पिंक स्लिप डॅडी : कथासंग्रह

पिंक स्लिप डॅडी : कथासंग्रह 
~ गीत चतुर्वेदी Geet Chaturvedi

~ राजकमल प्रकाशन 
....

अतिशय उत्तम फिक्शन हे वास्तव आणि कल्पनेचं सर्वोत्तम काॅकटेल असतं.

'पिंक स्लिप डॅडी' हा तीन दीर्घकथांचा संग्रह हे याचंच यथार्थ उदाहरण आहे

या सर्व कथा सर्व प्रकारच्या स्त्री पुरूषांच्या कथा आहेत. यात सर्व रस आले आहेत. बीभत्सरसापासून श्रृंगाररसापर्यंत.

प्रत्येक कॅरेक्टर हे मेहनत करून बारीक बारीक तर्हेने तासून घासून पुसून लिहले आहे. तरी ही लोकं खोटं वाटत नाहीत . कधीकधी हे लोकं अॅब्सर्ड वाटू शकतात पण तरीही ते सगळे आपल्याच दुनियेचा भाग वाटतात. हे लेखकाचं यशच असतं कारण तो प्रतिईश्वराच्या भूमिकेमधे जातो.

सिमसिम :
आपण वाचण्याच्या आयुष्यात खूप कथा वाचतो. काही कथा जीवाच्या जवळ येऊन बसतात. त्यातील ही ' सिमसिम'.
'सिमसिम' मधला आपल्या लायब्ररीतील पुस्तकांना पोटची पोरं मानणारा गोड सिंधी म्हातारा त्याच्या पेरूसारख्याच आंबटगोड चविष्ट लवस्टोरीसारखाच हुरहूर लावणारा आहे.

त्याची बायको मात्र जीवाला चटका लावून जाणारं कॅरेक्टर आहे.

दिलखुश सम्बोसावाला आणि त्याची जाणूनबूजून केली जाणारी वाताहत दुखवते.

पैसा आणि सत्तेच्या जोरावर
बळजोरीने लादले जाणारे बदल काय काय उद्ध्वस्त करून किती जिवांच्या चिथड्या उडवतात.

पोएटिक प्रोज खूप आनंद देतं.
पिवळी खिडकी आणि ' ती ' दोघं आणि त्यातील म्हातारबांचा तिसरा कोन हे सगळं अतिशय जमून आलेलं रसायन आहे. स्वप्निल रसरशीत भन्नाट रोमँटीक अशी ही कथेतील कथा आपल्याच मनाचे घट्ट दरवाजे 'खुल जा सिमसिम' करत उघडते.

या कथेमधील पुस्तकांचं नृत्य हा एक विलक्षण जिवंत व्हिजुअल पाॅईंट आहे. कुणीतरी सिनेमा करा रे याचा.

...

पिंक स्लिप डॅडी:
काॅर्पोरेट फिक्शन हा नेहमीच रोचक प्रकार असतो.
यातला पिएसडी म्हणजे प्रफुल्ल शशिकांत दाधिच एक निखळ काॅर्पोरेटीय संधीसाधू निर्घृण मॅनेजरचा बेकार नमुना आहे.
वाचकाला दया यावी अशी त्याची सायको बायको सबीना आणि प्रेमिका अजरा जहांगीर आहेत. निबरट्ट गेंडा कातडी जयंत पाल आणि त्याची करूण बायको विंध्या आहे. हरामखोर बाॅस राजकुमार पसरिचा आहे.
नताशाबेन आहे.
सगळ्यांत उठून दिसते ती टॅरो कार्ड रिडर पृशिला पांडे. ही दणकट बाई ज्या पद्धतीने लिहलीय ती बघून पिकासोच्या दणकट बायकाच आठवतात.

पिंक स्लिप डॅडीमधील मधले पोएटिक भाग विचार करण्यासाठी जबराट मटेरियल आहे.

...

गोमूत्र :
बाजार ही सध्याच्या जगाची वास्तविकता आहे. जगण्यापासून मृत्यूपर्यंत, खाण्यापासून हगण्यापर्यंत, प्रेमापासून खूनापर्यंत आपण बाजारच झालो आहोत.
एकतर विकणारे आहोत नाहीत विकले जाणारे आहोत. खरीदणारे तिथे पलीकडच्या किनारी आहेत.

या बाजाराच्या तावडीत सापडलेल्या करकचून गळा आवळलेल्या एका सामान्य माणसाची भयंकर सटायर शोकांतिका म्हणजे 'गोमूत्र'. 
या कथेत बाबा हा नमुनेदार बाॅस भेटतो.

यात आपले मराठी wink emoticon ज्ञानेश्वर भेटतात.
अष्ट चिरंजीव भेटतात. अद्वैत सिद्धांतपण भेटतो आणि या बाजाराचा , इकाॅनाॅमीचा प्रत्येक पैलू जिवंत होऊन भेटतो. 
या पूर्ण कथेची ट्रीटमेंट अतिशय विलक्षण वेगळी आहे . 
ही कथा शेवटी तुम्हाला सून्न करून टाकते.
………………………

राजकमलची पुस्तक क्वालीटी अत्यंत उत्कृष्ट आहे. किंचीतशी तक्रार आहे ती कव्हरविषयीच.
अश्या उत्कृष्ठ लिखाणाला तसंच न्याय देणारं चित्र हवंय.

हिंदी आपली सख्खी मावशी भाषा तरी आपण तिच्यात काही वाचत नाही.
हिंदीचं आधुनिक साहित्य किती समृद्ध आहे याची एक झलक मिळते गीत चतुर्वेदी यांच्या लिखाणातून.

~ जुई

About the Author

जुई कुलकर्णी's picture
जुई कुलकर्णी

चित्रकार आणि कवी : जुई कुलकर्णी 2009 पासून फेसबुकवरून चित्र आणि कविता प्रकाशित .

स्व शिक्षित चित्रकार .

कवरपेज डिझायनिंग : मिळून साऱ्याजणी मासिक फेब्रुवरी 2012

मॅड स्वप्नांचे प्रवाह - काव्य संग्रह

शक्यतेच्या परिघावरून - काव्य संग्रह (आगामी)

रेखाटने : काही तीव्र मंद्र काही - काव्य संग्रह 'श्वासाचं बांधकाम ' हा स्वतःचा कविता संग्रह प्रकाशित

अक्षर दिवाळी अंक , 'व' मासिक यातून कविता प्रकाशित .