अहमदच्या डिजीटल घडयाळाने दिलेला अलार्म

अहमद मोहमद नववीतला पोरगा...अवघ्या चौदा वर्षांचा...मूळचा गरीबीने ग्रासलेल्या सुदानमधला पण सध्या अमेरिकेतील टेक्सास मधल्या मॅक आर्थर स्कूलचा विद्यार्थी ..!! गडयाला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये कमालीचा रस... अगदी या सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयातील गोष्ट. काही तरी सर्किट जोडून आणि आणखी काहीबाही करुन बहादराने एक डिजिटल घडयाळ तयार केले, घरच्या घरी... या वयातला उत्साह.. अहमदला वाटले हे घडयाळ आपल्या टीचरना दाखवावे.. टीचर खुश हो जायेगी तो क्लास में अपना वट बढेगा.. म्हणून त्याने हे घरच्या घरी तयार केलेले घडयाळ शाळेत नेले आणि आपल्या शाळेतल्या बाईंना दाखविले पण झाले भलतेच ... बाईंनी या काळ्या सावळ्या पोराकडे पाहिले .. अहमद मोहमद ..आणि त्या डिजिटल घडयाळाकडे पाहिले.. त्यांना वाटले, हा बॉम्ब असावा.. त्यांनी प्राचार्यांकडे तक्रार केली प्राचार्यांनी चक्क पोलिसांना बोलावले.. पोलिसांनी या कोवळ्या पोराला चक्क हातकडया घातल्या... अरे, डाऊट आला तर चौकशी करा.. ते घडयाळ खोलून पाहा पण चौदा वर्षाच्या पोराला हातकडया..? आणि अहमद आपल्या आई बाबांना बोलवा म्हणतो आहे तर तुझी चौकशी सुरु आहे, त्यात कोणालाही बोलाविता येणार नाही, असे पोलिस ऑफिसर सुनावतो आहे. त्या पोराला आपला नेमका गुन्हाच कळेना, आणि आपल्या घडयाळाला हे लोक बॉम्ब का म्हणताहेत, तेही कळेना... अरे पण या पोरावर संशय घ्यायला या मुलाचे पूर्वीचे काही रेकॉर्ड तरी पाहाल की नाही? तो कधी उध्दट पध्दतीने वागला आहे का, आक्रमक झाला आहे का, त्याच्या वर्तनात काही असामाजिक या पूर्वी शाळेला आढळले आहे का? तर्कशास्त्र हद्दपार... बालमानसशास्त्र बाद ... अहमदला काहीही त्रास न देताही त्या वस्तूची तपासणी करुन खातरजमा करता आली असतीच की, आणि खरोखरच काही वावगे आढळले असते तर रितसर कायदेशीर प्रक्रिया करता आली असतीच की पण एवढा विचार करतो कोण? त्या लहान जीवावर, त्याच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल याच्याशी तर कोणाचे देणेघेणेच नाही, इतक्या असंवेदनशील पध्दतीने कोणी अशा गोष्टी हाताळू शकते? तेही अमेरिकेत? बालमानसशास्त्र नावाची काही चीज या शाळेच्या आणि पोलिसांच्या गावीही नसावी... शाळा प्रशासनाने नको ती संशयास्पद आणि धोकादायक वस्तू शाळेत आणली म्हणून अहमदला शाळेतून तीन दिवस निलंबित केले.. अखेरीस त्या घडयाळात काही धोकादायक सापडले नाहीच पण या निमित्ताने पुन्हा एकदा ‘इस्लामफोबिया’ चे दर्शन झाले... आता या पोराचे कौतुक करायला फेसबुक, गुगल, एम आय टी सारेच पुढे आले आहेत.. पण सगळ्यात उल्लेखनीय आहे ती बराक ओबामांची प्रतिक्रिया... त्यांनी या लहानग्या धडपडया मुलाला चक्क व्हाईट हाऊसला येण्याचे निमंत्रण दिले आहे, तेही त्याच्या कुल डिजिटल घडयाळासोबत...! तुझ्यासारख्या कल्पक पोरांमुळेच अमेरिका महान बनली आहे, हे ही त्यांनी आवर्जून नमूद केले आहे...ओबामांच्या या ट्वीटला चार लाखांहून अधिक जणांनी रिट्विट केले आहे. स्टॅण्ड विथ अहमद अशी मोहिमच ट्विटरवर सुरु झाली आहे. आपले पूर्वग्रह, आपले आकस, आपले धर्म आपण या निरागस पोरांच्या आयुष्यात टाईम बॉम्बसारखे पेरत आहोत का? अहमद आणि त्याच्या पिढीतील मुलांची घडयाळे डिजिटल झाली आहेत पण आपण आपल्या बंद पडलेल्या मध्ययुगातील घडयाळात धावणारा वेळ पाहतो आहोत.... उदया ठायी ठायी सुरुंग पेरलेल्या जमीनीवरच जगायचे नसेल तर आपण वेळीच सावध व्हायला हवे.. आपल्याला तोडणा-या बाबींपेक्षा आपल्याला जोडणा-या बाबी अधिक आहेत, बलवान आहेत, हे बराक ओबामांचे वाक्य या निमित्ताने लक्षात घ्यायला हवे.. अहमदचे घडयाळ एका धोकादायक वेळेची जाणीव आपल्याला करुन देते आहे... डिजिटल युगात घडयाळाचे काटे गळून पडले पण आपल्या मनातले काटे अजून निघायला तयार नाहीत.. अहमदच्या डिजिटल घडयाळाने दिलेला अलार्म आपल्या ‘बहि-या’ कानावर पडणार की नाही ? आणि मुख्य म्हणजे, बराकची मैत्री तो-याने मिरवणारे आपण या समंजस मित्राकडून काही गोष्टी शिकणार की नाही , हाच मोठा प्रश्न आहे . अशा अनेक महत्वाच्या प्रसंगी बराक ओबामांनी जी संवेदनशीलता दाखविली आहे, अवघड परिस्थितीत दोन फाटलेले किनारे जोडण्याचा, वेळीच टाका घालण्याचा तो शहाणपणा दाखविला आहे त्याचे सा-यांनीच कौतुक केले आहे. २००९ मध्ये अशीच एक घटना अमेरिकेतल्या केंब्रिजमध्ये घडली होती. झाले होते ते असे, विद्यापीठातील एक नामवंत प्राध्यापक आणि संशोधक हेनरी गेटस हे चीन मधील आपली संशोधन परिषद आटोपून हार्वर्ड विद्यापीठातील आपल्या निवासस्थानी परतले होते. आणि त्यांना घराचे पुढील दार उघडेना. त्यांनी मागच्या दाराने घरात प्रवेश केला आणि पुढचे दार आतून उघडण्याचा प्रयत्न केला पण तरीही ते जमेना अखेरीस त्यांनी आपल्या ड्रायव्हरच्या मदतीने दारावर धक्के मारायला सुरुवात केली. या आवाजाने शेजारी राहणा-या बाईंचा संशय बळावला. त्यांना वाटले, हे दोघेजण घरफोडी तर करत नाहीत ना ? त्यांनी पोलिसांना कॉल केला. जेम्स क्रॉऊले नावाचा पोलिस ऑफिसर घटनास्थळी पोहचेपर्यंत हेनरी गेटस दार उघडण्यात यशस्वी झाले होते. पोलिस ऑफिसरने चौकशी सुरु केली. ‘ हे माझेच घर आहे,’ हे प्राध्यापक महोदय समजावून सांगत होते पण पोलिस ऑफिसर त्याचा पुरावा मागत होता, त्याने प्राध्यापकाचे ओळखपत्र मागितले. मग प्राध्यापक ही चिडले. तू मी झाले आणि क्रॉऊलेनी त्याचा पोलिसी हिसका दाखविला त्याने चक्क हेनरी गेटसना अटक केली, हातात बेड्या ठोकल्या. हेनरी गेट्स कृष्णवर्णीय तर पोलिस ऑफिसर गौरवर्णीय... प्रकरण खूप गाजले.. मेडियात उलट सुलट मते व्यक्त झाली. त्यात एका पोलिस ऑफिसरने हेनरी गेटसारख्या विद्वानाला ‘जंगली मंकी’ म्हटले. त्याला आपली नोकरी गमवावी लागली. म्हटले तर, एका पोलिस स्टेशनचा मामला.. पण या मुळे दोन समाजगटात तणाव निर्माण होतोय हे लक्षात येताच बराक ओबामांनी त्यात वेळीच लक्ष घातले. त्यांनी हेनरी गेटस आणि पोलिस ऑफिसर जेम्स क्रॉऊले यांना व्हाईट हाऊसमध्ये बिअर पार्टीसाठी बोलावले. या पार्टीला स्वतः ओबामा आणि उपाध्यक्ष बिडेन उपस्थित होते. या बिअर समिट मध्ये गेट्स आणि क्रॉऊले यांची मनमोकळी चर्चा झाली. मनातले मळभ दूर झाले. झाला प्रकार, गैरसमजातून झाला हे दोघांच्याही लक्षात आले. या बिअर समीटनंतर दोघांमध्ये समेट झाला. गेटस तर विनोदाने म्हणाले, “अरे हा जेम्स क्रॉऊले तर माझा दूरचा भाऊ निघाला. आमच्या दोघांच्याही वंशावळीचे मूळ आयरिश आहे.मी त्याचे डी एन ए नमुना मागितला आहे आणि जेम्सने मला घातलेल्या हातकडया तो मला भेट देणार आहे. त्या ऐतिहासिक असल्याने आम्ही त्या संग्रहालयात ठेवणार आहोत.” या प्रसंगाने ‘ कोणताही वाद चिघळता कामा नये, हा प्रसंग सा-या अमेरिकेसाठी एक शिकवण आहे’, या भरतवाक्याशी सारे आले. “काम रिस्की था , व्हिस्कीने किया बेडा पार...” तसेच इथे घडले. फरक इतकाच येथे व्हिस्की ऐवजी बिअर होती. पण आजकाल आम्हांला काहीच बेअर होत नाही, आम्हांला लगेच सारे काही अनबिअरेबल होते. पूर्वग्रहांच्या, सूडाच्या अनाठायी हातकडया संग्रहालयात ठेवायची गोष्ट आहे, हे आम्ही कधी शिकणार? अशा हातकडया आपली सर्जनशीलता, गतिमानताच मारुन टाकतात, ही समज येणे एवढेच त्यांचे मोल. त्या हातात मिरवून स्वतःला अपंग बनविण्यात काय आनंद? ओबामांचे राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध यातले मला काही कळत नाही पण प्रत्येक छोटया छोटया गोष्टीतून या माणसाची सर्वसमावेशकता, संवेदनशीलता आपल्याला अधिक माणूस बनवत जाते, हा माझा नेहमीचा अनुभव आहे.. हेनरी गेटस असतील नाही तर अहमद मोहमद , माणसाच्या कातडीचा रंग आणि त्याच्या जात धर्माच्या प्रमाणपत्रा पलिकडे खरा माणूस असतो.. एका चिमुरडयाच्या इवल्याशा डिजिटल घडयाळाने आपल्याला भानावर आणले आहे , एक अलार्म वाजविला आहे. मात्र, अलार्म वाजला तरी जागे व्हायचे की नाही, हे आपल्यावरच अवलंबून आहे. -
डॉ. प्रदीप आवटे
( लेखक बालरोगतज्ञ असून आरोग्य अधिकारी म्हणून राज्य शासन सेवेत कार्यरत आहेत. 'धम्मधारा'हा कवितासंग्रह,'जग्गूभैय्या झिंदाबाद' कुमारकथासंग्रह प्रसिध्द. )

About the Author

प्रदीप आवटे