वंश, वर्ण, धर्म

अमेरिकेत रोजचे जीवन जगतांना वंशभेद, धर्मभेद  आड येत नाहीत, तिथे माणसांना त्यांचे हक्क मिळतात असा एक समज भारतात राहतांना माझ्या मनात होता. आजही अनेक भारतीयांना थोड्याफार प्रमाणात असेच वाटते. मेडियामुळे माहिती झालेल्या गोष्टी वा बातम्या यामुळे असे मत तयार होते. वर्षानुवर्षे अनेक भारतीय अमेरिकेत येत आहेत. तिथेच स्थाईक होत आहेत. भारतात ज्या संधी कदाचित मिळाल्या नसत्या त्या अमेरिकेत आल्याने मिळाल्या असे भारतीयांना वाटते. त्यात तथ्य आहेच. पैशाशिवाय तिथे आयुष्य जगणे सोपे आहे असे सुद्धा वाटणे साहजिक आहे.

पण भारतात जातीभेद, भ्रष्ट्राचार आणि अमेरिकेत कुठलेच प्रश्न भेडसावत नाहीत असे समज होऊ नये म्हणून काही मुद्दे नोंदवावेसे वाटतात. भारतीय माणसाने भारत सोडून अमेरिकेत स्थाईक व्हायचे ठरवले म्हणजे सगळे प्रश्न संपले वा त्यांना खूप संकटे त्यामुळे निर्माण झाली असा अर्थ काढायचीही गरज नाही. १९७० पेक्षा आज २०१५ नंतर परिस्थिती बदलली आहे. एशियन वा भारतीय आल्याने स्थानिक अमेरिकन लोकांना नोक-या मिळत नाहीत, त्यांच्या नोकरी वा शिक्षणाच्या संधी कमी होतात असा एक विचारप्रवाह उलट अधिक वेगाने स्थिरावला आहे. अनेक आयटी व्यवसाय, कॉल सेंटरची कामे भारतातही गेली. तिथली काम करण्याची पद्धत, उत्पादने व सुविधा यांचा स्तर याविषयी अमेरिकन मनात आता समाधान राहिलेले नाही. उलट अमेरिकन मनात कटूता आहे. भारतीय स्वीकारले जातात वा स्वीकारले गेले ते नाईलाज म्हणून, आर्थिक फायदा होईल या आशेनेच. हा व्यावसायिक स्वीकार आहे. माणुसकी वा आपुलकीचा त्याच्याशी तसूभरही संबंध नाही. भारतीय येत राहिले, पुढे पिढ्या वाढत गेल्या. ही माणसे भारतीय वंशाची आहेत. ते सणवार पोषाख वा खाद्यपदार्थ जरी भारतीय करत असले तरी ते अमेरिकेचे नागरिक आहेत. अमेरिकत जगभरातून स्थायिक झालेल्या, अमेरिकन समजाणा-या गो-या वा कृष्णवर्णीय़ अमेरिकन यांचे सर्व उपलब्ध संधीकरता ते स्पर्धक आहेत. हे भान इथे पुरेसे आलेले आहे.  भारतीय माणसाचे स्वागत अमेरिकन करत नाहीत ही भावना मनात ठेऊन अमेरिकेत पाऊल ठेवावे असे म्ह्णेन.

--

आपला वंश, वर्ण धर्म सगळेच विसरायचे ठरवले तरी ते सोपे वा शक्य नसते असे अनेक अनुभव येतात. पुढे काही तसेच अनुभव देते आहे. 

मी एकदा लायब्ररीत बसले होते. माझ्या शेजारच्या टेबलावर एक व्यक्ती काही मासिके चाळत बसली होती. आणखी एकजण तिथे आला.  त्याच्या हातात एक पुस्तक होते. ते घेऊन तो त्या व्यक्तीच्या समोरच्या खुर्चीवर बसला. त्याने समोर बसलेल्या माणसाला "इथे बसू का? कुणी दुसरे येते आहे का? वा साधे हाय हॅलो"सुद्धा केले नाही. सार्वजनिक ठिकाणी असे शिष्टाचार सोडून वागणे त्यामानाने क्वचित बघायला मिळते. एकमेकांशी उघड शत्रूत्व मान्य केलेली माणसेही चार चौघात वावरतांना सर्वसंमत असेच वागतात.

बराच वेळ गेल्यावर मासिके चाळणारा दुस-याला म्हणला," तू ज्यू आहेस का?"
"नाही" दुस-याने मान न वर करता उत्तर दिले.

अशी संभाषणे मी आजवर किस्से किंवा विनोद म्हणून ऐकून होते. पण आता हे संभाषण कसे पुढे जाते याची उत्सुकता होती.

पुन्हा त्याने विचारले," तू ज्यूच आहेस. हो ना?"

"नाही" दुस-या माणसाने उत्तर दिले.

आणखी पाच एक मिनिटात पहिला माणूस उत्तरला," तू तसेच वागतो आहेस. "

" हो, मी ज्यू आहे " आता मात्र दुसरा जरा वैतागून म्हणाला होता.

 अखेर या माणसाला  हवे ते उत्तर मिळाले आहे त्यामुळे हा अधिक काही बोलणार नाही असा विचार माझ्या मनात डोकावला.
पण त्यावर त्याने दिलेले उत्तर मात्र अवाक करणारे होते.

" गंमतच आहे, तू ज्य़ूंसारखा दिसत मात्र नाहीस"
----------------

               अमेरिकन.. गोरे अमेरिकन.. असे आपण सरसकट म्हणतो.  त्यांचे "origin" वेगळे असते हे माहितीही असत आपल्याला.  हे माहिती असणे आणि तो फरक तसा त्यांनाही मान्य असतो हे प्रत्यक्ष अनुभवणे मात्र वेगळे आहे. आयरिश, स्कॉटिश, जर्मन, फ्रेंच वंशाचे लोक वरवर बघता आपल्या दृष्टीला तसे सारखे दिसतात.  पण त्यांच्याशी बोलले की समजते तेही एक वा सारखे नाहीत वा तसे समजतही नाहीत! असाच एक अनुभव.- एखाद्याचे लग्न ठरले, वा कुणी नवे ऑफिसात जॉईन झाले की अशा वेळी कानावर येणारे संभाषण कसे असते त्याचे एक उदाहरण बघू या.

स्त्री चटकन म्हणते," माझी फॅमिली आहे आयर्लंडची. हा आहे स्कॉटीश आणि याची आई मात्र जर्मन आहे. "

कधी तो सांगतो," आम्ही नॉर्थ कॅरोलायना मधले".

 त्यावर त्याला कुणीतरी विचारते," माझ्या गावात याच आडनावाची आयरिश फॅमिली होती. त्यांच्यापैकी नाही का तुम्ही?"

समान धागा सापडतो. मग गप्पा रंगतात. त्या त्या ठिकाणची ओळखीची चार नावे, चार खास पदार्थ, प्रतिष्ठित व्यक्ती, शाळेतली सुंदर मुलगी... हे सर्व सुरु असते तेव्हा आजूबाजूला माझ्यासारखे, त्याच्याशी काही संबंध नसणारे, त्याविषयी फार गंध नसणारे, फार उत्सुकता नसणारेही कुणी तिथे आहे याचा विसर पडतो.

--------------

मुलांचे सॉकर, सायन्स फेअर अशा विविध ठिकाणी अमेरिकेत राहणा-या अनेक कुटुंबियांशी ओळख होते. जात, धर्म वा वंश याची ओळख नसेल तर उत्तम असे कितीही वाटले तरी ते नाहीसे करायला खूप प्रयत्न आणि काळ लागेल. आपली ओळखच आपण या घटकांनी ठरवतो ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. किमान या ओळखीचा शेवट अस्मिता वा युद्ध यात झाला नाही तरी खूप प्रश्न कमी होतील. आपण भारतीय आहोत ही ओळख लपवायची गरज नाही. पण माझा धर्म हिंदू आहे का असा प्रश्न अनेकांच्या चेह-यावर दिसतो. मुस्लिम समाजाविषयी नकारात्मक, घृणास्पद मते असलेले अनेक जण मी पाहिले आहेत.

अमेरिकेत जन्मलेल्या पण भिन्न  मूळ वंश अथवा वर्ण असलेल्या व्यक्तींचे अनुभव बोलके असतात. माझी एक मैत्रीण आहे. तिचा जन्म झाला इथेच झाला आहे. तिची आई भारतीय, वडील आणि नवरा श्वेतवर्णी, ख्रिच्शन अमेरिकन आहेत. तिची मुले वडिलांचा वर्ण आणि हिचा तोंडवळा घेऊन आली आहेत. शाळा,कॉलेज, ऑफिसेस याशिवाय इतर सार्वजनिक ठिकाणी तिच्यासारख्या अनेकांना कशा प्रश्नांना सामोरे जावे लागते ते पाहू या.  नवी माणसे भेटली की एक दोन भेटीत संभाषणाची दिशा काहीशी अशी असते-

"तू कुठून आलीस?"

ती सांगते टेक्सास, इथेच जन्मले , वाढले.

शाळा कॉलेज चौकशी पुढे सरकते. समोरच्या चेह-यांवर थोडा अविश्वास, थोडी उत्सुकता.

"वडील?"

" न्यू यॉर्क, त्यांचा जन्म शिक्षण तिथलेच. व्यवसायाकरता ते टेक्सासला आले."

माझ्याकडे बघत एक जण म्हणतो, " ही भारतातून आली आहे ना?"

ती हसते.मलाही त्याला काय अभिप्रेत आहे ते समजले असते.

शेवटी काहीसे थांबून, मोठ्या आवाजात, तिच्याकडे बघत कुणीतरी म्हणत " तू एथनिक दिसतेस" तिला एक्झॉटिक म्हणायच असत असही असेल असा विचार मनात येतो. भारतातला योग.. अह योगा, आसने, अध्यात्त्म इथे विक्रीच्या वस्तू आहेत. त्याची बाजारपेठ मोठ्या तेजीत आहे.

आधीच्या घटना आठवून मी अस्वस्थ होते.

आता माझी ही मैत्रीण शब्द, त्यांचे अर्थ, त्याचा वापर यावर एक लेक्चर देणार की "सो व्हॉट" असे विचारणार? याची चिंता माझ्या चेह-यावर  स्पष्ट दिसत असते.

"या विकेंडला माझ्या घरी या, I have invited few friends" ती हसत म्हणते. "फक्त मी एथनिक फूड करणार आहे. अलर्जीज असतील तर आधीच सांगा"

...

                     भारतीय पोशाख, त्यांचे रंग, बटर चिकन, समोसा हे सगळं अमेरिकेत लोकप्रिय आहे. exotic असा एक शब्द त्याविषयी आपण नेहमी ऐकतो. 

 हीच मैत्रीण असेच बोलता बोलता एकदा म्हणाली होती- exotic या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे?

"काही लोकांना तुमचे नॉन कॉकेशन लुक्स आकर्षित करत नाहीत. पण तुम्हाला त्याविषयी प्रश्न विचारणे त्यांना योग्य वाटते. त्याकरता त्यांनी सोय केली आहे ही. तुमचे डोळे, तुमचे काळेभोर केस, तेही कुरळे असतील त्याला हात लावण्याची मुभा घेता येते असे वाटून."

कॅनडामध्ये अशा दिसण्यावरून भिन्न वंशाचे वर्णाचे आहे हे समजते त्या लोकांना "विझिबल मायनॉरिटी" म्हणतात!

भारतात दलित दिसत नाहीत, जगभरात आणखी किती कोण कोण नाकारले जातात त्याची यादी मोठीच आहे.

---

                 माझ्या ग्रूपमध्ये एक बांग्लादेशाहून आलेली मुलगी आणि एक श्रीलंकेहून आलेला मुलगा होता. आम्ही मॉल, बुक स्टोअर वा  जेवायला एकत्र गेलो तर ते इथे आम्हा सगळयांनाच भारतीय समजत असा अनुभव अनेकदा यायचा. भारत, श्रीलंका,पाकिस्तान वा बांग्लादेशातील माणसे यांना बघितले की नेमके कोण कोणत्या देशातले असा फरक करणे अवघड असते हे अनेक अमेरिकन बोलून दाखवतात. प्रसिद्ध सतार वादक पंडीत रवीशंकर यांच्या निधनानंतर फॉक्स लोकल न्यूजवर "आर्ट ऑफ लिविंगचे श्री श्री श्री रविशंकर" यांचे छायाचित्र दाखवले गेले. याबद्दल मिडियाचा "गलथान कारभार" अशी भारतीय वर्तुळात चर्चा होणे स्वाभाविकच होते. वर्ण, वंश आणि वेगळी वागणूक, प्रसिद्धी असे मनात ठेवले तर या घटनेला अनेक पैलू आहेत हे सुद्धा नाकारता येणार नाही.

----------

                  मनातली भीती वा अनिश्चितता दूर होणे आवश्यक असते. त्याकरता सभोवताल तसा असावा लागतो. तसा नसेल तर अगदी लहान मुले तो तसा तयार करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये बाह्य स्वरूपी, दृश्य स्वरूपी दिसणा-या गोष्टी पटकन समोर येतात. पाळणाघरात नेहमी बघायला मिळणारा एका वर्षाहून लहान वयोगटाल्या मुलांचा हा अनुभव खूप काही सांगतो.  तिथे भिन्न वंशाची, वर्णाची मुले असतात. त्यापैकी एखादे मूल रडायला लागले, त्याला कशाची त्रास होत असेल तर ते काय करते माहिती आहे? आफ्रिकन वंशाचे मूल त्याच्या सारख्या दिसणा-या मुलाचा आधार शोधते! तसेच असते ओरिएंटल आणि इतर मुलांचे. हा फरक समजणे इतके नैसर्गिक आहे.  माझे मूळ आणि माझे बाह्य रूप, मी कुठे  आहे, माझ्याबरोबर कोण आहे या सर्व घटकांमुळे येणारा अनुभव वेगळा असतो.  विझिबल मायनॉरिटी मध्ये येणारी माणसे मात्र याउलट आपल्या भोवतालाचे भान विसरत नाहीत असे आढळले आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. देश आपला वाटला तरी माणसे आपली वाटण्याकरता एक comfort zone तयार व्हावा लागतो. इथे शाळा, कॉलेजेस, वा विद्यापिठे पाहिली तर विविध वंशाचे वर्णाचे लोक एकत्र काम करतात व शिकतात असे वाटते. पण जसे खोलवर जाऊ जसे दृश्य स्वरूपी साम्य पाहून मुलेमुली एकत्र असतात हे सुद्धा समजते. आवडनिवड आणि मते जुळणे या बरोबर त्यांचा वंश वर्ण वा धर्म या गोष्टी सुद्धा त्यामध्ये प्राधान्यक्रमाने असतात.असुरक्षित वाटणे जोवर मनात घर करून असते तोवर हा झोन तयार होणे अवघड असते. पण कालांतराने या गोष्टींवर तोडगा काढता येतो.

-------

 इथे जन्मलेली वा वाढणारी मुले,बाहेर देशातून आलेले त्यांचे पालक व अगदी सुरुवातीपासून राहणारे अमेरिकन यांच्यामध्ये या कंम्फर्ट झोनचा फरक असतो. मॅग्नोलियाचा वृक्ष प्रामुख्याने साऊथ इस्ट आशिया, नॉर्थ अमेरिका, लॅटिन अमेरिका आणि साऊथ अमेरिकेत आढळतो. त्याला येणारे फूल त्या झाडाच्या गर्द हिरव्या पानांमध्ये शोभून दिसते. त्यापैकी "किंग मॅग्नोलिया" ही त्याची विशिष्ट जात प्रामुख्याने नॉर्थ अमेरिकेत अनेक ठिकाणी दिसते. त्याला येणारे मोठे पांढरे शुभ्र फूल देखणे असते. भारताच्या साधारण तीनपट पसरलेल्या अमेरिकेचे या मॅग्नोलियासारखेच आहे. हा प्रदेश  भव्य आहे. विविध कारणांनी ही माणसे जगभर प्रसिद्ध होतात.  प्रथम युरोपातून आणि नंतर जगभरातून मंडळी अमेरिकेत आली. अस्मितेचे बॅगेज घेऊन, attitudes घेऊन. कालांतराने त्या सर्वांच्या दोन तीन पिढ्या इथेच स्थाईक झाल्या.  आता ही स्थानिक झालेली माणसे नव्याने येणा-यांकडे कसे पाहतात? त्यांच्याकडे बघण्याचा बाहेरून येणा-या लोकांचा दृष्टीकोन कसा असतो? अगदी बारकाईने पाहिले तर काय दिसते?या मॅग्नोलियाची झाडे, त्याचे फूल कोणत्याही इतर फुलासारखे आहे. ही माणसेही काही जगावेगळी नाहीत. दुष्काळात तग धरण्याची ताकद ही मॅग्नोलियाची खासियत आहे.  तशीच ही माणसे चिवट असतात, प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढतात.  मार्ग काढायचा असतो आणि भेद त्यात अडथळे असतात. ही जाणीव आणि कृती यामुळे खरा फरक पडतो. राजकारण आणि व्यवसाय या भेदाभेदांमुळे तेजीत असतात.

जगात आढळणारे जात,वर्ण, वंश, धर्म इत्यादी संकल्पनांसकट ही मंडळी "अमेरिकन" आहेत!

सोनाली जोशी

About the Author

साहित्यसंस्कृती