
लहानपणापासून आपण अनेक माणसांना भेटतो. त्यात खूप माणसे लग्न झालेली असतात असं आपल्या आठवणीत असतं. प्रेम आणि प्रेमात चिंब भिजलेल्या कथा आणि सिनेमा हा आपल्या वाढण्याचा एक अविभाज्य घटक असतो. थोडक्यात परीकथा वाचत आणि बघत मुले मोठी होतात. आपण ज्या समाजात राहतो त्यात स्वप्नाळू वयापासून प्रेम, साथ, जोडीदार, लग्न म्हणजे आयुष्याचे सोने झाले असे नकळत मनावर ठसलेले असते. तसे वाटले तर ते चुकीचे नाही. पण यशस्वी होण्यासाठी माणसाला जोडीदार असलाच पाहिजे, त्याचे विवाहित असणे वा रिलेशनशिपमध्ये असणे ही सर्वात महत्त्वाची बाब तर नक्कीच असू शकत नाही. अशी भावना ज्यांना जोडीदार मिळत नाही त्यांचीच असते असे कुणी म्हणेल. पण जोडीदार मिळवायला आणि नाते टिकवायला ज्यांना कष्ट घ्यावे लागले अशा कुणाचेही हेच मत असेल.
जगातल्या कोणत्याही प्रांतात, समाजरचनेनुसार यशस्वी होण्याची एक व्याख्या सुद्धा जोडीदार मिळवणे ही आहेच. हा जोडीदार कसा मिळवायचा, ही साथ कशी असावी त्याबद्दल मते वेगळी आहेत. पण अशा साथीशिवाय आयुष्य़ अपूर्ण आहे असे आपल्या मनावर नकळत बिंबवलेले असते. एखाद्या व्यक्तीची ओळख त्याचे/ तिचे लग्न झाले आहे नाही/ जोडीदार आहे वा नाही किंवा मुले आहेत की नाहीत याशिवाय अपूर्ण असते असे दिसते. या सर्वाचा मनावर परिणाम होत असतोच. किंबहुना यश, आनंद वा कोणतेही सुख प्रेमाच्या माणसांशिवाय अपूर्णच आहे ही भावना मनात घर करू लागलेले असते यात शंका नाही. या प्रेमाच्या माणसांत आपला/ आपली जीवनसाथी ही व्यक्ती गृहीत धरलेली आहे.
जी माणसे एकटी आहेत, ज्यांना जोडीदार नाही, जोडीदाराचे निधन झाले आहे अशा सर्वांना एकटे राहायचा निर्णय घेणे याकडे समाज कसे पाहतो ते नेमके माहिती आहे. घटस्फोट वा प्रेमभंग झाला आहे म्हणून मिळणारे उपदेशाचे डोस, दुकटे होण्याचे सल्ले यावर काही न बोललेलेच बरे. कोणताही सण, लग्न समारंभ वा आता येणारा व्हेलेंटाईन्स डे असो अशा एकटया माणसांना जगणे नकोसे होते असेही अनुभव त्यांना येतात. माणसांना दुकटे करण्याची ही घाई, त्यांना चार चौघांसारखी वाट घ्यायला लावण्याचे एवढे दडपण आणायचे कारण काय असावे असा विचार नेहमी मनात येतो.
नाते जोडले गेले म्हणजे आयुष्य सफल झाले अशी भावना आली की मग वयात आलेल्या मुलामुलींना एकमेकांकडे मोकळ्या निकोप दृष्टीने पाहता येत नाही. मैत्रीचा उद्देशही शेवटी जोडीदार मिळवणे हा एक असतो. एकटे राहणे नको म्हणून कोणतेही नाते स्वीकारणे हा पर्याय अनेकदा मुलेमुली घेतात. शिकलेले, उत्तम नोकरीधंदा करणारे असे तरूण तरूणी का बरे चुकीच्या नात्यांना संमती देतात? निवड चुकणं वेगळ. फसवणूक होणं निराळं. पण लग्न लावण्याची व लग्न करण्याची घाई आणि दडपण यामुळे माणसे अनेकदा चुकीच्या नात्यात बांधली जातात. त्यांच्या आयुष्यात आनंद तर येत नाहीच पण त्यातले असमाधान वाढत जाते. एका बरोबर दोन आयुष्य़ाची नासाडी होते हे वेगळे. मुले असतील तर ती त्यांना होणारा त्रास वेगळाच.
जी माणसे घाई करत नाहीत ती एकटी आहेत असे दिसते. म्हणजे ही घाई केली नाही तर हवा तसा/ तशी जोडीदार मिळाला नाही म्हणून येणारी निराशा असते ती टाळता येत नाही. योग्य जोडीदार नाही म्हणून तुटणारे नाते आणि त्यातून उभे राहणारे प्रश्न वेगळेच. त्यापेक्षा एकटेपणाचा तात्पुरता वा कायमस्वरूपी स्वीकार करायला मन तयार करता येईल का? हे मन फक्त मुलामुलींचेच नाही तर त्यांच्या पालकांचेही तयार व्हायला हवे. ( भारतीय कुटुंबपद्धतीत २१ वर्षाहून मोठी मुले आईवडीलांना त्यांची जबाबदारी वाटतात. मुलांचे लग्न हा त्यांचा यशस्वीतेचा टप्पा असतो. हे तर चुकीचे आहे यात शंका नाही)
आत्मविश्वास कायम राहावा, निराशा येऊ नये , आयुष्य अपूर्ण आहे अशी भावनाही मनात राहू नये असे वाटत असेल तर तिशी जवळ आली की दोनाचे चार हात करणे, लिव्ह इन, वन नाईट स्टॅंड इत्यादी गोष्टी जमल्या वा जमल्या नाहीत तरी आनंदी राहता येईल का हा विचार मुलामुलींना करणे गरजेचे आहे.
जोडीदाराशिवाय तुम्ही एकटे आहात असे वाटते का?नात्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन महत्त्वाचा आहे.
पूर्ण आणि संपूर्ण नात व जीवन, भीती वा प्रेम याकरता नात्याचा स्वीकार, नाईलाज वा पूर्ण विचार करून नात्याला दिलेली स्वीकृती महत्त्वाची आहे. नकारात्मदृष्ट्या नात्याकडे पाहणे की सकारात्मकदृष्ट्या नाते बघणे याने सुद्धा नाती बदलू शकतात. या नात्याशिवाय काय मिळणार नाही, ते नसेल तर तुम्ही समाधानी आहात का? हे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. प्रथम दर्शनी प्रेम वा प्रेमासाठी सबकुछ कुर्बान इत्यादी टोकाचे विचार दूरच असलेले बरे. नात्यामध्ये तडजोड करण्याची तुमची तयारी आहे का हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. हा सर्व विचार करून तुम्ही निर्णय घ्याल का? तसा निर्णय घेणे हे जास्त हिताचे.
ते निर्णय घेण्यासाठी आधी स्वत:वर प्रेम करता आले पाहिजे. स्वत:विषयी कोणतीही नकारात्मक भावना मनात नसावी. आपल्यात जी कमी आहे ती कमी माणसे नाते जोडूण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात असे दिसते. जोडीदार त्याला अपवाद कसा असेल? स्वत:चे दोष कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसे झाले की आपल्यावर प्रेम करता येते.त्यानंतर गुणदोषासह स्वीकार केला पाहिजे. ते सुद्धा महत्त्वाचे आहे. समाधानी होण्यासाठी नाते जोडण्यापेक्षा समाधानी असतांना नाते जोडणे अधिक योग्य. मला माझी उंची कमी आहे असे वाटते. ६ फूट उंचीचा नवरा मिळाला की माझ्या मनातले शल्य कमी होईल अशी भूमिका मुळातच चूक आहे. त्यामुळे अनेक नको असलेल्या सवयी वा दोष असलेला पण ६ फुटाचा मुलगा मी पसंत करेन याची शक्यता वाढते. स्वत:विषयी समाधान आणि स्वीकाराची भावना असेल तर अशी निवड करण्यात चुका होण्याची शकयता कमी होईल.
पूर्णत्वाची भावना म्हणजे काय? स्वत:विषयी असलेल्या भ्रामक कल्पना दूर करून वास्तवाचा स्वीकार. ही पूर्णत्वाची भावना एकटे असतांना आली तर दुसरी व्यक्ती येईल तिच्यामुळे माझे दोष दूर होतील वा जे चांगले आहे ते अधिक चांगले होईल ही अपेक्षा राहणार नाही. असे अवलंनबून असणे टाळता येईल.स्वत:विषयी पूर्णत्वाची भावना मनात ठेऊन मग जोडीदार का हवा, कसा हवा याचा विचार करा. एकटे असणे ही काही व्याधी नाही की ज्यावर इलाज करायलाच हवा! एकटे असणे ही एक स्थिती आहे, ती एक निवड आहे. तिच्याकडे निकोप नजरेने बघायला शिकू या!