जन्म आणि मृत्यू

जन्म आणि मृत्यू

वाट अंधारली होती
तरी ती चालत होती
आतल्या आणि बाहेरच्या
दोन्ही काळोखांनादोन्ही हातांनी बाजूला सारत
ती चालतच होती
आठवत होतं तिला 'तिचं' घर
तिचं असं नव्हतं काही उरलं
वैधव्यामुळे सौभाग्यासह
सगळं जणू होतं सरलं
 

होती ती निराधार
दुःख होतं अपरंपार
लहान तिच्या पुतण्याचा
एकच होता छोटा आधार

 
त्या आधाराला घट्ट धरलेलं तिने
लहानाहून झाली लहान
चिमखडे त्याचे बोल ऐकताना
मातृत्वाची भागली तहान

 
एके दिवशी अचानक
कोण जाणे कशाची दृष्ट लागली
डोळ्यांसमोर तिच्या अंधारी येऊन
श्वास थांबून शुद्ध हरपली
 

बहुतेक हेच मरण असावं… 
वाटलं तिला, एकदाची सुटले! 
घरातल्यांनीही हळूच मग
सुटकेचे निःश्वास टाकून घेतले
 

स्मशानात तिचं प्रेत
असंच उघड्यावर पडलं होतं
चेतनाहीन शरीर ते
ज्वालांची वाट पाहात होतं

 

पण… अहो आश्चर्यम !
कुठलीतरी अनामिक उर्जा
तिच्या शरीराला गेली स्पर्शून
जीवनशक्ती संचारताना
अनामिक भीती आली दाटून
उठलीच ती दचकून मग
स्वतःला चाचपत होती
वाट अंधारली होती
तरी ती चालत होती

………………………

 

हे जगणं कि मरणं
काहीच उमगत नव्हतं
मृत्यूने हळूच हुलकावणी देऊन
जगण्याचं दार लावलं होतं
त्यापूर्वी कितीतरी वेळा, ती जिवंतपणे मेली 
अंधाऱ्या या विजानात मात्र, पुन्हा जीवित होत होती
 
पुनर्जन्मच हा वाटला तिला
आयुष्यात पहिल्यांदा ती मोकळा श्वास घेत होती
आयुष्यात पहिल्यांदा ती आपल्या नादात चालत होती
जगाच्या दृष्टीने तिचं असणं संपलं होतं
गोंधळाच्या भोवऱ्यात मन गोल गोल फिरत होतं

माणसं घाबरतात भूतांना
तशी भूतंही घाबरतात माणसांना
मृत्युनदीचा पैलतीर
भयभित करतो दोघांना 

 
मर्त्य माणसांच्या जगाची कल्पना मनात काहूर माजवत होती
का स्मशानशांतता अचानकशी अधिक जवळची वाटत होती!
 

पावलं काही भुतासारखी उलटी उलटी पडत नव्हती
तरीही ती थांबत नव्हती
वाट अंधारली होती
तरी ती चालत होती

……………………

 

तोंड छपवून पदरात, भीती दडपून उरात
टाकलं तिने पाऊल हळूच तिच्या घरात
पुतण्या तिचा हरखालाच, तिला अचानक पाहून
हात पसरले लगेच त्याने, 'काकी' म्हणून, गोड हसून
 
' पुन्हा मरणार नाहीस ना गं ? ' प्रश्न त्याचा पहिला
थिजलीच ती जागच्या जागी, काय उत्तर द्यावं याला ?
असंच तोंड छपवून आता मागे ती फिरणार होती
जिवंत माणसंही याच्यापेक्षा वेगळं काय करत होती?

 
तेवढ्यात दार ढकलून कोणीतरी आत आलं
तिला असं पाहून सारं क्षणभर स्तंभित झालं
नंतरच्या त्या किंकाळ्या, ते आक्रोश
तिला अस्वस्थ करत होते
जित्याजागत्या बाईला सारे
इतके का घाबरत होते?!

जगण्यामरण्यातली रेषा आता पुसट पुसट होत होती
दुरावलेली माणसे अजून दूर दूर जात होती
दीर म्हणाला ' वहिनी, आमच्या वंशाचा गं तो दिवा
आमचीच आहेस तू तरी का करतेस असा कावा?
करेन यथासांग क्रियाकर्म, करेन सर्व सोपस्कार
आत्ता इथून जा निघून, कर एवढे उपकार!!! "
 

माणूस मरतो म्हणजे शरीरानं संपतो
कोणाच्यातरी मनात तो आठवणींनी उरतो
कधीतरी जगता जगताच नकळत मरतो
डोळ्यांदेखत हळूहळू धुसर धुसर होतो

 
जन्म मृत्यूचा हा खेळ तिला अजब वाटत होता
कोण जाणे कसा अचानक नवं बळ देत होता
' मी जिवंत आहे… मी जिवंत आहे…' ओरडू लागली ती
जगायच्या जिद्दीने तळमळू लागली ती
 

पण… नव्हतं कोणी ऐकणारं, तिला समजून घेणारं
तिच्यासाठी नव्या जन्माचं नवं दालन उघडणारं 

जगण्यासोबत घराचंही दार आता बंद झालं
काळ्या डोहाने मात्र तिला सहज आपलंसं केलं

 
किती विचित्र दैवगती…
जगणं सिद्ध करायला लागली
जगण्याचीच आहुती
मरून द्यावी लागली तिला
अस्तित्वाची पावती

 आता धरलीय वाट तिने
प्रकाशाची, आत्मशोधाची
जिथे नाही घरदार, नाही कसलाच मेळ
जिथे नाही जन्ममृत्युचा जीवघेणा खेळ

 
वाट आता उजाडली होती
ती पुढे चालत होती
… पृथ्वी नामक डोहात पुन्हा जीव द्यायचा नाही
या निर्धारानं!
-गायत्री

(Poem based on Rabindranath Tagore's short story "Jibit o Mrit')

Category: 

About the Author

गायत्री लेले's picture
गायत्री लेले