​ऑटिझमची सर्वसामान्य लक्षणे !!! (भाग १)

ऑटिझमची सर्वसामान्य लक्षणे !!! (भाग १)

‘ऑटिझम’ असलेल्या व्यक्तीला दैनंदिन जीवनात कमी-अधिक प्रमाणात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सर्वात मुख्य म्हणजे त्यांच्या मेंदूच्या विशिष्ट रचनेमुळे त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोण हा सर्वसामान्यांपेक्षा बऱ्याच प्रमाणात वेगळा असतो. एखादी गोष्ट समजून घेण्याची क्षमता, विचार करण्याची पद्धत, इतरांशी संवाद साधणे, आपल्या भावना व्यक्त करणे  इत्यादी साध्या-साध्या गोष्टींमध्ये  त्यांना अडचणी येतात.

ह्या अडचणींचे मुख्यत्वे तीन विभाग पडतात. त्यांना “Triad of Impairment” म्हणतात.

१. संभाषण कौशल्याचा अभाव (Impairment in Communication)

२. सामाजिक कौशल्याचा अभाव (Impairment in Socialisation)

३. कल्पनाशक्तीचा अभाव (Impairment in Imagination)

 

१. संभाषण कौशल्याचा अभाव (Impairment in Communication)

  • मुलाचे बोलणे आणि भाषा विकास अजिबात होत नाही अथवा फारच थोडा होतो.

मुलाच्या स्वरयंत्रात कसलाही दोष नसतानाही मूल बोलणे टाळते. कारण मेंदूकडून त्यासंबंधीचे संदेश मुलाच्या वाचा-अवयवांपर्यंत पोचत नाहीत अथवा ते विपर्यस्त (distorted) स्वरूपात पोचतात. कधी कधी मूल फक्त गरजेपुरतेच काही शब्द अथवा सुरुवातीची काही अक्षरे बोलते. कधी कधी तर कोणतीही गोष्ट हवी असेल तरी फक्त एकच शब्द परत परत वापरला जातो. उदा. “दे”,“दी”. कारण, शब्द भांडाराची कमतरता, आणि भाषेचा परिणामकारक वापर करण्याची अक्षमता. सर्वसाधारणपणे शब्दांनी संवाद साधण्यापेक्षा खाणाखुणांनी अथवा समोरच्या व्यक्तीच्या हाताला धरून हव्या असलेल्या गोष्टीकडे त्यांना ओढत नेणे हीच क्रिया अधिक प्रमाणात केली जाते.

  • एखादा शब्द अथवा शब्दसमूह वारंवार उच्चारला जातो (echolalia).

मुलांना कधी कधी एखादा शब्द अथवा शब्दसमूह खूप आवडतो, आणि त्याचा ते वारंवार वापर करतात. त्यांना त्याचा अर्थ कळलेला नसतो पण त्याचे केवळ उच्चारण त्यांना आकर्षित करते. आणि त्याचा वारंवार उच्चार करून ते आनंदित होतात. कधी कधी जाहिरातीतल्या वाक्यांचा पण अगदी त्याच सुरावटीत पुनरुच्चार केला जातो इतकी त्यांना ती ओळ अथवा ते वाक्य आकर्षून घेते, भले त्यांना त्याचा अर्थ समजला असो वा नसो.

  • बोलणे कधीकधी असंबद्ध किंवा विषयाला सोडून असते.

काही मुलांचा भाषा विकास थोड्याफार प्रमाणात झालेला असतो पण त्यांच्या आवडीचे विषय फारच मर्यादित आणि संकुचित असतात. आणि त्यांच्या बोलण्याचा उद्देश केवळ त्यांना आवडणाऱ्या गोष्टींबद्दल त्यांना जी माहिती आहे ते आणि तेच फक्त भरभरून बोलत रहाणे एवढाच असतो. मग समोरच्याला त्या विषयामध्ये स्वारस्य असो अथवा नसो. पण प्रत्यक्ष संवाद साधणे हा उद्देश सहसा नसतो.

  • एखाद्या वस्तू/व्यक्तीकडे अंगुलीनिर्देश करणे अथवा दुसऱ्याच्या अंगुलीनिर्देशाचा अर्थ समजणे अवघड असते.

एखाद्या गोष्टीकडे बोट दाखवून दुसऱ्या व्यक्तीचे त्या गोष्टीकडे लक्ष आकर्षित करून घेणे त्यांना फारसे जमत नाही. ते केवळ नजरेने त्या गोष्टीकडे बघत राहतात आणि त्यांना वाटते कि समोरच्याने देखील ते पाहिले आहे. तसेच एखाद्या व्यक्तीने बोटाच्या इशाऱ्याने त्यांचे एखाद्या विशिष्ट गोष्टीकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला तर मूल गोंधळून जाते. त्याला हे लक्षात येत नाही कि नेमके कुठे बघायचेय? समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे, त्यांच्या हाताकडे की आणखी कुठे.

  • खेळताना कल्पनाशक्तीचा वापर करू न शकणे.

एखादे खेळणे नेमके कसे खेळावे ह्याची त्यांना समज नसते. अथवा त्यांची त्याबद्दलची कल्पना वेगळीच असते. उदा. हातात खेळण्यातली गाडी आल्यावर ती गाडी जोरात पळवायची, इतर गाड्यांबरोबर तिची रेस लावायची, किंवा त्यांची धडकाधडकी करायची असे सर्वसामान्य मुलांचे ठरलेले खेळ न खेळता ती गाडी हातात धरून नुसतीच त्याची चाके फिरवत बसायला काही मुलांना आवडते. कधी कधी तर ते ती गाडी नुसतीच हातात धरून ठेवणे अधिक पसंत करतात. कारण असा कोणताही खेळ खेळताना सर्वसामान्यपणे मुले तो खेळ नेमका कसा खेळायचा ह्यावर आपसात चर्चा करून मग खेळाला सुरुवात करतात. पण ऑटिझम असलेल्या मुलाला असे करणे भाषेच्या अभावामुळे शक्य नसते.

  • शब्दांचा शब्दशः अर्थ घेणे. तसेच विनोद, कोडी अथवा उपहासाची समज नसणे.

त्यांची भाषा ही बहुतेकवेळा बऱ्याच प्रमाणात अविकसित असल्यामुळे शब्दांचा शब्दशः अर्थ घेण्याची त्यांची प्रवृत्ती असते. उपमा, प्रतीकात्मक शब्द, विनोद, उपहास, शब्दकोडी असा उच्च प्रतीच्या भाषेचा वापर करणे अथवा कुणी तसा वापर केल्यास तो समजून येणे हे त्यांच्यासाठी फारच अवघड असते.

  • भावनांचे भाषेच्या सहाय्याने उचित प्रकटीकरण करणे तसेच इतरांच्या भावना ओळखून त्यानुसार आपले वर्तन करणे त्यांच्यासाठी फारच अवघड असते.

त्यांच्या मेंदूमधील भावना नियंत्रित करणारे केंद्र हे ऑटिझममुळे प्रभावित (affected) झालेले असल्यामुळे त्यांना त्यांच्या नेमक्या भावना लक्षात येत नाहीत तसेच त्या भावनांचे नियंत्रण करणे हे देखील त्यांच्यासाठी फारच अवघड असते. तशात भाषेचा पुरेसा विकास न झाल्यामुळे त्यांच्या राग, आनंद, दुःख इत्यादी भावनांचे प्रकटीकरण बऱ्याचदा शब्दांत व्यक्त होण्यापेक्षा आरडाओरडा करणे, रडणे, वस्तूंची फेकाफेक करणे, दुसऱ्याला मारणे अथवा स्वतःला इजा पोचवणे अशा आक्रमक स्वरूपात होऊ शकते. तसेच इतरांच्या भावनाही बहुतेक वेळा त्यांच्या आकलन शक्तीच्या पलीकडच्या असतात. त्यामुळे प्रसंगी ते स्वार्थी अथवा संवेदनाशून्य भासतात.

आपल्या लक्षात आलेच असेल की संभाषणासारख्या रोजच्या जीवनात अत्यंत आवश्यक अशा गोष्टीमध्ये देखील  ऑटिझममुळे एखाद्या व्यक्तीला किती प्रकारच्या अडचणी येत असतील! अर्थात ह्यावर ‘तीव्र स्वरूपाचे प्रशिक्षण, हाच केवळ परिणामकारक उपाय आहे. आणि तो जेवढ्या लवकर सुरु होईल तितकेच त्या ऑटिझम असलेल्या मुलाला त्याच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करणे सोपे जाईल.

ऑटिझमविषयीचा या आधीचा भाग येथे वाचता येईल.

पुढील भागात आपण सामाजिक कौशल्याचा अभाव (Impairment in Socialisation) याविषयी जाणून घेऊ.

-मेधा पुजारी

"Kaizen" Intervention Center for Autism, Pune

       Mobile: 7798895363

email: kaizenforautism@gmail.com

About the Author

Medha Pujari