अनोळखी व्हावे पुन्हा

रिमझिम पडणारा पाऊस, समोर वाफाळता चहा, ऑफिसाचं वा कॉलेजचं काम याचा वेग मंदावलेला आहे. तर एखाद्यावेळी तुम्ही घरी आहात आणि लाईट लंपडाव खेळत आहे असं समजा. पावसाळ्यात हे सर्व आपल्या परिचयाचं आहे. पावसामुळे होणारी गरसोय जरा बाजूला ठेवू या. पावसासोबत येणा-या आवडत्या गोष्टींचाच विचार करू या.

आवडीचं गाणं, मित्रमैत्रिणींचा घोळका इत्यादी. या सर्व गोष्टी तुमच्या हाताशी थोडा रिकामा वेळ आहे. डोक्याला जरा शांतता आहे असं असेल तर जास्तच भावतात. अशा पाऊसवेळी तुम्ही गर्दीत जात आहात, कुणाचा तरी धक्का लागतो. उगाच आरडाओरडा न करता समजून तुम्ही पुढे जाता. कधी हसून सोडून देता.

अनोळखी माणसावर रागावताना आपण दोनदा विचार करतो. त्या अनोळखी माणसाऐवजी तिथं कोणी ओळखीचं असेल तर? त्या व्यक्तीचा उद्धार ठरलेला! हक्काच्या माणसांशी आपण जरा गृहीत धरून वागतो. आपली आवडनिवड हट्ट आणि अपेक्षा जास्त बाळगतो. त्यामुळेच नाती टिकवणं जास्त जिकिरीचं होतं. नातं तुटतं, एकटेपणाला स्वीकारावं लागतं.

एकटं पडणं वेगळं, आपण नेहमी एकटं असावं, एकटयानं भटकावं, सगळ्या सुखसोयीचा उपभोग एकटयानं घ्यावा असं फार कमी जणांना वाटतं. लिव्ह मी अलोन असं आरडाओरडा करणा-यालाही कधी तरी सुखात वा दु:खात वाटेकरी हवा असतो. पण त्याउलट असं हक्काचं कुणी जवळ नसेल, गर्दीची एक सोबत असते. त्या गर्दीत अगदी अनोळखी माणसं असली तरी. मग ती गर्दी एखादी पार्टी, लग्नसमारंभ, मॉल वा अगदी सिनेमा थिएटरची असू शकेल. त्या गर्दीत एकटेपणा संपण्याची शक्यता असते.

अशाच एका गर्दीत तो उभा होता. नात्यांचा त्याचा अनुभव म्हणजे दोन ब्रेक अप, एक घटस्फोट, दुसरं लग्न.. सध्याच्या वेगवान जगण्यात नाती टिकवणं सोपं नाही. त्याच्यासारखी उदाहरणे कमी नाहीत. नुसतं डेटिंग, लिव्ह इन, ओपन मॅरेज हे सर्व आज विवाहसंस्थेबरोबर समांतरपणे अस्तित्वात आहे. प्रत्येक नात्यात अपेक्षा, रागलोभ, संवाद या सगळ्याचा ताळमेळ राखणं सोपं राहिलेलं नाही.

रस्ता क्रॉस करून तो दुस-या बाजूला असलेल्या कॅफेत शिरला. त्यानं एक खुर्ची ओढली आणि तो बसला. त्यानं कॉफी सांगितली. त्याचा मित्र ५ मिनिटात तिथे येणार होता. त्याच्या शेजारच्या टेबलावर चार जणी मोठयानं बोलत होत्या, हसत होत्या.. त्यांचे हातवारे आणि हालचालींमुळे त्याने खुर्ची एक-दोनदा अगदी त्याच्या टेबलाजवळ सरकवली.

कॅफेतले इतर लोकही अधून मधून त्यांच्याकडे कटाक्ष टाकत होते. पण त्या चौघींना त्याची पर्वा नव्हती. त्याचा मित्र आला. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. पण त्या चौघींचं हसणं-खिदळण सुरू होतं. एकीचा फोन तिच्या हातातून काढून तिघी तिला चिडवत असाव्यात. तो फोन हातातून निसटला आणि त्याच्या मांडीवर पडला. फोन तिथे पडायला आणि रिंगटोन सुरू व्हायला एकच गाठ पडली!

तो रिंगटोन त्याच्या चांगल्याच परिचयाचा. तीच असेल का? त्याच्या मनात विचार आला. तेवढयात तिनं त्या बाजूला मान वळवली. जिचा फोन होता, ती त्याच्याकडे पाहत होती, फोन परत घेण्यासाठी. पाच वर्षानी दोघं समोरासमोर आले होते. तिला पाहिल्यावर हा उसळला. रागाच्या भरात तिला मनाला येईल ते बोलला. ती गप्प बसली नाही. उरलेल्या तिघी आणि सर्व कॅफे त्यांच्याकडे बघत होते. मग तो निघून गेला.. ती मागेच थांबली. एव्हाना मित्राला आणि इतरांना अंदाज आला होता.

प्रेमाचं हे असंही सार्वजनिक प्रदर्शन आपल्याला आता दिसतं. तुम्हाला तुमच्या प्रेमाची लक्तर भिंतीवर टांगलेली चालतील का? कराल का तुम्ही असं काही? प्रेम केलं असेल, त्या व्यक्तीपासून दुरावला असाल तर एक गोष्ट मनात पक्की करा. ती व्यक्ती निघून गेली म्हणजे परत भेटणार नाही, असं नाही.

शेजारी, बॉस, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, एखादं सेलेब्रिटी अशा कोणत्याही स्वरूपात तिची आणि तुमची भेट होऊ शकते. पण ती वेळ सूड घेण्याची नाही. ती वेळ नातं पुन्हा जुळेल अशा भ्रमात राहण्याची सुद्धा नाही. आपल्या प्रेमाचा मान राखण्याची ती वेळ आहे. स्वत:च्या निवडीबाबत आदर बाळगण्याची ती वेळ आहे.

पाऊस पडून गेला की दाटलेलं मळभ दूर होतं. सृष्टी ताजीतवानी होते. रस्ते, अंगण, इमारती, गाडया स्वच्छ होतात. तसं तुमच्या मनाचं होऊ द्या. पाऊस येतो म्हणजे काय हे माहिती असलं तरी आपण पावसाची वाट बघतो. तसंच प्रेमाचं आहे. पावसाच्या सरी, पावसाचे थेंब मनात रेंगाळतात. तसंच प्रेमाचं असतं. आपलं असफल प्रेम पुन्हा समोर आलं तर पाऊस येऊन गेला असं समजा. तुम्ही सृष्टीसारखं ताजंतवानं व्हा.

ज्या चांगल्या सुखाच्या दोन गोष्टी असतील त्याचं स्मरण करा. भांडण, शिवीगाळ, सुडाची भावना, कमी लेखणं टाळा.. त्यानं तुमची सध्याची प्रेमाची माणसंही दुरावतील. ज्या व्यक्तीवर प्रेम केलं तिनं काही चूक केली तर अनोळखी माणसावर तुम्ही अशा वेळी किती रागावला असता? त्याहून जरा कमी आरडाओरडा हक्काच्या व्यक्तीवर करा.

एकमेकांच मन जपणं सोपं नसतं, असं म्हणत आपण अनोळखी व्यक्तीशी तोंडदेखलं का असेना पण गोड बोलतो. संयमानं प्रसंगाना सामोरं जातो. आज अनोळखी असलेली व्यक्ती उद्या परिचयाची होऊ शकते. कधीतरी मैत्री जुळू शकते. कधी ती व्यक्ती अधिक जवळ येते अशी शक्यता आहेच. तशीच कालांतराने कधी ती दुरावते सुद्धा. हे वर्तुळ पूर्ण होतं. संधी द्यायची असेल तर ती जवळच्या व्यक्तीला द्या. नात्याचा मान राखा.

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह