अभिरुची रमेश ज्ञातेच्या कविता

भूतकाळातल्या वा स्वप्नांतल्या सत्यांच्या वर्तमानात पडणाऱ्या सावल्यांकडे ‘ पाहणे ‘ म्हणजे या कविता. त्यामुळे, या कवितांत ‘ सावली ‘ ही प्रतिमा अनेकदा येते. आशयाची ही सूक्ष्मता आणि त्याचे सर्वांगीण अवधान ही अभिरुचीच्या कवितेची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. तिच्या कवितेची ही रहस्ये व्यक्त करणारी या संग्रहातली ‘ जोगवा ‘ ही कविता या दॄष्टीने अनेकदा वाचावी अशी आहे. अभिरुचीची कविता ही एक वेगळी कविता आहे – ना स्त्रीवादी, ना विद्रोही, ना कसला न्याय मागणारी, ...

ना कसली तक्रार करणारी, ना नुसतेच आत्मकेंद्री अनुभव मांडणारी. एका स्त्रीमनाच्या जगण्याच्या या सूक्ष्म आणि संवेदनशील अवस्थांचे हे पूर्ण व्यक्त होणे आहे. काळाची गूढे समजून घेण्याच्या कॄती हेही या कवितेत मधून मधून घडत राहते कारण तिच्या ‘ असण्या ‘ चीच ती मागणी आहे. या कविता म्हणजे सावल्या असल्याची जाणीव असल्याने, ते क्षण पूर्णत्वाने व्यक्त होत असले तरी त्यांत या क्षणीचे तडक गुंतणे नाहीय. त्यामुळे, या कवितांना एक तटस्थतेचेही परिमाण लाभते. या एक प्रकारच्या आध्यात्मिक, तत्त्वज्ञानात्मक दॄष्टीमुळे कविता साधी राहते. इथे खूप प्रतिमांची रेलचेल वा श्रीमंती येत नाही. कलात्मकतेचेही प्रदर्शन नाही. अनुभवांच्या या ‘ पाहण्या ‘ तच एक अर्थसमॄद्धी आहे. अशा प्रकारच्या या, प्रेम, मीलन आणि विरह यांच्याच पण वेगळ्या कविता आहेत. ‘ सामाजिक बांधिलकी ‘ वा ‘ राजकीय भूमिका ‘ यांची मूल्यात्मक मागणी असणारे कदाचित या कवितेला शून्य गुण देऊन नापास करतील, पण, कॊणत्याही अटीशिवाय जगण्याकडे पाहणे हे सांस्कॄतिक प्रवाहाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असते, हे दुर्लक्षिता येणार नाही. त्या दॄष्टीने मराठीतली ही महत्त्वाची कविता आहे. यातल्या सगळ्याच कविता या, या सर्व वैशिष्ट्यांनी युक्त आहेत असे नाही. काही कविता नीट जमलेल्या नाहीत, काहींत अभिव्यक्तीतला कच्चेपणाही दिसतो, पण, महत्त्व जोखायचे ते जमलेल्या कावितांतून – अभिव्यक्तीच्या प्रक्रियेतली स्मूथ परिपक्वता जिथे दिसते त्या कवितांवरून. इथे कवितांची उदधॄते देत या कवितांचे सविस्तर परीक्षण करण्याचा हेतू नाही. मला जाणवलेली त्यांची काही वैशिष्ट्ये सांगावीत आणि या कविता समजून घेण्याच्या मला दिसणाऱ्या शक्यता सुचवाव्यात, इतकाच हेतू आहे. या कवितांच्या अर्थसंपॄक्ततेची दोन उदाहरणे देऊन थांबतो –

आता मी आश्वासकपणे पाहत राहते
कधी अतॄप्त राहूच न शकणाऱ्या
आणि वेगात भूतकाळ बनू पाहणाऱ्या
माझ्या वर्तमान संदर्भांच्या दिंडीकडे...
आता आयुष्यात येणारा भूतकाळ
कधीच छळणार नाही मला
माझ्या मानेत आपली धारदार हिंस्र नखं खोचत... ( ' स्वत्व ' -- पॄ ५७ )
( यात ‘ येणारा भूतकाळ ‘ ही कल्पना बघा ! )
तसेच –
मुद्दाम जपायच्या नाहीत म्हणून मोडीत काढलेल्या वस्तूंसारखी
मी देखील नाहीशी झाले... ( ' शिशिर ' -- पॄ १८ )

उदाहरणांदाखल मला आवडलेल्या काही कविता म्हणजे –
जगणे, जाणिवा, ओवी, थेंब, क्षण आणि प्रारब्ध. या सहज सापडल्या त्या दिल्या आहेत.
माझ्या मते हा एक वेगळा, महत्त्वाचा कवितासंग्रह आहे. गमभन प्रकाशन आणि राज्य साहित्य आणि संस्कॄती मंडळ यांचे या प्रकाशनाबद्दल अभिनंदन !

About the Author

साहित्यसंस्कृती