समरस होणे असे साध्य करा

रद्दीच्या दुकानात गठ्ठे असतात. वाचनालयात शेल्फावर पुस्तके असतात. जसा काळ जातो तसे क्षण, गोष्टी, व्यक्ती येतात आणि जातात.  माणसे हे माहिती असूनही तणावाखाली असतात. भूतकाळ मनातून जात नाही. भविष्याचे विचारही टाळता येत नाहीत. अशा वागण्याचा परिणाम हाती घेतलेले काम, नातेसंबंध या सगळ्यावर दिसू लागतो.जो क्षण आहे त्याच्याशी समरस होऊन जगणे हे खरे जगणे! त्याकरता वर्तमानावर लक्ष केंद्रित करा, भूतकाळ व भविष्याचा जास्त विचार करू नका. 
(माईंडफुलनेस) समरस होणे असे साध्य करा

  1. येणा-या दिवसाची उत्सुकतेने आणि कुतूहल मनात ठेऊन सुरूवात करा. एखादी नवी गोष्ट अनुभवतांना, शिकतांना जी भावना मनात असते तीच रोजच्या घटनांकरताही असू द्या.
  2. आपल्याला ताणतणाव, भीती वा अनेक विविध विचारांनी अस्वथ वाटत असते असे अनेकदा होते. ते ताणतणाव कमी करण्याकरता स्व:त:च्या चुका माफ करायला शिका.स्वत:ला त्याबद्द्ल कोसू नका. त्यामुळे वर्तमानावर लक्ष देता येईल.
  3. घडणारी घटना, त्रासदायक भावना कालांतराने भूतकाळात जमा होते. त्याची तीव्रता कमी होते असे कायम मनात ठेवा. त्यामुळे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता येईल.
  4. स्वत:ची काळजी घ्या, आपल्या भावनांची कदर करा पण त्याचा त्रास करून घेऊन नका.
  5. कायम अचूक असणे, सर्व कामे, व्यवसाय वा प्रत्येक कृती योग्य पद्धतीने घडणे अशक्य आहे. कायम परफेक्ट असणे हा एक भ्रम आहे. आपल्याला नेहमी तसे करता येणे शक्य नसते हे समजून घ्या. चुका कमी कशा होतील ते पहा पण चूक झाली म्हणजे सगळे संपले असे कधीही मनात आणू नका. स्वत:चा त्रुटींसकट स्वीकार करा.
  6. आपण सतत स्वत:चा बचाव कसा करता येईल अशा पावित्र्यात असतो. आपल्याला कमी त्रास व्हावा, आपल्या त्रुटी इतरांना दिसू नयेत याकरता प्रयत्नशील असतो. त्याकरता कधी नाटक करतो, कधी सोंग घेतो. पण अशा वागण्याचा मनावर आणि शरीरावर नकळत ताण येत असतो. त्यापेक्षा जसे आहोत तसे जास्तीत जास्त वेळा वागण्याचा प्रयत्न करा. बचावात्मक धोरण बाजूला ठेवले की विश्वास निर्माण होतो. हिंमत वाढते. आपल्याला अनेकांशी जुळवून घेता येते हे सुद्धा लक्षात येईल.
  7. आपल्या आयुष्यात काहीच कायम टिकणारे नाही.अनेक व्यक्ती, अनेक वस्तू, गोष्टी येतात आणि निघून जातात. भावना बदलतात. त्यांची तीव्रताही बदलते. जन्माला आलो तसे एक दिवस आपल्याला जावेच लागणार हे एक सत्य आहे.म्हणूनच प्रत्येक क्षण पूर्णत्वाने अनुभवा. तो क्षण पकडून ठेवता येणार नाही हे लक्षात घ्या. कोणताही काळ आला वा गेला तरी त्याचे दु:ख होणार नाही असे  समरसून जगा.
Category: 

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह