एका नदीची गोष्ट

नदी वयात येत होती तेव्हाची गोष्ट.. खूप खूप आधी, आपण सगळे जन्माला येण्याआधीची. एक दिवस एक खूप देखणा रुबाबदार तरुण तिच्या काठाशी आला. नदीला झालेलं पुरुषाचं पहिलं दर्शन! तिला तो हवाहवासा वाटला, त्याच्याशी बोलावसं वाटलं.. तो रोज काठावर येत असे. नदीही रोज मनातून त्याची इच्छा करत असे. एक दिवस त्या पुरुषाबरोबर एक स्त्री होती. नदी चालता चालता थबकली. ते दोघं नदीजवळ आले. त्या पुरुषाला जवळून पाहताना आयुष्यात पहिल्यांदाच नदीचं पाणी पाणी झालं.. त्याने विचारलं नदीला “आम्ही आणि आमचे नातेवाईक इथे तुझ्या काठाशी राहू इच्छितो..” नदी विचार करू लागली. नदी ‘हो’ म्हणाली. तो आनंदला, त्याने बरोबर आणलेल्या स्त्रीला मिठी मारली. तेव्हा पहिल्यांदाच नदीला नदी असल्याचा राग आला...

मग तो आणि त्याचे नातेवाईक तिथे येऊन राहिले. त्यांनी झोपड्या बांधल्या. गोष्टीवेल्हाळ भाषेत ते ‘सुखाने नांदू लागले’. तिच्या काठावर येऊन कपडे धुणाऱ्या, पाणी घेऊन जाणाऱ्या बायांशी तिची मैत्री झाली. या सुखासीन जगण्यामागचं दुःख तिने पहिल्यांदाच अनुभवलं.. तिच्या घरात येऊन दगा करणाऱ्या, पाणी वाया घालवणाऱ्या पोराटोरांवर तिने असोशीने माया केली. एकदा एका (संधी) साधू पुरुषाने आता वस्तीमध्ये मंदिर उभारलं आणि नदीचं नामकरण करायचं ठरवलं, ‘गंगा’ असं! नदीने ठाम नकार दिला. जणू तिला कल्पनाच होती तिच्या निर्मळ मनाच्या भविष्यातल्या राजकीय वापराविषयीची...

मध्ये खूप वर्षं गेली..

एकेकाळी तिच्या मदतीने आधाराने उभ्या राहिलेल्या या वस्तीच्या संस्कृतीचा ‘अहम’ वाढला. तिच्या भोवती अनेक गगनचुंबी संस्कृती उभ्या राहिल्या, तिचाच तिरस्कार करणाऱ्या. ह्या संस्कृतीचा बोकाळलेला अहम ती हताश होऊन पाहत होती. तिच्या घराचं अंगण या संस्कृतीला हानिकारक वाटणाऱ्या कचऱ्याने भरून गेलं होतं..

तरीही नदी जगत होती.. कोरड्या मनाने, हतबलतेने. ते पहिलं जोडपं परत येईल या आशेवर! या मधल्या काळात तिने अनेक मृत्यू अनुभवले होते..

आता नदी माणूस होण्यासाठी प्रार्थना करत होती. तिला मरण हवं होतं..  

About the Author

निखिल घाणेकर

निखिल घाणेकर