मी हू डोव्ह इन टू द हार्ट ऑफ द वर्ल्ड

 अडचणींवर मात करणारी, शारीरिक व्यंगावर वा व्याधीवर मात करून यशस्वी होणारे नायक नायिका असलेली अनेक पुस्तके असतात. 

 Me, Who Dove into the Heart of the World
लेखिका Sabina Berman, अनुवाद Lisa Dillman)

ही कादंबरी त्या पुस्तकांसारखी नाही. केवळ प्रमुख पात्र यशस्वी होते वा अपयशी ठरते यापेक्षा यात बरेच काही आहे. अ‍ॅनिमल राईटस, बुद्धाचे तत्त्व, माणूस असणे म्हणजे काय अशा विविध बाबी यात लेखिकेने अतिशय कौशल्याने गुंफल्या आहेत. ह्या कथानकात मुख्य पात्र आहे केरन. तिला Autism (high functional autism) आहे. 

तिच्या चाळीशीपासून लेखिका एका विलक्षण वेगळ्या आयुष्य़ाची कथा सुरु करते. कथानकात थेट बालपणापर्यंतच्या अनेक घटनांचा मागोवा घेतलेला आहे. आपण केरनबरोबर तिच्या ती जसा प्रवास करते तसे तिच्या वेगळ्या, धक्कादायक, रोमहर्षक विश्वात प्रवास करतो. केरनच्या आयुष्याचा वेगळे वळण लागते ते तिच्या मावशीमुळे- इझाबेलमुळे. आईचं प्रेम न मिळालेली केरन मावशीच्या प्रेमामुळे जीवन ख-या अर्थानं जगू लागते. 

आजोबांकडून वारसाहक्काने मिळालेला व्यवसाय आता या दोघींना चालवायचा असतो. त्यानिमित्त्याने ट्युना फिश इंडस्ट्री, अमेरिका आणि मॅक्सिकोचे संबंध, विविध कायदे आणि घटना -त्याचे व्यवसायावर व माणसांवर होणारे परिणाम याची माहिती ही कादंबरी वाचतांना मिळते.

शिक्षणाकरता अमेरिकेत आलेली केरन, शिक्षणपद्धती, तिचे अनुभव आपल्यापुढे एक वेगळं  विश्व उलगडून दाखवतं. सबीना बर्मन आपल्या शिक्षणपद्धतीतल्या त्रुटी कधी खिन्नपणे, कधी खास उपहासात्मक शैलीत तर कधी सहज खुशखुशीत टोमणे मारत पुढे आणतात. केरनला विनोद वा विरोधाभास कळत नाही. पण तिची मते, तिची कृती आपल्याकरता विनोद निर्माण करते, आपल्याला विचार करायला लावते.
 शिक्षणाचा उद्देश काय? हा एक असाच प्रश्न मनात डोकावल्याशिवाय राहत नाही.

ऑटिझम नसलेली माणसे आणि एकूणातच आपण ज्या गोष्टी आपला हक्कच आहे अशा थाटात गृहित धरतो, आपले श्रेष्ठत्व मिरवतो, त्यामुळे कसे शोषण करतो याचे अनेक दाखले ही कादंबरी वाचतांना येतात. केरनची  दृष्टी निरागस आहे हे त्याचे कारण. तिला प्राण्यांचे आणि निसर्गाचा मानवाने चालवलेले शोषण मान्य नाही. ती धर्म, इतिहास, फाय्दा तोटा वा सामाजिक संकेत यांच्याशिवाय या घटकांकडे समान नजरेने पाहते. म्हणून माणसे, प्राणी आणि निसर्ग यांना समसमान समजते.

(मला प्रमुख पात्राचे नाव कळायला मला वेळ लागला कारण हे पात्र फक्त मी असं केलं, मला असं करायचं आहे याच भाषेत बोलते.) केरनला काही साध्या साध्या गोष्टी कळत नाहीत, करता येत नाहीत. पण काही गोष्टींमध्ये तिचे प्रभुत्त्व विलक्षण आहे. तिचे विचार काळ्य़ा पांढ-या अशा दोन पद्धतीत विभागलेले असतात. तिला  डार्विनपेक्षा रेने डेकार्ट अधिक आवडतो. 

उत्सुकता वाढवणारे पण थोडे वेगळे काही वाचायला जर तुम्हाला आवडत असेल तर सबिना बर्मनचे हे पुस्तक नक्की वाचा.

 Me, Who Dove into the Heart of the World
लेखिका Sabina Berman, अनुवाद Lisa Dillman)

Image credit- amazon.in

http://www.amazon.in/Who-Dove-into-Heart-World/dp/0805093257/ref=sr_1_1?s=books&ie=UTF8&qid=1459527940&sr=1-1&keywords=me+who+dove+into+the+heart+of+the+world

 

About the Author

novel reader's picture
novel reader