रंगकमळ

………………………
धारदार जिवंत शब्द कधीकधी पुस्तकात लपलेले राहतात. कधीकधी वाचकांचंच नशीब चमकतं आणि मग ते शब्द ध्वनीत रूपांतर होऊन येतात.
'रंगकमळ' या कमल देसाई यांच्या तीन कथांच्या ध्वनीफीतीविषयी हे सांगणं आवश्यक आहे की रंगकमळ ऐकून कमल देसाई यांच्या कथा तुम्ही आधी वाचल्या असतील तर 'रंगकमळ' तुम्हाला वेगळ्या अर्थाने भावेल आणि कमल देसाईंच्या कथाविश्वाशी तुम्ही संपूर्ण अपरिचित असाल तर तुम्ही त्यांच्या भन्नाट जगात खेचल्या जाल.
प्रिया जामकर आणि रविंद्र लाखे यांनी अतिशय प्रेमाने आणि तळमळीने हे काम केलं आहे. त्याला 'रंगकमळ' हे मधूर नाव देण्यात आलं हादेखील त्या दोघांच्या कमल देसाई यांच्या कामावरच्या प्रेमाचा पुरावा आहे.
प्रिया जामकर पेशाने मराठीची प्राध्यापक आहे . तिने कमल देसाई यांच्या साहित्यावर डॉक्टरेट केली आहे .एक छंद म्हणून मराठीतल्या उत्तमोत्तम लेखकांचे साहित्य ती अभिवाचन करून लोकांपर्यंत पोचवत असते .
प्रियाने जेंव्हा तिला हे काम करायचं आहे असं सांगितलं तेंव्हा मी मित्रकर्तव्य म्हणून तिला प्रोत्साहन दिलं . तिच्या कमल देसाईं विषयी भावनांशी मी परिचित होते.प्रियाला असं वाटतं की ती कमल देसाई यांचं देणं लागते. त्यासाठी त्यांच्या कथांचं अभिवाचन करून , ते रेकॉर्ड करून ऑडियो बुक स्वरुपात लोकांपर्यंत पोचवणे तिला आवश्यक वाटत होते .
कमल देसाई यांच्या कथा या साध्या सोप्या,सरळ कथा नाहीत. पण अत्यंत रंजक आणि विलक्षण कसदार आहेत.कमल देसाई या एका लेखकाने म्हणल्याप्रमाणे 'रॉकस्टार' होत्या . काळाच्या पुढलं आणि अतिशय धाडसी लिखाण त्यांनी केलं . 
त्यांची विलक्षण पात्रंयोजना, फँटसी , कथेच्या आतले स्तर, काळाचे वेगवेगळे प्रस्तर , अफाट चित्रात्मकता ,कटू धारदार उपहासपूर्ण विनोद हे सगळं ध्वनीमाध्यमात मांडणं ही सोपी गोष्ट 
नाही. कारण माध्यम बदललं की फरक पडतो आणि जबाबदारी वाढते .
रविंद्र लाखे हे कवी आणि नाटककार आहेत.त्यांच्या या दोन्ही भूमिकांचा इथे कस लागला आहे .
ही डीव्हीडी तयार होताना मी पाहिली . प्रत्यक्ष रेकॉर्डींग होताना तिथे हजर राहिले. या रंग कथेची नायिका म्हणजे सुमित्रा. तिच्यासारख्या कॅरॅक्टरमध्ये घुसायला प्रियाला किती कष्ट पडले हे पाहिलं . ही सुमित्रा जणू प्रियाला शोषून घेत होती आणि प्रिया अथक लढत होती. 
रवींद्र लाखे यांचं कडक ,काटेकोर , आग्रही, परफेक्शनिस्ट निर्देशन या कामाला अगदी आवश्यकच होतं . 
....
रंग
रंग या कथेचे तीन भाग आहेत .
रंगची नायिका म्हणजे सुमित्रा . ही एक पस्तीशीपुढली कुमारिका आहे .तिचे वडील अकाली वारले म्हणून नोकरी करून तिने त्यांचा संसार निभावला आहे . त्याबद्दल तिला काही दु:ख,खंत,निराशा नाही . निखळ कर्तव्य भावनेनी तिने हे केलं आहे. तिच्या भावंडानी तिचा भरपूर गैरफायदा घेतला आहे.स्वतःच्या जबाबदार्या टाळून तिच्यावर ढकलून दिल्या आहेत.तरी तिच्या मनात अन्याय झाल्याची भावना नाही. 
सुमित्रेने एक खोटी सुमित्रा तयार करून ही सर्व दु:ख पचवली आहेत .
केशव हा सुमित्रेचा मित्र आणि कलीग आहे . तो तिच्या प्रेमात आहे . तो तिच्या मागे लग्न करण्यासाठी लागला आहे . केशव आग्रही आणि हट्टी आहे. तो बुकीश आणि भावनांचं अवडंबर माजवण्यात पटाईत आहे. 
सुमित्रेला मात्र केशव नकोसा वाटतो . तिला त्याचं ओझं , बंधन होतं . बदलीमुळे केशवपासून तिची सुटका अनायासे होते. 
पण मग श्रीरंग कामत येतो . 
श्रीरंग समोर मात्र सुमित्रेचा निभाव लागत नाही . प्रेमात शरण भाव सहज यायला हवा . तसा तो श्रीरंग समोर येतो . त्याच्या विलक्षण व्यक्तिमत्वाने सुमित्रा जणू भुलून जाते , चुरगळून शरण येते .
एक अजब तर्हेचं प्रेम आणि द्वेषाने भरलेलं नातं त्यांच्यात तयार होतं .
श्रीरंग त्या खोट्या सुमित्रेला नष्ट करून टाकतो . प्रेमाचा अनाहत रंगच केवळ उरतो .
सुमित्रेचा हा प्रवास निव्वळ अप्रतिम आहे . प्रियाने तो शब्दश: जिवंत केला आहे . खोट्या सुमित्रेचा खून होण्याचा प्रसंग हा खास' कमल देसाई फँटसी' म्हणायला हवा. तो उभा करणं हे एक आव्हान होतं .
सुनील गोडसे केशव आणि रवींद्र लाखे श्रीरंग उभा करतात. रवींद्र लाखे विशेष करून श्रीरंग आणि अण्णा मामा ही दोन्ही अगदी वेगळी पात्रं लीलया उभी करतात . 
....
'आत्मा विकणे आहे ' आणि 'माणसाची गोष्ट'
'आत्मा विकणे आहे ' आणि 'माणसाची गोष्ट' या निखळ 'कमल देसाई'कथा आहेत .
तो अतीतीव्र उपरोध,कथनाचा तो अलगसा बाज आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे ती फँटसी हा खास त्यांचा कथाविशेष आहे.
'आत्मा विकणे आहे' मध्ये निखळ धारदार उपरोध आहे .
माणूस, देव आणि सैतान हे तिघं या कथेत आहेत. आणि माणसाने विकायला काढलेला माणसाचा आत्मा आहे.
देवधर्म, कर्मकांडे , माणूस आणि ईश्वर यांच्यावर केलेला प्रच्छन्न उपहास रविंद्र लाखे ऐकवतात. प्रत्येक पात्रासाठी वेगळी ढब वापरणे आवश्यक होते आणि ते उत्तम जमलं आहे. सैतानाचा भाग विशेष रोचक झाला आहे.
....
'माणसाची गोष्ट' ही पटणारी तरीपण अतिशय झोंबणारी फँटसी आहे . 
सृष्टी विरूद्ध मनुष्य असा हा खडा सामना आहे.
सृष्टीची नैसर्गीकता माणूस नेहमीच बिघडवीत आला आहे.
माणसाने स्वतःला सृष्टीपेक्षा नेहमीच श्रेष्ठ समजलं. सृष्टी स्वतःसाठी राबवण्यात कधीच कसर सोडली नाही.
एक न एक दिवस याचा जाब मनुष्यजातीला द्यावा लागेल. तर ही त्या दिवसाची कथा आहे.
प्रियाने ती योग्य सांगितली आहे.

Image credits and availability-बुकगंगा.कॉम

About the Author

जुई कुलकर्णी's picture
जुई कुलकर्णी

चित्रकार आणि कवी : जुई कुलकर्णी 2009 पासून फेसबुकवरून चित्र आणि कविता प्रकाशित .

स्व शिक्षित चित्रकार .

कवरपेज डिझायनिंग : मिळून साऱ्याजणी मासिक फेब्रुवरी 2012

मॅड स्वप्नांचे प्रवाह - काव्य संग्रह

शक्यतेच्या परिघावरून - काव्य संग्रह (आगामी)

रेखाटने : काही तीव्र मंद्र काही - काव्य संग्रह 'श्वासाचं बांधकाम ' हा स्वतःचा कविता संग्रह प्रकाशित

अक्षर दिवाळी अंक , 'व' मासिक यातून कविता प्रकाशित .