शांताराम

शांताराम

लेखक: ग्रेगरी डेविड राॅबर्टस 
अनुवाद : अपर्णा वेलणकर 
मेहता प्रकाशन 
...
आपल्या प्रत्येकात कुठेतरी एक गुन्हेगार असतोच.

'शांताराम' हे पुस्तक फार वर्षं वाचायचं होतं. त्याचं आकारमान इतकं गलेलठ्ठ आहे की माझ्यासारख्या निगरगट्ट वाचकालाही आव्हान मिळतं. अर्थातच माझी ही निगरगट्टता मराठीबाबत आहे. इंग्रजी शांताराम खूपच दुरूनच बरा. आणि अपर्णा वेलणकर यांनी मराठीत शांतारामचा पुनर्जन्मच केल्याने त्यात काही हरकतही नाही.

आपल्या महाप्रचंड एका विश्वात एकाचवेळी अनेक जगं जगत असतात. शांताराम चं अंडरवर्ल्डचं गुन्हेगारी जग आपल्या जगापासून कितीतरी योजनं लांब अंतरावर असतं. एक माणूस आयुष्यात नक्की काय काय करू शकतो याची लिमिट बघायची असेल तर शांताराम वाचावं. 
वाचणारा का वाचतो ? त्याला वाचताना मजा येते , आनंद होतो , दुःख वाटतं हे तर आहेच. पण त्यापलीकडे वाचणारा आपल्या रूढ चाकोरीबद्ध निरस आयुष्यापलीकडे किती वेगवेगळ्या प्रकारचे जगणं असू शकतं हे धुंडाळत असतो. .

ऐंशीच्या दशकात ग्रेगरी हा ऑस्ट्रेलियातून फरार होऊन आलेला गुन्हेगार मुंबईत उतरतो. 
मुंबई नावाच्या माया नगरीच्या प्रेमात पडतो. मुंबईची हवा त्याला स्वातंत्र्याची चव चाखवते. 
जीवघेणा एकटेपणा, अपराधी भावनेचं ओझं सहन करत लीन मुंबईला आपलसं करतो. हिंदी आणि मराठी सफाईदार बोलायला शिकतो. मराठीवर प्रेमच करू लागतो.लीन महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राहतो तिथेच तो शांताराम होतो. 
परिस्थितीने मुंबईच्या झोपडपट्टीतही राहतो. तिथे डाॅक्टरचं काम करून शेकडो दुवा घेतो.

प्रेम, मैत्रीची भूक लागलेला शांताराम त्याच्या नकळत माफियांनी केलेल्या सापळ्यात अलगद अडकतो. तत्वज्ञानाचा भोक्ता असलेला हा ऑस्ट्रेलियन माणूस एका अफगाणी डाॅनच्या प्रेमात पडतो. त्याचा मुंबईत सापडलेला मुलगाच बनतो. 
ही दुनिया गोल आहे आणि माणूस एकच आहे. 
हा प्रवास भन्नाट आहे. 
ग्रेगरी इथे येऊन प्रभाकरचा लीन , झोपडपट्टीचा लीनबाबा आणि रूक्माबाईचा शांताराम होतो. एकाच जन्मात ही अनेक आयुष्य जगण्याची त्याच्यावर सक्तीच होते. 
कादरभाई ,कार्ला , प्रभाकर आणि इतर मित्रांच्या प्रेमात पडलेला शांताराम हा एक जंकी आणि गुन्हेगार असूनही त्याचा कणभर तिरस्कार वाटत नाही.

"You are Interested in everything , committed to nothing "
पूर्वाश्रमीच्या प्रेयसीचं हे वाक्य शांताराम भयंकरच सिरियसली घेऊन या आता सगळ्या नात्यांची किंमत नीटच चुकवतो आणि तयार होते ही विशाल कादंबरी.

इथे सरळ एका माणसाने स्वतःचं जगणं मांडलंय.त्यात काही वाड़्मयीन मूल्य, अलंकारिक भाषा , कल्पनारम्यता वगैरे 'फिक्शन 'च्या नेहमीच्या चौकटी लावायची गरजच नाही कारण कादंबरीचा मूळ कंटेंटच भयंकर दणकट आहे, अगदी शांताराम सारखाच दणदणीत आहे .
...

या पुस्तकाविषयी लिहताना चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या कामाचा उल्लेख करणं मस्ट आहे. कारण 'शांताराम ' या शीर्षकाच्या अक्षर लिखाणापासून ते पुस्तकातील प्रत्येक फोटोत त्यांनी स्वतःच्या स्किलला भरभरून ओतून दिलंय. 
मुखपृष्ठावर हाजी अलीचा दर्गा आहे ,आतमधे लिओपोल्ड कॅफे , इंडीया गेस्ट हाऊस, बकाल झोपडपट्टी, रिव्हॉल्वर या सगळ्या सगळ्यात 'शांतारामच्या मुंबईचा' अर्क उतरलाय. आणि अत्यंत देखण्या शांतारामचा एक फोटोही आहे.
...

इतक्या मोठ्या कादंबरीचा अनुवाद करणं सोपी गोष्ट नाही. खेरीज त्यातील नैसर्गिक रावडी भाषा मराठी करणं तंतोतंत जमलंय. लिखाणातले डाॅनच्या फिलॉसॉफी चे तुकडे भारी वाटतात. वाचता वाचता तुम्ही त्या अल्टिमेट जटीलतेकडे सहज जाता .

मराठी अनुवादाच्या जगात घडलेलं एक महत्वाचं काम म्हणजे 'शांताराम '.
~ जुई

 

About the Author

जुई कुलकर्णी's picture
जुई कुलकर्णी

चित्रकार आणि कवी : जुई कुलकर्णी 2009 पासून फेसबुकवरून चित्र आणि कविता प्रकाशित .

स्व शिक्षित चित्रकार .

कवरपेज डिझायनिंग : मिळून साऱ्याजणी मासिक फेब्रुवरी 2012

मॅड स्वप्नांचे प्रवाह - काव्य संग्रह

शक्यतेच्या परिघावरून - काव्य संग्रह (आगामी)

रेखाटने : काही तीव्र मंद्र काही - काव्य संग्रह 'श्वासाचं बांधकाम ' हा स्वतःचा कविता संग्रह प्रकाशित

अक्षर दिवाळी अंक , 'व' मासिक यातून कविता प्रकाशित .