एका आजोबांचा फोन..

एका आजोबांचा फोन..
आजच्या एका वृत्तपत्राच्या कुठल्याश्या पुरवणीत माझा कुठलासा लेख आलेला असतो. तो येणार हे 
माहित असल्यामुळे मी आधीच तसा काही जणांना सांगून ठेवलेलं असतं. सकाळ होताच मी घाई-
गडबडीत पेपर शोधतो. त्यातलं ते पान शोधून काढतो. आज माझी नजर अग्रलेख वगैरे चक्क स्कीप 
करून थेट माझ्या लेखावर जाते. मीच लिहिलेला लेख. शब्दन् शब्द माझा. एकेक परिच्छेद लिहून 
झाल्यानंतर आणि आज सगळा लेख पूर्ण झाल्यानंतर, असं मिळून किमान दहा-पंधरा वेळा तो माझा 
लेख मी वाचलेला. मात्र तरीही वृत्तपत्रात छापून आलेला लेख म्हणून मी तो कौतुकाने डोळे भरून वगैरे 
पाहतो. त्या खालचं माझं नाव, नंबर, इ-मेल आयडी.. सारं पुन्हा पुन्हा पाहतो. त्या मोबाईल नंबरमधील 
एकेक आकडा व्यवस्थित पाहून तो नंबर बरोबर आहे की नाही याची खात्री करून घेतो आणि निश्चिंत 
होतो.
त्यानंतर गडबड सुरु होते त्या लेखाबद्दल सगळ्यांना कळवण्याची. जे उत्साही असतात त्यांना एसएमएस किंवा फ़ोन जातो, की अमुक अमुक पेपरात माझा लेख आलाय. अवश्य वाचा आणि प्रतिक्रिया कळवा. प्रत्येकजण आपापल्या गडबडीत तरी प्रत्येकजण हो म्हणतो. मग जे निरुत्साही असतात त्यांना whatsapp मेसेज करतो. उरलेल्या अज्ञात निरुत्साहींसाठी फेसबुकवर स्टेटस अपडेट होतं. 
तेच सारं.. लेख… पेपर… प्रतिक्रिया… अवश्य… वगैरे. आणि हो, निरुत्साहींना फार कष्ट पडू नयेत म्हणून त्या लेखाची ऑनलाईन लिंक मी त्या फेसबुक आणि whatsapp मेसेजमध्ये टाकतो. मग आपापल्या नित्याच्या घाई-गडबडीत असणाऱ्या जगात मीही सहभागी होतो. साधारण अकरा-बाराच्या सुमारास सकाळी फोन करून कळवलेल्यांपैकी तीन-चार जणांचे फोन येतात. अभिनंदन, शुभेच्छा होतात. मग मी असंच  कधीतरी फेसबुक उघडून पाहतो. स्टेटसवर पाच-सहा कमेंट्स असतात. वा… खूपच छान, अप्रतिम, सुंदर, मस्तच रे…आणि कीप इट  अप वगैरे. तीस-चाळीस लाईक्स असतात. त्यापैकी कितीजणांनी तो लेख वाचलेला असतो कुणास ठाऊक. आणि माझी अपेक्षा अशीच असते कि प्रत्येकाने हातातले सगळे कामधंदे, सारे महत्वाचे कार्यक्रम बाजूला ठेवावेत आणि तो जिथे कुठे अगदी हिमालयात 
जरी असला तरी त्याने तो लेख वाचावाच आणि मला प्रतिक्रिया द्यावी. जसजसे लाईक्स  वाढत जातात तसा माझा उत्साह वाढू लागतो. पण तरीही, मी वाट पाहत असतो सकाळी आणि काल रात्री कळवलेल्यांपैकी काही जणांची. त्यांना मी सात-आठ वाजताच फोन केलेला असतो आणि बारा वाजून गेले तरी त्यांचा काही रिप्लाय आलेला नसतो.
अचानक त्यांच्यापैकी एका जुन्या मित्राचा फोन वाजतो. वेळ साधारण साडेबारा-एक. तुझा लेख वाचला. खूप छान झालाय वगैरे संभाषण अर्धा-एक मिनिट चालतं. मग तो मित्र त्याच्या नवीन प्रोजेक्ट्स बद्दल, त्याच्या कुठल्याश्या तुटलेल्या किंवा सुरु झालेल्या अफ़ेअरबद्दल सांगू लागतो. व हे सगळं ऐकत असताना मला एक फोन येऊ लागतो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तरी पुन्हा पुन्हा कॉल येऊ 
लागतो. मी वैतागतो. कोण कटकट करतंय… कॉल वेटिंगवर ठेवला गेलाय, बिझी लागतोय… एवढंही कळत नाही? चालू असलेला फोन मी ठेवतो तेंव्हा तीन मिस्ड कॉल्स दिसतात. 
अज्ञात  landline नंबर. शून्य वीस किंवा शून्य बावीस वगैरे. काहीशा नाखुशीनंच मी त्या नंबरवर कॉल करतो. अर्धी रिंग व्हायच्या आतच समोरून कॉल उचलला जातो. नमस्कार… मी अमुक अमुक पेठेतून किंवा वाडीतून किंवा कॉलनी-पार्कातून अमुक अमुक बोलतोय. समोरची व्यक्ती बोलू लागते - तुमचा आजच्या दैनिक अमुक अमुक मधील लेख वाचण्यात आला. आवाज कापता, थरथरता… वजनदार, भारदस्त… दोन शब्दांच्यामध्ये मोठा पॉज, थोडीशी धाप, आणि दीर्घ श्वास. या व्यक्तीचं वय साधारण सत्तरीच्या पुढे असावं अशी अटकळ मी बांधतो. वैतागाची जागा उत्सुकता घेऊ लागते. मीही मग नमस्कार… बोला… अरे वा… वगैरे फ़ॉर्मल मनमोकळेपणानं बोलू लागतो. मग ते आजोबा खूप छान आहे तुमचा लेख. मी या वृत्तपत्राचा नियमित वाचक आहे. आज जर वाचायला उशीरच झाला. म्हणून दुपारच्या जेवणाबरोबर वाचला. (आता जरा कंटाळा येऊ लागतो. फ़ॉर्मल मोकळेपणा चालूच.) या 
तुमच्या लेखामुळे मला आमच्या काळातल्या जुन्या आठवणींमध्ये रममाण होता आलं. फार फ्रेश वाटलं 
वाचून. तुमच्या शब्दांनी मला तुमच्यातल्या लेखकाकडे आकृष्ट केलं. जेवण अर्धवट ठेऊन मी तुम्हाला फोन केला पण तुमचा फोन व्यस्त लागला. बहुधा अशीच एखादी प्रतिक्रिया दिली असावी एखाद्या वाचकाने. मी तरीही पुन्हा पुन्हा नंबर फिरवत राहिलो . ह्याचा त्रास झाला असेल तुम्हाला. माफ करा मला… भावना लपवता आल्या नाहीत हो… ( हे चालू असताना काय बोलायचं असतं याचं प्रशिक्षण मी 
घेतलेलं नसतं. त्यामुळे मी शांत. ) ठीके… तुम्हाला आणखी त्रास नाही देत. आगामी वाटचालीसाठी या तुमच्या अज्ञात, म्हाताऱ्या वाचाकातर्फे शुभेच्छा. धन्यवाद. फोन संपतो.
म्हटलं तर मला त्या कॉलचं फार काही विशेष वाटत नाही. म्हटलं तर मला फार भयानक प्रमाणात भारी वाटलेलं असतं. मग मी फेसबुक उघडून पाहतो. लाईक्स, मस्त, कीप इट अप वगैरे आणखी वाढलेले असतात. पण मला ते काही वाचावसं वाटत नाही. आश्चर्यानेच मी फेसबुकमधून बाहेर येतो. पुन्हा माझ्या कामांना लागतो. घड्याळाचा काटा जसाजसा पुढे सरकू लागतो तसा माझा लेख जुना 
होऊ लागतो. तो छापून वगैरे आल्याचं अप्रूप माझ्यासाठीही आता जुनं  होऊ लागतं. तो लेख मग मी हळूहळू मनातल्या होमपेजमधून कपाटातल्या एखाद्या फाईलमध्ये कट-पेस्ट करतो. मात्र का कुणास ठाऊक, त्या होमपेजवरील एका छोट्याशा जागेत तो अज्ञात वाचक, थरथरत्या आवाजातले ते आजोबा, सतत मिस्ड कॉल्स देत राहतात…… 
निमेश वहाळकर 

 

About the Author

निमेश वहाळकर's picture
निमेश वहाळकर