दुगा बाहेरच्या घडामोडींचा गावातल्या आरोग्याच्या प्रश्नाशी संबंध जोडून गावातल्या लोकांना सांगत असतो. गप्पा चालू असतानाच गावातलाच एक अदिवासी मस्त खर्रा खात आमच्या शेजारी बसला होता. मग बोलता बोलता विषय निघाला की खर्रा, तबांखू आरोग्याला कशी हानीकारक आहे. तर विनायकनं त्याचा संबंध थेट आबा म्हणजे आर. आर. पाटील तबांखू खाल्यामुळेच गेल्याचं सांगत त्या माणसाला समजावू लागला. हे आरोग्यसेवक गावाच्या आरोग्यासाठी स्वताचा आनंद –विसरून काम करत आहेत. हे काम करताना कधी कधी मोठ्या कौटुंबिक घटनांना देखील सामोरे जावं लागतं. असंच दु:ख विनायकच्या पाठीशीही आहे. गावच्या आरोग्याचं काम सांभाळत असताना विनायक असंच कोणाची तरी तब्येत खराब असल्यामुळं गेला होता तर त्याची मुलगी आजारी पडली आणि त्यातच ती दगावली आठवण महादेव सातपुते सांगत होते.. गावच्या आरोग्यासाठी धडपडणाऱ्या या विनायकची पोरगी आजारपणामुळंच मरावी, यापेक्षा मनाला चटका लावणारी दुसरी काय गोष्ट असू शकते ! आपण आपल्या लोकांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, गावासाठी काम करू शकतोय हीच गोष्ट विनायकच्या काम करण्यामागची प्रेरणा आहे. त्याच्या बदल्यात गावातली मंडळी आपल्याला डॉक्टर म्हणतात आणि आदरानं वागवतात यातच त्याला आनंद मिळतो.  विनायकचं हे काम फक्त त्याच्या गावासाठीच मर्यादित असलं तरी ते खूप महत्त्वाचं आहे. एकीकडं जागतिकीकरणाच्या गप्पा मारणाऱ्यांना अमेरिकेत काय चाललंय हे कळत असतं पण आमच्याच देशातल्या दुर्गम भागातील परिस्थितीचं आकलन नसतं किंवा जाणून घेण्याची इच्छा नसते. म्हणून स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या लोकांचं काम जरी मोठ्या शहरात राहून दिसत नसलं तरी त्यांच्या त्या कामाचं महत्त्व मला तरी जागतिक दर्जाच्या मानवी जीवन सुखी आनंदी परिपूर्ण बनविणाऱ्या कामाएवढंच महत्त्वाचं वाटतं. त्याला माझ्या काय,  कोणाच्याही मान्यतेची वा प्रशस्तीपत्राची गरज नाही.  गावच्या आपल्या अदिवासी समाजच्या आरोग्यासाठी स्वता:च्या कुटूंबाचीही पर्वा न करता अविरतपणे महादेव भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे कितीतरी विनायक दुगा आपल्याला या भागात पहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला शासनातर्फेही थोडेफार प्रयत्न चालू असतात. मच्छरदाण्यांचं वाटप, धूरफवारणी इ. गोष्टी या भागात शासनातर्फे मलेरियाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी करण्यात येतात.

या सर्व प्रयत्नांचं फळ म्हणजे,  या मलेरियासंबंधीच्या कामाच्या कार्यक्षेत्रातील 48 अदिवासी गावं– वस्त्यांमध्ये आज एकही रूग्ण मलेरियानं दगावत नाही. त्याचप्रमाणं मलेरियाची लागणही खूप कमी लोकांना होत असते. अदिवासी मलेरियाबद्दल जागरूक झाला आहे. तो आता स्वता:हून काळजी घेऊ लागला आहे. महादेव सातपुते गेली 20 वर्षे या भागात काम करत आहेत. प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरातील माणसांशी आता त्याचे वैयक्तिक जिव्हाळ्याचं नातं तयार झालं आहे. महादेव सातपुते यांचे सहकारी सर्चमधील महेश देशमुख सांगतात, “महादेव हा अदिवासीत्तेर लोकांमधून आलेला असताना सुद्धा त्यानं आज या आदिवासींशी एक वेगळं नातं तयार केलं आहे. महादेवची काम करण्याची सचोटी, संभाषण कौशल्य हेच त्याला आजपर्यंत या कामाशी बांधून ठेवू शकलाहे. इकडं मलेरिया साथीचा रोग आहे, सोबतच नक्षलग्रस्त भाग अशा परिस्थितीमध्ये फिल्डवर काम करणं अधिकच त्रासदायक आणि धोकादायक ठरतं. अशा परिस्थितीमध्ये महादेव मागील 15- 20 वर्षापासून मलेरिया निर्मूलनाचं काम करत आहे. आज त्याला आदिवासींच्या संस्कृतीची त्यांच्या एवढीच माहिती आहे”

आज 20 वर्षानंतर महादेव सातपुते आपल्या उद्दिष्टाच्या जवळ पोहचले आहेत. मलेरिया आज पूर्वीसारखा जीवघेणा राहिला नाही. महादेवभाऊंना त्यांच्या 20 वर्षांच्या प्रवासाबद्दल विचारलं असता ते सांगतात, “आज मी जे काही मलेरियासंबंधी काम करू शकलो किंवा आरोग्य शिक्षणासाठी  गडचिरोलीमध्ये काम करता आलं, ती  माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण त्या कामापेक्षा जास्त आनंद मला या आदिवासींकडून, त्यांच्या संस्कृतीतून शिकायला मिळालेल्या गोष्टींचा आहे.  काम करताना त्यांची भाषा शिकता आली. पूर्वीपासून कविता करायचा नाद होता. मग गोंड भाषेत गाणी लिहायला लागलो. या गाण्यांच्या आधारे  आदिवासींचं आरोग्य शिक्षण चांगल्या प्रकारे करता आलं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजेल मी अदिवासी नसताना आज हे अदिवासी मला आपल्या लोकांप्रमाणेच आदरानं वागवतात, यापेक्षा दुसरी कोणतीच महत्त्वाची आनंदाची  गोष्ट माझ्यासाठी असू शकत नाही”. या 20 वर्षाच्या काळात आदिवासींच्या जीवनात अनेक बदल घडले, त्याबद्दल बोलताना ते सांगतात, “पूर्वी आजार वगैरे काही झाला की अदिवासी पूजारी पूजा अर्चा यामध्ये गुंतायचा, पण आज कोणी आजारी पडलं की ते या गोष्टीपासून दूरच असतात व थेट दवाखान व डॉक्टरची वाट धरतात,  हा सर्वात मोठा बदल मला जाणवतोय. आरोग्याव्यतिरिक्त इतर बदल सांगायचे झाल्यास शिक्षणाचं प्रमाण वाढलं त्याचप्रमाणं शिक्षणाच्या गळतीचं प्रमाणही कमी झालं आहे. अदिवासी तरूणांची आता शिक्षित पिढी निर्माण होवू लागली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अदिवासी आता जागरूक झाला आहे”.

हे काम करत असताना डॉ. राणी व अभय बंग, तुषार खोरगडे यांचं मार्गदर्शन सातत्यानं मिळल्यामुळंच काम करता आलं, असं सातपुते आवर्जून सांगतात.  20 वर्षापूर्वी जिथं काम करायला यायची कोणाची तयारी नव्हती, अशा वेळी महादेव सातपुते यांनी स्वताच्या आरोग्याची काळजी न करता वा काळजी घेत मलेरिया निर्मूलनासाठी 48 गावामध्यं जे काम केलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. कधीही आपल्याला जीवघेणा मलेरिया होऊ शकतो किंवा पोलिंसांचा नक्षलवाद्यांना औषधं पुरविता का म्हणून होणारा त्रास सहन करत, आदिवासींच्या आरोग्यासाठी आपलं जीवन वाहून घेणारे महादेव भाऊ ज्यांना ज्यांना भेटतील त्यांच्यासाठी एक प्रेरणाच बनतील. काम कितीही मर्यादित क्षेत्रातील असू द्या पण तुमची जिद्द आणि चिकाटी याच्या जोरावर ज्या लोकांना तुम्ही आजारांपासून दूर ठेवलं ज्यांचं आयुष्य वाचवलं त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि तुमच्या प्रतीचा आदर हेच प्रशस्तीपत्र, असं मानणारा हा माणूस. महादेवभाऊबद्दल  आदिवासींच्या डोळ्यात दिसणारा जिव्हाळ्याचा बंध आणि आदर कोणत्याही पुरस्कारपेक्षा कमी नाही.

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जंगली डोंगराळ भागात आजही सेलिब्ररल मलेरिया थैमान घालत असतो. गडचिरोलीच्या या 48 भागामध्ये झालेल्या कामाच्या मॉडेलचा सरकारनं इतर अदिवासी भागातील मलेरियाच्या उच्चाटनासाठी उपयोग करून घ्यायला हवा. औषधपाणी, मच्छरदाणी आणि श्रमदान ही त्रिसूत्री आणि स्थानिक भाषेतील गाण्यांच्या माध्यमातून आरोग्य शिक्षण याचा विचार सरकारनं करायाला नक्कीट काही हरकत नसावी. आज महाराष्ट्राच्या अनेक दुर्गम भागामध्ये जिथं सरकार प्रशासन आरोग्य सेवा पुरविण्यात कमी पडतंय त्या भागात अनेक महादेव सातपुते स्वता:च्या वैयक्तिक आयुष्याचा त्याग करून त्या त्या भागातील लोकांच्या आरोग्यासाठी अविरत काम करत आहेत. निसर्गाशी संघर्ष, पोलिस व नक्षलवाद्यांच्या दहशतीचा सामना करत 24 तास ऑन फिल्ड आदिवासींच्या आरोग्यासाठी आणि शहरातल्या लोकांसाठी व सरकारसाठी  वास्तव न जाणता चिल्लर असलेल्या जीवघेण्या मलेरियाशी अविरत लढणाऱ्या महादेव सातपुते याच्या कामाला व जिद्दीला सलाम !

 

  • अभिषेक भोसले

       bhosaleabhi90@gmail.com

 

 

About the Author

अभिषेक भोसले's picture
अभिषेक भोसले