आईन्स्टाईनची प्रेमपत्रे

अगदी प्राचीन काळापासून प्रेम आणि प्रेमाच्या पत्रांची देवाणघेवाण सुरू आहे. कालिदासाने लिहिलेले मेघदूत, नल दमयंतीचे आख्यान ज्या भूमीत जन्माला आले तिथे प्रेमपत्राची महती सर्वाना माहिती आहे. नात्याने, प्रेमाने जोडलेल्या दोन व्यक्तींमध्ये संवाद आवश्यक असतो यात दुमत नाहीच.

एकमेकांपासून दूर राहताना तर हा संवाद अतिशय महत्त्वाचा ठरतो. मग अशा वेळी हा संवाद कधी अगदी दैनंदिन गोष्टींबद्दल असतो तर कधी अगदी खासगीही असतो. गुरू, शिष्य, दोन देशांचे प्रमुख, प्रेमी, मित्र-मैत्रिणी नातेवाईक यांचा पत्रव्यवहार इत्यादी.. कलावंत, साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक, युद्धावर गेलेले जवान असे सर्वच जण पूर्वीपासून पत्र लिहीत. आता संवादाचे प्रमुख माध्यम इलेक्ट्रॉनिक झाले असले तरी संवाद आहे, पत्रं लिहिणारेही आहेत.

पूर्वी लिहिलेल्या या पत्रांपैकी काही प्रसिद्ध व्यक्तींची पत्रे जगात विविध भाषांमध्ये साहित्य रूपात प्रकाशित झाली आहेत. त्यापैकी किमान काही पत्रे वाचली तरी जगाच्या पाठीवर होणारी ही देवाणघेवाण अतिशय मनोरंजन, हृदयस्पर्शी आणि मार्गदर्शक आहे याची खात्री पटते. असेच एक उदाहरण म्हणजे अल्बर्ट आईनस्टाईन या प्रसिद्ध शास्त्रज्ञाने लिहिलेली पत्रे.

आईनस्टाईनची आणि मिलवाची; त्याच्या भावी पत्नीची पहिली भेट झाली. त्यानंतर आठ एक वर्षाने त्यांचे लग्न झाले. पुढे साधारण तपानंतर अल्बर्ट आणि मिलवा कायदेशीररीत्या विभक्त झाले. या सर्व काळात अल्बर्ट आईनस्टाईनने मिलवाला लिहिलेली ५४ पत्रे एका पुस्तकाच्या रूपात प्रसिद्ध झाली आहेत. लग्नाचा शेवट घटस्फोटात झाला तर आपण ते अपयश मानतो.आईनस्टाईनचे लग्न अपयशी ठरले. पण त्याचे प्रेम अयशस्वी होते का? आईनस्टाईन आपले प्रेम असफल झाले असे मानत नाही. ‘‘उत्साहवर्धी, प्रेरणादायी, वाट बघायला लावणारे, मला भुरळ घालणारे प्रेम मला करता आले असे तो म्हणतो. प्रेमात येणारी विफलता, वाद आणि दु:खसुद्धा मी भरभरून पाहिली. मुले, त्यांचा जन्म, त्यांचं मोठं होणं सगळं माझ्या वाटयाला आलं म्हणजे माझे, आमचे प्रेम यशस्वी झाले’’ असे त्याचे मानणे होते.

तरुण आईनस्टाईन आणि मिलवा यांचा बराच पत्रव्यवहार एकमेकांपासून दूर होते अशा वेळी झाला. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला जिच्यावर प्रेम आहे त्या व्यक्तीतले दोष दिसत नाहीत, कुणी सांगितले तर पटत नाहीत. त्या व्यक्तीचं बोलणं आठवतं, तिचा सहवास हवासा वाटतो आणि प्रेमामुळे उत्साह वाढतो. प्रिय व्यक्तीला भेटण्याची हुरहूर लागते. प्रिय व्यक्तीची भेट झाली नाही तर काय होईल या विचाराने मन सरभैर होतं. हे सर्व अनुभव तुम्हाला, आम्हाला नाही तर प्रसिद्ध शास्त्रज्ञाना सुद्धा येतात हेच ही पत्रं सांगतात. उदाहरण म्हणून या ओळी पाहा.

”When I’m not with you I feel as if I’m not whole. When I sit, I want to walk; when I walk, I’m looking forward to going home; when I’m amusing myself, I want to study; when I study, I can’t sit still and concentrate; and when I go to sleep, I’m not satisfied with how I spent the day.…tender kisses form your    Albert

आईनस्टाईनची प्रेयसी मिलवा बुद्धिमान होती. तिलाही शास्त्रविषयात गती होती. इतर मुलींपेक्षा तिचे वागणे वेगळे होते. त्या काळच्या सर्वसाधारण मुलींपेक्षा तू वेगळी आहेस, आई-वडिलांचा आपल्या लग्नाला विरोध आहे, तरी मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. हे आईनस्टाईनने पत्रातून तिला कळवले होते. हे सर्व पत्रांतून सांगत असताना आपल्या आई-वडिलांचं वागणं पटत नाही असं सांगतो. त्यांचं विश्व आणि माझं विश्व बदललं आहे याची कबुली देतो.

त्या बदललेल्या विश्वात मिलवाची कशी योग्य साथ आहे याचा पुन्हा पुन्हा उल्लेख करतो. आपण कोणत्याही मर्यादा ओलांडलेल्या नाहीत हे माझ्या आई-वडिलांना पटवून देणं दिवसेंदिवस अवघड आहे. मला आई-वडिलांचा अपमान करायचा नाही, मला त्यांचे बोलणे ऐकून घेणे आवश्यकच आहे पण मी ते म्हणतात तसे वागणार याची खात्री तो मिलवाला पटवून देतो.

तुझ्या आई-वडिलांकडे आहेस तर आनंदात राहा. मस्त लाड करून घे. त्या लाडाने तुझी तब्येत छान झालेली मला बघायची आहे. मन लावून अभ्यास कर. माझ्या घरी मात्र रोज-रोज होणा-या या कटकटींपासून दूर जाऊन कधी तुझ्या ओठांवर ओठ ठेवतो, तुला मिठीत घेतो असे मला झाले आहे असे उद्गारही तो काढतो.’’

हे सर्व अतिशय हळवे, भावुक आणि प्रेमात बुडालेल्या व्यक्तीचे वागणे आहे. तुझे प्रेम हेच माझे आयुष्य आहे. तू मिळत नाहीस तोवर अभ्यास आणि संशोधन हाच एक दिलासा आहे असं तो वारंवार लिहितो. आपण एकत्र आलो की दोघेही आनंदात राहू, भरपूर संशोधन करू, आपलं छोटं विश्व प्रेमानं भरू असा उल्लेख त्याच्या पत्रात आहे.

सुरुवातीच्या पत्रात मिलवाने पत्राचे उत्तर का दिले नाही, उशिरा का दिले याविषयी आईनस्टाईन कधी तिच्यावर रुसतो तर कधी तिला रागावतो. तसेच पत्र आल्यावर, पत्र लिहिल्याबद्दल आभारही मानतो. आपल्या व्यक्तीवर फक्त आपला अधिकार असतो. तिनं आपल्या म्हणण्यानुसार वागावं असा हट्ट असतो. तो हट्ट तो अधिकार आईनस्टाईनच्या पत्रातून दिसतो.

घटस्फोट घ्यायचा हे नक्की झाल्यावरही आईनस्टाईनने तशी विनंती करणारी पत्र मिलवाला लिहिली. त्यात त्याने मुलं आणि मिलवाची सर्व आíथक जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली. आíथक बाबी आणि इतर सर्व अटी लिहिताना त्याच्या मनात मिलवाविषयी आदर आहे. प्रेमाविषयी आदर आहे. कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारीची जाणीव आहे. त्यांनी विभक्त होणे ही एक दुर्दैवी घटनाच. पण प्रेम करणारी माणसं त्या प्रेमाचा आदर करतात. प्रेम प्रेरणादायी असतं. प्रेम आध्यात्मिक आणि व्यवहारापलीकडे जाणारं असतं. हे आईनस्टाईनच्या उदाहरणाने समोर येतं.

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह