द सिंपथाएझर

 द सिंपथाएझर
मला युध्दकथा वा मध्यवर्ती व्यक्तीरेखा एक गुप्तहेर आहे अशी पुस्तके खूप आवडतात असे नाही. किंबहुना ती वाचतांना त्रासच होतो. त्यामागे अनेक कारणे आहेत. "द सिंपथाएझर" ही कादंबरी मात्र आमच्या लायब्ररीतल्या एका मैत्रिणीने आवर्जून वाच असे सांगितल्याने वाचली. 
ऐतिहासिक, रहस्यमय आणि अतिशय अकल्पित बदल वाचकांपुढे ठेवणारी ही कादंबरी आहे; एशियातून आलेले, अमेरिकेत राहणारे अशा सर्वांनी वाचावी अशी कादंबरी आहे असे मत्रिणीचे म्हणणे होते.ते  पटले.

सोपे करून सांगायचे तर ही एका गुप्तहेराची कथा आहे. या कादंबरीची सुरुवात "I am a spy, a sleeper, a spook, a man of two faces," अशी आहे. हया ओळी म्हणजे कमांडंट म्हणून वावरणा-यासमोर नायकाने दिलेला माफीनामा आहे.

(पात्राला नाव नसलेला) कादंबरीचा नायक त्याच्या बॉसबरोबर, त्याच्या साथीदारांबरोबर विमानात बसलेला असतो. साऊथ व्हिएटनाम सोडून जाण्याचे फर्मान निघालेले असते.नायक नॉर्थ व्हिएटनाममधील कम्युनिस्टांचा हा गुप्तहेर आहे. जे अर्थातच त्याचा सह्कारी, बॉस यांना यावेळी माहिती नाही. ही मंडळी पळून जाऊन जीव वाचवणार आहेत.अमेरिकेत हॉलीवूडच्या एका अगदीच सामान्य भागात सेटल झाल्यावर हा बॉस काय काय करतो ते सांगण्याची व त्यावर पाळत ठेवण्याची जबाबदारी या नायकाची आहे. युद्ध संपले नाही तर ते पुन्हा सुरु करता येईल अशी भूमिका त्यामागे आहे.

 

---

या नायकाला खरेच दोन चेहरे आहेत. त्याच्या धारणा, निष्ठा आणि श्रद्धा  दुभंगलेल्या आहेत. त्याच्या आयुष्यात जागोजागी विसंगती आहे. नायकाला जे अनुभव येतात त्यात स्थलांतरीत समुहाला सामोरे जावे लागणारे अनेक प्रसंग आहेत. वेगाने होणा-या जागतिकीकरणात या प्रसंगांना अगदी देशाबाहेर न जाताही काही प्रमाणात अनुभवता येते ही वस्तुस्थिती आहे. आपल्या  श्रद्धा अणि निष्ठा कशा बदलतात हे त्याचे साधे उदाहरण.
 आपल्याला आश्चर्य चकित करणा-या स्थलांतरित व्यक्तीच्या आयुष्य़ातल्या अनेक घटना आणि आव्हाने याचा या निमित्त्याने उहापोह केला आहे. 

---

अमेरिकेच्या या दुस-या वारीत नायकाला अमेरिकन स्वप्नाच्या वेगळ्या सत्याला सामोरे जावे लागते. व्हिएटनाम युद्धाविषयी अमेरिकन लोकांची धारणा, अमेरिकेच्या सहभागाविषयीच्या संकल्पना आणि व्हिएटनामी लोकांच्या धारणा तपासून पाहणारे हे संदर्भ अतिशय महत्त्वाचे आहेत. विविध विसंगतीने बदलेल्या या कादंबरीत अमेरिकन ड्रीमकडे उपहासात्मक नजरेनेही पाहिले आहे. जगाच्या राजकारणात अमेरिकेचे स्थान काय, जगात कुठेही क्रांती होते तेव्हा त्यामागची कारणे, सत्ये कोणती असे अनेक प्रश्न आणि त्याचा लेखाजोखा आपल्यासमोर उलगडतो. 

--
युद्धानंतर सामान्य लोकांचे काय झाले? त्यांना दिलेली वचने पाळली गेली का?ती पाळली गेली नाहीत त्याचे कोणते परिणाम लोकांना भोगावे लागले याची कारणे या अनुषंगाने तपासून पाहिली आहेत. युद्ध करणे योग्य होते का? कोण चुकले, कोण बरोबर होते वा उत्सुकता ताणणारी युद्धकथा सांगणे हा व्हिएट थांग न्युएन या लेखकाचा मूळ उद्देश नाही.
नायक थोड्या अनाकलनीय आणि अतर्क्य अशा त्याच्या आयुष्यातल्या घटना आपल्यासमोर उलगडत जातो तेव्हा जगभरातल्या माणसांच्या वागण्यातल्या विसंगतीवर वार करतो. व्हिएटनाम वॉर आणि त्यावर असलेले चित्रपट ही अमेरिकनांची फॅंटसी आहे. माणुसकीला बाजूला ठेऊन अमेरिकन स्वत:ला नायकाची भूमिका देतात. त्यावरच लेखकाचा हा एक प्रहार आहे. काही जणांना ही कादंबरी अमेरिकन आहे असे वाटते, काही जणांना त्यात अमेरिकन विरोधी सुर आहे असे जाणवते. तसेच काही त्याला व्हिएटनामी लेखन मानतील. पण त्यातल्या विसंगती या जगभराच्या आहेत. लेखकाची भाषाशैली, लेखन शैली या दोन्ही मला आवडल्या. त्या ओरिजिनल आहेत. काही वेळा गंभीर, थोड्या कंटाळवाण्याही होतात. पण तरीही त्यातले प्रसंग मात्र उत्सुकता वाढवणारेच आहेत.

---
केवळ ’स्पाय नॉवेल’ (चमचमीत वर्णने) म्हणून ही कादंबरी हातात घेतली असेल तर वाचकाची फसगत होण्याची शक्यता आहे. कादंबरीची व्याप्ती त्याहून खूप जास्त आहे. 

--सोनाली जोशी

 

 

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह