
संकट एकटी येत नाहीत असे म्हणतात. परीक्षेत नापास होणे, ब्रेक अप होणे, नोकरी जाणे, जवळच्या माणसाचे निधन अशा बिकट परिस्थितीला एकामागून एक असे सामोरे जावे लागणे
हे सोपे नाहीच. त्यामुळे माणसे जीवनातली सकारात्मकता गमावण्याची शक्यता असते. एक अपयश आले की त्यानंतर सगळे बिनसणार, अंदाज चुकणार, अपेक्षाभंग होणार असे मनात धरून वागणारे अनेक्कण मी पाहिले आहेत. प्रकाश असूनही अंधारलेले आहे असे अनेकांना वाटते असे त्या स्थितीचे वर्णन करता येईल.अशा वाईट परिस्थितीत मनाची ताकद कशी कायम ठेवाल?
१. मनावर ताबा ठेवा
सकरात्मक वागण्याची सुरुवात मनात येणा-या विचारांपासून करायची आहे हे पक्के करा. मनात येणारे वाईट विचार प्रत्यक्षात येतील अशी भीती बाळगू नका. मनात कितीही वाईट विचार आले, हिंस्रक भावना आल्या तरी त्या नाकारा. एक दीर्घ श्वास घ्या, मनावरचा ताण कमी होईल.
२.संगीत ऐका
जगातल्या विविध प्रकारच्या संगीतात मनाची शक्ती वाढवण्याची ताकद आहे. मनावरचा ताण कमी करण्याची शक्ती आहे. ज्या संगीताने मनाला प्रसन्न वाटते, प्रेरणादायी वाटते ते संगीत ऐका.
३. मनाली उभारी देणारे वाचन करा
आपण जे वाचतो वा पाहतो त्याचा नकळत मनावर परिणाम होत असतो. मनावर ताण असेल, अतिशय नकारात्मक विचार असतील तर भीतीदायी वा त्रासदायक काही बघू वा वाचू नका. तेव्हा प्रेरणा देणारे वाचन करा. मनाला उभारी देणारे लेखन वाचा. जगात यशस्वी आणि प्रसिद्ध अशी जवळ जवळ प्रत्येक व्यक्ती एका टप्प्यावर अयशस्वी होत होती हे लक्षात घ्या. कोणतेही नवे काम करतांना चुका होतात. त्या समजून घ्या. त्या कमी करा. यशस्वी लोकांच्या चरित्रापासून अधिक व सातत्याने प्रयत्न करण्याची शक्ती घ्या.
४.इतरांच्या यशाने खच्ची होऊ नका
तुलना करू नका.माणूस त्याचे यश वा अपयश अनेकदा तुलनेने मोजत असतो. इतरांना यश मिळाले म्हणजे तुम्ही अयशस्वी झाला असा विचार मनात निर्माण होणे अशावेळी टाळणे अवघड असते. त्याचा परिणाम आपण अधिकच अपयशी झालो आहोत असे वाटण्यात होतो. इतरांवरून स्वत:चे अपयश वा यश ठरवू नका. त्याने खच्ची होऊ नका.स्वत:चे काय चुकले ते पहा, ते सुधारा, अधिक प्रयत्न करा.
५. लक्ष केंद्रित करा, मेडिटेशन करा.
शरीर व मन एकत्र काम करतात हे ध्यानात ठेवा. एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर त्यावर योग्य उपचार करा. वैद्यकीय उपचार घेण्यात कमीपणा मानू नका. यात शरीर व मन दोन्ही आले. मन ताब्यात राहणे, दु:ख कमी वाटणे या सर्वांकरता एकाच गोष्टीवर ध्यान द्या. लक्ष केंद्रित करण्याची सवय करा. जो मेडिटेशनचा मार्ग योग्य वाटतो तो स्वीकारा. त्याने ताण कमी होईल. त्यामुळे शांत वाटेल व अनेक प्रश्नांवर तोडगा सुचण्याची शक्यता निर्माण होईल.
६. अनेक गोष्टी नियंत्रणाबाहेर असू शकतात
प्रयत्नांनी बरेच काही शक्य होते असे आपण म्हणतो. तसे घडतेही. पण काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. चौकात उभे असतांना तुमचे वाहन तुम्ही नियंत्रित करू शकता. शेजारचे वाहन तुमच्या अंगावर येणार नाही हे तुम्हाला नियंत्रित करता येत नाही. अशाप्रकारे एखादी व्यक्ती, तिचे वागणे, एखादी घटना तुमच्या नियंत्रणाबाहेर असते. ते स्वीकारा. त्याने मनाची उभारी घालवू नका.
गोष्ट शक्य होईल अशा भूमिकेतून प्रयत्न करा व अपयश आले तर ते स्वीकारा. मनाला अशी शिकवण दिली की सकारात्मकता वाढत जाते.