मध्यरात्रीनंतरचे तास

मध्यरात्रीनंतरचे तास

 

चांगल्या कादंबरीचं श्रेष्ठत्व हे असतं की एका संपूर्ण वेगळ्या जगाचाच सखोल अनुभव कादंबरी आपल्याला देते.
तामिळनाडू मधली मदुराईजवळची एकदोन लहानशी गावं आहेत तिथे ही कादंबरी घडते.
कादर आणि करीम हे गावातील तालेवार भाऊ, त्यांच्या अनुक्रमे बायका रहीमा आणि जोहरा ,त्यांच्या अनुक्रमे मुली वहीदा आणि राबिया हे कादंबरीतलं मुख्य कुटूंब आहे.
बाकी त्यांचे शेजारी ,अनेक नातेवाईक या सगळ्यांमधे कादंबरी फिरत राहते.
राबिया आणि तिचा मित्र अहमद यांच्या पौगंडवस्थेतील प्रेमकथेची झालरही कादंबरीला शोभून दिसते.राबिया , अहमद आणि राबियाची मैत्रीण मदिना यांचा अजब ताणलेला प्रेमत्रिकोणही इथे आहे.
...
मुस्लिम समाजात असतो तसा इथे नात्यांचा घोळ आहे. कारण मावस, चुलत, आते , मामे सर्व भावंडांत लग्नसंबंध आहेत. वाचत जाऊ तशी कादंबरी पकड घेते.
मुस्लिम धर्म आणि समाज स्त्रियांविषयी किती टोकाचा अन्यायकारक आहे याचा सतत अनुभव कादंबरीत येतो. त्यात राबिया,मदीनासारख्या मुलींचे बालपण चुरगळून जाते. वहीदा आणि फिरदौसचे तारूण्यही होरपळून जाते.
इथे सतत बंदी आणि केवळ बंदीच आहे. अगदी साध्या साध्या गोष्टींत बंदीच आहे. 
घराबाहेर पडायला बंदी , आरामशीर बसायची बंदी , शिक्षणाची बंदी , मनोरंजन करून घेण्याची बंदी , खाण्यापिण्यावर बंदी आणि शरीराच्या नैसर्गिक हाकांना प्रतिसाद देण्याचीही बंदीच आहे. 
मोकळा श्वास घेण्याची आणि पर्यायाने जगण्याचीही बंदीच जणू.
याचं पर्यवसन काही स्त्रियांच्या बंडखोरीत आणि शेवटी त्यांच्या भीषण मृत्यूत होतं.
लैंगिकतेविषयी बोलताना यातल्या काही बायका इतकं वखवखून बोलतात की आपण आश्चर्यचकीत व्हावं. भावना दाबल्यावर त्या अजूनच उसळतात याचं हे एक उदाहरण आहे.
राबिया , मदीना , फातिमा , शरीफा , फरीदा , वहीदा , फिरदौस, नजीमा , मुमताज, रहीमा , जोहरा या सगळ्यांची ही कहाणी केवळ यांचीच न राहता सगळ्याच स्त्री जातीची होऊन जाते .या बायकांच्या अवस्थेची इतकी कीव येते की राबियाच्या त्या लाकडी बाहुल्यांसारख्याच या बायकाही लाकडाच्या होऊन जाव्यात असे वाटू लागते.
आत्ममग्न देखणी वहीदा फक्त शरीरभुकेने वखवखलेला उथळ नवरा मिळवते आणि सोबत वाईट नजरेचा सासराही मिळतो.
नवरा कुरूप आहे म्हणून तलाक घेऊन आलेली देखणी फिरदौस हिंदू शेजाऱ्या सोबत झोपते म्हणून तिची आईच तिला विष देऊन ठार मारते.
धाडसी फातिमा हिंदू माणसाचा हात धरून पळून जाते म्हणून तिच्या वृद्ध आईवर भुकेने मरण्याची वेळ येते.
साठीच्या श्रीमंत पुरूषाला चार त्याच्या मुलीच्या वयाच्या बायका मिळतात.
भरपूर हुंडा घेऊन भरपूर शोषण केले जाते.
केवळ पाळी आली म्हणून मुलीला घरात डांबून तिचे शिक्षण बंद केले जाते.
ही सगळी उदाहरणे पुरेशी आहेत की हा अतिशय हीन आणि गलिच्छ समाज आहे.
पार्श्वभूमीला नेहमीचे ताणलेले हिंदू मुस्लिम संबंध इथे आहेतच. हिंदू मुस्लिम एकत्र मिसळून राहणारी ही गावं.या मुस्लिम बागायतदारांना हिंदू कामकरी चालतात, त्यांच्या बायका लपूनछपून उपभोगायला किंवा रखेल म्हणून चालतात परंतू राजरोसपणे हिंदू मुस्लिमांनी एकत्र होणे मात्र चालत नाही. तिथे धर्म बुडतो.
......
हे सगळं अतिशय धाडसीपणे लिहिणाऱ्या मूळ लेखिका सलमा हिच्या धाडसाविषयी आदर वाटू लागतो.
सोनाली नवांगुळ हिने या इतक्या विस्तृत कादंबरीचा उत्तम अनुवाद केला आहे. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवाद करताना लेखनाचा आत्मा जपून तो आणणं महत्वाचं असतं. ते इथे सोनालीने केलं आहे.
.......
काही तमिळ शब्द तसेच ठेवले आहेत. त्या शब्दांचा किंवा पदार्थांचा अर्थ शेवटी परिशिष्टात दिला असता तर वाचकाला बरे झाले असते.
चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मुखपृष्ठ अत्यंत अर्थवाही आणि समर्पक आहे.
जितकी समाजात करकचून बांधणारे नियम, बंधनं जास्त तितक्या विकृतीही जास्तच.
तमिळ मुस्लिम समाजातील सगळ्या स्त्रियांची ही भयानक घुसमटलेली अवस्था आपल्याला खोलवर हीच जाणीव करून देते. एकूणच भारतीय स्त्रीच्या एका दबलेल्या समुहाच्या घुसमटीला वाचा फोडणारी ही एक वाचनीय कादंबरी आहे.
-जुई कुलकर्णी

----
मध्यरात्रीनंतरचे तास

लेखिका :सलमा
अनुवाद: सोनाली नवांगुळ,-मनोविकास प्रकाशन 

About the Author

जुई कुलकर्णी's picture
जुई कुलकर्णी

चित्रकार आणि कवी : जुई कुलकर्णी 2009 पासून फेसबुकवरून चित्र आणि कविता प्रकाशित .

स्व शिक्षित चित्रकार .

कवरपेज डिझायनिंग : मिळून साऱ्याजणी मासिक फेब्रुवरी 2012

मॅड स्वप्नांचे प्रवाह - काव्य संग्रह

शक्यतेच्या परिघावरून - काव्य संग्रह (आगामी)

रेखाटने : काही तीव्र मंद्र काही - काव्य संग्रह 'श्वासाचं बांधकाम ' हा स्वतःचा कविता संग्रह प्रकाशित

अक्षर दिवाळी अंक , 'व' मासिक यातून कविता प्रकाशित .