शाळा नावाचं रिमाण्ड होम !

   - श्रीरंजन आवटे

 

 

ज्ञानाच्या अनेक मितींना चार भिंतीत कोंडताना शिक्षणाचा अर्थसंकोच होत रहातो, याचे भान आपल्याला येत नाही. बिनभिंतीची शाळा असण्याचं स्वप्नही आपण पाहू शकत नाही आणि मग शाळा नावाचा कोंडवाडा, रिमांडहोम तयार होतं. सृजनाची, प्रतिभेची शक्ती मारण्याचा प्रयत्न प्रचलित शिक्षणव्यवस्था कशा पध्दतीने करते याचा लेखाजोखा घेणारा तरुण कवी लेखक श्रीरंजन आवटे यांचा लेख

.......................................................

  विनोबा भावेंनी गीताप्रवचनात एक गोष्ट सांगितली आहे- शिक्षण अधिकारी शाळा तपासण्यासाठी जातात. चौथीच्या वर्गातल्या मुलांना प्रश्न विचारतात. अनेक प्रश्न विचारुनही मुलं उत्तरं देत नाहीत. शेवटी संकोचून त्या वर्गाचे गुरुजी शिक्षण अधिका-यांना अत्यंत नम्रतेने सांगतात-“ आपण विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मलाही ठाऊक नाहीत. आडातच नाही तर पोह-यात कुठुन येणार ?” यावर शिक्षण-अधिकारी त्या शिक्षकाला म्हणतात-“ गुरुजी तुम्ही खूप गर्विष्ठ दिसता.” गुरुजींना कळेना. अत्यंत विनम्रतेने आपणाला उत्तरं येत नसल्याचे कबूल केलेले असतानाही शिक्षण अधिका-यांनी आपणाला गर्विष्ठ म्हणावे, हे काही त्यांना समजेना. गुरुजींची अस्वस्थता पाहून शिक्षण-अधिकारी त्यांना सांगतात- “ गुरुजी, तुम्ही आडही नाहीत, नि पोहराही. आड आणि पोहरा यांना जोडणारे तुम्ही आणि मी दोरखंड आहोत.”

     उपरोक्त प्रसंग अतिशय बोलका आहे. शिक्षण-व्यवस्थेतील आपली नेमकी भूमिकाच न समजल्याने शिक्षकांचे रुपांतर वार्डन किंवा तुरुंगाधिका-यामध्ये होताना आपल्याला दिसते. मलाच काय ते अंतिम सत्य गवसले आहे, आणि आता या अडाणी बापड्या विद्यार्थ्यांचे आपण प्रबोधन करणार आहोत, त्यांचा उध्दार करणार आहोत या त्यांच्या पक्क्या धारणेमुळे  शिक्षकांचाही विकास होत नाही नि विद्यार्थ्यांचाही. संस्कार, उपदेश यांचा मारा करु पाहणारा शिक्षकवृंद शिक्षणाच्या प्रक्रियेकडेच गांभीर्याने पहात नाही. शिक्षणाच्या प्रक्रियेचा सखोल अभ्यास करणारे आणि प्रयोगशील विचारवंत म्हणून ख्यातकीर्त असलेले के बी जिनान यांनी अदिवासी मुलांच्या शिक्षणाच्या संबंधाने बोलताना म्हटले होते की- अदिवासी समाजात ‘शिकवणे’ हा प्रकार घडतच नाही. ‘शिकणे’ ही प्रक्रिया होते  कारण शिकणे ही प्रक्रिया नैसर्गिक आहे. शिकवणे ही प्रक्रिया नैसर्गिक नाही तर ती एक कृत्रिम प्रक्रिया आहे आणि शिकणे ही प्रक्रिया दुहेरी आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये दोन्ही बाजूंनी ही प्रक्रिया सुरु असेल तरच ती यशस्वी होऊ शकते.

दुर्दैवाने याची जाण नसलेले शिक्षक/ अध्यापक मंडळी स्वतःला जे योग्य वाटेल तेच मारुन मुटकून विद्यार्थ्यांकडून करवून घेताना दिसतात. मध्यंतरी ‘आयना का बायना’ नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला.  टिपीकल बॉलीवूड पध्दतीची मांडणी करणारा हा  चित्रपट असला तरी त्यातून या रिमांडहोम मधल्या मुलांच्या समस्यांकडे अंगुलीनिर्देश करण्याचे काम दिग्दर्शकाने केले आहे. एकाधिकारशाहीने रिमांडहोम मधील मुलांना बदलू पाहणारा वार्डनच अखेरीस बदलतो आणि माणूस जन्मतः गुन्हेगार नसतो तर परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवत असल्याचे लक्षात घेऊन त्यांच्या आयुष्याकडे ममत्वाने पाहू लागतो. आपल्या आत-आत डोकावले तर आपल्यामध्ये सुधारण्याच्या अनंत शक्यता असतात;पण त्यासाठी मनाची सारी कवाडं खुली हवीत.  हा सिनेमा पहात असताना मला सध्याची प्रचलित शाळा हीच रिमांडहोम सारखी भासू लागली. धाक-दडपशाहीने, दमनयंत्रणेने मुलांना सुधारता येते, या विचाराने बहुसंख्य शाळा आणि शिक्षकमंडळी काम करत असतात. काही पालकही आपल्या पाल्याला चांगली शारीरिक शिक्षा करण्याविषयी शिक्षकांना सांगत असतात. ‘चांगला चोप द्या, त्याशिवाय तो वळणावर येणार नाही’ अशा पध्दतीची भाषा ते वापरत असतात. ( अशा एकाधिकारशाहीत वाढलेल्या मुलांना राजकीय व्यवस्था म्हणून पुढे हुकुमशाहीचे आकर्षण वाटत असेल, तर त्यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही) वर्तनशास्त्राचा आणि मानसशास्त्राचा यत्किंचितही अभ्यास न करणारे शिक्षक महोदय देखील मुलांना झोडपून ‘सुधारण्याचा’ प्रयत्न करत असतात. यातून मुलं सुधारत तर नाहीतच उलट त्यांना शिक्षकांचा, शाळेचा राग यायला लागतो. (अपवाद आहेतच, अपवादाने नियम सिध्द होतो) पदवीचं शिक्षण घेत असताना मी एकदा माझ्या शाळेत गेलो होतो तेव्हा नव्यानेच रुजू झालेले एक सर मला सांगत होते- अमुक एका शिक्षकाचा एवढा दबदबा आहे की सर स्टाफरुम समोर जरी उभा राहिले तरी  दहावीच्या वर्गातलं पोरगं बाहेर पडत नाही.  ( स्टाफरुम आणि दहावीच्या वर्गातलं अंतर बरंच असूनही सरांचा वचक किती आहे, हे कौतुकमिश्रित आनंदाने सर मला सांगत होते. ) मला खरंतर या गोष्टीचं जरासंही कौतुक वाटलं नाही. उलट आपले लाडके सर आले आहेत/ मॅडम आल्या आहेत म्हणून मुलं उत्साहाने तुमच्याजवळ येत असतील तर तो खरा शिक्षक. मुलांसोबतची आनंददायी निकोप मित्रता ही शिक्षक-विद्यार्थी यांच्या नात्याची पूर्वअट असायला हवी. गुरु-शिष्य या नात्यात जो एक समर्पणाचा, शरण जाण्याचा भाव शिष्याकडून अपेक्षिला जातो तो आधुनिक प्रयोगशील शिक्षणाने नाकारलेला आहे.

दुसरी भीती विद्यार्थ्याच्या मनात असते ती पुस्तकी अभ्यासाची नि मार्कांची. हे जे ‘मार्क्स’वादी शिक्षण आहे ते अतिशय घातक आहे. मी शाळेत असताना आम्हाला पुलंचा धडा होता. त्यात त्यांनी एक अतिशय विनोदी प्रसंग सांगितला होता. एका शिक्षकाच्या घरी त्याचे मित्र जेवायला येतात. शिक्षक कौतुकाने आपल्या मुलीने होमसायन्स केलेले आहे, ती कशी सुगरण आहे, तिला होमसायन्सला मार्क्स किती मिळाले वगैरे वगैरे सांगतात. मुलगी जेवायला ताट वाढू लागते तर ताटात फक्त लोणचं आणि चटणी. पाहुणा मित्र आश्चर्याने मुलीकडे पाहतो तेव्हा ती सांगते, “ मला फक्त एवढंच करता येतं. २२ मार्काला लोणचं आणि २८ मार्कांना चटणी. पासिंगला एवढंच पुरेसं!”

होमसायन्सच्या पेपरमध्ये लोणचं आणि चटणी करुन पास होता येतं पण प्रत्यक्ष जगताना संपूर्ण स्वयपाक येणं गरजेचं असतं पण मार्कांच्या ‘आहारी’ गेल्यानंतर लोणचं नि चटणी यावरच आपली भूक भागवून घ्यावी लागेल अशा पध्दतीचा आशय त्यात पुलंनी मांडला होता.  शहरी औपचारिक शिक्षण आणि अदिवासींचं शिक्षण यात फरक करताना के बी जिनान म्हणतात, शहरी लोक शब्द-शिक्षित( word literate) आहेत, तर अदिवासी लोक संवेदना-शिक्षित ( sensely literate) आहेत. अदिवासींच्या अनुभवातून शब्द येतात तर शहरी औपचारिक शिक्षणात शब्दातून अनुभूती घेण्याचा प्रयत्न केला जातो. अदिवासींच्या या खेळकर शिक्षण प्रक्रियेविषयीची पुष्टी अदिवासी संगीताच्या अभ्यासक प्राची दुबळे देखील देतात. ही आनंददायी शिक्षणपध्दत अधिक महत्वाची असल्याचे मत त्या व्यक्त करतात.

ज्ञानाच्या अनेक मितींना चार भिंतीत कोंडताना शिक्षणाचा अर्थसंकोच होत रहातो, याचे भान आपल्याला येत नाही. बिनभिंतीची शाळा असण्याचं स्वप्नही आपण पाहू शकत नाही आणि मग शाळा नावाचा कोंडवाडा, रिमांडहोम तयार होतं. सृजनाची, प्रतिभेची शक्ती मारण्याचा प्रयत्न प्रचलित शिक्षणव्यवस्था कशा पध्दतीने करते याचं एक मार्मिक उदाहरण के बी जिनान यांच्या एका प्रयोगातून समोर येतं- त्यांनी एकच प्रश्न तिसरीतल्या आणि नववीच्या मुलांना विचारला.  प्रश्न असा होता की कंपासचा वापर न करता केवळ पेन्सिल आणि पट्टी यांचा वापर करुन वर्तुळ काढता येईल काय ? नववीतल्या मुलांनी वर्तुळ काढता येत नसल्याचे जाहीर करत हात वर केले. कंपासाशिवाय वर्तुळ काढता येणे अशक्य आहे असं मुलं म्हणाली. तिसरीतली मुलं मात्र विचारात पडली. वर्गातल्या काही मुलांनी पट्टी आणि पेन्सिल यांच्या सहाय्याने वर्तुळ काढलं. जिनान यांनी जेव्हा त्यांना वर्तुळ कसं काढलं असं विचारलं तेव्हा तो मुलगा म्हणाला, “ एक बिंदू काढला. त्याच्यापासून पट्टीच्या सहाय्याने समान अंतरावर बिंदू रेखाटत राहिलो. आणि मग सारे बिंदू जोडले. झाले वर्तुळ.” 

विशिष्ट बिंदूपासून समान अंतरावर असणा-या बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ, ही व्याख्या तिसरीतल्या मुलाला त्याच्या त्याच्या कल्पकतेतून समजली होती. खरं म्हणजे नववीतल्या मुलांना तर वर्तुळाची पुस्तकी व्याख्यादेखील माहीत होती;पण त्यांना पट्टीने वर्तुळ काढता आलं नाही. स्वतःची विचारशक्ती, कल्पनाशक्ती संपवून गाढवी पध्दतीने ठोकळेबाज काम करण्याची सवयच आपली शाळा आपल्याला लावताना दिसते आणि मग ‘मी आणि माझं शिक्षण यात शाळेला मध्ये येऊ दिलं नाही’, या मार्क ट्वेनच्या उपरोधिक वाक्याचा अर्थ आपल्याला समजतो. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या फॅन्ड्रीचे दिग्दर्शक एकदा अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले होते- “ मला आजही शाळा आणि दवाखाना यांची भयंकर भीती वाटते.” गुरुजींच्या हाततली छडी आणि डॉक्टरांच्या हातातलं इंजेक्शन यांची समान भीती वाटणं देखील पुरेसं बोलकं आहे.

शाळेतल्या मुलांना रुग्ण किंवा कैद्यासारखं न पाहता हसत खेळत शिक्षण दिलं तर शाळा सुटल्याची बेल वाजल्यानंतर वेगानं धावणारी मुलांची पावलं मंदावतील नि सकाळी शाळा भरण्याच्या बेलनंतर मुलं वेगानं धावू लागतील आणि शाळेच्या पाय-या संपतील. शाळेचं रुपांतर एका विशाल खुल्या भव्य प्रांगणात होईल गरज आहे ती मनाची सारी कवाडं सताड उघडी ठेवण्याची !

About the Author

श्रीरंजन's picture
श्रीरंजन

शैक्षणिक पात्रताः 

फर्ग्युसन महाविद्यालयातून भौतिकशास्त्रात पदवी- 

  स.प महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी- राज्यशास्त्र 

  

परिचयः-

  • संपादक, पाखरांची शाळा ( बालकांसाठी्चे मासिक)
  • सल्लागार संपादक, सुंबरान (मासिक)
  • ‘कवितारती’, ‘अक्षर’, ‘परिवर्तनाचा वाटसरु’, ‘ऐसी अक्षरे’(ऑनलाइन दिवाळी अंक), ‘अनाहत’ ( इ-नियतकालिक) यामध्ये कविता प्रसिध्द
  •  दै.सकाळ,लोकमत,दिव्य मराठी,महाराष्ट्र टाइम्स, कृषीवल साप्ताहिक लोकप्रभा,कलमनामा, परिवर्तनाचा वाटसरु, ऐसी अक्षरे,’कलात्म’ मध्ये सामाजिक,राजकीय, साहित्यिक विषयांवरील लेख प्रसिध्द.
  •  ‘जागतिकीकरणाचे चित्रण करणारी कविता’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्र, मंचर पुणे येथे याच विषयावरील शोधनिबंधाचे वाचन. 
  • अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये यश संपादन