उत्तम व्यक्ती व्हावे असे वाटते ?- या ५ गोष्टी करा

उत्तम व्यक्ती व्हावे असे वाटते?- या ५ गोष्टी करा

आपल्या मनात आपण कोण व्हावे, अधिक चांगले काम करावे, आवडत्या व्यक्तीला सुख द्यावे अशा प्रकारचे अनेक विचार येत असतात. कुणाला उत्तम विद्यार्थी, उत्तम सहकारी,उत्तम शिक्षक व्हायचं असत, उत्तम व्यावसायिक व्हायचं असत. आपण आहोत त्यापेक्षा जास्त चांगले करावे अशी इच्छा मनात असते. भूतकाळात आपण जसे वागलो तसे वागायला नको होते असे वाटत असते.त्याऐवजी कसे वागायला हवे होते याच्या अनेक नोंदी मनात असतात. उत्तम पालक, उत्तम साथी असे जे असेल ते अधिक चांगल्या पद्धतीने करायचे असेल तर आपल्यात सुधारण करणे आवश्यक असते.

कोणतेही काम अधिक चांगले करण्याकरता हे पाच प्रश्न विचारा, त्याची जी उत्तरे येतील त्याचा पाठपुरावा करा. तसे वागा. बदल करा. उत्तम व्यक्ती होण्याची हीच गुरुकिल्ली आहे.

१. तुम्ही इतरांशी कसे आणि काय बोलता?
तुमच्या बोलण्यात नकारात्मकता, हेवा, उपहास आहे का ते पहा. तुम्ही व्यक्ती आहे तशी स्वीकारता की त्याविषयी आपली मते सांगता? काही वेळा मते लादता?तुमचे विचार, तुमचे प्रश्न यावर लक्ष केंद्रित करा. ज्या आदर्शांचा पाठपुरावा करायचा आहे त्यापेक्षा तुमचे वागणे वेगळे आहे का? तसे असेल तर योग्य तो बदल करा.

२.तुम्हाला काय शिकता येईल?
मला सर्वकाही येत अशी भावना मनात असेल तर नवे काही शिकण्याची गरज वाटत नाही.त्यामुळे वाढ खुंटते. नवे कौशल्य, नवी भाषा, नवे तंत्र , एखादी वेगळी सवय अशाप्रकारच्या अनेक गोष्टी शिकत राहणे समृद्ध जीवनासाठी आवश्यक आहे. तुमच्यात काय त्रुटी आहेत, काय तुमचे बलस्थान आहे याचा आढावा येणे आवश्यक आहे. त्रुटी कशा दूर करता येतील याचे प्रयत्न करा. त्याकरता नवे काही शिकण्याची तयारी ठेवा. काय शिकता येईल याची एक यादी करा.

३.ध्येयवादी आहात का?
तुम्हाला काय करायचे आहे, काय हवे आहे याबद्दल सतत सतर्क रहा. आपले ध्येय ठरवा. त्यापासून विचलित होऊ नका. असे जगणे म्हणजे आयुष्य योग्यप्रकारे जगणे आहे. तुमचे हे विचार जेवढे स्पष्ट असतील तेवढे तुमच्याशी बोलणे, संपर्क करणे सोपे होते. तुमचे स्वत:चे मत बाळगा, ते स्पष्ट करा.

४. क्षमाशील आहात का?
मनुष्य जेवढा जास्त ध्येयवादी होत जातो तेवढे त्याचे इतरांबाबतचे मत अधिक टोकदार होण्याची शक्यता असते. ध्येय गाठतांना ज्या कुणाचा अडथडा येतो, जे कुणी त्रास देत आहेत असे वाटते त्यांना क्षमा करा. त्यांचा बदला घेण्यात वेळ वाया घालवू नका.त्यांना त्रास देण्यापेक्षा ध्येयाकडे लक्ष द्या, त्याकरता प्रयत्न करा. व्यैयक्तिक व सामाजिक आयुष्य़ात अधिक क्षमाशील व्हा.

५.तुम्हाला प्रेम व कृतज्ञता याचे महत्त्व आहे का?
ध्येयाकडे वाटचाल करतांना मनात कटूता बाळगू नका. इतरांविषयी आणि व्यावसायिक स्पर्धकांविषयी मनात अढी बाळगू नका. त्याऐवजी जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञता बाळगा. ज्या लोकांनी सहकार्य केले त्यांचा उल्लेख करा. प्रेम भावना मनात असेल तर आपली दृष्टी सकारात्मक राहते. कृतज्ञता मनात असेल तर अहंकार दूर ठेवता येतो. त्यामुळे नवे शिकण्याची उमेद कायम राह्ते.उत्तम व्यक्ती होण्याची हीच गुरूकिल्ली आहे.

 

About the Author

साहित्यसंस्कृती