मार्डिग्रा

           नव वर्ष सुरू झालं की दुकानांत रंगीबेरंगी माळा दिसू लागतात. तेव्हा आणि दरवेळी घर बदलतांना घरातल्या त्या भल्यामोठ्य़ा प्लास्टीकच्या रंगीबेरंगी माळा पाहिल्या की माझ्या मनातल्या पहिल्या मार्डिग्राच्या स्मृती जाग्या होतात. मार्डिग्राच्या एका परेडमध्ये, ऐन थंडीत गर्दीमध्ये उभे राहून धडपडून मिळवलेली ती माळ खर अगदीच साधीच आहे. पण एक वेगळा अनुभव त्या माळांच्या निमित्त्याने माझ्यापुढे आला. म्हणूनच  त्या माळा फेकून न देता मी पुन्हा दुस-या घरात नेते. वसंताचे स्वागत आणि सृजनाचा उत्सव म्हणजे " मार्डिग्रा". ख्रिसमस आणि नवे वर्ष सुरु झाल्यापासून लोक मौजमजा, खाणेपिणे आणि जल्लोशात मग्न असतात.  मार्डिग्रा या शब्दाचा अर्थ आहे  "Fat Tuesday" . हा दिवस झाला की त्यानंतर सुरु होणारा बंधनाचा, संयमाचा ४० -४५ दिवसाचा काळ घालवण्याची ही पूर्वतयारी असते असे लोक मानतात.  आपल्याकडे श्रावण सुरु होण्याआधीची अमावस्या ज्या हेतूने साजरी होते तसाच प्रकार म्हणू या! 

 

१६९९ मध्ये फ्रेंच व्यक्तींमुळे अमेरिकेत मार्डिग्राची सुरुवात झाली अशी नोंद आहे. १८२७ पासून न्युऑर्लिन्स येथे मार्डिग्रा मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागला. मिरवणुका, चित्ररथ, नाचगाणे आणि उत्तम पदार्थांची रेलचेल असे या उत्सवाचे स्वरूप असते. अमेरिकेशिवाय ब्राझील, इटली आणि जर्मनीतही मार्डिग्रा साजरा होतो.  हा उत्सव अमेरिकेच्या दक्षिण भागात -. ल्युईझियाना, टेक्सास आणि अलाबामा या राज्यात प्रामुख्याने साजरा होतो. ल्युइझियाना राज्यातले ’न्युऑर्लिन्स’ हे शहर या उत्सवाकरता जगप्रसिद्ध आहे. अमेरिकेतून, जगातून या उत्सवाकरता लोक न्युऑरिलिन्सला येतात. सर्व शहरात उत्साहाचे, आनंदाचे वातावरण असते. रस्त्यांवरून जाणारे चित्ररथ आणि मिरवणुका बघण्याकरता लोक दोन्ही बाजुला उभे असतात. चित्ररथात असलेली माणसे विविध वेशभूषा करतात. प्रत्येक चित्ररथाचे तसेच ठराविक परेडचे एक थीम असते. परेडमध्ये अनेक चित्ररथ, डान्स ग्रूप , लोकल बॅण्ड याचाही समावेश असतो. अनेकदा त्यांचे थीम हॉलीवुड वा ग्रीक मायथॉलॉजीवर आधारित असते. परेडमध्ये सहभाग घेतलेले लोक हातात गळ्यात प्लास्टिकच्या मोत्याच्या माळा घालतात. या मोत्यांचे रंग फक्त जांभळा, सोनरी आणि हिरवा असेच असतात. ही माणसे रस्त्यावर उभे असलेल्या लोकांकडे त्या माळा, कॅन्डी आणि छोटी खेळणी फेकतात. त्या माळा आणि इतर गोष्टी गोळा करायला एकच झुंबड उडते हे दृष्य अनेक ठिकाणी सहज आढळते.  अशा माळांनी नटलेले अनेकजण घोळकयाने रस्त्यावरून जात असतात. या माळांविषयी अधिक माहिती आपण नंतर पाहू या.

         काही भागात स्टेडियममध्ये असतात तसे स्टॅंड करून रस्त्याच्या दोन्ही बाजुला लोकांची बसण्याची व्यवस्था केलेली असते. अनेक मोठ्या कंपन्या अशा सॅन्डचे प्रायोजक असतात. विकेंडला कंपनीतील लोकांनी या उत्सवाला यावे म्हणून येण्याजाण्याचीही व्यवस्था करतात. त्यांच्याकरता काही जागा राखीव ठेवतात. विविध क्षेत्रात मार्डिग्राच्या निमित्त्याने आर्थिक उलाढाल होते. २००६ मध्ये झालेल्या सागरी वादळांमुळे न्युऑर्लियन्स शहराचे झालेले नुकसान अजूनही भरून निघालेले नाही. शहराचे आर्थिक सबळीकरण होण्याकरता त्यानंतर उत्सवाला अधिकच मह्त्त्व प्राप्त झाले आहे.

हा उत्सव सार्वजनिक तसेच घरोघरीही साजरा होतो. अनेक मोठ्या  खाजगी पार्ट्य़ांचाही यात मोठा सहभाग असतो. मोठ्या हॉटेलच्या बॉलरूम्समध्ये मुद्दाम डान्सचे आयोजन केले असते. अनेक सेवाभावी संस्था त्या काळात याच शहरात उपयुक्त उपक्रम राबवतात. या उत्साहात सर्व आर्थिक आणि सामाजिक स्थरातील लोकांनी सहभावी व्हावे याकरता प्रयत्न केले जातात.

या दिवसात खाण्यापिण्याचा जल्लोशाचा निव्वळ अतिरेक असतो असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मार्डिग्रा झाला की हे सेलेब्रेशन संपते आणि बुधवार पासून ते इस्टर पर्यंत लोक एखादी गोष्ट, एखादा नियम ठरवतात, तो पाळतात, एखादया पदार्थाचा त्याग करतात. 

किंग केक

साधारण जानेवारीच्या ६ तारखेपासून दुकानात, बेकरीत सोनेरी, हिरवा आणि जांभळ्या रंगाचे केक दिसू लागतात. न्याय, विश्वास आणि सामर्थ्याचा पुरस्कार करणारा हा केक किंग केक या नावाने ओळखला जातो. किंग केक दिसू लागले की या उत्सवाची; कार्निवलची चाहूल लागते. कोणतीही धार्मिक माहिती नसली तरी उत्सवप्रिय व्यक्तीला हे केक दिसले की पार्ट्यांची आमंत्रणे येणार हे वेगळे सांगावे लागत नाही. या कार्निवलची समाप्ती मार्डिग्राने होते. पण मधले हे सर्व दिवस लोक भरपूर खादाडी करतात. ऑफिसात, शाळेत, लायब्ररी अशा अनेक ठिकाणी लोक किंग केक आणतात, वाटतात. अनेकदा या केकमधे एक प्लास्टीकची -बाळाची प्रतिकृती असते- छोट्या येशूचे प्रतीक म्हणून ती ठेवतात. ज्या व्यक्तीच्या केकच्या तुकड्यात ती प्रतिकृती येते ती व्यक्ती दुस-या दिवशी केक आणते असा रिवाज असतो. स्पॅनिश संस्कृतीमध्येही या किंग केकचा समावेश आहे. त्यात मध्यभागी प्रतिकृती म्हणून बिन्स वा मटाराचा वापर करतात.

न्युऑर्लिन्स आणि मार्डिग्रा

फ्रेंच आर्किटेक्चरकरता न्युऑर्लिन्स हा भाग प्रसिद्ध आहे. या शहरात अनेक प्राचीन वस्तुसंग्रहालये , दुकाने आहेत. इतकेच नाही तर संगीत आणि चित्रकला याकरता हा भाग विशेष ओळखला जातो. अनेक हॉटेल्स आणि ऑडिटोरियम्समध्ये स्थानिक तसेच नामांकित कलाकारांची उपस्थिती प्रामुख्याने जाणवते.  मार्डिग्रा सिझनमध्ये रोज रस्त्यावरून निघणा-या मिरवणुका आणि चित्ररथ यामुळे वाह्तुकीची कोंडी होण्याची शक्यता असते. ती सोडवणे हे ट्रॅफिक पोलिसांचे या दिवसातले मुख्य काम असते.  मार्डिग्रा दरम्यान अनेक मिरवणुका वा अनेक उपक्रम मुलाबाळांसहीत साजरे करता येतात. गरोदर स्त्रीपासून अगदी तान्हया बाळाला घेऊन आलेली माणसे मी मार्डिग्राला बघितली आहेत. अशा सहकुटुंब बघता येतील अशा परेडस हा या उत्सवाचा फक्त एक छोटासा भाग आहे.  शरीराने आणि मनाने तरूण असलेल्या सर्वांकरता हे शहर वेगवेगळ्या संधीची पर्वणी आहे!

फ्रेंच क्वाटर्स हा भाग बघतांना जरा दुसरीकडे नजर गेली तर आपल्या घराचा रस्ता आठवायला खास प्रयत्न करावे लागतील अशी आकर्षणे ठिकठिकाणी आहेत.  बर्ब्रॉन स्ट्रीटवर नग्नतेचे कुणालाही वावडे नाही. गळ्यात घातलेल्या माळांचा वेगळाच उपयोग इथे होतो हे आपल्या ध्यानात यायला वेळ लागत नाही. गेली अनेक वर्षे या माळा चीनमधून आयात करतात असे म्हणतात. या विविध प्रकारच्या शोभिवंत माळा म्हणजे उत्सवाचा जीव की प्राण! जी चीनी मंडळी माळा तयार करतात ते कारागीर त्याबद्दल खूपच जिव्हाळयाने बोलतात. त्याच्यातला कलाकार नवेनवे प्रयोग करण्यात आनंदी असतो असे इथे आलेल्या काही चिनी मित्रमैत्रिणींनी सांगितले. पण अनेकदा त्या मंडळींचा आपण तयार केलेल्या माळा दागिने  म्हणून घालतात असा समज असतो. पण प्रत्यक्षात अमेरिकेत जे घडते ते निराळेच. एखाद्या पुरुषाने एखादी रंगीत माळ एखाद्या स्त्रीला दिली आणि तिने ती स्वीकारली तर -- दोघांच्या इच्छेनुसार तिथे बरेच काही घडते. त्या भागात अनेक पब् आहेत. त्यात गे पब्सही आहेत. वर्षातील कोणत्याही दिवशी अगदी दिवसाढवळ्याही  इथे सांस्कृतिक धक्क्यांकरता तयार असावे लागते ही वस्तुस्थिती आहे. लासवेगासची श्रीमंती आणि भव्यता या शहराला नसली तरी त्याचे स्वत:चे स्थान अबाधित आहे.  गुन्हेगारी आणि अनेक बेकायदेशीर व्यवसाय हा येथील जीवनाचा अविभाज्य घटक आहे. या शहरातील काही भाग अगदी बकाल आहेत, तर काही गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध! हे सर्व माहिती असूनही या शहराचे आकर्षण कायम आहे. रेव्ह पार्ट्या होणा-या भारतातील शहरात आता कशाचेच नवल राहिलेले नाही. पण २००० सालापर्यंत येथे येणारे भारतीय विद्यार्थी ५-६ तासाचे ड्रायव्हिंग करून, रात्रपहाट करून जवळपासच्या शहरातून न्युऑर्लिन्सला जाण्यासाठी उत्सुक असत हे मी खात्रीने सांगू शकते! आजही परिस्थिती खूप बदली असेल असे नाही, फक्त त्यात अनपेक्षित वा धक्कादायक असे काही नसावे. त्यावेळी मी हे प्रथम पाहत होते. सार्वजनिक ठिकाणी लैंगिक भावनांचे इतके थेट आणि मोकळे प्रदर्शन इतरत्र मी पाहिले नव्हते. लैंगिक स्वातंत्र्य, open relationship या सर्व बाबी किती जाहीरपणे व सहज स्वीकारता येतात ते या दरम्यान नक्की दिसते. मने दुखावली जातात, शोषण होते ही दुसरी बाजू.
एकदा मार्डिग्राचा अनुभव घेतलेली व्यक्ती पुन्हा न्युऑर्लिन्सला गेली नाही तरच नवल! न्युऑर्लिन्समध्ये राहणा-या मंडळींना पाहुण्यांची सवय असते ते उगीच नाही..

मार्डिग्रादरम्यान रस्त्यावर प्रचंड गर्दी असते. अगदी मध्यरात्रीपर्यंत हातात बियरचा ग्लास घेतलेले, जरा जास्त झालेले.. असे विविध प्रकारचे लोक त्यात असतात.  मित्रमैत्रिणीबरोबर वा घोळक्याने हिंडणे अशा वेळी  जास्त सुरक्षित असते यात शंका नाही. "seafood "  साठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात मार्डिग्राच्या वेळी फाईड चिकनला सर्वाधिक मागणी असते असे म्हणतात. एरवी शहर आणि स्वच्छता या दोन्हीकडे लक्ष देणारी अनेक माणसे शुद्धीत नसतात त्यामुळे रस्त्यावर बियरचे ग्लास, बाटल्या. सिगरेटची थोटके,माळा यातून  मार्ग काढत चालावे लागते. जोरदार वाजणारे संगीत आणि वाद्ये, दरवळणारा घमघमाट, थंडी.. कशाचाच कुणाला त्रास होत नसावा असे उत्साहाचे गारूड मी तिथे पाहिले आहे. लोकांच्या अंगातला उत्साह परेड संपली तरी ओसरत नाही! मनात विचार येतो आता उद्या अशा रस्त्यावर कशी वाहने धावतील?जागोजागी नुसता कचरा!

पण वास्तव वेगळे आहे. जर कुणी जास्त काळ तिथे रेंगाळले असेल तर पहाटेलाच शहरातील स्वच्छता राखणारे कामगार येतात हे कळते.  प्रत्येक रस्ता, गल्ल्लीबोळ ते स्वच्छ करतात. जेवढे दिवस कार्निवल सुरु असतो तेवढे दिवस हाच नियम! fat tuesday नंतर येणारा बुधवार संयमाची आठवण करणारा असतो!

-सोनाली जोशी

 

 

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह